जाई-१

रामजी व राघो दोघे जीवश्चकंठश्च स्नेही, जणू एका घोटाने पाणी पीत, एका प्राणाने जगत. दिसायला शरीरे दोन, परंतु त्यांचे मन एक होते, हृदय एक होते. गावातील सर्वांना त्यांच्या मैत्रीचे कौतुक वाटे.
परंतु काही काही लोकांना ही अभंग मैत्री बघवत नसे. त्या दोघांचे भांडण व्हावे असे त्यांना मनापासून वाटे आणि खरोखरच एके दिवशी तसे झाले.
त्या दिवशी कशावरूनतरी गोष्ट निघाली. रामजी व राघो हमरीतुमरीवर आले. एकमेकांचे तोंड न पाहण्याचे त्यांनी ठरवले. राघो जरा मनाने हळवा होता. ज्या गावात आपण इतकी वर्षे परस्पर प्रेमाने वागलो तेथेच इतके भांडलो ह्याची त्याला लाज वाटू लागली. तो घरातून बाहेर पडेना. त्याचे चित्त कशातही रमेना. खाणे पिणे रुचेना. सुखाची झोप येईना. शेवटी तो गाव सोडून दूर देशी निघून गेला.
राघो आज येईल, उद्या येईल अशी त्याची बायको वाट पाहतं होती; परंतु राघोकडून ना चिठ्ठी ना निरोप. त्याची बायकोही खंगू लागली. ती जेवू लागली म्हणजे नवऱ्याची तिला आठवण येई. पती कुठे असतील, ते जेवले असतील का ? असे मनात येऊन तिचे डोळे भरून येत व तिचे जेवण संपे.
असे काही दिवस गेले. राघो परत आला नाही, परंतु त्याच्या मरणाची दृष्ट वार्ता मात्र आली. ती बातमी ऐकून राघोच्या बायकोने हाय घेतली. थोड्याच दिवसांनी तीही देवाघरी निघून गेली; परंतु लहानग्या जाईला आता कोण ? ना आई ना बाप. लहान वयात जाई पोरकी झाली.

रामजीने आपल्या मित्राच्या मुलीला आपल्या घरी आणले. जाईची आई अंथरुणावर असता तो समाचारास जात असे. जाईला मी अंतर देणार नाही, असे मरणोन्मुख मातेला त्याने वचन दिले होते. आपण भांडलो म्हणून राघो गेला. राघोचे प्रेम खरोखर थोर. प्रेमभंग त्याला सहन झाला नाही, असे रामजीच्या मनात येई. मित्रप्रेमाचे ऋण कसे फेडावे ? प्रेमाची का फेड करता येते ? परंतु मनाचे काही तरी समाधान कृतज्ञता दाखवून मिळत असते. म्हणून रामजीने जाईला जणू आपली मुलगी मानली. तिचे तो सारे करी. तो जणू जाईचा आई-बाप बनला.
जाई चार-पाच वर्षांची होती आणि रामजीचा मुलगा मोहन, तो सात-आठ वर्षांचा होता. जाई व मोहन एकत्र खेळत. मोहन हूड होता. मोठा खेळकर. जाईही तशीच होती. दोघे शेतावर जात. झोल्यावर झोके घेत. कधीकधी घरीही मोहन जाईबरोबर खेळे. तो तिची बाहुली सजवून देई. तिचा खेळ मांडी. तिच्या भातुकलीत भाग घेई. 'मोहन, तू का मुलगी आहेस ?' असे कोणी म्हटले की तो निघून जाई.
मोहन व जाई दोघे वाढत होती. दोघे देखणी होती. रामजी आपल्या मनात एक मनोरथ मांडीत होता. तो आपल्या मनात एक गोड स्वप्न रचीत होता. पुढेमागे मोहन व जाई यांचे लग्न लावून द्यावे, छान आहे जोडा, असे त्याच्या मनात येई. आपल्या मृत मित्रासही ह्यामुळे स्वर्गात आनंद होईल असे त्याला वाटे.
दिवसांपाठी दिवस जात होते. महिन्यांमागून महिने जात होते. वर्षांमागून वर्ष जात होती. मोहन व जाई बहीण-भावाप्रमाणे वाढत होती, निर्मळपणे वाढत होती, निष्पाप वृत्तीने वाढत होती. रामजीची इच्छा त्यांना काय माहीत ? रामजीचे गोड स्वप्न त्यांना ठाऊक ? रामजीने कधीही तशी शंका त्या मुलांना येऊ दिली नव्हती.

आता मोहन विशीच्या पलीकडे गेला. तो चांगलाच वाढला होता. हाडापेराने मोठा दिसे. अद्याप त्याच्या तोंडावर थोडी कोवळीक दिसत होती. जाईही पंधरा-सोळा वर्षांची झाली. रामजी त्या दोघांकडे बघे व प्रसन्नपणे हसे. तो आता वृद्ध होत चालला होता. आपली इच्छा आपल्या डोळ्यांदेखत पूर्ण करून घ्यावी असे त्याच्या मनात येऊ लागले.
एके दिवशी रामजीने मोहनला हाक मारली.
'काय बाबा? त्याने मोहक वाणीने विचारले.
'मोहन, तू आज्ञाधारक मुलगा आहेस. तू मला फार आवडतोस. आता माझं वय होत आलं. फार दिवस ह्या जगात मी जगेन असं मला वाटत नाही.' असे म्हणून रामजी थांबला.
'बाबा, असं का म्हणता ? तुम्ही आम्हाला पुष्कळ दिवस हवेत, आई कधीच सोडून गेली. तुम्हीही का जाणार ? जाईला व तुमच्या मोहनला तुमच्याशिवाय कोण ?' मोहन दु:खाने म्हणाला.
'मोहन, आज मी तुला मुद्दाम हाक मारली. माझी एक इच्छा आहे, ती तू पूर्ण कर. किती तरी वर्ष ती इच्छा माझ्या मनात आहे. पित्याची इच्छा पूर्ण करून देशील का त्याला समाधान ?' रामजीने विचारले.
'बाबा, तुमच्यासाठी मी काय करणार नाही ? सांगा तुमची इच्छा. ह्याच्या आधीच का सांगितली नाहीत ती ?' मोहन म्हणाला.
'प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. बाळ मोहन, तुझं लग्न करावं असं माझ्या मनात येतं, तू आहेस तयार ?' पित्याने प्रश्न केला.
'बाबा, आधी जाईचं करा. तुमच्या हातून आधी तिचं लग्न होऊ दे. तिला ना आई ना बाप. तुम्ही तिला आई-बापाची आठवण होऊ दिली नाहीत. तुम्ही तिचं सारं केलंत. तिचे सारे लाड पुरविलेत. आता एवढं आणखी करा.' मोहन म्हणाला.
'तुमचं दोघांचं लग्न मी एकदमच करणार आहे !' रामजी हसून म्हणाला.
'कोणता पाहिलात मुलगा ? गरीब असला तरी चालेल; परंतु निरोगी, धडधाकट, प्रामाणिक व श्रमांना न कंटाळणारा असा पाहिला आहे ना ? जाईला कोणतं पाहिलंत स्थळ ?' मोहनने विचारले.

'नवरामुलगा जवळच आहे. जवळच राहतो. चांगला आहे. देखणा आहे, गुणी आहे.' पिता म्हणाला.
'कुठंसा राहतो ?' मोहनने उत्सुकतेने विचारले.
'इथंच' पिता बोलला.
'काय त्याचं नाव ?' मोहनची उत्सुकता फारच वाढली.
'मोहन !' पिता शांतपणे म्हणाला.
क्षणभर कोणीही बोलले नाही. तेथे गंभीरता पसरली. पिता-पुत्र विचारात मग्न झाले. पिता पुत्राकडे बघत होता, पुत्र खाली बघत होता.
'अशक्य, अगदी अशक्य.' असे शब्द मोहनच्या कापऱ्या ओठांतून बाहेर पडले.
'काय अशक्य ?' पित्याने विचारले.
'मोहनचं जाईशी लग्न होणं अशक्य.' मोहन म्हणाला.
'कोण म्हणतो अशक्य ?' पित्याने प्रक्षुब्ध होऊन विचारले.
'मी म्हणतो.' मोहनने निश्चयाने सांगितले.
'मोहन, विचार कर. आतापर्यंत तू माझी कधीही अवज्ञा केली नाहीस. आजपर्यंत माझी आज्ञा पाळलीस. ही आज्ञाही पाळ. वृद्ध पित्याचं मन दुखवू नकोस.' रामजी म्हणाला.
'बाबा, ह्या एका गोष्टीशिवाय इतर काहीही सांगा. कड्यावरून उडी टाकायला सांगा; समुद्रात बुडी घ्यावयास सांगा; विषाचा पेला तोंडाला लावायला सांगा; आगीतून जावयास सांगा; - हा मोहन ते सर्व आनंदानं करील; परंतु ही गोष्ट नको.' मोहन दृढ स्वराने म्हणाला.
'का नको ? ज्या दिवशी जाईला मी आपल्या घरी आणलं, त्या दिवसापासून हे स्वप्न मी माझ्या मनात खेळवीत आहे. इतकी वर्ष मनात धरलेली आशा,- ती का तू मातीत मिळवणार ? मोहन, माझ्या घरात राहावयाचं असेल तर माझी आज्ञा मानली पाहिजे. माझ्या पित्यानं आज्ञाभंग कधी सहन केला नाही. तुझा बापही स्वत:चा आज्ञाभंग सहन करणार नाही. मुलानं बापाचं ऐकलंच पाहिजे अशी आपल्या कुळाची परंपरा आहे. ही परंपरा तूही चालव.' रामजी म्हणाला.
'बाबा, जाई व मी बहीण- भावाप्रमाणे वागत आलो. दुसरा विचार कधी मनात आणला नाही. बहिणीजवळ का लग्न लावायला मला सांगता ? पिता झाला म्हणून त्याची अपवित्र आज्ञा ऐकायची की काय ? पिता थोर आहे. परंतु पित्याहून सत्य थोर आहे. पावित्र्य थोर आहे. कुळाची पवित्र परंपरा चालवावी, अपवित्रता बंद करावी.' मोहन म्हणाला.

रामजीचा संताप अनावर झाला. क्रोधाने तो थरथरु लागला. शेवटी तो मोहनला म्हणाला, - 'तुला एक महिन्याची मी मुदत देतो; तेवढ्या अवधीत काय तो विचार कर. बऱ्या बोलानं मी सांगतो तसं करायला सिद्ध हो, नाही तर ह्या घरातून तोंड काळं करून चालता हो. तू माझा मुलगाच नाहीस असं मी समजेन. मोहन मेला असं मानीन. जा. माझ्यासमोर उभा नको राहूस.'
त्या दिवसापासून मोहन घरामध्ये फारच थोडा वेळ थांबे. जणू घर सोडून जाण्याचा तो अभ्यास करीत होता. तो कोणाजवळ बोलेना, हसेना, खेळेना. तो खिन्न व उदास दिसे. जाई त्याच्याजवळ जाई व गोड बोलण्याचा प्रयत्न करी. परंतु जाई जवळ येताच मोहन उठून जाई. जाईच्या डोळ्यांत पाणी येई. तिच्या जिवाची तगमग होई.
महिना संपला. पित्याने दिलेली मुदत संपली. एका सदऱ्यानिशी मोहन घरातून बाहेर पडला. सुखात वाढलेला मोहन ! तो आता कोठे जाणार, काय खाणार, काय पिणार ? तो एका लहानशा झोपडीत राहू लागला. तो मोलमजुरी करू लागला. तो उन्हातान्हातून श्रमे, खपे. कधी गवंड्याच्या हाताखाली काम करी, कधी शेतातील कुंदा खणायला जाई. त्याच्या कोमल हातांना फोड येत, परंतु हळूहळू सवय झाली. हातांना घट्टे पडले. उन्हातान्हात काम करून त्याचा चेहराही जरा राकट बनला.
मोहनने आता लग्न लावले. एका गरीब मजुराच्या मुलीशी त्याने लग्न लावले. तिचे नाव गजरी. मोहन व गजरी गरिबीत स्वर्ग निर्माण करीत होती. गजरीसुद्धा कामाला जाई. दोघे कष्टाने मिळवीत. परस्परांना प्रेम देत. मोहन गजरीला पाणी आणून देई. तिलाही घरी वेळ असला तर मदत करी. एखादे वेळेस दोघे पहाटे दळीत. मोहन म्हणे, 'ओव्या म्हण.' गजरी गोड ओव्या म्हणे.

मोहनने लग्न लावले ही गोष्ट रामजीच्या कानावर गेली. तो म्हातारा खवळला. त्याच्या तळपायांची आग मस्तकाला गेली. त्याने जाईला हाक मारून सांगितले, 'पोरी, त्या कारट्याकडे खबरदार कधी गेलीस तर. त्याच्याकडे कधी गेलीस असं जर मला कळलं, तर तुलाही हे घर सोडावं लागेल. विचार करून वाग. समजलीस ?'
मोहनकडे जावे असे जाईच्या मनात कितीदा तरी येई. परंतु ती जावयास धजावंत नसे. मोहनही आपल्याजवळ धड बोलेल की नाही असे तिच्या मनात येई. ती मनातील दु:ख कोणाजवळ बोलणार ? रामजी व मोहन दोघांकडे तिचा जीव ओढे. आपण गेलो तर वृद्ध रामजीस तरी कोण ?
जाईचा विवाह लांबणीवर पडला. तिचे लग्न करावे असे जणू रामजीच्या मनात येईना. जाई सासरी गेल्यावर मला म्हाताऱ्याला कोण, असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येई. शिवाय जाई मोहनशी जोडलेली आहे, असे स्वप्न आज दहा-बारा वर्षे तो मनात खेळवीत होता.ते स्वप्न आपल्या हातांनी त्याला मोडवेना. जाईचा विवाह दुसऱ्या कोणाशी करण्याचा विचारही त्याला सहन होत नसे. आणि जाई ? तिच्या मनातही विवाहाचा विचार येत नसे. तिला रामजीची कीव येई. त्याची ती सेवा- चाकरी कृतज्ञतेने करी.
रामजीच्या घरात धान्याची कोठारे भरलेली होती; परंतु कोण खाणार ते धान्य ? तिकडे मोहनला उन्हातान्हात राबावे लागत होते. मेहनतीने भाकर मिळवावी लागत होते. जाईचा जीव खालीवर होई.

मोहन आपल्या वडिलांच्या घरावरून चुकूनही जात नसे. न जाणो, पित्याच्या वैभवाची, त्या घरादाराची, शेतीवाडीची इच्छा मनात उत्पन्न व्हावयाची. त्या बाजूने जाणेच नको. तसेच, स्वत:चा कृश झालेला देह जाईच्या दृष्टीस पडू नये म्हणूनही तो त्या बाजूने जात नसे. रामजी ओटीवर बसलेला असे. आपला मुलगा एक दिवस घरी परत येईल असे का त्याला वाटत होते ?
मोहनला श्रमाची सवय नव्हती. एकाएकी खूप श्रम त्याला पडू लागले. मनात दुसरीही दु:खे असतील. तो अशक्त दिसे. गजरी बाळंत झाली होती. तिला आता कामाला जाता येत नसे. मोहनला घरचे करावे लागे, पुन्हा कामावर जावे लागे. तो अगदी थकून जाई.
एके दिवशी फारच दमून-भागून मोहन घरी आला. घरी आल्यावर तो आपल्या लहान मुलाला घेऊन खेळवीत होता. त्या मुलाचे हसे पाहून तो सारे श्रम विसरला; परंतु एकाएकी घेरी येईल असे त्याला वाटले. त्याने बाळ खाली ठेवला. तो पडला. गजरी धावत आली. तिने त्याला सावध केले, अंथरुणावर निजवले. मोहनच्या अंगात सपाटून ताप भरला. गजरी घाबरली. गरीबाला कुठला डॉक्टर ? गजरी रडत बसली. मोहन म्हणाला, 'रडू नकोस. तू रडलीस म्हणजे मला वाईट वाटतं. माझ्याजवळ बस. बाळाला घेऊन बस. त्यात मला समाधान आहे.'
मोहनचे दुखणे हटेना. त्याला कामावर जाता येईना. घरात खाण्यापिण्याची पंचाईत पडू लागली. जाईच्या कानांवर या गोष्टी गेल्या. रामजीला न कळत ती मोहनच्या बायकोकडे मदत पाठवी. कधी दूध, कधी फळे, कधी काही ती पाठवू लागली. मोहन मरणाच्या दारात होता. त्याला भेटण्यासाठी जाईचा जीव तडफडत होता; परंतु ती जाऊ शकली नाही. तिची व मोहनची भेट ह्या जगात जणू पुन्हा व्हावयाची नव्हती. मोहन मरण पावला ! 

लेखक:  साने गुरुजी
**********************
कॉपीराईटस:
केशव भिकाजी ढवळे.
**************

वाचनांस सोयीचे जावे म्हणून ह्या कथेचे दोन भाग पाडले (भाग २-सोबत जोडला) आहेत.