सात वर्षांनी ...

महाराष्ट्राचे अत्यंत लाडके लेखक पु . ल. देशपांडे यांना जाऊन येत्या जून मध्ये सात वर्षें होतील.

गेल्या सात वर्षांत त्यांच्या स्मरणार्थ , त्यांच्या एकूण कारकीर्दीचा मागोवा , आढावा घेणारी , त्यांचा आठवणींना उजाळा देणारी , त्यांच्या अप्रकाशित लेखनाची अनेक पुस्तके आली आणि ही सर्व पुस्तके उत्तम खपली. पु. लं. ची कितीतरी जुनी पुस्तके , गाणी , नाटके या गेल्या सात वर्षांत अगदी चांगली खपली ; आणि हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे नाहीत.

पु. लं. ची हिमालय-सदृष्य सावली गेल्या शतकाच्या शेवटच्या चार -पाच दशकांवर पडली. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य उणीपुरी पन्नास वर्षे ते हयात असतानाच तळपत होता. हा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.

आज सात वर्षांनी , ही सावली दूर गेल्यानंतर , त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या त्यांच्या प्रेमाच्या पुराची लाट किंचितशी ओसरल्यासारखी झाल्यानंतर त्यांच्या आपल्या आताच्या आयुष्याशी राहिलेल्या नात्याबद्दल आपल्याला काहीशा समतोलपणे बोलता येईल असे वाटते. त्यांच्याबद्दलचा "रेव्हरंस" लोपलेला नाही ; परंतु त्यांच्या "रिलेव्हन्स" बद्दल बोलावे इतपत काळ उलटला आहेसे वाटते.

त्यांच्या लिखाणाकडे मागे वळून पहाताना, आपल्या सध्याच्या जगण्याच्या संदर्भात पु. ल. कुठे उभे आहेत असे तुम्हाला वाटते ? त्यांच्या लिखाणातील काय काय अजूनही आवडते ? काय काय मार्मिक वाटते ? "ओल्ड रेलीक" वाटावा असा कुठला भाग वाटतो ? एकंदर जगण्याबद्दलचे त्यांचे कुठले विचार चिरकाल टिकून आहेत असे वाटते ?