आझाद हिंद सेना ५ - पूर्वरंग

नेताजी देशाबाहेर निसटले व पश्चिमेला गेले, त्यात त्यांचा जर्मनीकडून मदत मिळविणे हा हेतू तर होताच पण जपान - जर्मनी मैत्रिपूर्ण संबंधाचा अचूक फायदा उठवीत जर्मनीद्वारे जपानकडून अधिकाधिक साहाय्य मिळविणे हा तितकाच महत्त्वाचा दुसरा हेतू होता. जरी अफगाण सीमेवरून आग्नेयेच्या दिशेने हिंदुस्थानची सीमा अक्ष राष्ट्र सैन्याच्या साहाय्याने गाठायची व दोन दिशांनी शत्रूला कोंडीत पकडाचे हे गणित असले आपले खरे युद्ध आपण घरा पलीकडील अंगणात खेळत इशान्ये कडून देशात बाहेरून आंत असे सीमोल्लंघन करणार हे नेताजींना अभिप्रेत होते. नेताजी व पूर्वेकडील भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतलेले क्रांतिकारक  यांच्यात अनेक मर्यादांमुळे तुटक असला तरी संवाद होता, एकमेकाची चाहूल घेतली जात होती. एकदा तर जपानहून राशबिहारी बोस यांनी घाडलेले एक पत्र कलकत्ता पोलिस प्रमुख टेगार्ट याला गुप्तचरांनी आणून दिले होते. ते जप्त केले नाही याचे कारण त्याने असे सांगितले की हे भयंकर लोक अनेक नावांनी अनेक पत्त्यांवर अशी पत्रे एकाच वेळी पाठवतात, एखादे जप्त केले तरी दुसरी मिळतीलच, तेव्हा हे पत्र न पकडता पोचू देणे व लक्ष ठेवणे हेच उत्तम. म्हणजेच नेताजींचा पूर्वेला संपर्क होता हे निश्चित. पुढे नेताजी देशाबाहेर जाऊन जर्मनीत प्रकट झाल्याचे रेडिओ बर्लिनवरून ऐकताच पूर्वेत राशबिहारी, प्रीतमसिंह यांना जो आनंद झाला त्यावरूनही पूर्वेने नेताजींना मनोमन आपला नेता म्हणून स्वीकारले होते हे स्पष्ट आहे. नेताजी जर्मनीत गेले तेव्हा इकडे पूर्वेला काय परिस्थिती होती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.

राश बिहारी बोस म्हणजे साक्षात क्रांतिकारकांना क्रांतिपथ दाखविणारा प्रकाशमान तारा. दिल्लीत २३ ऑक्टोबर १९१२ ला व्हॉईसरॉयच्या मिरवणुकीवर बोंब टाकल्यावर हाहाःकार उडाला. जुलूम, फितुरी या तंत्राने या कटातले मास्टर अमिरचंद, अवध बिहारी, बालमुकुंद हे दिलीत फासावर जात हुतात्मे झाले तर बसंतबिस्वास अंबाल्यात हुतात्मा झाला. मात्र या मागचा मेंदू व सक्रिय सहभागी असलेले राशबाबू मात्र सरकारला जाम सापडले नाहीत. हा मनुष्य कसलेला नट व बहुरूपी असल्याचे इंग्रज अधिकारी सांगत. नाना भाषा, नाना वेष यामुळे राशबाबू सरकारच्या डोळ्यात धूळ फेकून पंजाब, बंगाल, उत्तर प्रदेश असे लपाछपी खेळत होते. एकदा तर ते असलेल्या इमारतीला पोलिसांनी घेरल्यावर ते डोक्यावर मैला घेऊन मेहतराच्या वेषात तर एकदा तिरडीवरून हारात गढलेले प्रेत बनून ते पसार झाल्याच्या दंतकथा प्रसिद्ध होत्या. राशबाबू १९१३ साली अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर उत्थानाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले व त्यांनी क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, कर्तारसिंह सराबा, सोहनसिंह भकणं यांच्या साहाय्याने बनारस येथे लष्करी छावणीवर हल्ला चढवून सशस्त्र उठाव करायचा असा बेत नियोजित केला. मात्र कृपालसिंह नावाच्या फितुरामुळे तो फसला व अटक होऊन क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, कर्तारसिंह सराबा, सोहनसिंह भकणं व त्यांचे अनेक सहकारी यांनी हौतात्म्य पत्करले. मात्र याहीवेळी ही राशबाबू सुखरूप निसटले. त्यांचे खास सहकारी सचिंद्रनाथ संन्याल यांनी पुढे हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना ही क्रांतिसंघटना स्थापन केली. अखेर असा लपंडाव इथे खेळत राहून काहीच साध्य होणार नाही हे ओळखून त्यांनी आपला रोख पूर्वेला वळवला. बॅंकॉक, मलाया, सिंगापूर येथे असलेले हिंदुस्थानी, त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा प्रयत्न यामुळे ते प्रेरित झाले असावेत. (पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान सिंगापुरात इंग्रजांना मारून तिथे राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता). जाण्याचा निश्चय होताच खटपटीने 'राजा पी. एन. टी. टागोर' या नावे प्रवास परवाना मिळवून व कागदोपत्री रविंद्रनाथ टागोरांचे दूरचे नातेवाईक असल्याची बतावणी करून राश बाबू १२ मे १९१५ रोजी बोटीवर चढले व २२ मे रोजी सिंगापुरात दाखल झाले व तिथून पुढे ५ जून रोजी जपानच्या कोबे बंदरात उतरले. पोहोचले.

जपानला त्यांची गाठ हेरंबला गुप्ता व भगवान सिंह या दोन गदर क्रांतिकारकांशी पडली. त्या काळात ब्रिटन व जपान मैत्रीचे संबंध असल्याने इंग्रज जपान मधल्या भारतातून परागंदा होऊन आलेल्या क्रांतिकारकांवर लक्ष ठेवून होते व त्यांना हस्तांतरित करण्यासाठी जपानचा पिच्छा पुरवीत होते. हेरंबलाल अमेरिकेला निघून जाण्यात यशस्वी ठरले. इकडे राश बिहारी यांनी पाठलाग चुकवून आपले वास्तव्य गुप्त राखण्यासाठी १७ वेळा आपले राहण्याचे ठिकाण बदलले. देशासाठी काहीतरी करण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या राशबिहारींची गाठ योगायोगाने पडली ती चीनच्या डॉ. सन्यतसेन यांच्याशी. खिशात रविंद्रनाथांचा सचिव असल्याचे ओळखपत्र, मनात देशप्रेम आणि कानांत फासावर गेलेल्या क्रांतिकारक साथीदारांचे शब्द "राशभाई, क्रांतीचा ध्वज फडकत ठेवा' या पलीकडे दुसरे काही नसलेल्या आणि अनोळखी भाषा, अनोळखी लोक असलेल्या जपान मध्ये येऊन ठाकलेल्या या विलक्षण तरुणाबद्दल डॉ. साहेबांना अत्यंत आत्मीयता वाटू लागली व मग डॉ. त्यांना मित्सुरू टोयामो यांच्याकडे घेऊन गेले. वयोवृद्ध असलेले मित्सुरू म्हणजे आशियातील क्रांतिकारकांचे भीष्माचार्य. आपल्याला परमपूज्य असलेला बुद्ध ही हिंदुस्थानची देणगी मानणाऱ्या मित्सुरूंचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यास पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये व जनतेत वजन होते. मित्सुरूंनी तत्काळ राशबाबूंना आशीर्वाद देत आपले शिष्यत्व दिले व त्यांची राहण्याची सोय केली. राशबाबूंनी सोमा कुटुंबातील तोशिको या मुलीशी लग्न केले व ते जपानामध्ये जपानी नागरिक म्हणून स्थायिक झाले. आता इंग्रजांना त्यांना हात लावणे सोपे नव्हते, मुळात जपानी मुलीशी लग्न करण्यात त्यांचा उद्देश तोच होता. ते जपानी भाषा शिकले, व पत्रकारिता व लेखन करू लागले. काही वर्षांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मात्र पत्नीशोकाने एकाकी झालेल्या राशबिहारींना हिंदुस्थानातील नव्या क्रांतिपर्वाची चाहूल लागली आणि ते तडफेने तयारीस लागले.

इकडे संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियातील कामानिमित्त वा देशांतराने आलेली व स्थायिक झालेली हिंदुस्थानी जनता आता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी सज्ज झाली होती. मलाया, फिलिपाईन्स, बँकॉक येथे चळवळीने जोर धरला होता. प्रितमसिंग हे १९३३ पासून बँकॉकमध्ये स्थायिक होते व त्यांच्यावर पोलिसांची नजर होती. बाबा अमरसिंग हे गदर कार्यकर्ते. १९१५ सालच्या अयशस्वी गदर उत्थाना नंतर ते २५ वर्षे कारावासाची सजा अंदमान व रंगून येथे भोगून १९४० साली सुटले. मंडाले तुरुंगात त्यांना नेताजींच्या सहवासाची संधी लाभली होती. सुटका होताच ते बॅंकॉक येथे आले व प्रितमसिंहांना भेटले. या दोघांनी 'इंडियन इंडिपेन्डन्स लिग' ची स्थापना केली. १९४० च्या डिसेंबरमध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून हॉंगकॉंगच्या तुरुंगात सजा भोगत असलेले ३ हिंदुस्थानी क्रांतिकारक तिथून निसटले व कॅंटन येथील जपानी लष्करी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने बॅंकॉकला आले व त्यांची भेट कर्नल तामुरा या जपानी अधिकाऱ्याशी झाली. तामुराने त्यांना प्रितमसिंगांच्या स्वाधीन केले.

१९४१ पासून मेजर फुजीवारा बँकॉक मधील प्रितमसिंगांच्या गुप्त संघटनेच्या साहाय्याने कार्यरत झाला. त्याच्यावर मलाया सिंगापूर येथील स्थायिक असलेल्या भारतीयानं तसेच ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांना जपानच्या पाठिंब्याने ब्रिटिशांविरुद्ध लढायला प्रवृत्त करायचे ही कामगिरी सोपविण्यात आली होती. एफ्. किकान - म्हणजे फुजिवारा किकान या संघटनेत १२-१५ जपानी सैन्याधिकारी होते. फुजिवारा यांनी मोहनसिंगांची भेट घेऊन वाटाघाटी केल्या व त्यांनी परस्परांशी सहकार्याचा करार केला. त्याच्या अटी अशा:
१) भारत व जपान ही दोन्ही राष्ट्रे समान दर्जाची व सार्वभौम असतील या दृष्टीने हा करार आहे
२)हिंदुस्थानला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंडियन इंडिपेन्डन्स लिग इंग्लंडविरुद्ध सशस्त्र युद्ध करील व त्यात जपानने दिलेल्या सर्व मदतीचे स्वागत केले जाईल. मात्र  भारतीय भूप्रदेशावर वा कोणत्याही भागावर जपान आपला हक्क सांगणार नाही किंवा जिंकण्याची अभिलाषा बाळगणार नाही. जपान भारताच्या अंतर्गत राजकीय, आर्थिक, लष्करी, सांस्कृतिक वा धार्मिक स्वरूपाच्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप करणार नाही.
३)धर्म, वंश, जात वा राजकीय विचारप्रणाली याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्वांना इंडियन इंडिपेन्डन्स लिग सामावून घेईल, फक्त सामील होणाऱ्याच्या मनात इंग्रजांविरुद्ध लढायची तीव्र इच्छा असली पाहिजे.
४)इंग्लंड आणि जपान यांच्यात युद्ध पेटले की इंडियन इंडिपेन्डन्स लिग जपानी सैन्यासोबत दक्षिण थायलंड व मलायाकडे कुच करेल. ब्रिटिश सैन्यातले हिंदी सैनिक तसेच मलाया, थायलंडमधील भारतीय यांच्यातूनच 'आझाद हिंद फौज' उभारण्यात येईल. जपानने जिंकलेल्या भूप्रदेशात आझाद हिंदच्या सैनिकांना मुक्तपणे फिरता येईल व जपानी सेना त्यांना बंधुभावाने वागवेल.
५) इंडियन इंडिपेन्डन्स लिगला टोकियो,बॅंकॉक तसेच मलयांतील शहरातल्या नभोवाणी केंद्रातून कार्यक्रम प्रक्षेपित करता येतील.
६) प्रितमसिंगांच्या मागणीनुसार त्यांना जपान अर्थ, शस्त्र तसेच अन्य सामग्री उपलब्ध करून देईल.
७) जपानचे लष्करी अधिकारी इंडियन इंडिपेन्डन्स लिगचे नेते आणि जर्मनीत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात संपर्क साधण्यास मदत करतील.