आझाद हिंद सेना २ - हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंघर्षाचा आढावा

१८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात वासुदेव बळवंत फडके नावाची उल्का कोसलळी आणि लुप्त झाली. मग पुढची ठिणगी पडली ती चाफेकर बंधुंच्या रुपाने. विसावे शतक उगवले ते नव्या ज्वाला घेउनच - लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी तलवारी सारखी चालवीत थंड, अचेतन समाजाला धग दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यदेवतेचे पोवाडे गात थेट हिंदुस्थानच्या हाती पहिले शस्त्र दिले. पनास वर्षे काळेपाणी झालेल्या स्वातंत्र्यवीरांनी शिक्षा देणाऱ्यालाच प्रतिप्रश्न केला, "तितकी वर्षे तुमचे साम्राज्य टिकेल काय?" तर लोकमान्यांनी सरकारला डोके ठिकाणावर आहे का असे ठणकावून विचारले होते. दोघेही आपापल्या पद्धतिने जनजागृती चेतवित होते, क्रांतियज्ञ सिद्ध करीत होते.  याच सुमारास भारतात एक नवा किरण उमटला. गांधी. दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या या माणसाने अहिंसा आणि सत्याग्रह ही नवी अस्त्रे आपल्याबरोबर आणली होती. सहजता, सोपेपणा व कुणालाही अंगीकारता येइल अशी देशभक्ती, ती सुद्धा समाजसेवेच्या स्वरुपात. हा मनुष्य सामान्य जनतेला पटकन आपला वाटला. बघता बघता त्याने जनतेला एकत्रीत करायचा चंग बांधला आणि स्वातंत्र्याच्या प्रयत्नाला एका देशव्यापी संघटित प्रयत्नाचं रुप आलं. क्रांतिकारकांविषयी कितीही आदर असला तरी त्यांच्या अग्नीपथावर चालण्याची हिंमत सामान्य माणसात नव्हती. अग्नी कितीही तेजस्वी असला, पूजनिय असला, तरी त्याची धग इतकी प्रखर असते की आपण त्याच्या जवळ जाउच शकत नाही. या मानाने गांधींचा देशप्रेमाचा मार्ग फार सोपा व सरळ होता. महाराष्ट्राच्या संतांनी 'प्रपंच करावा नेटका' अशी संसार सांभाळून इश्वरभक्ती करायची संथा जनसामान्यांना दिली तदवत गांधींनी जनतेला 'देशभक्ती साठी असामान्यत्वच आवश्यक नाही तर ती सामान्य माणसालाही करता येते" हा कानमंत्र दिला.

हिंदुस्थानातील स्वातंत्र्य लढ्याचा आढावा घेतला तर असे दिसुन येते की १९२० साली लोकमान्य टिळक निवर्तल्यानंतर कॉंग्रेसचे नेतृत्व गांधींकडे आले. गांधी हे अहिंसावादी होते व केवळ आंदोलने, आर्जवे, शत्रुचे हृदय परिवर्तन या मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. विशेषत: लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीपुढे आणि रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले असे परखड्पणे विचारणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढे गांधींचे धोरण साहजिकच फार मवाळ होते. किंबहुना एखाद्या लढ्यात उपयुक्त ठरलेले सत्याग्रहाचे अस्त्र हेच एकमेव अस्त्र, हाच एकमेव उपाय, हाच रामबाण उपाय व याखेरीज दुसरा मार्गच असू शकत नाही असा त्यांचा सिद्धांत होता. मात्र एखादी चळवळ यशस्वी करणे आणि स्वातंत्र्यप्राप्ति यांत फार मोठा फरक आहे हे त्यांना पटले नाही. किंबहुना ते स्वातंत्र्यवादी असाण्या ऐवजी मानवतावादी अधिक होते. गांजलेल्यांची सेवा, समाजाचा उद्धार यांत त्यांना स्वातंत्र्य लढ्यापेक्षा अधिक स्वारस्य होते. त्यांचा स्वभाव चंचल असा होता व त्यापायी अंगी काहीशी धरसोड वृत्तिही आली होती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने त्यांच्याकडे कालबद्ध, निर्णायक अशी योजना नव्हती. आपण आपल्या मार्गाने जात राहायचे व वाट पाहायची असा त्यांचा विचार. सरकारकडे तडकाफडकी स्वातंत्र्य मागण्याची त्यांची यत्किंचितही इच्छा नव्हती. सरकारच्या कलाकलाने वागत एकीकडे आपल्या मागण्या पुढे करत सामंजस्याने बोलणी करण्याकडे त्यांचा कल होता. गांधी ही तेवणारी समई होती तर क्रांतिकारक ही मशाल वा वडवानल होता. जर शत्रूला पळवायचा असेल तर दाहक ज्वाळाच हव्यात, समईचा मंद प्रकाश हा गाभाऱ्यात प्रकाश देण्यासाठी योग्य. मात्र गांधी आपल्या नंदादिपाच्याच प्रकाशात स्वातंत्र्याचा मार्ग शोधण्यावर ठाम होते. नेमकी हिच गोष्ट क्रांतिकारक विचारसरणीच्या तरुणांना पटत नव्हती.  एकेकाळी अंधारात सुर्यकिरण यावा तसा त्यांनी हिंदुस्थानच्या राजकारणात प्रवेश केला. मात्र तिसरे दशक पार होत असताना त्यांचे वर्तन हे मध्यान्हीच्या सूर्यासारखे दाहक होऊ लागले होते. त्यांनी आपल्या मनाची कवाडे बंद करून घेतली होती.

अखेर व्हायचे तेच झाले. पहाटेच्या आंधारात ज्याच्या किरणांची चाहुल उबदार व सुखद वाटते, तोच सूर्य माथ्यावर तळपू लागला की तापदायक होतो. गांधींमधला  'मी' फणा काढुन उभा राहीला होता. आधी माझे महात्म्य, माझे तत्त्व, माझे विचार, मग इतर सर्व असा खाक्या त्यांनी आरंभिला होता. आपल्याला वंद्य मानणाऱ्या पण तरीही आपले नेतृत्व सोडुन स्वतंत्र मार्ग चोखाळुन स्वातंत्र्याप्रत सज्ज झालेल्या इतर देशभक्तांचा धिक्कार  व तिरस्कार आणि निर्भत्सना करण्यासाही ते कचरेनासे झाले. चौरीचौरा प्रकरणात हिंसा घडल्याने आंदोलन मागे घेउन त्यांनी असंख्य अनुयायांशी प्रतारणा केली होती, मात्र याच सत्पुरुषाने अमानुष अशा जालियनवाला बागेतील खुनी इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध मात्र कसलेही आंदोलन उभे केले नाही वा त्यांना सजा होण्यासाठी उपोषणही केले नाही. ज्या गांधींनी हुतात्मा भगतसिंह प्रभृतिचा हिंसक म्हणून तीव्र निषेध केला त्या गांधींनी नि:शस्त्र आंदोलन करणाऱ्या लालाजींवर मरेपर्यंत लाठी चालवणाऱ्या उन्मत्त ईंग्रज अधिकाऱ्या विरुद्ध मात्र मौन पाळले. पुढे  याच हुतात्मा भगतसिंहाने जेव्हा बॉंब सारख्या संहारक अस्त्राचा अत्यंत कल्पक व संपूर्ण अहिंसात्मक वापर केला तेव्हा मात्र गांधींनी त्यांची पाठ थोपटली नाही की वाहवा केली नाही. व्हॉईसरॉयची गाडी उडवण्याच्या प्रयत्नाचा निषेध करून गांधींनी असंख्य जनतेला दुखावले. तिसऱ्या दशकात 'हिंदुस्थान समजवादी प्रजासत्ताक सेना' लोकप्रियतेच्या शिखरावर होती, हुतात्मा भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इत्यादीं क्रांतिकारकांच्या धगधगत्या हौतात्म्याने विव्हळ झालेल्या तरुण पिढीला गांधींनी दुखावले. प्रत्येक क्रांतिकारक त्यांना आदरणीय मानत असूनही त्यांनी केवळ आपल्या पेक्षा वेगळ्या मार्गाने जाणे हे आपल्याला आव्हान असे समजून त्यांचा दु:श्वास केला.  एकीकडे तरुण कॉंग्रेसजन संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा जोरा करीत असतांना त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली. तरुणांचे कंठमणी असलेल्या नेताजींचे नेतृत्व त्यांना डाचु लागले. एकिकडे गोलमेज परिषदेतले अपयश तर दुसरीकडे क्रांतीकारकांची वाढती लोकप्रियता यामुळे गांधी काहीसे अस्वस्थ झाले होते व जणु त्यांना आपल्या सर्वेसर्वा पदाला धोका असल्याचे व तो नेताजींच्या रुपात असल्याचे त्यांना जाणवु लागले. १९२८ च्या कलकत्ता अधिवेशनात नेताजी जेव्हा लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात खाडखाड बुट वाजवीत कलकत्त्यात फिरले व मागे बेहोष तरुण स्वयंसेवक त्यांचा व स्वातंत्र्याचा जयघोष करीत फिरू लागले तेव्हाच गांधींच्या कपाळावर नापसंतीची पहिली आठी उमटली. हे प्रकरण डोइजड होइल हे त्या मुरब्बी राजकारण्याने अचूक ओळखले                                        

 बाळाचे पाय ......

                                               lashkari adhikari

मोतीलाल नेहरू व नेताजी

 गांधींच्या सारखेच लोकप्रिय असे दुसरे नेतृत्व म्हणजे नेहेरू. काहीसा उतावळा पण उत्साही स्वभाव, काहीतरी करून दाखवायची हौस, हिंदुस्थानचे सर्वेसर्वा होण्याची आकांक्षा असलेला हा सद्गृहस्थ अनेकदा कुणाच्यातरी प्रभावाखाली वावरताना भासायचा. तिसरे दशक संपत असताना सुभाष-जवाहर हे एकेमेकांच्या बरेच जवळ आले होते. नेताजींची तड्फ, जिद्द, सळसळता उत्साह, शत्रूवर थेट शरसंधान करण्याची आक्रमकता, त्यांचा तरुणांवर - विशेषत: कॉंग्रेसमधील तरुण तुर्कांवर वाढता प्रभाव यामुळे नेहेरू निश्चितच नेताजींकडे झुकू लागले होते. 'भारत के दो लाल, सुभाष और जवाहरलाल' ही घोषणा सर्वतोमुखी झाली होती.

                                         netaji jawahar

नेताजींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद भुषविले आणि सगळा नूर पालटू लागला. पक्षाने व अर्थातच अध्यक्षानेही आपल्याला अभिप्रेत असेल ते आणि तेच व आपल्या परवानगीने बोलोवे असा आग्रह असणाऱ्या गांधींना सुभाष खटकू लागले. आपण मनाई केली असताना देखिल वारंवार संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा पाठपुरावा, कॉंग्रेस मधील जे चुकत आहे त्यावर टिका, क्रांतिकारकांशी असलेले घनिष्ट संबंध यामुळे गांधींना सुभाष नावडते झाले. गांधींनी त्यांना खड्यासारखे दूर काढायचा चंग बांधला. या क्षणी मात्र नेहरूंनी आपले माप गांधींच्या बाजुने झुकविले. १९३९ मध्ये प्रथमच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली. 

adhyaksha

एकीकडे जहाल मतवादी व आर-पार अशी भूमिका घेणारे तरुण तुर्कांचे लाडके नेताजी तर समोर गांधी पुरस्कृत पट्टाभी सितारमय्या. ही निवडणुक म्हणजे गांधींनी आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. संपूर्ण पक्ष यंत्रणा नेताजी विरोधी प्रचारात उतरली होती, तर नेताजी केवळ आपली भुमिका स्पष्ट करीत आज देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन करत आपल्या उमेदवारीचे प्रयोजन सांगत होते. निकाल सरळ सरळ दिसत होता - नेताजींचा पराभव. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडले. नेताजींना स्पष्ट मताधिक्याने सण्सणीत विजय मिळाला. पट्टाभी यांना १३७५ तर नेतजींना १५८० मते मिळाली होती. पट्टाभींना पुढावा मिळाला तो गांधींच्या जनम्स्थान गुजरातेत, स्वत:च्या आंध्र प्रदेशात व डॉ. राजेंद्र प्रसादांच्या बिहारात. महाराष्ट्रात समविभागणी होती तर पंजाब, ह्बंगाल, दिल्ली, मद्रास, केरळ, कर्नाटक, आसाम प्रांतात नेताजींना कौल मिळाला. गुजरातेत पट्टाभींना १०० तर नेताजींना केवळ पांच. पंजाबात पट्टाभींना ८६ तर नेताजींना १८२, बंगाल मध्ये तर पट्टभींना ७९ आणि नेताजींना ४०४! एकूण राष्ट्राचा कौल नेताजींच्या बाजून होता.

netaji gandhi

गांधींना हा वैयक्तिक पराभव वाटला व त्यांनी एकिकडे बाहेर पडण्याची भाषा केली तर दुसरीकडे नेताजींवर आगपाखड करायला सुरुवात केली. नेताजी फॅसिस्ट असल्याचे काही कॉंग्रेसजन पसरवु लागले. नेताजी हे गांधींना आव्हान देत असून त्यांची वाटचाल सर्वनाशाकडे होत असल्याच्या अपप्रचाराला उत आला होता.

मात्र नेताजींचे चित्त थाऱ्यावर नव्हते. दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमु लागले होते. त्या युद्धाच्या वणव्यात नेताजींना दिसत होता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा मार्ग.