विदर्भातली मराठी भाषा - भाग १

सासरची कोकणस्थ असले तरिही माहेरची मी देशस्थ. विदर्भातली देशस्थ. कारण माझे वडील मूळचे विदर्भातले. त्यामुळे घरी बोलल्या जाणारया मराठी मध्ये अधून मधून विदर्भीय फोडणी हमखास असायची.

आता आताच मनोगता वर खास पुणेरी भाषेतील मजेशीर वाक्प्रचार वाचनात आले. वाटले आपणही आपल्याला माहीत असलेले काही गमतीशीर विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द मनोगती ना सांगुया.

झांबल झांबल करणे : धांदरटपणा करणे/ नक्की काय करावे ते नीट न सुचणे

(उदा. काय झांबल झांबल करतो आहेस?? पटकन काय ते काम उरक.)

रुंगळ रुंगळ करणे : एखाद्या च्या आगे मागे सतत रेंगाळणे

(उदा. ती आई वेडी असल्याने सतत आईच्या मागे रुंगळ रुंगळ करत असते.)

कुईटला वास : घाणेरडा वास/दुर्गंधी

(उदा. काय कुईटला वास आहे तुझ्या मोज्यांचा !)

घुरट वास : गाई-गुरांच्या अंगाला येणारा घाणेरडा वास/दुर्गंधी

(उदा. तबेल्यात जाऊ नकोस. घुरट वास येतोय.)

कुईटला आणि घुरट हे दोन्ही तसे दुर्गंधी व्यक्त करणारे शब्द असले तरिही नक्की कुठे कोणता शब्द चपखलपणे वापरायचा ते फ़क्त एक विदर्भीयच जाणे.

चाटु ("च" चा उच्चार "चमचा" मधील "च" प्रमाणे) : तव्यावर डोसा टाकताना वापरावयाचा डाव

ठुनी : आधार/टेकू

जागा करणे : जेवण झाल्यानंतर जमीन पुसून घेणे

भणभण माश्या मारणे :  काहीच उद्योगधंदा न करता नुसते स्वस्थ बसणे

लोळलाळ करणे : दुपारची वामकुक्षी करणे

या खेरीज पुष्कळ शब्द आहेत, पण आता या क्षणी आठवत नाहीयेत. माझ्या लग्ना आधी, मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने गमती गमतीत एका वहीत असे सर्व विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द व त्यांचे अर्थ जमा केले आहेत व त्या शब्दसंग्रहाला "विदर्भीय शब्दसूची" असे नाव दिले आहे. माझा प्रेमविवाह असल्याने आणि भावी नवरा कोकणस्थ असल्याने माझ्या बहिणीला चिंता होती की आमच्या घरात बोलले जाणारे काही शब्द माझ्या नवरयाला समजतील की नाही. त्यामुळे अशी शब्दसूची लिहून मी ती माझ्या नवरयास द्यावी आणि त्याने ते शब्द पाठ करून मगच मला मागणी घालण्या साठी माझ्या वडिला समोर यावे, असे ती गमतीने म्हणे.

पुढच्या वेळी माहेरी जाणे जेव्हा होइल तेव्हा ती शब्दसूची शोधून अन्य काही शब्द पुढच्या भागात देईन. तोवर तुम्ही तुम्हालाही असे कही "हटके" विदर्भीय शब्द माहीत असल्यास कळवा.

याशिवाय विदर्भीय भाषेची एक लक्षात येण्या सारखी खासियत अशी की विदर्भीय लोक हिंदी शब्दांचा वापर फार करतात.

उदा. तो तिथून वापस (परत) गेला. या बाबतीतली अजून उदाहरणे आता आठवत नाहियेत. आठवल्यास पुढच्या भागात कळवेन. त्याच पमाणे आपण जसे "वाघ-बिघ, काम-बिम, दात-बित" असे शब्दप्रयोग करतो, तसे विदर्भीय लोक "वाघ-गिघ, काम-गिम, दात-गित" असा शब्दप्रयोग करतात. ("बि" ऐवजी "गि").