ह्यासोबत
- आझाद हिंद सेना १ - प्रास्ताविक
- आझाद हिंद सेना २ - हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंघर्षाचा आढावा
- आझाद हिंद सेना ३- नेताजी
- आझाद हिंद सेना ४ - कात्रज, पन्हाळा, आग्रा...
- आझाद हिंद सेना ५ - पूर्वरंग
- आझाद हिंद सेना ६ - जर्मनीत आगमन
- आझाद हिंद सेना ७ - जर्मन अध्याय: सेना, ध्वजवंदन, राष्ट्रगीत
- आझाद हिंद सेना ८ - पूर्वेकडे प्रस्थान
- आझाद हिंद सेना ९ - जपानचा झंझावात आणि आझाद हिंदची उभारणी
- आझाद हिंद सेना १० - जडणघडण, संकट व नव्याने उभारणी
- आझाद हिंद सेना ११ - 'प्रभु आले मंदिरी'
- आझाद हिंद सेना १२ - "चलो दिल्ली" आणि राणी लक्ष्मी पलटण
- आझाद हिंद सेना १३ - हंगामी सरकारची स्थापना
आझाद हिंद सेना!
प्रत्येक हिंदुस्थानियाच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द. आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगाला गवसणी घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, चलो दिल्ली च्या गर्जना करीत हिंदुस्थानच्या दिशेने कूच करणारी स्वातंत्र्यसमराच्या कल्पनेने मोहरलेली सेना आणि देशासाठी प्राणार्पण करायला आसुसलेल्या हिंदुस्थानी स्त्रीयांची झाशी राणी पलटण. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरात झोकुन देणाऱ्या झाशीच्या राणीचे नाव घेतलेली पलटण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील निर्णायक पर्वातल्या लढ्यासाठी शस्त्रसज्ज झाली हा एक असामान्य योग आहे. भारताचे स्वातंत्र्य 'लक्ष्मिच्या पावलांनी' आले हे शब्द सर्वार्थाने खरे ठरतात.
नेताजी सुभाष यांच्या आझाद हिंद सेनेने जपानी लष्कराच्या सहाय्याने इशान्येकडून एल्गार केला व विजय डोळ्यापुढे दिसत असताना जपान पराभूत झाले, पाठोपाठ नेताजीही या जगातून नाहीसे झाले हा इतिहास सर्वानाच माहीत आहे. पण जे फारसे माहित नाही वा सहसा चर्चिले जात नाही त्याचा परामर्ष केलेल्या वाचनाच्या आधारे घेण्याचा हा एक प्रयत्न. मी अभ्यासकही नाही आणि संशोधकही नाही, व्यासंगी विद्वान तर नाहीच नाही. अर्थातच माझ्या लेखनात काही त्रुटी असण्याची शक्यता आहे, मनोगती त्या वेळोवेळी दाखवुन देतील व सुधारतीलही याची मला खात्री आहे.
आझाद हिंद सेना म्हणजे नक्की काय होते? तीच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट काय? ही संकल्पना कशी सुचली? कशी साकार झाली? मुळात अशा सेनेची गरज का भासली? त्या वेळचे जागतिक संदर्भ काय होते? हिंदुस्थानची स्वातंत्र्यप्राप्ति कितपत स्पष्ट दिसत होती? या सेनेत कुणाचे कार्य काय? या सेनेने नक्की काय साध्य केले? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यध्वजारोहणात आझाद हिंद सेनेचा वाटा किती? या सेनेची पाळेमुळे कुठवर रुजली होती? आपल्या राष्ट्राच्या मुक्तीसाठी 'शत्रुचा शत्रु तो मित्र' या नात्याने जर्मनी व जपान यांच्याशी संघटन साधून स्वातंत्र्य सेना स्थापणारे नेताजी व त्यांचे अनुयायी देशद्रोही कसे? राजकिय नेत्यांनी धिक्कारले तरी जनसामान्यांत आझाद हिंद सेनेची प्रतिमा काय होती?
या व अशा अनेक प्रश्नांचा परामर्ष घेण्याचा हा एक प्रयत्न. आझाद हिंद सेनेचे पहिले ध्वजारोहण व शपथविधी जुलै महिन्यात तर स्वातंत्र्याच्या कल्पनेने झपाटलेल्या नेताजींचा देहांत ऑगस्ट महिन्यात. हा योग साधून ही लेखमाला जुलै महिन्यात सुरू करून जमेल तसे लिहित जात नेताजींच्या स्मृतिदिनी समारोप करण्याचा मानस आहे. जर कुणाकडे उपयुक्त माहिती असेल तर ती येथे देण्याचे मनोगतींना नम्र आवाहन.
जर्मनीतील पहिल्या तुकडीचा शपथविधी
जुलै १९४२, जर्मनी येथील आझाद हिंद सेनेच्या पहिल्या तुकडीचा शपथविधी समारंभ. आझाद हिंद चा डरकाळी फोडत झेपावणारा पट्टेरी वाघ धारण केलेला तिरंगा धारण केलेले गुरुमुखसिंह मंगट - आझाद हिंदच्या अगदी पहिल्या जवानांपैकी एक.