तीन मडकी - २

'आता किती वेळ ते मडके हालवीत घुमणार ? ठेवा खाली. दमले, घामाघूम झालेत.' सावित्रीबाई रागातही हसून म्हणाली.
परंतु भिकंभट हसला नाही. त्या वाण्याने आपल्याला फसवले असे त्याला वाटले. ते मडके त्याने हातात घेऊन तो तसाच घराबाहेर पडला. सावित्रीबाई रडणाऱ्या मुलांना समजावीत बसली.

                                                 
अंधारातून भिकंभट जात होता. उजाडते न उजाडते तोच तो वाणीदादाच्या घरासमोर दत्त म्हणून उभा राहिला. 'वाणीदादा, माझे मडके तुम्ही लांबवलेत. हे नव्हे माझे मडके. तुम्ही अदलाबदल केलीत. होय ना ? द्या माझे मडके.' असे तो ब्राह्मण म्हणाला.
वाणीदादा संतापून भिकंभटाच्या अंगावर धावून गेला. तो रागाने म्हणाला, 'मला काय करायचे तुझे मडके ? मला का भीक लागली आहे ? मी का चोर आहे ? नीघ येथून. नाहीतर थोबाड रंगवीन. नीघ.'
ती बाचाबाची ऐकून शेजारची मंडळीही तेथे आली. त्या सर्वांनी भिकंभटाची हुर्यो केली. त्याला हाकलून लावले. बिचारा भिकंभट पुन्हा रडत निघाला. रानात जाऊन त्या पूर्वीच्याच झाडाखाली रडत बसला.
तिकडून शंकर पार्वती जात होती. त्याचे रडणे त्यांच्या कानी पडले. पार्वती शंकरास म्हणाली, 'देवा कोणी तरी दु:खीकष्टी प्राणी रडत आहे. चला. आपण पाहू.' शंकर म्हणाले, 'पुरे झाले तुझे. या जगाला रडण्याशिवाय धंदा नाही. या रडारडीला मी तरी कंटाळलो आता आणि आपल्याजवळ तरी असे काय उरले आहे ?' पार्वती म्हणाली, 'अजून दोन मडकी शिल्लक आहेत. तोपर्यंत काय द्यायचे ही चिंता नको. चला जाऊ त्या दु:खी प्राण्याकडे.'
ती त्या झाडापाशी आली. तो तोच पूर्वीचा ब्राह्मण. शंकरांनी विचारले, 'का रडतोस, काय झाले ?' भिकंभट म्हणाला, 'काय सांगू महाराज ? त्या एका वाणीदादाकडे मी मडके ठेवून अंघोळीला गेलो. अंघोळ केल्यावर मडके घेऊन घरी गेलो. 'पड पड' म्हणून मडके हालविले; परंतु एक दाणा पडेल तर शपथ. त्या वाण्याने मडके बदलले असावे अशी शंका येऊन मी त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले; परंतु तो माझ्या अंगावर धावून आला. शेजारीपाजारी त्याच्याच बाजूचे. खऱ्याची दुनिया नाही. मी गरीब, एकटा पडलो. आलो पुन्हा या झाडाखाली व बसलो रडत.'
भगवान शंकर म्हणाले, 'हे दुसरे मडके घे.'
भिकंभटाने विचारले, 'यातून काय बाहेर पडते ?'
शंकर म्हणाले, 'यातून पड पड म्हटले की राक्षस बाहेर पडतात. 'शिव शिव' म्हटले की ते नाहीसे होतात. घे हे मडके व त्या वाण्याची खोड मोड.' ब्राह्मणाच्या सारे ध्यानात आले. नमस्कार करून व ते मडके घेऊन ब्राह्मण निघाला.

तो त्या वाण्याकडे आला व म्हणाला, 'वाणीदादा, वाणीदादा, सापडले हो माझे मडके. उगीच तुमच्यावर आळ घेतला. झाले गेले विसरून जा. हे माझे मडके सांभाळा. मी नदीवरून अंघोळ करून येतो. सांभाळा हां.'
ब्राह्मण नदीवर गेला. त्या मडक्यात काय असावे हे पाहण्याच्या निमित्ताने वाणीदादा उठला. त्याने ते मडके हालविले, 'पड पड' म्हटले तो एकदम अक्राळविक्राळ राक्षस बाहेर पडले. त्यांच्या हातात सोटे होते. गदा होत्या, त्या वाण्याला ते राक्षस बदडू लागले. वाणीदादा ओरडू लागला. त्याच्या आरोळ्या ऐकून शेजारीपाजारी धावले. त्यांनाही राक्षसांनी भरपूर प्रसाद दिला.
'मेलो, मेलो, ब्राह्मणा धाव ! असे सारे ओरडू लागले. पाठीवर तडाखे बसत होते. सारे चांगले झोडपले गेले. भिकंभट सावकाश येत होता.
'अरे ब्राह्मणा, हे राक्षस आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत असे दिसते. सांग यांना काही. वाचव आमचे प्राण- ' सारे गयावया करीत म्हणू लागले.
भिकंभट वाणीदादाला म्हणाला, 'वाणीदादा, माझे पहिले मडके मुकाट्याने दे. तरच हे राक्षस नाहीसे होतील.'
वाणीदादाची तर कणीक चांगलीच तिंबली गेली होती. तो पटकन घरात गेला व ते मडके घेऊन बाहेर आला. ब्राह्मणाने ते मडके घेतले. व नंतर 'शिव शिव' 'शिव शिव' असे म्हणताच ते राक्षस अदृश्य झाले.

भिकंभट आता ती दोन मडकी घेऊन निघाले. केव्हा एकदा घरी जाऊ असे त्यांना झाले होते. आले एकदाचे घर. दोन हातांत दोन मडकी घेऊन आलेल्या आपल्या नवऱ्याचा तो अवतार पाहून सावित्रीबाईंना हसू आले. भिकंभट म्हणाले, 'हसू नको, पोती आण. डाळेमुरमुऱ्यांनी भरून देतो.' 'पड पड' असे म्हणत मडके हालवू लागले. काय आश्चर्य ! डाळेमुरमुऱ्यांची धार लागली. पोराबाळांना आनंद झाला. मुठी भरभरून ते खाऊ लागली. भिकंभट बायकोला म्हणाले, 'तू सुद्धा खाऊन बघ. अमृतासारखी चव आहे.' तिने दोन दाणे तोंडात टाकले व मग ती म्हणाली, 'खरेच हो, डाळेमुरमुरे असे कोठेही कधी खाल्ले नाहीत.'
भिकंभटाने भडभुंज्याचे दुकान थाटले. जो तो त्याच्या दुकानावरून माल नेऊ लागला. त्याच्या दुकानावर ही गर्दी. भिकंभट श्रीमंत होऊ लागला. तो शेतीवाडी विकत घेऊ लागला. सावकारी करू लागला. त्याने बायकोला, मुलाबाळांना दागदागिने केले. कशाला जणू तोटा नव्हता.

एके दिवशी भिकंभट खेड्यावर गेले होते. आज मडके कोण हालविणारं ? त्यांच्या मुलांत भांडण सुरू झाले. एक म्हणे मी हालवीन. दुसरा म्हणे मी हालवीन. झोंबाझोंबी सुरू झाली. शेवटी ते मडके जमिनीवर पडले व त्याचे झाले तुकडे. ती मुले रडू लागली. तिकडून आई आली व तिनेही त्यांना मार मार मारले, 'मस्ती आली होती मेल्यांना, 'खाल काय आता भुरी ?' असे ती ओरडली.
भिकंभट घरी आले. त्यांना सर्व प्रकार कळला. सावित्रीबाई म्हणाली, 'पुन्हा एकदा बसा ना झाडाखाली त्या रडत. मिळाले एखादे मडके तर बरे झाले. नाही मिळाले तर हे दागदागिने मोडू व पोटाला खाऊ.'
बायकोचा हा पोक्त सल्ला भिकंभटाने ऐकला. तो पुन्हा निघाला. व त्या झाडाखाली रानात रडत बसला. तिकडून शंकर पार्वती जात होती. 'देवा, कोणी तरी रडते आहे, चला आपण पाहू.' शंकर म्हणाले, 'शेवटचे मडके आज देऊन टाकू. पुन्हा कोणाकडे जायला नको. कोण रडतो पाहायला नको.' ती दोघे त्या झाडाजवळ आही तो तोच ब्राह्मण,
'काय रे ब्राह्मणा, आता काय झाले ?'
'मुलांच्या भांडणात मडके फुटले, मी फुटक्याच नशिबाचा जणू आहे. काय करू महाराज ?'
शंकर म्हणाले, 'आता हे शेवटचे मडके देतो. पुन्हा रडत येऊ नकोस. आलास तरी उपयोग नाही.'
भिकंभटाने विचारले, 'या मडक्यातून काय बाहेर पडते ?'
भगवान म्हणाले, 'पाहिजे असेल ते पक्वान्न हवे असेल तितके बाहेर पडते.'
भिकंभट आनंदला. नमस्कार करून ते तिसरे मडके घेऊन घरी आला. बायको वाट पाहतं होती. नवीन मडके पाहून तिलाही आनंद झाला.
'यातून काय पडते बाहेर ?' तिने विचारले.
'पातेले घेऊन ये.' तो म्हणाला.
सावित्रीबाई पातेले घेऊन आल्या. भिकंभटाने मडके हालवून 'श्रीखंड' असे म्हटले. तो काय आश्चर्य ! घट्ट सुंदर पिवळे धमक श्रीखंड पडू लागले. मुलाबाळांनी, सर्वांनी पोटभर खाल्ले.
भिकंभटाने आता हलवायाचे दुकान घातले. पेढे, बर्फी, श्रीखंड, बासुंदी, पुरी, जिलबी, लाडू, रसगुल्ले सारे पदार्थ तेथे असत. सारी दुनिया त्याच्याकडून माल घेई. सणवार आला की भिकंभटाच्या दुकानावर गर्दी असायची. भिकंभटाकडे माल मिळतो तसा कोठेही मिळत नाही अशी दुकानाची कीर्ती पसरली.

त्या गावात धनमल म्हणून एक श्रीमंत मनुष्य होता. तो कारस्थानी होता. युक्तिबाज होता. भिकंभटाकडील या श्रीखंडबासुंदीच्या मडक्याची गोष्ट त्याच्या कानावर आली. भटजीकडील हे मडके लांबविण्याचा त्याने विचार केला.
एकदा काय झाले, त्याचा जावई आला. बऱ्याच दिवसांनी आलेल्या जावईबोवांस थाटाची मेजवानी द्यावी असे धनमल याला वाटले. सर्व तयारी झाली. धनमल भिकंभटाकडे जाऊन म्हणाला, 'जावयाला पंगत आहे. तुम्ही उत्कृष्ट पक्वान्ने पुरवाल काय ?' भिकंभट म्हणाला, 'हो.' त्यावर पुन्हा धनमल म्हणाला, 'ताजा ताजा माल तेथल्या तेथे मिळावा म्हणून तुम्ही आमच्याकडे या व पक्वान्नांचा पुरवठा करा.' भिकंभट म्हणाला, 'एका अटीवर मी तुमच्या घरी येईन. मला स्वतंत्र खोली दिली पाहिजे. खोलीत कोणी येता कामा नये. मी आतून पातेली, पराती भरभरून देत जाईन.' धनमल म्हणाला, 'ठीक. तशी व्यवस्था करू.'
मेजवानीचा दिवस उजाडला. गावातील मोठमोठ्यांस आमंत्रण देण्यात आले. जेवणाची तयारी झाली, कण्यारांगोळ्या घालण्यात आल्या. चंदनाचे पाट मांडले गेले. सुंदर केळीची पाने होती. जावयासाठी सुंदर असे चांदीचे ताट होते. अगरबत्त्यांचा घमघमाट सुटला होता.
अगदी आयत्या वेळेस भिकंभट फडक्यात मडके गुंडाळून घेऊन धनमलच्या घरी आला. त्याला खोली दाखविण्यात आली. तो त्या खोलीत गेला. भरपूर माल पाच मिनिटांत त्याने दिला. बाहेर पंगत बसली. मंडळी जेवू लागली.
धनमलने काय केले, वाढायला भरपूर पक्वान्ने आहेत असे पाहून ज्या खोलीत ब्राह्मण होता तिला एकदम त्याने बाहेरून कडी लावून घेतली. ब्राह्मण ओरडू लागला, मला शौचास जावयाचे आहे, मला लघवीस जावयाचे आहे, दार उघडा. असे ओरडू लागला. कोणी दार उघडीना.
धनमल येऊन म्हणाला, 'भटजीमहाराज, आता खोलीतच मरा. मडक्यातील पक्वान्न खा. पाणी मिळणार नाही. बाहेर पडता येणार नाही. जर खोलीतून बाहेर पडायचे असेल तर ते मडके मला दिले पाहिजे.'
काय करणार भिकंभट ? मडके द्यावयास तो तयार झाला. धनमलने मडके घेऊन त्याला दार उघडले. ब्राह्मण रडत घरी गेला. इकडी जेवणे चालली होती. धनमल पंगतीत जाऊन म्हणाला, 'स्वस्थ होऊ दे भोजन. आता आणखी दुसरी पक्वान्ने लवकरच येतील.' त्या मडक्यातून तऱ्हेतऱ्हेची ताजी ताजी पक्वान्ने बाहेर पाडण्यात येऊ लागली. मंडळी संतुष्ट होत होती.

इतक्यात भिकंभट ते राक्षसाचे मडके घेऊन धनमलकडे आला. ते मडके इतके दिवस माळ्यावर नीट ठेवण्यात आले होते. ब्राह्मण धनमलला म्हणाला, 'एक मडके घेतलेस, आता हेही घे. यातून तर अधिकच सुंदर पदार्थ बाहेर पडतात. घ्या हे. मला काही नको.'
धनमल म्हणाला, 'आण इकडे. नको तर नको.' ब्राह्मण मडके देऊन निघून गेला. धनमल पुन्हा पंक्तीत जाऊन म्हणाला, 'स्वस्थ जेवा. आता आणखी निराळेच पदार्थ येणार आहेत. हे पदार्थ कधी बाधणार नाहीत. खायला संकोच नका करू.
धनमलने ते नवीन मडके हालवले. तो काय ! त्यातून सोटे घेतलेले राक्षस बाहेर पडले. ते भयंकर राक्षस सर्वांना बदडीत सुटले. जावईबोवांच्या पाठीत चांगलाच तडाखा बसला. सासरे धनमल तर ओरडू लागले, 'मेलो मेलो' म्हणू लागले.  सर्वांची त्रेधातिरपीट. पोटे फार भरलेली म्हणून न पटकन उठता येई न पळता येई. नेसूचे सावरणेही मुष्किल झाले.
'अरे त्या ब्राह्मणाला बोलवा. त्याला बोलवा.' असे धनमल सांगू लागला. कोणी तरी ब्राह्मणाला सारे जाऊन सांगितले. ब्राह्मण तेथे आला. तो धनमल यास म्हणाला, 'माझे पहिले मडके दे म्हणजे राक्षस नाहीसे करतो.' ते पहिले मडके देण्यात आले. भिकंभटाने 'शिव शिव, शिव शिव' असे म्हटले. तत्काळ राक्षस अदृश्य झाले. सर्वांचे जीव खाली पडले.
भिकंभट दोन्ही मडकी घेऊन घरी आला. पुनश्च त्याच्या वाटेला कोणी गेले नाही.
भिकंभट, सावित्रीबाई, त्यांची मुलेबाळे सारे सुखात राहिली.

                                                   संपली आमची कथा
                                                  सरो ऐकणाराची व्यथा
                            **********************************
लेखक: साने गुरुजी.
कॉपीराइट्स: केशव भिकाजी ढवळे.