सोन्याची साखळी-२

जवळपास बाग असावी असे त्या मुलीला वाटले. ती आईला म्हणाली, ' आई, तू येथे बैस. कोठे तरी जवळच बाग असावी. फुलांचा वास येत आहे. रातराणीचा, निशिगंधाचा, प्राजक्ताच्या कळ्यांचा वास येत आहे.' असे म्हणून ती मुलगी पाणी शोधावयास निघाली.

ती प्रधानाच्या मुलाची गावाबाहेरची बाग होती. केवढी थोरली अफाट बाग होती. एकदा आत मनुष्य शिरला की बाहेर निघणे कठीण. रात्रीच्या वेळी कोणी अनोळखी नवखा मनुष्य बागेत शिरला तर तो बाहेर पडणे शक्य होत नसे. उजाडले म्हणजे तो बाहेर पडे. ती मुलगी त्या बागेत शिरली. पाणी शोधीत चालली. शेवटी एका करंज्यांजवळ आली. रात्रीची वेळ होती. कर्दळीची पाने तिने तोडली, परंतु त्या झोपलेल्या पानांना तोडण्याआधी तिने नमस्कार केला व क्षमा मागितली. त्या पानांचा द्रोण करून तो पाण्याने भरून घेतला व ती निघाली. परंतु तिला रस्ता सापडेना. तिला बागेतून बाहेर पडता येईना. घुटमळत राहिली, हिंडत राहिली. 'माझी आई तहानलेली असेल, पाणी पाणी म्हणून प्राण सोडील' असे म्हणून ती रडे व भिरीभिरी हिंडे, परंतु रस्ता सापडेना.
आता बरीच रात्र झाली होती. प्रधानाच मुलगा गावाला गेला होता. आज राजपुत्र एकटाच होता. तो रात्री जिवंत झाला व बागेत हिंडू लागला. हिंडता हिंडता त्या मुलीची व त्याची गाठ पडली. ती दोघे एकमेकांकडे पाहतं राहिली.  'माझी आई' एवढा एकच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला. त्या राजपुत्राने सारी चौकशी केली. तो म्हणाला, 'चल, मी तुला रस्ता दाखवतो.' किती तरी दिवसांत राजपुत्र बागेच्या बाहेर पडला नव्हता. दोघेजण बागेच्या बाहेर आली व आईला शोधीत फिरू लागली. सापडली एकदाची आई.

'आई, हे पाहा पाणी, आई-' तिने हाक मारली. आईचे डोके तिने मांडीवर घेतले. आईने डोळे उघडले. 'बाळ, माझा प्राण वाचत नाही. घाल शेवटचे पाणी. तुझ्या हातची गंगा. तुझे कसे होईल ?' असे म्हणून म्हातारी मांडीवर पडली. तो राजपुत्र म्हणाला, 'तुमच्या मुलीची काळजी करू नका. मी राजपुत्र आहे. मी तिला माझी बायको करीन. आमचे हात एकमेकांच्या हातांत द्या व आम्हा दोघांस आशीर्वाद द्या.'
म्हातारीने थंडगार होत जाणाऱ्या हातांनी आपल्या मुलीचा हात राजपुत्राच्या हातात दिला. झाडावरून फुले डोक्यावर पडली. म्हातारीने दोघांच्या डोक्यावर ते सुकलेले परंतु प्रेमाने भरलेले हात ठेवले व म्हणाली, 'देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो ! सुखात ठेवो ! एकमेकांस अंतर देऊ नका; कोणाचे वाईट करू नका. वाईट चिंतू नका. कोणाचा हेवादावा नको, मत्सर नको. मी आणखी काय सांगू ? माझ्याने बोलवत नाही. आता देवाचे नाव घेत सुखाने मरू दे.' असे म्हणून ती 'राम राम' म्हणू लागली.
म्हातारीचा प्राण गेला. त्या दोघांनी तो मृतदेह बागेत नेला व त्याला अग्नी दिला. दोघेजण दमली होती. ती मुलगी रडत होती. राजपुत्र तिचे सांत्वन करीत होता. हातपाय धुऊन दोघे त्या घरात आली. राजपुत्राने तिला खाण्याचा थोडा आग्रह केला. तिने दोन फळे खाल्ली. नंतर राजपुत्राने तिला सारी हकीगत सांगितली, 'मी सकाळी मरून पडेन, परंतु रात्री जागा होईन. काही काळजी करू नकोस. शेवटी चांगले होईल.' असे म्हणाला.

आपल्या नशिबी काय आहे ते तिला आठवले. 'प्रेताशी लग्न लागणार' हे शब्द तिला आठवले. काय काय होईल ते खरे. आईने हात हातांत दिला, आता यांचे पाय सोडून जावयाचे नाही, आता जन्माच्या गाठी पडल्या;' असे ती मनात म्हणाली.
सकाळी नित्याप्रमाणे राजपुत्र मरून पडला, त्याच्याजवळ ती मुलगी, ती त्याची पत्नी बसून राहिली. ती त्याच्या अंगावर माशी बसू देत नसे. वारा घाली. दिवसभर तिने खाल्ले नाही. रामनामाचा जप करीत पतीजवळ बसून राहिली. रात्रीची वेळ झाली. तिकडे त्या सावत्र राणीची झोपायची वेळ झाले. तिने सोन्याची साखळी गळ्यातून काढून उशीखाली ठेवताच, इकडे राजपुत्र जागा झाला. तो जागा होताच त्या मुलीच्या जिवात जीव आला. दोघांना आनंद झाला. दोघांनी हौदावर जाऊन स्नान केले. त्या बागेत एक शिवालय होते. 'चला, तेथे जाऊन आपण पूजा करू. रोज रात्री आपण त्या मृत्युंजयाची पूजा करीत जाऊ.' असे ती त्याला म्हणाली. दोघांनी महादेवाची पूजा केली. घरात जाऊन दोघांनी फलाहार केला. राजपुत्र म्हणाला, 'तू दिवसा खात जा, असा उपवास नको करूस.' ती म्हणाली, 'तुमच्याशिवाय मी कशी खाऊ ? सीता, सावित्री, द्रौपदी, दमयंती, यांच्या कथा मी उगाच का ऐकल्या ? असे मला कसे सांगता ? स्त्रियांचे हृदय तुम्ही ओळखीत नाही का ? तुमच्याशिवाय जेवणे म्हणजे ते विष आहे. त्यात मला आनंद नाही. दिवसा तुमच्याजवळ 'राम राम' म्हणत बसणे तेच खरे आपणा दोघांना जेवण.' आपल्या पत्नीचे ते थोर शब्द ऐकून राजपुत्राला कृतार्थ वाटले. आपल्याला देवाने फार थोर मनाची पत्नी दिली म्हणून त्याने देवाचे आभार मानले.

प्रधानाचा मुलगा गावाहून आला. आपल्या मित्राला भेटण्यासाठी तो रात्री आला. तो येऊन पाहतो तो बागेत राजपुत्र कोणा स्त्रीबरोबर हिंडत आहे ! त्याला आश्चर्य वाटले. राजपुत्राने त्याला सारी कथा सांगितली. प्रधानाच्या मुलास आनंद झाला. तो म्हणाला, 'आता मी जरी गावाला गेलो तरी तू एकटा राहणार नाहीस. वहिनींना दुपारी जेवायला पाठवत जाईन.' ती थोर मुलगी म्हणाली, 'भावोजी, मी दिवसा खाणार नाही. रोज रात्री बरोबरच आम्ही पारणे सोडीत जाऊ. तुम्ही येथेच स्वयंपाकाचे आणून ठेवा. लाकूडफाटे आणून ठेवा. मी माझ्या हाताने रसोई करीन. माझ्या हाताने यांना वाढीन. त्यात खरा आनंद आहे. काही तरी सेवा मला घडू दे.'
प्रधानाच्या मुलाने त्याप्रमाणे सारी व्यवस्था केली. बाहेर रात्र पडली म्हणजे ती मुलगी चूल पेटवी व उत्कृष्ट स्वयंपाक करून ठेवी. आपला पतिदेव केव्हा जागा होईल, त्याला आपण नैवेद्य केव्हा दाखवू, याची ती वाट पाहतं बसे. तो उठला म्हणजे उभयंता स्नान करीत. देवाची पूजा करीत व केळीच्या पानावर जेवत. जेवण झाल्यावर  ती भांडी घाशी व राजपुत्र विसळू लागे. ती नको नको म्हणे, परंतु तो ऐकत नसे. एकमेकांना मदत करावी असे तो म्हणे.
असे कित्येक दिवस गेले. त्या बागेत राजपुत्राला एक मुलगा झाला. दिवसा मुलाला खेळवण्यात त्याच्या पत्नीचा आता वेळ जाई. तेथे एक सुंदर पाळणा टांगला होता. रात्री राजपुत्र मुलाला खेळवी, नाचवी. परंतु असे या बागेत किती दिवस राहावयाचे ? राजाला या गोष्टी माहीत नव्हत्या. प्रधानाच्या मुलाशिवाय कोणालाही हे रहस्य माहीत नव्हत. या रहस्याचा उलगडा कसा व्हावयाचा ?

प्रधानाचा मुलगा स्वस्थ बसला नव्हता. त्याने कित्येक दासींना त्या सावत्र राणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. एक दिवस सावत्र राणीला जरा बरे वाटत नव्हते. रात्री एक दासी डोके चेपीत बसली होती. राणीला झोप येईना. शेवटी तिला एकदम आठवण झाली.
'खरेच, आज साखळी काढून ठेवली नाही.' असे म्हणून तिने गळ्यातील ती सोन्याची साखळी उशीखाली काढून ठेवले. दासीने विचारले, 'काढूनशी ठेवलीत ?' राणी म्हणाली, 'ती काढून ठेवली नाही तरे ती बोचते व झोप येत नाही. मी रोज ती काढून ठेवते. उशीखाली ठेवते. एक क्षणभरही या साखळीला मी विसंबत नाही.'
दासीला ती गोष्ट महत्त्वाची वाटली. तिने ते गोष्ट प्रधानाच्या मुलास सांगितली. प्रधानाच्या मुलाच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. राजपुत्राने ज्या सोन्याच्या साखळी बद्दल सांगितले, तेच ही याबद्दल त्याला शंका राहिली नाही. ते सोन्याची साखळी कशी मिळवावी ते त्याला समजेना.
प्रधानपुत्राने ती गोष्ट राजपुत्र व त्याची बायको यांना सांगितली. राजपुत्राच्या बायकोने धाडस करावयाचे ठरविले. आपल्या पतीचे प्राण कायमचे आपणच परत आणावे असे तिने नक्की केले.

सकाळची वेळ होती. राजपुत्राच्या बायकोने आपले पहिले फाटके लुगडे काढले. ती ते नेसली. भिकारणीच्या वेषाने आपल्या मुलास कडेवर घेऊन ती निघाली. तिचे रूप राणीलाही लाजवील असे होते; परंतु तिची वस्त्रे भिकारणीला शोभतील अशी होती. हिंडता हिंडता ती राजवाड्यात आली. सावत्र आई अंगणात होती.  ती भिकारीण राणीला म्हणाली, 'राणी, राणी, मला नाही कोणी. मला उद्योगधंदा द्या, मी गरीब आहे. तुम्ही सांगाल ते काम करीन. मी तुमचे केस विंचरून देईन. हलक्या हाताने वेणी घालीन.' राणीला आश्चर्य वाटले. त्या भिकारणीचे रूप पाहून तिला तिचा मत्सर वाटला. अशी सुंदर स्त्री आपली दासी असावी असे तिने ठरवले.
'त्या पाण्याने हातपाय धुऊन ये व माझे केस विंचर बघू.' असे सावत्र राणी म्हणाली. त्या वेषधारी भिकारणीने तसे केले. हलक्या हाताने ती राणीचे केस विंचरू लागली. एक केस तडतडला नाही. इतक्यात मुलगा रडू लागला. कोण रडते म्हणून दुसरी राणी पाहावयास आली. त्या राणीला पाहताच सावत्र राणी म्हणाली, 'तुमचा मुलगा नाही आला. तो या जन्मी नाही यावयाचा. काय मेली आशा तरी ! म्हणे माझा मुलगा येईल, माझा मुलगा येईल !'
त्या भिकारणीला राजपुत्राचे खरी आई कोण हे लगेच समजले. आपल्या पतीचा चेहरा व त्या राणीचा चेहरा यांत तिला साम्य दिसू लागले. आपल्या सासूच्या पाया पडावे असे तिला वाटले; परंतु तिने धीर धरला. ती राणी त्या रडणाऱ्या मुलाजवळ आली व म्हणाली, 'किती गोड मुलगा आहे ! माझा बाळ देखील लहानपणी असा दिसे; परंतु दैवाला नाही पाहवले. देव मला मेलीला नेता तर !  परंतु सोन्यासारखी मुले नेतो आणि आम्हाला रडायला ठेवतो ! द्या, मी जरा घेत्ये त्याला.'
'काही नको घ्यायला. ती माझी दासी आहे आणी तूही खबरदार त्यांच्याजवळ बोलशील तर. तुला कामावर ठेवणार नाही.' सावत्र राणीचे शब्द ऐकून ती थोर राणी निघून गेली. ती वेषधारी भिकारीण मुलग्याला उगी करून  'उद्या येईन'असे सांगून गेली.

रात्री राजपुत्राला सारी वार्ता तिने सांगितली. लवकरच तुम्हाला मी मुक्त करीन असे ती म्हणाली.
तो मुलगा आता चारपाच वर्षांचा झाला होता. त्याला सर्व समजू लागले होते. एके दिवशी मुलाला आई म्हणाली, ' बाळ आज त्या राणीकडे आपण जाऊ, त्या वेळेस तेथे तू मोठ्याने रडू लाग. मी किती समजावले तरी उगी राहू नकोस. मी तुला विचारीन, 'का रे रडतोस ?' तू राणेच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीकडे बोट कर. ती सोन्याची साखळी मिळेल, तेव्हाच रडावयाचा थांब.'
मुलाला असे पढवून त्याला घेऊन रोजच्याप्रमाणे ती कामाला आली. सावत्र राणीचे वेणीफणी ती करू लागली. जवळचं बाळ खेळत होता. तो एकाएकी रडू लागला. राणी म्हणाली, ' त्याला आधी उगी कर, वेणीफणी मागून कर.' काही केल्या बाळ रडायचा थांबेना.
त्याची आई त्याला म्हणाली, 'का रे असा ओक्साबोक्शी रडतोस ? काय झाले ? काय हवे तरी ?' मुलाने राणीच्या गळ्यातील साखळीकडे बोट केले.
राणी म्हणाली, 'लबाडा, सोन्याची साखळी हवी का ? माझ्या पोटी का आला नाहीस ? देव भिकाऱ्यांना खंडीभर पोरे देईल. परंतु श्रीमंताला देणार नाही.' त्या मुलाची आई त्याला म्हणाली, 'माझ्या पोटी कशाला आलास ? पुढच्या जन्मी राजाराणीच्या -पोटी जन्म घे व सोन्यामोत्यांचे दागिने घाल, उगी.'
परंतु मुलाचे रडणे थांबेना. शेवटी राणीला त्या लेकराची कीव आली, 'घाल त्याच्या गळ्यात थोडा वेळ. जरा थांबला रडायचा म्हणजे निजेल. मग हळूच ये.' असे राणी म्हणाली. सोन्याची साखळी मिळताच बाळ रडायचा थांबला. आईच्या मांडीवर तो झोपी गेला. ती राजपुत्राची बायको राणीला म्हणाली, 'मी याला घरी निजवून येते. हळूच तुमची साखळी काढून आणून येथे.' राणी म्हणाली, 'जा, परंतु साखळी लवकर घेऊन ये. ती साखळी माझा जीव की प्राण आहे. त्या साखळीला मी कधी विसंबत नाही. फक्त निजताना उशाखाली ठेवते. नाही तर अक्षपी गळ्यात असते.'

ती वेषधारी दासी मुलाला घेऊन गेली. ती निघाली आणि बागेत आली; तेथे येऊन पाहते तो राजपुत्र जिवंत झालेला. दोघांना फार आनंद झाला. मुलाच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीकडे बोट करून ती म्हणाली, ' हा पाहा तुमचा प्राण. हा मी परत आणला आहे.' राजपुत्र म्हणाला, 'आईने सांगितली होती, तीच ही साखळी.'
इतक्यात प्रधानाचा मुलगा पण तेथे आला. डाव सिद्धीस गेला हे पाहून त्याला धन्यता वाटली. तो म्हणाला, 'आता मी राजाला जाऊन सांगतो. तुम्हांस हत्तीवरून मिरवत नेऊ.'
प्रधानाचा मुलगा राजाकडे गेला. त्याने सारे वर्तमान सांगितले. राजाला आश्चर्यं वाटले. केव्हा मुलाला, सुनेला, नातवाला पाहीन असे त्याला झाले. राजपुत्राच्या आईस कळले. राणी धावतच आली. ती म्हणाली, 'त्या लहान मुलास पाहून मला माझ्या मुलाची आठवण होई ती उगीच नसे होत. तो माझाच नातू. माझे हृदय मला सांगत असे. हृदयाचा सूर खोटा कसा ठरेल ! चला, आपण त्याला डोळेभर पाहू. पोटाशी धरू. '

हा हा म्हणता बातमी शहरात पसरली. लाखो लोक निघाले. हत्ती, घोडे, रथ, चतुरंग सैन्य निघाले. हत्तीवर सोन्याची अंबारी ठेवली होती. वाद्ये वाजू लागली. राजा व राणी बागेजवळ आली. सून पाया पडली. त्यांनी तिला आशीर्वाद दिले. मुलगा भेटला. नातवाला जवळ घेऊन, त्याला आजीने कुरवाळले. राजाराणीचा आनंद गगनात मावेना. मिरवीत मिरवीत सारे राजवाड्यात आले.
राजाने मोठा सोहळा केला. गरीबांना अन्नदान, वस्त्रदान झाले, जो जे मागेल ते त्याला मिळाले. सारे सुखी होते. एकच प्राणी दु:खी होता व तो म्हणजे ती सावत्र माता. राजा तिचे नाक कान कापून हाकलून देणार होता; परंतु राजाचा मुलगा उदार होता. त्याने तसे होऊ दिले नाही. 'दया करणे हाच थोर धर्म.' असे तो म्हणाला.

तो सावत्र आईच्या पाया पडून म्हणाला. 'माझे प्राण तुझ्या गळ्यात होते. मी तुझ्या गळ्यातील ताईत. झाले गेले विसर व मजवर मुलाप्रमाणे प्रेम कर. मी माझ्या आईचा तसाच तुझा.' सावत्र आईचे हृदय भरून आले व ती म्हणाली, 'आज पासून मी तुझी खरी आई झाल्ये.'

                                                   शेवट गोड झाला. 
                                                 सर्वांना आनंद झाला. 
                                               तसा तुम्हा आम्हांस होवो.  
                                                   
                                               ***************

लेखक : साने गुरुजी
कॉपीराइट्स : केशव भिकाजी ढवळे.