पाखराची गोष्ट : भाग १

फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दूर दूर असलेल्या एका देशातील ही गोष्ट आहे. एक होता शेतकरी. त्याचे नाव होते खंडू. खंडूची बायको होती. तिचे नाव चंडी. चंडी नावाप्रमाणेच खरोखर होती. जणू त्राटिकेचा अवतार,. ती सदा संतापलेली असायची. डोळे तारवटलेले, कपाळाला सतराशे आठ्या, घरात अक्षयी तिची आदळापट चालायची.

खंडूला वाईट वाटे; परंतु काय करणार ? घर सोडून जावे असे त्याला वाटे; परंतु तेही बरोबर नाही असे त्याची सदसद्विवेकबुद्धी सांगे. 'तुझी गाठ पडली आहे खरी अशा बायकोशी. आता भिऊन पळू नकोस. सहन कर सारे.' असे सदसद्विवेकबुद्धी म्हणे.
चंडी खंडूजवळ कधी एकही शब्द गोड बोलत नसे. ती सदैव त्याच्या अंगावर ओरडायची, त्याला शिव्या द्यायचे, हातात लाकूड घेऊन मारायला यायची. प्रत्यक्ष मारीत नसे एवढेच. शेजारी पाजारी तरी का खंडूला सहानुभूती दाखवत होते ?नाही. तेही हसत, थट्टा करीत.

कोंबडा आरवताच खंडू उठे. तो शेतावर जाई. चंडी त्याला काहीसुद्धा न्याहारीला देत नसे. ना थोडी चटणीभाकर, ना मूठभर पोहे. बारा वाजेपर्यंत उपाशी पोटी तो शेतात काम करी. नंतर भुकेलेला तो घरी येई.
'आला मेला घरी, इतक्यात कशाला आला ? का मरत होता उन्हात ? मोठा नाजूक की नाही ? नखरे करायला हवेत मेल्याला. अजून भाकर भाजून नाही झाली, तो आला गिळायला. बसा ओसरीत आता. हे दाणे निवडा. नीट निवडा. खंड्या, अरे तुला सांगत्ये मी. घे ते सूप व निवड दाणे. खडादगड पाहून ठेव. नवरोजी झालाय नुसता छळायला.
असे सारखे तिचे तोंड सुरू असायचे. खंडू घरी दमून भागून आल्यावरही चंडी जे काम सांगे ते तो निमूटपणे करी. मग जी जाडीभरडी कोरडी भाकर चंडी वाढी ती तो खाई.
'कोरडी भाकर कशी खाऊ ?' तो म्हणे.
'तर काय बासुंदी आणू ?श्रीखंड आणू ? भिकारी तर आहे मेला; परंतु ऐट आणतो राजाची. म्हणे कोरडी कशी खाऊ ? मला जात नाही कोरडी म्हणून माझ्यापुरते थोडे कालवण केले आहे. तुला रे काय झाले ? भरपूर काम करीत नाहीस वाटते शेतात ? ज्याला भूक चांगली लागते त्याला चार दिवसांचे शिळे तुकडेसुद्धा साखरेवाणी गोड लागतात. म्हणे कोरडी भाकर कशी खाऊ ? घशाखाली जात नाही वाटते ? जरा मुसळ सारा घशात व भोक मोठे करा घशाचे. मी म्हणून ताजी भाकर तरी देत्ये करून. दुसरी कोणी सटवी असती, तर चार दिवस तुला उपाशी ठेवती, शिळे खायला घालती. आपले पाय चेपायला लावती. खा कोरडी भाकर. सुखाची मिळते आहे भाकर तीसुद्धा उद्या देव नाही देणार, जर असे कुरकुराल तर.' असे ती म्हणे.
ती तोफ एकदा सुरू झाली म्हणजे खंडू घाबरे. मुकाट्याने भाकर खाई व उठून जाई. मग जरा ओसरीत तो घोंगडीवर अंग टाकी. तो ती हिडिंबा लगेच गर्जत येई.
'पडलेत काय पालथे ? जा की शेतात. आळशी आहे मेला. खातो व लोळतो. शेतकरी का असा दिवसा झोपतो ? उठा जा.'

खंडू आता घरी फार बसत नसे. बहुतेक त्याचा वेळ आता शेतातच जाई. दमला तर तेथेच झाडाखाली पडे. त्या दाट छायेच्या एका झाडाखाली उशाला धोंडा घेऊन तो पडे. झाडावर पाखरे गोड गाणी गात असत. ती मधुर किलबिल ऐकून खंडूला आनंद होई. तो मनात म्हणे,'पाखरे इतके गोड बोलतात. माणसे का बरे गोड बोलत नाहीत ? माझी बायको का बरे गोड बोलत नाही ? आणि शेजारीही माझा उपहासच का करतात ?
एक नवीनच पक्षी एकदा त्याला दिसला आणि पुढे रोज त्याच्यासमोर तो पक्षी येऊन बसे. नाचे. गोड शब्द करी. खंडूला आनंद देण्यासाठी का ते सुंदर पाखरू येत असे ?
एके दिवशी खंडू त्या पाखराजवळ गेला, तो काय आश्चर्य ? ते पाखरू पळालं नाही, भ्यायलं नाही. खंडूने त्या पाखराला धरले. त्याने ते पाखरू घरी आणले. एका सुंदर पिंजऱ्यात त्याने ते ठेवले.

खंडू आता त्या पाखरावर जीव की प्राण प्रेम करी. त्याला ताजी फळे घाली. त्याच्या पिंजऱ्यावर हिरवे पल्लव बांधी, फुले बांधी. मोठ्या पहाटे उठून त्या पाखराला बोलायला शिकवी.
'ये हो खंडू. दमलास हो. भागलास हो. बस जरा. मी गाणी गातो. तू आनंदी राहा. मी तुला रिझवीन. मी तुझ्याजवळ गोड बोलेन. मी तुला प्रेम देईन. ये हो खंडू.'
असे त्या पाखराला तो बोलायला शिकवी.त्याची ती कजाग बायको त्या वेळेस झोपलेली असे. बायको जागी झाली की, खंडू शेतावर निघून जाई; परंतु शेतावर गेला तरी त्याला त्या पाखराची आठवण येई. डोक्यावर सूर्य आला की, खंडू आता घरी येई. येताना त्या पाखराला कोवळी कणसे आणी. रानमेवा आणी.
खंडू घरी येताच ते पाखरू पिंजऱ्यात नाचू लागे. गाऊ लागे. ते खंडूचे स्वागत करी व गोड वाणीने म्हणे, ये हो खंडू. दमलास हो. बस हो जरा. मी तुला गाणे गाईन. मी गोड बोलेन . ये.' खंडूला ते गोड शब्द ऐकून आनंद होई. तिकडे बायको बडबडत असली तरी खंडू तिकडे लक्ष देत नसे. पाखराची गोड वाणी ऐकण्यात तो तल्लीन होई.

खंडू आता आनंदी असे. त्याच्या आत्म्याला जणू प्रेमामृताचा चारा मिळाला. त्याच्या मनाला सहानुभूतीचे खाद्य मिळाले. भुकेलेला खंडू तृप्त झाला. बायको त्याला भाकर करून वाढी आणि ते पाखरू प्रेम देई. जगात न मिळणारे दुर्मिळ प्रेम.

एके दिवशी खंडू शेतात गेला.; परंतु पाखराच्या पिंजऱ्याचे दार उघडे राहिले. इकडे ती चंडी उठली. नवरा गेल्यावर ती गोड गोड करून खायची. आज तिने शिरा करण्याचे ठरविले. ताटात रवा काढला. साखर काढली. एका पातेलीत तूप घेतले; तिने सारी तयारी केली इतक्यात अंगणात कोणाची गुरे आली म्हणून त्यांना हाकायला ती गेली. इकडे ते पाखरू पिंजऱ्यातून खाली आले. स्वयंपाकघरात गेले. रव्यामध्ये चोच घालून रवा खाऊ लागले. साखरेत चोच मारून साखरेचे कण त्याने खाल्ले. ते पाखरू मेजवानीत रमले. इतक्यात चंडी आली. तिने ते पाहिले. तिला राग आला. ते पाखरू फडफड करून पिंजऱ्याकडे जाऊ लागले; परंतु तिने ते पकडले. ते पाखरू धडपडत होते. केविलवाणे ओरडत होते.
'घालशील पुन्हा चोच ? घालशील? आणि त्याच्याजवळ गोड गोड बोलायला हवं नाही ? मी पिंजऱ्याजवळ आल्ये तर जीभ जशी झडते मेल्याची. खंड्याजवळ गोड गोड बोलतोस ? थांब, तुझी जीभ कापून टाकत्ये. का निखारा ठेवू जिभेवर ? नको. कापूनच टाकावी. मग बघत्ये कसा गोड बोलशील तो.'
असे म्हणून तिने खरोखरच कात्री आणली आणि त्या पाखराची चोच उघडून तिने त्याची जीभ कटकन कापली. तुकडा उडाला. पाखराने किंकाळी फोडली. ची ची केले. अरेरे !
त्या पाखराला त्या चंडीने आता सोडले. ते दीनवाणे पाखरू पिंजऱ्यात जाऊन बसले. त्याला वेदना होत होत्या; परंतु कोणाला सांगणार, कशा सांगणार ? त्याची वाणी गेली. त्या पाखराच्या डोळ्यांतून पाणी आले.

दुपारची वेळ झाली. खंडूच्या येण्याची ते पाखरू वाट पाहत होते. खंडू आला. कोवळी कणसे घेऊन आला. फुलांचे तुरे पिंजऱ्यावर लावण्यासाठी घेऊन आला.
खंडू पिंजऱ्याजवळ गेला; परंतु पाखरू आज नाचेना, गोड गाणे म्हणेना. 'ये हो खंडू दमलास हो.' असे म्हणेना. का बरे ?

'पाखरा, का रे आज बोलत नाहीस ? तूही का रागावलास माझ्यावर ? आज मला यायला का उशीर झाला ? कालची फळे का आंबट होती, कडवट होती ? परंतु मी ती खाऊन पाहिली होती. गोड होती ती. हे बघ फुलांचे तुरे आणले आहेत. का रे ? आज असा का ? आणि हे तुझ्या डोळ्यांत पाणी का ? मी तुला पिंजऱ्यात कोंडले म्हणून का तू दु:खी आहेस ?तुला का बाहेरच्या स्वातंत्र्याची आठवण झाली ? झाडांवर झोके घेण्याची का आठवण झाली ? तू वाऱ्यावर बाहेर नाचत असशील. झाडांच्या डहाळ्या टाळ्या वाजवीत असतील, तुझ्या नाचण्या गाण्याला ताल धरीत असतील. होय ना ? ते का सारे तुला आज आठवले ? का तुझ्या घरची तुला आठवण झाली ? तुझी का बायको आहे ? तुझी का मुलेबाळे आहेत ? कोठे आहे तुझे घरटे ? परंतु तुला मी पकडले तेव्हा तू पळाला नाहीस. मला वाटले की, तू माझ्यावर प्रेम करायला आलास आणि खरेच तू आनंदी होतास. आज सकाळी मी जाईपर्यंत तू सुखी होतास ! आणि नंतर काय झाले ? ती हंडी का तुला बोलली ? अरे ती तशीच आहे. तिचे बोलणे नको मनावर घेऊ. बोल. गोड गोड गाणे म्हण. 'खंडू दमलास हो' असे म्हण. तू माझा आधार. तूही का रागावलास ? बोल. राजा, बोल. नाच, गा.'
परंतु ते पाखरू मुके झाले होते. थोडीफार हालचाल ते करी; परंतु पुन्हा स्वस्थ बसे. दीनवाणे बसे.

खंडू घरात गेला.
'का गं आज पाखरू का बोलत नाही ? तू काय केलेस ? त्याला का शिव्याशाप दिलेस ? त्याला का मारलेस ? ते खिन्न आहे, दु:खी कष्टी आहे. त्याचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येतात. तू मला बोलतेस, शिव्या देतेस. त्या मुक्या प्राण्याचेही का मन दुखावलेस ? त्यालाही का त्रास दिलास ? काय केलेस ?'
'काय केले ? कापली त्याची जीभ. तुमच्याजवळ गोड गोड बोलते ते पाखरू; मला ते बघवत नव्हते. इतके दिवस मी माझा राग आवरता घेतला होता; परंतु आज त्याने माझ्या भांड्यात चोच घातली. मी जरा बाहेर गेल्ये, तो पिंजऱ्यातून बेटे खाली आले व बसले खात. जणू मेजवानीच होती त्याला. आला मला राग. धरले, घेतली कात्री व कापली जीभ. ठारच मारणार होत्ये, त्याचा गळाच चरचर कापणार होत्ये, परंतु आजच नको म्हटले. बोल म्हणावे आता कसे गोडा बोलतोस ते. मी पिंजऱ्याजवळ कधी गेल्ये तर एक आवाज काढीत नसे. तुम्हाला पाहून ते हसे, नाचे, गाणे म्हणे. माझ्यावर जणू खप्पा मर्जी. टाकली जीभ कापून. खंड्या, आता कोण रे गोड बोलेल तुझ्याजवळ ? त्या पाखराची पूजा करीत होतास. त्याला फुलांचे तुरे आणीत होतास; परंतु माझ्या केसांत घालण्यासाठी आणलीस का कधी फुले ?'
'नव्हतो का एके काळी आणीत ? परंतु तू ती कुस्करून टाकीत असस. पायांखाली चिरडून टाकीत असस. मग आणणे बंद केले. '
'मी तुझे सत्त्व पाहत होते खंड्या. देवी एकदम नाही प्रसन्न होत. जा त्या पाखराकडे. ते रडतं आहे. तू रड. जा, नीघ.'

खंडू खरेच पिंजऱ्याजवळ आला. त्या पाखराकडे दु:खाने पाहत राहिला. बराच वेळ विचार करून खंडू त्या पाखराला म्हणाला,
'पाखरा, तुला मी आज सोडूनच देईन हो. तुला मी आणले हीच चूक. पाखरांची झाडावरच शोभा. झाडांवरचीच त्यांची गाणी ऐकावी. मन रिझवून घ्यावे. उगीचच तुला आणले व कोंडले. आज तिने जीभ कापली, उद्या तुझा गळाही ती कापील. ती राक्षसीण आहे. अगदी राक्षसीण. पाखरा, जा हो. सोड मला. मी अभागीच आहे. मला एकट्यानेच राहिले पाहिजे. फार तर सृष्टीची दूरून मिळेल ती संगत घ्यावी. फुलांची, पाखरांची, झाडामाडांची, डोंगरकड्यांची, नद्यानाल्यांची,
गाईगुरांची दूरून संगत. खरे ना ? होय. ही सृष्टीतील संगत मी घेत जाईन. तुला सोडतो हो आज; परंतु तुझे जातभाईं तुला मारणार नाहीत ना ? तू दास्यात जिवंत राहिलास म्हणून तुला चोची नाही ना मारणार ? नाही मारणार. कारण तू उपकारासाठी कैदी झालास. एका दु:खी माणसाला आनंद देण्यासाठी तू आपखुषीने आलास. तुझे भाईबंध तुझ्यावर रागावणार नाहीत. तुझे स्वागत करतील. तुझी मुलेबाळे, तुझी बायको तुझ्यावर अधिकच माया करतील. जा पुन्हा प्रेमळ घरट्यात, डोल फांद्यांवर, पोह आकाशात, खा रानचे मेवे. जा हो पाखरा. आज मी मुक्त करीन हो तुला'
असे तो बोलत होता, तो आतून घसरा आला, 'या गिळायला. भाकर झाली आहे.' खंडू गेला.
त्याच्याने आज खाववले नाही. पाखराला आज खाता येत नव्हते. पाखराची जीभ दुखत होती. खंडूला खाणे का गोड लागेल ? दोन तुकडे खाऊन तो उठला. पाणी प्यायला. हातात पिंजरा घेऊन तो शेतावर गेला.

त्या गर्द छायेच्या झाडाखाली बसला. त्याने पिंजऱ्यातून ते पाखरू बाहेर काढले. त्याने ते प्रेमाने हृदयाशी धरले. अश्रूंनी त्याला न्हाऊ घातले. पाखराने चोच वर केली. दोन अश्रू ते प्यायले; परंतु ते पाणीही त्याच्या जिभेला झोंबले.
'पाखरा, जा हो आता. जा लांब उडून. येथे शेतावरही नको येऊस. एखादे वेळेस ती येईल. तुला मारील. लांब बनात जा. पूर्वेच्या बाजूला एक बन आहे. त्यात एक सदैव वाहणारा झरा आहे. बांबूची, कळकीची उंच बने आहेत. जा तेथे. सुखात राहा. तुझी मला आठवण आहे. मी तुला विसरणार नाही. माझ्या हृदयात तुझ्यासाठी घरटे आहे. त्या घरट्यात तुझी मनोमय मूर्ती सदैव राहील. मुकी गाणी ती गाईल हो. जा.'
पाखराला जणू ती वाणी समजली. ते उडाले. पुन्हा एकदा येऊन, खंडूसमोर जरा नाचून, त्याच्या डोक्यावर घिरट्या घालून ते गेले. खंडू पाहत होता. पूर्वेकडच्या बाजूला ते उडाले. ते दमले. एका झाडावर ते बसले. पिंजऱ्यात बसून त्याच्या पंखांची शक्ती कमी झाली होती; परंतु ते पाहा पुन्हा उडाले. निळ्या निळ्या आकाशातून उडत चालले. खंडू पाहत होता. ते पाखरू दिसेनासे झाले. खंडू पुन्हा काम करू लागला.

(क्रमशः)

लेखक : साने गुरुजी
******************
कॉपीराईटस:
केशव भिकाजी ढवळे
*********************
वाचनांस सोपे व्हावे म्हणून ह्या कथेचा दुसरा भाग वेगळा केला (सोबत देत) आहे.