विदर्भातली मराठी भाषा - भाग २

नमस्कार!

भाग १ मध्ये कबूल केल्या प्रमाणे या भागात मी आणि माझ्या बहिणी ने तयार केलेली विदर्भीय शब्दसूची इथे देत आहे. या शब्दसूचीत जवळ जवळ ९० शब्द/ वाक्प्रचार / म्हणी आहेत. पण वेळे अभावी आणि जागे अभावी ते सर्व इथे देणे शक्य होणार नाही. पण जमतील तितके देते आहे. बाकीचे ३ ऱ्या भागात देइन.

म्हणी :

  1. बाप तशी लेक, मसाला एक (खाण तशी माती)
  2. हालो मालो दिव्यात तेल घालो (इकडून तिकडे फिरत वेळ काढणे/timepaas करणे/ रवटाळणे)
  3. खायला लागलं गोड आणि बुदूबुदू झोड (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
  4. ढुई ढुई पाणी, घाल पाणी चिंचोणी (खूप पाणी घालून पदार्थ पातळसर बनवणे/ जरूरी पेक्षा जास्त पातळ करणे)
  5. मला पहा आणि फुलं वाहा. (आपण स्वतः काही काम न करता बसून राहणे आणि लोकानी आपली खातिरदारी करावी अशी अपेक्षा करणे)
  6. म्हाली पणा आणि घोडा हाणा (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
  7. पेंड पुंडका आणि हिऱ्याचा मुंडका (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
  8. आंधळा डोळा पाण्याला गेला (डोळ असून नीट न दिसणे)
  9. पैसा ना अदला भप्पुला गडे (घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा)

शब्द :

  1. बिरवांगं = टोमॅटो
  2. पोपट = वाल
  3. बरबटी = चवळीचे दाणे
  4. घोळणा = मेथी वगैरे पालेभाज्यांची कच्ची पाने धुवून त्यात मीठ व तिखट घालून बनवलेले सॅलड
  5. डेमणा = छोटासा
  6. चिलमी गप्पा = वायफळ बडबड
  7. चीपीची तब्येत = कृश तब्येत (दोन्ही "च" च उच्चार "चष्मा" मधील "च" प्रमाणे)
  8. फैलते ताट = पसरट ताट
  9. ढामी = आळशी
  10. पतली चादर = पातळ चादर
  11. आशुक माशुक = मस्तपैकी तूप / तेल वगैरे लावून (उदा. आज थालिपीठं आशुक माशुक कर)
  12. बहिरं टप्पर = एकदम बहिरा
  13. दादोडा = मोठी पुळी
  14. धगुरडा = वयाने मोठा / निबर
  15. भगुनं = पातेलं
  16. संगीन = साधे नसलेले
  17. लेंडार = लवाजमा
  18. गुगाळणा = खराब (हा शर्ट गुगाळणा झाला आहे.)

वाक्प्रचार:

  1. नाकाच्या सुताने = कशाचीही पर्वा न करता / बिनधास्त (उदा. काय नाकाच्या सुताने पंखा लावून ठेवला आहे. किंवा नाकाच्या सुताने वरण्भात खा.)
  2. फकाफका लाईट लावणे = कारण नसताना वीज जळवणे (प्रखर उजेड करणे)
  3. पोट्टातून हसणे = मनापासून हसणे
  4. पोट्टातून आवडणे = मनापासून आवडणे
  5. पूसपास करणे = पुसून घेणे
  6. फतंफतं करणे = काम नीट न उरकणे
  7. झुलीला हात लावणे = कामाला नुसते हात लावणे पण प्रत्यक्षात काहीच काम न करणे (काम केल्याचा आभास निर्माण करणे)
  8. वाळूचुळू घालणे = वाळत घालणे (कपडे वगैरे)
  9. पाणी पडणे = पाऊस पडणे
  10. धसणे = घुसणे
  11. हनननं होणे = आर्थिक परिस्थिती हालखीचे होणे
  12. इगरणे = इतरावणे (उदा. आंब्याचा रस खाऊन ह इगरला आहे.)
  13. घोणे घेणे = ज्या गोष्टीतून काहीही निष्पन्न होणार नाही अश्या गोष्टीसाठी कष्ट घेणे
  14. कळंगणे = मळणे (हा शर्ट कळंगला आहे.)
  15. धमंधमं कामे करणे = पटापट कामे आटपणे

पुढचे शब्द ३ ऱ्या भागात देईन.

या भागा वरील तुमच्या प्रतिक्रीया कळवा.