आझाद हिंद सेना ९ - जपानचा झंझावात आणि आझाद हिंदची उभारणी

दिनांक ७ डिसेंबर १९४१. जपानी आरमाराने  पर्ल हार्बर येथील अमेरिकेच्या  नाविक तळावर अनपेक्षित असा जबरदस्त हवाई हल्ला चढवला आणि बलाढ्य अमेरिकी आरमाराचे बघता बघता तीन तेरा वाजवून टाकले. pharb2हा हल्ला इतका भयंकर आणि विद्युतवेगाने झाला की पर्ल हार्बर जवळील ओहाऊ तळावरील दोनशे विमानांपैकी दीडशे विमाने बरबाद केली; पैकी निदान ३८ विमाने प्रतिकारासाठी आकाशात तरी उडाली होती, बाकीची जागीच उध्वस्त झाली. असाच भयानक विध्वंस फोर्ड बेटावरही झाला. खुद्द पर्ल बंदरात अमेरिकी आरमाराच्या ऍरिझोना, व्हर्जिनीया, कॅलिफोर्निया, ओक्लाहोमा अशा एकूण ज्या ८६ युद्धनौका उभ्या होत्या. त्यापैकी बहुसंख्य बुडल्या तर उरलेल्या निकामी झाल्या. खरेतर हा हल्ला अनपेक्षित अजिबात नव्हता.  जपानने हा हल्ला आत्यंतिक गुप्त राखला असला तरी त्याचे नियोजन व अंमलबजावणी जबरदस्त व परिपूर्ण होती.  मात्र अमेरिकी नौदलाला हला होणार याचा काहीसा सुगावा लागलेला होता. अमेरिकी नौदलप्रमुख स्टॉर्क याने २-३ महिने आधीच पर्ल हार्बरचा नाविक तळ प्रमुख pharb4ऍडमिरल किनेल व पायदळ प्रमुख लेफ्टनंट कर्नल शॉट यांना तशी स्पष्ट कल्पना दिलीही होती मात्र फाजील आत्मविश्वासामुळे त्यांनी या इशाऱ्याकडे फारसे लक्षच दिले नाही. खुद्द ७ डिसेंबरच्या पहाटे गस्तीची विमाने व रॅड ही गस्तनौका गस्तीवर असताना त्यांना एक जपानी पाणबुडी दिसली, ती त्यांनी बुडविली, मात्र पुढे काहीच शोध घेतला गेला नाही.

ही तर सुरुवात होती; या निमित्ताने दुसरे महायुद्ध आता खऱ्या अर्थाने आशिया खंडात व प्रशांत महासागरात येऊन धडकले. pharb5 अमेरिकेने जपानविरुद्ध युद्धाची घोषणा केली. अर्थात जपान आपल्या संपूर्ण तयारीनिशी व सागरी सामर्थ्यावर विश्वासून युद्धात उतरले होते. पर्ल हार्बरच्या हादऱ्यातून अमेरिका सावरत असतानाच जपानने सयाम, फिलिपाईन्स, सिंगापूर व मलाया अशी जबरदस्त मोहीम सुरू केली. १ जानेवारी १९४२ रोजी मनिलावर जपानी ध्वज चढला आणि अमेरिकी सेना बाहेर पडली. इंडोचायना तर आधीच जपानच्या आधिपत्याखाली गेला होता. जपानी बॉंबफेकी विमाने सयाम, मलाया व सिंगापूर भाजून काढत असतानाच जपानी आरमारावर अचानक हल्ला चढवून, त्यांना बेसावध गाठून जपानला शह देण्याच्या योजनेनुसार सयामच्या आखातात ब्रिटनने आपल्या रिपल्स व प्रिन्स ऑफ वेलास या युद्धनौका घुसवल्या खऱ्या; पण आकस्मिक हल्ला त्वरेने करण्यासाठी त्यांनी विमानवाहू नौका न नेण्याचे धाडस केले व नेमके तेच त्यांच्या अंगाशी आले! वेडे होऊन तुफान बॉंबफेक करणाऱ्या पेटलेल्या जपानी वैमानिकांनी या दोन्ही बलाढ्य युद्धनौकांना सागराचा तळ दाखवला आणि ब्रिटनच्या सामर्थ्यवान समजल्या जाणाऱ्या नौदलाला जबरदस्त हादरा बसला. मलाया, बोर्निओ नंतर जपानचा रोख वळला तो हॉंगकॉंगवर. १२ डिसेंबर ते २५ डिसेंबर घनघोर लढाई करून, विमाने व आरमारी ताकद आपल्या लष्कराच्या दिमतीला देत १५ दिवसात ब्रिटिशांचे हॉंगकॉंग अखेर पडले. हॉंगकॉंग साठी जपान इतके इरेला पेटले होते की वेढा चालू असताना एकदा मागच्या अंगाने चुंगकिंग येथून चिनी सेना हल्ला करणार अशी खबर आली तरी आपल्या सैन्यावर विश्वास असलेल्या जपानने त्याची दखलही घेतली नाही. आता क्रम होता सिंगापूरचा! ३ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी असा जबरदस्त संग्राम केल्यानंतर अखेर ब्रिटिशांना जपानी आक्रमण थोपवणे अशक्य झाले. मलाया-सिंगापूर संग्रामात प्रकर्षाने उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे फिलिपाईन्समध्ये स्थानिक इंग्रजांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढले तर मलाय जनता या युद्धात साफ तटस्थ होती, निष्क्रिय होती आणि त्यांनी ब्रिटनला यत्किंचितही मदत केली नाही. इंडियन इंडिपेन्डन्स लीगच्या कार्याचा हा प्रभाव असे म्हणायला पुष्टी आहे कारण लीगने आशियात स्थायिक असलेल्या हिंदी जनतेत फार मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण करून त्यांची अस्मिता चेतविली होती. अर्थातच ते भारतावर अत्याचार करून भारताला गुलामीत जखडवणाऱ्या ब्रिटनला आपला शत्रू मानत होते व त्यांचा पराभव पाहायला उत्सुक होते.

१९४० ते १९४३ या कालखंडात पूर्वेकडे आय आय एल म्हणजेच इंडियन इंडिपेन्डन्स लीग ने आपले संघटनाजाल ब्रह्मदेश, थायलंड, मलाया,चीन, जपान असे सर्वत्र पसरवले होते. बॅंकॉक येथे मुख्यालय असून सरदार अमरसिंग व सरदार प्रितमसिंग हे या भूमिगत संघटनेचा कार्यभार सांभाळत होते. त्यांना थामुरा या जपानी सेनाधिकाऱ्याने उत्तम सहकार्य दिले व त्यांच्या गुप्त भेटी वारंवार घडत गेल्या. १९४१ मध्ये नेताजी इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन बर्लिनमध्ये प्रकटल्याचे वृत्त समजताच आझाद हिंद संघटना (आय आय एल) तर आनंदाने व उत्साहाने प्रफुल्लित झालीच पण जपाननेही आपल्या बर्लिन मधील वकिलातीला जर्मनीतील भारतीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. लगोलग इंपिरीयल जनरल हेडक्वार्टर्स ने तातडीने आझाद हिंद संघटनेशी संपर्क साधला. याच सुमारास म्हणजे ऑगस्ट मध्ये ब्रिटन, हॉलंड व अमेरिकेने संयुक्त कारवाई सुरू केली आणि दक्षिणपूर्व आशियातील परिस्थिती तंग झाली, यावर मात करण्यासाठी जपानने कर्तबगार लष्करी अधिकाऱ्यांची एक तुकडी तातडीने बॅंकॉकला रवाना केली, तिचे नेतृत्व करीत होते मेजर फुजीवारा. या तुकडीला शिटा किकान ऑर्गन असे नांव होते. थामुरा यांच्या मार्फत शिटा किकान व आझाद हिंद संघटना यांचे संबंध जवळचे आणि परस्पर सहकार्याचे झाले. या शिटा किकानला व जपान सरकारला आशियातील भारतीय स्वातंत्र्य चळवळ व बर्लिनस्थ नेताजी यांच्याविषयी विशेष आस्था होती. बृहन पूर्व आशियाई युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी आझाद हिंद संघटनेचे प्रितमसिंग व जपानी सेनाधिकारी यांच्यात रीतसर करार झाला व पुढे या कराराची कलमे  नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतरही मान्यताभूत ठरवली व अनुसरली. त्यामुळेच हा करार अतिमहत्त्वाचा ठरतो. या कराराची कलमे बव्हंशी रूपाने पूर्वरंग या लेखात नमूद केलेली आहेत.

८ डिसेंबर १९४१ रोजी जपानने दोस्त राष्ट्रांविरुद्ध युद्ध जाहीर केले व इंपीरिअल जनरल हेडक्वार्टरने तातडीने आपल्या फौजांना सर्व आघाड्यांवर चढाया करायचा आदेश दिला. एकीकडे जपानी सेना मलायावर तुटून पडली तर दुसरीकडे एफ. किकान व आझाद हिंद संघटनेने थायलंडमध्ये संयुक्त आघाडी उभारून मुसंडी मारली. १० डिसेंबर रोजी थाई-मलायी सीमेवरील यजयी शहरात प्रथमच भव्य भारतीय राष्ट्रीय निशाण फडकले, जपानी व हिंदुस्थानी भाषेत ’आझाद हिंद संघटना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहे असे फलक लागले. या प्रसंगाधारे प्रथमच गुप्त कारवाया करणाऱ्या आझाद हिंद संघटनेने आपले कार्य व उद्दिष्ट जाहिरपणे प्रकट केले. १४ डिसेंबर ला अरोलुआत्राच्या (अलोरस्टार?) जवळ एका रबर मळ्यांत जपानी सेनेने इंग्रज फौजेला गाठले. ही कर्नल फिट्झपॅट्रीकच्या हुकुमतीखालची १/१४ पंजाब रेजिमेंट होती. या जबरदस्त गनिमी हल्ल्यात कर्नल फिट्झपॅट्रीकने शरणागती पत्करली. जपानी सेनेने फौजेला घेरले, मात्र त्यांना कैद न करता ’इंडो इंडो’ असा गलका केला व त्यांना अभय दिले असल्याचे सांगितले. मेजर फुजीवाराने दुभाषामार्फत सर्वांना आवाहन केले की जपान हे राष्ट्र हे हिंदुस्थानचे मित्रराष्ट्र असुन ते त्याच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना सर्वतोपरी साहाय्य देणार आहे, तेव्हा इंग्रजी हुकूम मोडीत घाला आणि आपल्या देशासाठी आपले सैन्य म्हणून लढा. इंग्रजांच्या हुकुमतीत, इंग्रज अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करत असताना ब्रिटिश सैनिकांच्या मानाने हिंदुस्थानी सैनिकांना मिळणारी दुय्यम वागणूक, अधिकार न मिळणे, कमी लेखले जाणे, गोऱ्यांकडून अपमान होणे हे या बटालियनमधील कॅप्टन मोहनसिंग यांना फार सलत होते. आपण आपला जीव आपल्याला गुलामीत जखडणाऱ्या इंग्रजांच्या जयासाठी का ओवाळून टाकायचा? हा प्रश्न आता त्यांना वारंवार सतावु लागला होता. हे लेकाचे आपली सेवा संपवून गलेलठ्ठ मानधन व निवृत्तिवेतन घेऊन आपल्या बायका मुलांसमवेत मजेत ब्रिटनला निघून जातील आम्ही मात्र यांच्यासाठी टाचा घासत मरायचे? यांची अरेरावी, उद्धट वर्तन निमूट सहन करायचे? का? का? का? जेव्हा या तुकडीवर जपानी सेनेने हल्ला केला, वरून तुफान बॉंबफेक केली तेव्हा एकही ब्रिटिश लढाऊ विमान या सैनिकांना हवाई छत्र देण्यासाठी आले नव्हते याचा संताप त्यांना आला होता. अशा परिस्थितीत जेव्हा मेजर फुजीवाराने जेव्हा एफ. किकान व जपान-हिंदुस्थान सौहार्द्राविषयी निवेदन करून आपल्या देशासाठी लढणाऱ्या आझाद हिंद संघटनेत सामील होऊन आपल्या हिंदुस्थान साठी लढण्याचे आवाहन केले तेव्हा ते विलक्षण प्रभावित झाले.  मोहनसिंगांना या भावी सेनेचे सेनापतिपद व सर्वोच्च पद देऊ केले गेले व लवकरच ते जनरल मोहनसिंग झाले. मात्र मोहनसिंगांना जेव्हा जपानी अधिकाऱ्यांनी त्यांनी हिंदुस्थानी उठावाचे नेतृत्व करावे असे सुचविले तेव्हा मात्र मोहनसिंगांनी स्पष्ट सांगितले  की नेताजी आता भारताबाहेर पडले असून त्यांना इकडे आणावे व तेच खरे नेते म्हणून पात्र आहेत आणि हिंदुस्थानी स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ त्यांच्याचकडे आहे, ते इतर कुणाला पेलणारे नाही. मात्र मोहनसिंगांनी भरती होऊ पाहणाऱ्या सैन्याचे नेतृत्व स्वीकारायला होकार दिला व सैन्य उभारणीची जबाबदारी स्वीकारली.

 मलाया सीमेवर जपान-भारत संयुक्त लष्कराचे यश पाहता लष्करी अधिकाऱ्यांनी इंपीरिअल जनरल हेडक्वार्टरला पाठवलेल्या विशेष अहवालात नमूद केले की संयुक्त आघाडी निश्चित अधिक फलदायक आहे. या अहवालात असेही म्हटले होते की जपानी सेना ब्रह्मदेशापर्यंत इंग्रजांना हुसकून त्यांचा पराभव करू शकेल. मात्र इंग्रजांना पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी जपानी सेनेला मग ब्रह्मदेश सरहद्द ओलांडून हिंदुस्थानात जावे लागेल; मात्र भारतीय जपानचा प्रतिकारच करतील व इंग्रजांना ते फायद्यात पडेल. यापेक्षा जर आझाद हिंद सेना व जपान अशी संयुक्त आघाडी असेल तर ते अधिक सुकर होईल. अशा तऱ्हेने संयुक्त आघाडी प्रत्यक्षात आली.

"एकच पर्याय - तात्काळ बिनशर्त शरणागती!"

BritishSurrender[1]

कर्नल यामाशीटा इंग्रजांची बिनशर्त शरणागतीसाठी २४ तासांच्या मदतीची मागणी धुडकावुन लावताना. समोर पाठमोरा ले. ज. आर्थर पर्सिवल.

अखेर १५ फेब्रुवारी १९४२ ला सिंगापूर पडले व ब्रिटिश सैन्याने संपूर्ण शरणागती पत्करली व आपले सैन्य जपानच्या स्वाधीन केले. मुकाट्याने मान खाली घालून लेफ्टनंट जनरल आर्थर पर्सिवल सिंगापुरात बिनशर्त शरण आला.  सुमारे ४५००० भारतीय युद्धकैदी १७ फेब्रुवारी रोजी फारेर मैदानावर जमा करण्यात आले व एक विराट सभा आयोजित केली गेली. या सभेत एफ किकानचे अधिकारी व स्वतः: मेजर फुजीवारा यांनी भाग घेतला. याच सभेत इंग्रज सेनाधिकारी कर्नल हंट यांनी ब्रिटनची शरणागती जाहीर करताना आपल्या सैनिकांना असे सांगितले की यापुढे ते आपली सेना जपानी सेनेच्या स्वाधीन करीत असून सैनिकांनी यापुढे जपानी सैन्याचे हुकूम मानावेत. आयुष्यभर इंग्रजांची इमानाची चाकरी करणारे हिंदी सैनिक यामुळे कमालीचे दुखावले गेले. ज्यांच्या साठी आम्ही रक्त सांडले, आपले घरदार सोडून वणवण करीत फिरलो ते कृतघ्न इंग्रज असे आम्हाला एकाएकी वाऱ्यावर सोडतात? ते आम्हाला शत्रूच हाती कसे काय सोपवू शकतात?

 मेजर फुजीवारा यांनी जपानी भाषेत अत्यंत आवेशपूर्ण भाषण केले ज्याचे भाषांतर तत्काळ सैनिकांना ऐकविण्यात येत होते. fujiwara speech

निहॉनचा होनामारु आणि हिंदुस्थानचा तिरंगा एकत्र फडकताना

Indo_Nippon

भारतीय सैनिकांना भावनिक आवाहन करताना फुजीवारा यांनी असे आवाहन केले की यापुढे जपान व हिंदुस्थान हे मित्र आहेत आणि आपल्या मित्राच्या स्वातंत्र्यसंग्रामात जपान पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी मदत करणार आहे. सैनिकांनी आता जागे व्हावे व आपल्या देशासाठी लढण्यासाठी सज्ज होऊन इंग्रजी गणवेश व गुलामी झुगारून द्यावी. याच सभेत मोहनसिंग तसेच प्रितमसिंग यांचीही प्रभावी व जोषपूर्ण भाषणे झाली.  फुजीवारांपठोपाठ प्रितमसिंगांचे भाषण झाले व त्यांनीही निर्णायक वेळ येऊन ठेपली असून जर आत्ता योग्य निर्णय घेण्यात चूक केली तर अशी संधी पुन्हा कधी येईल ते सांगता येणार नाही व फार उशीर होईल, तेव्हा हिंदुस्थानच्या सुपुत्रांनो आपल्या देशासाठी लढायला सज्ज व्हा असे आवाहन केले. प्रितमसिंगांचे कळकळीचे व अंत:करणापासूनचे भाषण ऐकून उपस्थित हिंदी शिपायांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यानंतर मोहनसिंगांचे भाषण झाले व त्यांनी आपण जसे जागे झालो तसे तुम्हीही जागे व्हा व परक्यांची चाकरी सोडून आपल्या देशासाठी लढा व आयुष्याचे सोने करा असे आवाहन केले. बघता बघता सैनिक पुढे येऊ लागले आणि स्वातंत्र्य सेना आकारास आली.याचा परिणाम म्हणजे असंख्य हिंदी शिपायांनी ब्रिटिश सैन्याच्या चाकरीपेक्षा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्याचे व देशासाठी लढत वीरमरण पत्कराचे ठरवले. अर्थात इंग्रजी अपप्रचार व संशयाचे वातावरण यामुळे तसेच परिस्थितीचे नीट आकलन न झाल्याने अनेकांनी युद्धकैदी म्हणूनच राहणे पसंत केले. मात्र विचाराअंती व देशाचा विचार करून अनेक धुरंधर सामील होत गेले जे पुढे आझाद हिंद सेनेचे नाव सुवर्णाक्षरात लिहिणार होते; ते होते झमन कियानी, शहानवाझ खान, गुरुबक्षसिंग धील्लॉं, प्रेम सेहगल,जगन्नतथराव भोसले...

आतापर्यंत आझाद हिंद संघटनेच्या लष्करी अंगाला स्वातंत्र्य संग्रामसेना/ मुक्तिसेना अशी नावे होती. मात्र यापुढे हिंदुस्थानसाठी लढणाऱ्या सेनेला मोहनसिंगांनी ’आझाद हिंद सेना’ - इंडियन नॅशनल आर्मी असे नाव सुचविले व जपानने ते तत्काळ मान्य केले. सर्वत्र एक नवा जोष, नवा उत्साह निर्माण झाला. आता हालचालीमध्ये सुसुत्रता व वेग येण्यासाठी आझाद हिंद संघटना व आझाद हिंद सेना यांचे मुख्यालय सिंगापूर येथे हालविण्यात आले व मोहनसिंगही सिंगापुरात आले. आझाद हिंद सेनेचा विस्तार व विकास यासाठी मोहनसिंगांनी अथक परिश्रम घेतले व आझाद हिंद सेना सक्षम केली. २० मार्च १९४२ मध्ये आशियातील भारतीय स्वातंत्र्यप्रेमीचे संमेलन टोकियो येथे भरवले गेले, त्याचे प्रमुखपद राशबिहारींकडे होते. या परिषदेला बॅंकॉक हून विमानाने टोकियोला जात असताना ग्यानी प्रितमसिंग व कॅप्टन अक्रमखान  व स्वामी सत्यानंद पुरी होनासू बेटावरील चक्रीवादळात विमान सापडल्याने मृत्युमुखी पडले व आझाद हिंदला एक मोठा धक्का बसला. यामुळे परिषदेवर विषण्णतेचे सावट आले. राशबिहारींना व मोहनसिंगांनी या परिषदेसाठी विशेष परिश्रम घेतले होते.

राशबिहारी व मोहनसिंग

rash behri-mohan singhसुरुवातीला या परिषदेवर तीन देशभक्त अचानक साथ सोडून या जगातून निघून गेल्याचे दु:ख होते, त्याचा विसर पडावा अशी एक घटना या परिषदेच्या दरम्यान घडली आणि ती म्हणजे जर्मनीतुन आलेला नेताजींचा या परिषदेसाठीचा शुभसंदेश. या परिषदेत जपान सरकारने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाला, सार्वभौमत्वाला संपूर्ण पाठिंबा जाहीर करावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र टोजो सरकारकडून कुठलेच उत्तर मिळत नव्हते.