आझाद हिंद सेना ४ - कात्रज, पन्हाळा, आग्रा...

नेताजींच्या संपूर्ण जीवनावर सातत्याने शिवचरित्राचा विलक्षण प्रभाव दिसून येतो. हुतात्मा भगतसिंहाप्रमाणे हा क्रांतिकारकही शिवभक्त असावा हा योगायोग म्हणायचा की गनिमी काव्याने मूठभर सैन्यानिशी भल्यामोठ्या सुसज्ज शत्रूसेनेला खडे चारणारा आणि स्वराज्यासाठी तमाम शत्रूंना आव्हान देणारा राजा शिवछत्रपती हा त्यांचा स्फुर्तिदाता आदर्श असावा? नेताजींच्या आयुष्यातले अनेक प्रसंग व त्यांचे गुण पाहता मला त्यांच्यात व शिवरायांमध्ये विलक्षण साम्य दिसते. ज्या वयात शिवाजीराजांनी स्वराज्याचा ध्यास घेतला त्याच वेळी नेताजींनाही तोच ध्यास होता. शौर्याच्या जोडीला असामान्य मुत्सद्दीपणा, सावधपणा, शत्रूचा बारीक अभ्यास, दूरदृष्टी, दूरगामी व्यवस्थापन, उत्तम प्रशासन, माणसांना जमविण्याची, जोडण्याची आपल्या जिवाला जीव देणारे साथी बनवण्याची कला, देशाच्या व रयतेच्या हिताखातर वाघाच्या गुहेत जाण्याची हिंमत, महासत्तेच्या दरबारात देखिल स्वाभिमानाचे प्रदर्शन, एक की अनेक, अशी असंख्य साम्यस्थळे दोघांच्या चरित्रात दिसून येतात. नेताजींनी प्रख्यात इतिहासकार श्री. जदुनाथ सरकार यांचे शिवचरित्र बारकाईने अभ्यासले होते. त्यांच्या अखेरच्या म्हणजे एकूण अकराव्या तुरुंगवासात - अलिपूर येथील तुरुंगात त्यांनी हा ग्रंथ मुद्दाम मागवून घेतला व त्याचे अनेकानेक पारायणे केली. श्री. जदुनाथ सरकार हे सुप्रसिद्ध इतिहासकार. ते खरे इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांना इतिहासाची विलक्षण गोडी. त्यांनी हिंदुस्थानातील मुघल राजवट व खास करून औरंगजेबावर प्रचंड संशोधन करून पाच खंडात आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. तसेच त्यांनी शिवाजीराजांवर संशोधन करून ग्रंथ लिहिला, त्यात विशेषतः: राजांची राज्यपद्धती, प्रशासन, युद्धशास्त्र व काटेकोर नियोजन याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले होते. हेच सरकार महाशय नेताजी विद्यार्थी असलेल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक, म्हणजे अप्रत्यक्षरीत्या त्यांचे गुरूच होते.

हा तुरुंगवास म्हणजे साक्षात शिवरायांचा 'कात्रज' होत; कसा ते पुढे येईलच. इंग्रजी सत्तेच्या जागत्या पहाऱ्यातून सहीसलामत निसटून जाणे, त्यासाठी आजारपण, वैराग्याचे सोंग, सुटका झाल्यावर  कसे आणि कुठे जायचे ह्यात उघड उघड आग्र्याहून सुटकेची पुनरावृत्ती आहे. अफगाण सरहद्दीवरची ऑक्सस नदी ओलांडून रशियात गुपचुप शिरण्यासाठी अच्चरसिंग चीना व अक्रमखान यांच्यावर वाटा शोधून काढण्याची दिलेली व त्यांनी चोख पार पाडलेली कामगिरी म्हणजे तर पन्हाळ्याचा वेढा फोडून जाण्यासाठी चोरवाटा शोधण्याचा आधुनिक अवतार. पन्हाळ्याचा वेढा चुकवून निसटल्यावर पालखी भलतीकडे पाठवून पाठलागावरच्या शत्रूची दिशाभूल करून स्वतः: निर्दिष्टीत मार्गाने जाणे आणि कलकत्त्यातून पसार झाल्यावर सरकारला हिंदुस्थानच्या तमाम गोसावी- संन्याशांची चौकशी करवत ठेवत, सरहद्दीची नाकाबंदी करवणे व आपण त्या आधीच पार होणे यात फरक काय? शिवराय आग्र्याला गेलेले असतानाही इकडे कारभार चोख होता तद्वत नेताजींच्या साथीदारांच्या कारवाया व पूर्वेशी संधान ते पसार झालेले असतानाही सुरूच होते. फार काय शिवरायांच्या पश्चात त्यांचा प्रत्येक किल्ला औरंगजेबाशी अखेरपर्यंत लढला तसेच आझाद हिंदचे वीरही नेताजींच्या पश्चात त्यांच्या नावे जयजयकार करीत ताठ मानेने शत्रूला आव्हान देत लाल किल्ल्यावर गेले व त्यांनी जनतेत प्रचंड चेतना निर्माण केली जिची धग सरकारला सहन होण्यासारखी नव्हती.

नेताजींनी पश्चिमेकडेच जायचा निश्चय केला होता. एक तर पूर्वेकडे बऱ्यापैकी तयारी होती, राशबिहारींनी संघटना बांधत घेतली होती, दक्षिण पूर्व आशियातील भारतीय जनता एकवटत होती. आता पश्चिमेकडून अक्ष राष्ट्रांना आपल्या राष्ट्राला पाठिंबा उघडपणे घेऊन, स्वतंत्र भारताला एक राष्ट्र म्हणून मान्यता प्राप्त करून घेऊन इंग्रजांना पूर्व आणि पश्चिम अशा दुहेरी कोंडीत पकडायचा त्यांचा डाव होता. मुळात रशियाकडून साहाय्य मिळेल अशीही त्यांना आशा होती आणि जपान वा जर्मनीपेक्षा तो देश भौगोलिकदृष्ट्या अधिक जवळ होता. क्रांतिवादी रशिया आपल्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देईल असा त्यांचा कयास होता. अर्थात महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर क्षणाक्षणाला राजकारणाचे रंग बदलत होते. आपल्या प्रयाणाचे पद्धतशीर प्रयत्न नेताजींनी जवळपास दीड वर्ष अगोदर सुरू केले होते. सर्वप्रथम आपले सहकारी लाला शंकरलाल यांना त्यांनी जपानला जाण्याचा परवाना मिळवून देऊन पुर्वेच्या मोर्चेबंदीसाठी रवाना केले.

३ सप्टेंबर १९३९. मद्रासच्या विशाल समुद्रकिनाऱ्या वरच्या सभेत नेताजींनी पुनरुच्चार केला, "इंग्रजरूपी सापाला जर गांधी अहिंसेचे दूध पाजत असतील तर ते अवश्य तसे करोत. मी मात्र या सापाचा फणा ठेचणार आहे, भले तो मला डसला तरी हरकत नाही". दोन लाखाचा जनसागर बेभान होवून टाळ्या वाजवत होता. इकडे जर्मनीने पोलंड्वर आक्रमण करून युद्धाला सुरुवात केल्याची बातमी आली होती. हीच वेळ, हीच संधी. नेताजीचा निश्चय दृढ होता. घरी आले आणि लगेचच नेताजींना भेटायला कलकत्त्याचे 'दर्पण' या लोकप्रिय पंजाबी मासिकाचे संपादक श्री निरंजन तालीब आले. त्यांच्या बरोबर एक पाहुणा होता. अच्छरसिंग चीना! प्रसिद्ध कीर्ती किसान पक्षाचे कार्यकर्ते. या माणसाचे अफगाण सरहद्दीवर जाणे येणे होते, तो मुलुख आणी ते रस्ते त्याच्या परिचयाचे होते. नेताजींनी आपली अफगाण सरहद्दीतून ऑक्सस नदी ओलांडून रशियात पसार होण्याची मनीषा बोलून दाखविताच, चीना खुशीने कबूल झाले व त्यांनी वाटाड्या म्हणून आपला विश्वासू साथी भगतराम तलवार याला देण्याची हमी दिली. नेताजींनी देशाबाहेर जावे असा सल्ला स्वातंत्रवीर सावरकरांनीही दिला होता, तोच सल्ला नेताजींना पुन्हा एकदा त्यांचे सहकारी निहारेन्दु दत्तमुझुमदार यांनी देत डॉ. सन्यत सेन, मॅझिनी यांचे दाखले दिले.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेताजी इंग्रजांना भयंकर सलत होते. नेताजी ही आता डोकेदुखी ठरणार हे सरकारला स्पष्ट दिसत होते. नेमक्या याच वेळी नेताजींनी चीन भेटीचा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला. ही आपल्या गळ्यातली ब्याद दूर जाते आहे या विचाराने खूश झालेल्या राज्यपाल हरबर्ट यांनी मोठ्या खुशीने अर्जावर शिफारस केली आणि तो वर पाठवला. मात्र लॉर्ड लिनलिथगो यांच्या तळपायाची आग तो अर्ज पाहून मस्तकाला गेली. राज्यपालांची त्यांनी दूरध्वनीद्वारे चांगलीच कान उघडणी केली. आपला लंगडा बचाव करत हर्बर्ट यांनी नुकतेच नेहेरु सुद्धा जाऊन आल्याचा दाखला देताच संतापलेल्या व्हॉईसरॉय यांनी त्यांना सुनावले की हे नेहेरू नव्हेत! एकदा चीनला गेले की चीनच्या सीमा रशियाला भिडलेल्या आहेत हे विसरून चालणार नव्हते. अर्ज नामंजूर झाला. याच सुमारास कबूल कंदाहाराकडची काही माणसे नेताजींना भेटून गेली. तिकडे जपान वकिलातीत खेपा चालूच होत्या, काही ठाम संकेत येत नव्हत, अखेर दूतावासानेच भडकलेल्या पश्चिमेकडे जाऊन आश्रय घेण्याचा सल्ला दिला. सरकारची पाळत तर होतीच. या दरम्यान अचानक सहकारी सत्यरंजन बक्षी एक दिवस अचानक एक अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडून आले. त्यांनी काही अत्यंत गोपनीय सरकारी उच्चस्तरीय कागदपत्रे आणली होती. त्यात अगदी थेट लंडनपासूनचे नेताजींचे अहवाल होते. सुदैवाने सरकारचा नेताजींना तातडीने गिरफ्तार करायचा विचार त्यातून तरी दिसत नव्हता. म्हणजे वेळ होती तर. मात्र कसे कुणास ठाऊक, पण एक दिवस कलकत्ता पालिकेचे अभियंते डॆ आणि त्यांचा पुतण्या त्यांच्या भेटीला आले व त्यांनी सांगितले की त्यांना डॉ. बलदेवसिंह यांच्याकडून असे समजले की नेताजी रशियाला जाणार आहेत. वरकरणी त्यांना झटकून टाकले तरी या बभ्र्यामुळे नेताजी अस्वस्थ झाले. त्यांनी त्वरित बाहेर निसटाचा बेत स्थगित केले, कारण आता सरकार सावध असणार हे उघड होते.

अचानक ३ जुलै १९४० रोजी आपण हॉलवेल स्मारकाचे आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली. हतबुद्ध झालेल्या मेजदांनी आपल्या सुभाषला संतप्त सवाल केला, की सरकार कोणत्या कायद्या अन्वये आत टाकता येईल याचा विचार करत असताना तुरुंगात डांबायची अशी संधी सरकारला सहज उपलब्ध करून देण्याचे कारण काय? नेताजी काहीच बोलले नाहीत, मात्र हा अस्मितेचा प्रश्न असून आपण आंदोलन करणारच असे त्यांनी सांगितले. सिराजौद्दौल्याने काही इंग्रज शिपायांना पकडले व कोंडून घातले, त्यांत अनेक गोरे शिपाई मरण पावले. हॉलवेल सुदैवाने बचावला होता व त्याने शौर्याचे प्रतीक म्हणून ते स्मारक डलहौसी चौकात बांधले अशी कथा  होती. ती अनेकांना साफ कपोलकल्पित वाटत होती. मात्र लॉर्ड कर्झनने या स्मारकाचा आवर्जून जीर्णोद्धार केला. इंग्रजांच्या दृष्टीने ते अस्मितेचे तर फाळणीच्या अटटाहासाने संतापलेल्या बंगाली जनतेच्या दृष्टीने ते साम्राज्यवादाचे प्रतीक होते. नेताजींनी हे स्मारक हटवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करताच २ जुलै म्हणजे नियोजित आंदोलनाच्या आदल्या दिवशी नेताजींना अटक करण्यात आले. ठरल्याप्रमाणे ३ तारखेला फॉरवर्ड ब्लॉकच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. सुमारे १५० आंदोलकांना अटक केली गेली. पुढे २३ जुलै रोजी ते स्मारक हालवण्याचे सरकारने जाहीर केले. अटकेत असलेल्या सर्वांना सोडून देण्यात आले - नेताजीखेरीज. १८ एप्रिलचे महंमद अली उद्यानातले प्रक्षोभक भाषण, १८ मे चा फॉरवर्ड ब्लॉकच्या अंकातील लेख असे नाना आरोप ठेवून नेताजींना गजा आड केले गेले. तुरुंगात असतानाच विधिमंडळाची एक खासदारकीची जागा रिक्त झाली व नेताजींनी त्या जागेसाठी तुरुंगातूनच अर्ज भरला आणि ते बिनविरोध निवडूनही आले. नेताजी तुरुंगात असल्याने सरकार निर्धास्त होते. हेच ते नेताजींचे 'कात्रज'. खरे तर हॉलवेल स्मारक नामे शिळ्या कढीला ऊत आणायची अर्थोअर्थी काहीही गरज नव्हती. मग अटक होणार हे माहीत असताना देखिल नेताजींनी आंदोलन का छेडले? हा तर चक्क सरकारला बेसावध ठेवायचा, सरकारचे लक्ष भलतीकडे वेधायचा प्रयत्न होता.

३० ऑक्टोबर रोजी नेताजींनी थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहुन कळविले की मी खासदार झालो आहे आणि मला प्रकृती बरी असल्यास संसदेच्या कामकाजात भाग घ्यायचा आहे. आपल्याला व काही मुसलमान राजकीय कैद्यांना मिळवणाऱ्या वागणुकीत भेदाभाद असल्याची तक्रार त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली. अखेर २६ नोव्हेंबरला त्यांनी बंगालचे राज्यपाल, गृहमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांना पत्र लिहिले की माझ्या स्वातंत्र्यावर आलेल्या घाल्याच्या निषेधार्थ मी आमरण उपवास करणार आहे. तुम्हाला भले त्याने फरक न पडो, पण माझे हे पत्र माझे 'राजकीय मृत्युपत्र' म्हणून जपून ठेवा, म्हणजे भविष्यात राज्यावर आलेल्या माझ्या देशबांधवांना ते उपलब्ध होईल. याच पत्रात त्यांनी बहुमोल संदेश दिला होता

"राष्ट्र जगावं म्हणून व्यक्तीने मरावं. भारताने जगावं आणी त्याला स्वातंत्र्य व गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून आज मला मृत्यूला मिठी मारलीच पाहिजे.माझ्या देशबांधवांना मी सांगेन की गुलामी राहणे हा सर्वात मोठा शाप आहे हे कधीही विसरू नका.अन्यायाबरोबर तडजोड करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे हे विसरू नका. चिरंतन सत्य लक्षात ठेवा. तुम्हाला आयुष्य पुन्हा हवे असेल तर तर तुम्ही ते अर्पण केले पाहिजे.अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध झुंजणे हा सर्वात मोठा सद्गुण आहे. त्यासाठी कितीही किंमत मोजायला लागली तरी ती द्यायला हवी हे ध्यानात ठेवा.

परिस्थिती खालावत होती, तब्येत अधिकाधिक क्षीण होत होती. आणि नेताजींचा मृत्यू सरकारला परवडणारा नव्हता. अखेर ५ डिसेंबर १९४० रोजी त्यांना तुरुंगातून सोडून घरी नजरकैदेत ठेवण्यात आले. घरी आल्यावर नेताजी कुणाला भेटेनात. तब्येत खराबच होती. बाहेर पोलिस व गुप्तचरांचा खडा पहारा होताच. एक दिवस त्यांना भेटायला मियॉं अकबरशाह आले. ते निघाले, त्यांना सोडायला नेताजींनी पुतण्या शिशिर याला पाठवले. अकबरशहांना पेशावरला तातडीने जायचे होते. त्यांना स्थानकावर सोडायला सांगितले. वाटेत त्यांना काही खरेदी करायची आहे, ती करून द्या असेही सांगितले. मात्र स्थानकावर सोडल्यावर अचानक चालकाच्या लक्षात आले की खान साहेब खरेदी केलेली फैज टोपी, लांब लेंगे, पायघोळ अंगरखे वगैरे गाडीतच विसरून गेले होते. ते आपण मग पाठवून देऊ असे शिशिरने चालकाला समजावले. दरम्यान 'महंमद झियाउद्दीन', आयुर्विमा प्रतिनिधी, पत्ता 'सिविल लाइन्स' अशी काही व्यवसायपत्रेही शिशिरने छापून आणली होती. एव्हाना नेताजींनी घरच्यांना जवळ बोलावून आपण संन्यास घेणार असून लवकराच आपण अन्न-पाण्यावाचून ध्याना बसणार असल्याचे सांगितले. दरम्यान राम किशन व चीना हे भगतरामच्या घरी गेले व त्याला एक बडा नेता काबूल मार्गे रशियाला जाणार असल्याची गुप्त बातमी सांगितली. त्यावेळी काबूलमध्ये बाबा गुरुमुखसिंहांना अटक झाली होती. मात्र त्यांचा विश्वासू सहकारी अबदखान यांनी साहाय्य करण्याचे मान्य केले. मालवाहतुकीच्या व्यवसायामुळे त्यांना डोंगराळ भागातल्या वाटा माहीत होत्या.

दि. १६ जानेवारी १९४१. बोसांच्या मोटारीत गुपचुप एम. झेड. अशी अक्षरे ठसवलेल्या सामानाच्या दोन पेट्या ठेवल्या गेल्या. रात्रीचा दिडचा सुमार. १६ संपून १७ जानेवारी सुरू झाला होता.सगळीकडे सामसूम असताना महंमद झियाउद्दीन साहेब शिशिर बरोबर वॉंडरर मोटारीतून बाहेर पडले. आधी जरा उलट सुलट फिरून सकाळी ९ च्या सुमारास मोटार धनबाद जवळच्या बरारी खेड्यात आली. शिशिर आणि महंमदसाहेब शिशिर्चे बंधू अशोक यांच्या घरी आले. जेवण झाले, दिवसभर विश्रांती झाली. रात्री मंडळी गोमोह स्थानकात आली, व पहिल्या वर्गाचे तिकिट काढून काल्का-दिल्ली मेलने रवाना झाले. खानसाहेब १९ जानेवारी रोजी पेशावरला सुखरूप पोहोचले.

पिंजरा रिकामा पडला होता, पक्षी कधीच उडून गेला होता. २६ जानेवारी रोजी बोस कुटुंबीयांनी नेताजी अचानक गूढ रितीने गायब झाल्याचे अधिकृत वृत्त जाहीर केले. बातमी ऐकून उभा हिंदुस्थान मोहरून गेला. सारे जग हादरले. त्या सुमारास इथे महाराष्ट्रात 'उडाला सुभाष राघूपरी' असे गाणे फार लोकप्रिय झाले अशी आठवण माझी आजी नेहमी सांगत असे.

sutake aadhi

नेताजींचे घरून पसार होण्या आधीचे अखेरचे प्रकाशचित्र, डिसेंबर १९४०.

सोबत आहेत ते मेजदा आणि मातोश्री.