आझाद हिंद सेना ७ - जर्मन अध्याय: सेना, ध्वजवंदन, राष्ट्रगीत

नेताजींनी निवेदन सादर केले पण त्याला प्रतिसाद? प्रतिसादाला विलंब अत्यंत साहजिकच होता. एकतर आधी उल्लेख केल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धामुळे अत्यंत अविश्वासाचे वातावरण जगभर निर्माण झाले होते. हिटलर व जर्मनीच्या दृष्टीने निर्णय घेणे सोपे नव्हते. पहिले कारण म्हणजे नेताजी हे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय पक्षातून, कॉग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते होते व त्यांना हिंदुस्थानी जनता आपला नेता मानेल किंवा नाही याबाबतीत जर्मनीकडे खात्रीलायक माहिती नव्हती. दुसरे कारण म्हणजे हिटलरच्या युद्धकार्यक्रमात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पाठिंबा देणे हे याआधी ठरलेले नव्हते. तिसरे कारण म्हणजे माईन काम्फ मध्ये हिटलरने हिंदुस्थानच्या तत्कालीन नेतृत्वाची व स्वातंत्र्य आंदोलनाची नकारात्मक प्रतिमा रंगवली होती. चौथे कारण म्हणजे इंग्लंडला आज ना उद्या आपण तह करायला भाग पाडणार असा आत्मविश्वास हिटलरला होता, मग अशा परिस्थितीत हिंदुस्थानच्या संग्रामाला सहाय्यभूत ठरून त्यात खोंडा येऊ द्यायचा का? पाचवे कारण म्हणजे रशिया विषयी धोरण अजून निश्चित होत नव्हते तेव्हा बहुविध संघर्षात आणखी एक आघाडी उघडाची का यावर विचार करणं आवश्यक होते. सहावे कारण इटली - जर्मनी युती असताना या विषयक इटलीचे मत अजमावणे अगत्याचे होते. या आधी इटली भेटीत मुसोलिनीने नेताजींची गाठ तिथे अनेक वर्षे स्थायिक असून स्वातंत्र्यचळवळ चालवणाऱ्या व इटलीतून स्वातंत्र्यप्रचारासाठी रेडिओ हिमालय हे प्रक्षेपण केंद्र चालवणाऱ्या इक्बाल शिदेईशी घालून दिली होती. इक्बाल नेताजींच्या भेटीने भारावून गेला होता, किंबहुना त्यासाठी अत्युत्सुक होता. नेताजी निसटल्याची बातमी समजताच त्याच्या नभोवाणी केंद्रावरून  अनेकदा त्याने ’नेताजी, तुम्ही कुठे आहात, आम्ही वाट पाहतोय’ अशी सादही घातली होती. मात्र प्रत्यक्ष भेटीत नेताजी समजून चुकले की या युवकाचा संघर्ष पाकिस्तानासाठी आहे आणि नेताजींचा लढा हिंदुस्थानासाठी असून केवळ आपण स्वातंत्र्य मिळेपर्यंत एकमेकांना साहाय्य करायचे आहे व त्यानंतर विभक्त व्हायचे आहे असे त्याचे उद्दिष्ट आहे. अखंड व जाती-धर्म अशा बंधांपासून मुक्त असा सशक्त हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या नेताजींना या तरुणाची साथ देणे वा घेणे कदापि मान्य नव्हते आणि मान्य होणे शक्यही नव्हते.

मात्र हे सर्व असूनही जर्मनीतल्या अवघ्या एकूणचाळीस सहकाऱ्यांच्या साथीने ४० कोटी भारतीयांचे हंगामी सरकार स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे व त्या सरकारला मान्यता मागणारे नेताजी जर्मनीला प्रभावीत करून गेले हे निश्चित. अखेर नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या सुनिश्चित नियोजनबद्ध कार्यक्रमाचा विजय झाला. ८व ९ डिसेंबर १९४१ या दिवशी बर्लिनमध्ये भरवण्यात आलेल्या परिषदेत नेताजींना अनुकूल असा निर्णय घेण्यात आला. या परिषदेस इक्बाल सिदेई, अलेस्सान्द्रिनि, मेजर दे ला तोरे आणि उप परराष्ट्र वकिलात प्रमुख ग्वादानिनी हे इटलीतर्फे तर जर्मनीतर्फे वकिलात प्रमुख वुस्टर, डॉ. ट्रॉट, डॉ. वेर्थ व हिंदुस्थानतर्फे नेताजी उपस्थित होते. या परिषदेत चर्चिले गेलेले मुद्दे असे:

१) जर्मनी व इटलीतील भारतीय कार्यालये यांच्यात समन्वय साधून परस्पर सहकार्याने हिंदुस्थानच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी माहिती व योजना यांची देवाण घेवाण.
२)हिंदुस्थानी लष्करी तुकडी पूर्णतः: जर्मनीच्या अखत्यारीतील बाब असेल.अर्थातच वेळोवेळी इटलीचे सहकार्य त्यांत असेल. इटलीतर्फे असे सुचविण्यात आले सेनेबरोबरच घातपाताचे आणि प्रचारतंत्राचे प्रशिक्षण घेतलेल्या तुकड्याही आवश्यक आहेत.
३)इटलीने अफगाणातील अंतर्गत विरोधकांना पूरक असा प्रचार दूरगामी फायद्याचा असल्याचे व अफगाण सरहद्द हिंदुस्थान सीमेवरील बित्तंबातमी काढण्याच्या दृष्टीने असल्याचे सांगितले.
४)पाकिस्तानचा पुरस्कार करणे अयोग्य असले व तसे करणे ही इंग्रजांची चाल असली तरीही हिंदुस्थानातील मुस्लिमांच्या सहकार्याचा विचार करता त्याचा उघड धिक्कारही करू नये.
५) संघटित हिंदुस्थानला मान्यतेची अधिकृत घोषणा करणे लष्करी दृष्ट्या अनुकूल अशी स्थिती प्राप्त झाल्यावरच करणे संयुक्तिक ठरेल. या घोषणे बरोबरच आंतरराष्ट्रीय प्रचारकार्य, हिंदुस्थानात जागृती तसेच नेताजींनी स्वतः: रेडिओद्वारे युरोपातील जनतेला ब्रिटिश हिंदुस्थानला गुलामगिरीत खितपत ठेवू इच्छित असल्याचे सत्य कथन करणे.
६)जर्मनीने हिंदुस्थानच्या प्रचारासाठी रेडिओ हिमालय सारखी प्रक्षेपण केंद्रे सुरू करावीत.

rommel afrika

याच परिषदेत नेताजींनी आझाद हिंद तुकडीच्या स्थापनेचा उच्चार केला व त्यास त्रिपक्षिय मान्यता मिळाली. १९४१ सालीच एर्विन रोमेलने अफ्रिकेत अक्षरश: धुमाकुळ घातला होता. ग्राझिआनीच्या इटालीय फौजांना चोप देउन हाकलुन लावणाऱ्या अजिंक्य ब्रिटीश सेनेचे व दिग्विजयी जनरल वेव्हेलचे रोमेलने पार वस्त्रहरण करून टाकले होते. अल्जिरिया, ट्युनिशिया,लिबिया मधील एक एक करीत सगळी मोक्याची ठाणी रोमेलने बळकावली. या दणदणीत पराभवात इंग्रजांना आसरा होता तो टोब्रुकचा. आणि टोब्रुकचा बचाव प्राणपणाने केला ऑस्ट्रेलिया/ न्यूझिलॅंडच्या तोफखान्यांनी व मराठा लाईट इंन्फंट्रीच्या चिवट प्रतिकारानी. रोमेलला अफ्रिकेत हाती लागलेले युद्धकैदी जर्मनीत आणले गेले होते. नेताजींना आपली तुकडी उभारण्यासाठी या युद्धकैद्यांपैकी सैनिक घेउ देण्याचे ठरविले व ऍनाबर्गच्या छावणीची त्यासाठी निवड करण्यात आली. या युद्धकैद्यांपैकी जे जे आपल्या आवहनाला प्रतिसाद देऊन सामिल होतील ते आपले सैनिक, त्यासाठी केवळ आपणच प्रयत्न करणार तसेच आपल्या वतीने वा अन्यथाही जर्मनीने बळाचा वापर करुन वा जबरदस्तीने कुणालाही भरती करू नये असे नेताजींनी कटाक्षाने बजावले होते. एक नेता आपल्या अनुयायांची पितृवत काळजी कशी घेतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैन्य निर्मितीच्याच प्रसंगी नेताजींनी हे स्पष्ट केले व जर्मनीकडुन तसे मान्य करवुन घेतले की ही आझास हिंद ची तुकडी प्राणपणाने लढेल, पण फक्त हिंदुस्थानच्या स्वातंत्र्ययुद्धासाठी, हिंदुस्थानच्या सीमेवर. ती कुणाची भाडोत्री फौज म्हणुन लढणार नाही आणि तिला हुकुमत असेल ती फक्त हिंदुस्थानी.

कल्पना कितीही चांगली असली तरी प्रत्यक्षात येणे कठीण होते. युद्धकैदी झालेले सैनिक या तुकडीत सामील व्हायला तयार न होण्यामागे अनेक कारणे होती. एकतर सैनिक आपल्या अधिकाऱ्यासाठी त्याच्या हुकुमाने लढत असतो, त्यामुळे सहजासहजी अनेक वर्षे इंग्रजी फौजेत असलेले व इंग्रजांना अधिकारी मानलेल्या सैनिकांना एकाएकी हा बदल पचणे शक्य नव्हते. त्यात इंग्रजांनी जर्मनी व नेताजी यांच्याविरुद्ध जहरी प्रचार करून त्यांची मने कलुषित केलेली होती. या शिवाय सैन्याच्या नोकरीत आलेल्या हिंदुस्थानीयांना भरघोस निवृत्तिवेतन मिळत असे, त्यावर सहजासहजी पाणी कोण आणि का सोडेल? भरीत भर म्हणजे आझाद हिंदच्या भरतीत मूळ हुद्द्यापेक्षा कर्तृत्वावर हुद्दा ठरणार होता. आणखी एक नाजुक कारण म्हणजे या सैनिकांची बायका-मुले व घरदार अजूनही तिकडे हिंदुस्थानातच होते व त्यांना धोका निर्माण झाला असता. एकूण आपले सैनिक फुटू नयेत यासाठी इंग्रजा भरपूर प्रयत्न केलेले होते. या सैनिकांच्या अनेक छावण्या होत्या. पैकी ऍनाबर्गच्या छावणीत नेताजींना आपले सैन्य निवडण्यासाठी पाठवले गेले. नेताजी स्वतः: या जवानांशी बोलत, त्यांना आपले ध्येय व कार्यस्वरूप तळमळीने समजवून देत. हे करीत असताना नेताजींना अपमान व अवहेलना सहन करावी लागत असे. हे युद्धकैदी त्यांना पढवून ठेवलेल्या माहितीनुसार नेताजींना गद्दार, नाझींचा दलाल असे संबोधत असत. मात्र या सर्व नकारयादीवर नेताजींच्या जादुई व्यक्तिमत्त्वाने, तळमळीने तसेच प्रामाणिक आवाहन यांनी मात केली व हळूहळू सैन्य आकार घेऊ लागले. इटलीच्या ताब्यातील हिंदुस्थानी युद्धकैदीही आपल्याकडे सोपवावेत यासाठी जर्मनीने प्रयत्न सुरू केले. इटलीच्या ताब्यातील सैनिक हे जर्मनीच्या ताब्यातील सैनिकांच्या तुलनेने आझाद हिंदच्या जर्मन तुकडीत सामील व्हायला अधिक अनुकूल होते. याला कारण म्हणजे या सैनिकांनी इटलीच्या सैनिकांना पुरते ओळखले होते, व इंग्रजांकडून लढत असताना आपल्याला पाठ दाखवून पळताना पाहिलेले होते  व त्यामुळे ते त्यांच्या अंकित राहायला तयार नव्हते. या सैनिकांना नीट वागणूक इटलीची सेना देत नव्हती तसेच अन्नधान्य वगैरेची आबाळ होती.

नेताजींच्या अथक व चिकाटीच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागले व आझाद हिंदची जर्मनीतील तुकडी आकार घेऊ लागली. A H Bini मूळचे जालंदरचे असलेले गुरूमुखसिंग व गुरुबचनसिंग मंगट हे बंधू सर्वप्रथम सामील होणाऱ्यांमध्ये होते, पाठोपाठ सामील झाले ते मराठा लाइट इंन्फंट्रीचे कमांडर सुभानजी घोरपडे व त्यांचे सैनिक. या संपूर्ण भरती प्रक्रियेत जर्मनीने स्वतः:ला कटाक्षाने दूर ठेवले होते व कसलाही हस्तक्षेप केला नव्हता. पुढे इंग्रजांनी असा आरडाओरडा केला की ताब्यात सापडलेल्या सैनिकांचा छळ केला व अनन्वित यातना देऊन त्यांना जबरदस्तीने आझाद हिंदच्या तुकडीत सामील केले गेले त्याला कसलाही आधार मिळू शकला नाही. उलट त्यावेळी सैन्याधिकारी असलेल्या कुश्चर व क्रिटर यांच्या जुन्या दैनंदिन्यांमधून असे स्पष्ट उल्लेख होते की या भरतीत जर्मनीचा हस्तक्षेप तर नव्हताच पण श्री. बोस सुद्धा कुणावरही जबरदस्ती न करता सर्वांना आपले म्हणणे तळमळीने समजवून सांगत, या सेनेत सामील होणे हेच देशाशी खरे इमान असे सांगत व ते ऐकून ज्यांचे हृदयपरिवर्तन होत असे त्यांनाच सामावून घेतले जात असे. या कार्यात जर्मनीतील भारतीय नागरिक तसेच आझाद हिंदचे स्वयंसेवक यांनी सर्वस्व झोकून देऊन मदत केली. सामील झालेल्यांना जर्मनीतर्फे त्यांच्या मापाचे लष्करी गणवेश तसेच शस्त्रे पुरविण्यात आली. मात्र या सेनेचा स्वतः:चा ध्वज होता, ते जर्मन ध्वजाखाली लढणार नव्हते. त्यांच्या कवायतीसाठी सर्व हिंदुस्थानी संज्ञा जर्मन प्रशिक्षक अधिकाऱ्यांना भाषांतरित करून सांगण्यात आल्या होत्या व ते अस्खलित हिंदुस्थानीतुन हुकूम देत असत. या सेनेवर नेताजींनी राष्ट्रीयता

A H Oath

एकात्मतेची शपथ घेताना हिंदु, मुसलमान, शिख व ब्राह्मी शिपाई

बिंबवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले.  सर्वांची एक अशी हिंदी भाषा व ती सर्वांना लिहिता वाचता यावी यासाठी रोमन लिपीचा पुरस्कार केला. सैन्याच्या तुकड्यांमधील जातीय वा प्रांतिक स्वरूप नष्ट करायचा चंग बांधला. नेताजींना आपली तुकडी ही शस्त्रसज्ज व शस्त्रे चालवण्यात वाकबगार असावी असे वाटत असल्याने त्यांनी जर्मन सेनाधिकाऱ्यांमार्फत त्यांना आधुनिक शस्त्रे व युद्धनितीचे कडक प्रशिक्षण दिले. जर्मन सेनाधिकाऱ्यांनीही आत्मीयतेने प्रशिक्षण दिले व या सेनेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. मेजर क्राप्पे व क्रिटर यांनी तसे नमूद केलेले आहे. नोव्हेंबर १९५२ मध्ये १३०० च्या आसपास सैनिकसंख्या असलेली ही सेना पुढे १९४३ मध्ये सेवकवर्ग व प्रशासकीय कर्मचारी धरून ३५०० च्या आसपास गेली. सुरुवातीच्या १३०० सैनिकांच्या दोन बटालियन्स होत्या.

पहिली बटालियन - कंपनी १ ते ३ : प्रत्येकी १८ हलक्या मशीन गन, २ x ८०मिमि उखळी तोफा आणि ४ रणगाडाभेदी तोफा असलेल्या पायदळ तुकड्या

      - कंपनी ४ : मशिनगनची तुकडी
      - कंपनी ५ : ’अवजड’ कंपनी असून तिच्यामध्ये एक हॉवित्झर हलक्या तोफांची पलटण, ५० मिमि रणगाडाभेदी तोफांची पलटण व एक आस्थापक पलटण

दुसरी बटालियन - कंपनी ६, ७: रायफलधारी तुकड्या
       - कंपनी ८ : काहीशी अधुरी व संकेत-निशाणीचा प्रभार असलेली पलटण

या छोटेखानी सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्र हाताळणीचे प्रशिक्षण जर्मन सैन्याने दिले, जर्मन सैन्याधिकारी जातीने त्यात लक्ष देत होते,प्रत्यक्ष सेनापती रोमेलनेही या सेनेची पाहणी व त्यांना मार्गदर्शन केले होते. howitzer

हॉवित्झर तोफांवर निशाणीचा सराव

कोल्होबाचा सल्ला - 'वाळवंटी कोल्हा' रोमेल आझाद हिंदच्या तुकडीची पाहणी व मार्गदर्शन करताना
A H D Fox

अथक परिश्रमाने नेताजींनी जर्मन भूमीत आपल्या स्वतंत्र देशाचा तिरंगा जुलै १९४२ मध्ये फडकवला. वरचे अंग केशरी, मध्यांग शुभ्र व खालचे अंग हिरवे; मात्र शुभ्र मध्यांगात कॉंग्रेसचा चरखा वा आजच्या राष्ट्रध्वजातील अशोकचक्रा ऐवजी डरकाळी फोडत झेपावणारा पट्टेरी वाघ होता. दिनांक ११ सप्टेंबर १९४२ रोजी हॅम्बुर्ग येथील ड्युश-इंडिश गेसेल्क्खाफ्ट च्या संस्थापनेच्या प्रसंगी नेताजी व आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हटले जे आजही आपले राष्ट्रगीत आहे.