आझाद हिंद सेना ३- नेताजी

नेताजी सुभाषचंद्र बोस. हिंदुस्थानातील सशस्त्र क्रांतिकारकाचे शिरोमणी आणि स्वातंत्र्याचे विधाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अभिनव भारत हा क्रांतिदेवतेच्या मंदिराचा पाया, सचिंद्रनाथ संन्याल यांनी स्थापन केलेली व पुढे  हुतात्मा भगतसिंह यांनी पुनरुज्जीवित केलेली हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेना  हा त्या मंदिराचा गाभारा तर नेताजी व राशबिहारींची आझाद हिंद सेना हा त्या मंदिराचा कळस आहे. या मंदिराला गदर, युगांतर, अनुशीलन, नौजवान भारत सभा हे व  यासारखे असंख्य खांब आहेत, ज्यावर ते उभे राहिले.

एका खानदानी कुटुंबात, सुशिक्षित घराण्यात व संपन्न अशा घरात कटक येथे जानकीबाबु व प्रभावती यांच्या पोटी सुभाषचंद्रांनी जन्म घेतला. family

जानकीबाबू, मेजदा, प्रभावतीदेवी, विभावरीभाभी

janmasthan नेताजींचे कटक येथील जन्मस्थान

बालपण कटकला कॉन्वेण्ट शाळेत गेलेले सुभाष पुढील शालेय शिक्षणासाठी कलकत्त्यात रॅवेन्शॉ कॉलेजिएट शाळेत द्दाखल झाले. आणि इथेच नेताजींच्या जीवनाला कलाटणी मिळाली. चंद्रनगरचे राशबिहारी येऊन गेले, त्यांना काही मुले भेटली, हल्ली तुमचा सुभाषही वाईट संगतीत असतो अशा तक्रारी कानावर आल्याने चिंताक्रांत झालेल्या जानकीबाबूंनी एकदा हळूच मुलाच्या पुस्तकाचे कपाट उघडले आणि त्यांत पाहायला मिळाली ती लाला हरदयाळ यांच्या गदर पक्षाची भित्तिपत्रके:

पाहिजेत : हिंदुस्थानात लष्करी बंड घडवून आणण्यासाठी जवॉंमर्द शिपाई

वेतन     : मृत्यू

बक्षीस  : हौतात्म्य

निवृत्ती वेतन: आझादी

रणांगण      : हिंदुस्थान

आपल्या मुलाचे प्रताप पाहून वडील हादरले. खरेतर सुभाषने राशबिहारींच्या निधीसाठी २०० रुपये दिल्याने गुन्हाच दाखल व्हायचा पण वडिलांचे वजन व संबंध यामुळे ते टळले मात्र अंमलदाराने इशारा दिला. पुढे शालांत वर्षात राणीची प्रार्थना म्हणण्यास नकार दिल्याने छड्या मिळाल्या. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात हिंदुस्थानीयांना अवमानकारक भाषा वापरणाऱ्या ओटेन नावाच्या प्राध्यापकास बंगाली मुलांनी भर महाविद्यालयात चोपला. सुभाष त्यांत नसले तरी ते या घटनेचे साक्षीदार होते. मात्र चौकशीत त्यांनी आपण यांत नसल्याचा व कुणी मारले हे माहीत नसल्याचाच घोषा लावला. अखेर झाल्या प्रकाराचा निषेध करण्याची मागणी केली गेली तेव्हा सुभाषने ठाम नकार दिला व त्याची हकालपट्टी केली गेली. तसाही या महाविद्यालयात अनुशीलन व युगांतरचे कार्यकर्ते विद्यार्थी म्हणून वावरत असल्याने सरकारचा दात होताच. आपण पुढे काय मार्ग अनुसरणार हे नेताजींनी तेव्हाच दाखवून दिले होते.

tarun bose

अर्थात कलकत्त्यात जन्माला आलेले मूल क्रांतिकारक होणे हे स्वाभाविकच होते. १९०८ साली कलकत्त्याच्या माणिकतल्ला येथे हिंदुस्थानातील पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचा बॉम्बस्फोट यशस्वी झाला आणि बंगालच्या मुलांना पिस्तुलाच्या जोडीला बॉम्बं मिळाले. मुलेच काय, पण इथल्या मुलीही मागे नव्हत्या. कल्पना दत्त, प्रितीलता वड्डेदार, बीना दास, सावित्रीदेवी चक्रवर्ती, उज्ज्वला मुझुमदार, इंदुसुधा व शांतीसुधा घोष, पारुल मुखर्जी, लीला नाग, [रमिला गुप्ता, सुशीला दासगुप्ता, लावण्या दासगुप्ता, रेणू सेन.. अशी ही बंगालच्या क्रांतिकारकाची यादी न संपणारी होती. नुकत्याच ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे आयोजित स्वातंत्र्य संग्रामावरील प्रदर्शनाला गेलो असता, अंदमानच्या मानकऱ्यांपैकी तक्तेच्या तक्ते बंगालच्या नावांनी भरलेले पाहून मी बंगालपूढे नतमस्तक झालो. अशा या वाघांच्या देशात जन्मलेले आणि वाढलेले सुभाषचंद्र क्रांतीचे उपासक न बनते तरच नवल होते.

बऱ्याच उशीराने दाखल होऊनही इंग्लंडमध्ये आय सी एस ला चौथे येण्याचा पराक्रम करणारे नेताजी विलक्षण बुद्धिमान होते. त्यांचे वाचन अफाट होते. हिंदुस्थानात परत येण्यापूर्वीच त्यांनी सरकारी नोकरी ठोकरून स्वदेशी परतण्याचा निर्णय घेतला आणि ते परतण्यापूर्वीच नकारात्मक अहवाल मुंबईत पोचला.२२ एप्रिल १९२१ रोजी आपले नाव आय सी एस च्या यादीतून काढून टाकावे असा अर्ज देऊन ते थेट हिंदुस्थानला परतले. अर्थात त्यांचा पत्रव्यवहार हिंदुस्थानात अनेक कार्यकर्त्यांची सतत चालू होता. त्याचे अहवाल सरकारकडे गेलेच असतील. सुभाषबाबू मुंबईत येताच प्रथम थेट मणीभवनात गांधींच्या भेटीस गेले व त्यांनी पहिल्याच भेटीत आपली चाप पाडली. अर्थात त्यांनी गांधींचे शिष्यत्व पत्करले. पुढे ते कलकत्त्याला देशबंधूंच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते झाले. अनेक आंदोलने, अनेक चळवळी पार पाडताना व प्रत्यक्षात जवळून पाहताना त्यांच्या लक्षात आले की आता सद्य स्थितीत स्वातंत्र्य मिळण्याची सुतराम शक्यता नसून सशस्त्र क्रांती हा एकच मार्ग आहे जो आपल्या देशाला स्वातंत्र्याप्रत नेऊ शकेल. इंग्रज हे रक्तपिपासू साम्राज्यवादी असून त्यांच्यावर मानवतावादी उपायांचा परिणाम होण्याची शक्यता शून्यवत आहे.

मुळातच अत्यंत बुद्धिमान असलेल्या व इतिहास तसेच राजकारण यांचा अभ्यास असलेल्या सुभाषबाबूंनी सूक्ष्म निरीक्षण केले व असा निष्कर्ष काढला की स्वा. सावरकर व हुतात्मा भगतसिंह प्रभृतींच्या क्रांतीपद्धतीचा अभ्यास करता या देशाला आता संघटित सशस्त्र लढ्याची म्हणजेच लष्करी युद्धाची गरज आहे आणि त्यांनी हेही ओळखले की सध्या जनता ही अहिंसक नेतृत्वाच्या प्रभावाखाली असल्याने जनता, नेते या प्रयत्नात साथ देणे कठिण आहे, जनतेची साथ निश्चित असेल पण सुसंबद्ध लष्करी संघटना व सशस्त्र लष्कर निर्माण होणे दुरापास्त आहे. त्याचबरोबर नेताजींनी हेही ओळखले की ज्याच्या पासून साम्राज्याला आत्यंतिक धोका आहे अशांचा म्हणजेच स्वा. सावरकर, हुतात्मा भगतसिंह यांचा सरकार समूळ नायनाट करते व त्याला स्थानिक नेतृत्वाकडून विरोध होत नाही. देशात क्रांती घडवून आणण्यासाठी देशाबाहेरून लष्करी साहाय्याची गरज त्यांनी अचूक ओळखली. वीस वर्षांच्या वास्तव्यात अकरा वेळा भयानक हाल अपेष्टा देणारे पिचवून टाकणारे तुरुंगवास त्यांनी अनुभवले होते.

netaji cong2

हिजली सत्याग्रहा प्रकरणी त्यांना शिवणीच्या तुरुंगात डांबले तेव्हा त्यांना दुर्धर रोगाने ग्रासले. तुरुंगात निदान होईना व योग्य उपचार मिळेनात. त्यांना प्रकृतीसाठी देशाबाहेर युरोपात जाण्याचा वैद्यकीय सल्ला मिळाला. ८ मार्च १९३३ रोजी ते व्हिएन्ना येथे पोहोचले. मात्र उपचारा पेक्षा त्यांचे अन्य उपद्व्याप अधिक जोरात सुरू होते. त्यांचे उपद्व्याप व देश विदेशात असलेले लागेबांधे पाहता त्यांच्या पारपत्रावर इंग्लंड व जर्मनीत प्रवेश मनाईचा शिका मारण्यात आला होता. जर्मनी शत्रू राष्ट्र म्हणून तर इंग्लंडमध्ये अगोदरपासून असलेली चळवळ व क्रांतिकारकांचा राबता यामुळे ते तिथे जाणे सरकारला परवडणारे नव्हते. ते बरोबरच होते, लंडनला होणाऱ्या भारतीयांच्या राजकीय परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्याचे घाटत होते मात्र बंदीमुळे केवळ त्यांचे भाषण वाचून दाखविण्यात आले. मात्र त्यांना इटली येथील रोम येथे होणाऱ्या 'ईतालिअन ओरिएंटल इंस्न्टिट्युट' च्या उद्घाटनाचे अधिकृत निमंत्रण मुसोलिनी सरकारकडून आले व त्याचा लाभ घेत ते मुसोलिनी, कौंट स्यानो यांना भेटून व आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात हे कितपत उपयोगी पडतील याचा अंदाज घेऊन आले. याचे गुप्त अहवाल सरकारला मिळाले व त्यांच्यावरची नजर वाढली. याच काळात हिटलरने फ्रान्स व इंग्लंडच्या तोंडावर दोस्तीचा कुंचा फिरवल्याने त्यांना जर्मनीस जाण्याची अनुमती मिळू शकली. तिथे त्यांनी हिंदुस्थानी व आशियाई विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करू त्यांच्याशी जवळीक निर्माण केली. याच काळात नेताजींनी आपल्या राजकिय़ अनुभवांवर आधारीत 'द इंडियन स्ट्रगल १९२०-१९३४' हे पुस्तक लिहिले, ते लिहिण्यासाठी इंग्लंडच्या विशार्ट प्रकाशनाने त्यांचा पाठपुरावा केला व ते प्रकाशित केले. हे पुस्तक लिहिताना ते अनुभव तोंडी सांगत व त्यांची स्थानिक सहायिका एमेली शेंकेल ते टंकीत करीत असे. याच सुमारास त्या दोघांचे प्रेम जमले व ते विवाहबद्ध झाले.

EmilyJPGदरम्यान चिडलेला जुना व पुरलेला आजार, सतत दगदग , कुपथ्य यामुळे प्रकृती मात्र विशेष सुधारत नव्हती. त्यांना पित्ताशयाचा तसेच आतड्यांच्या वणांचा आजार होता. त्यावर शस्त्रक्रिया करावी की उपचार करावेत यावर दुमत होते. अखेर शस्त्रक्रिया झाली. नोव्हेंबर १९३४ मध्ये पित्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समजल्याने ते परतीस निघाले, मात्र ते घरी पोचेपर्यंत पिता हे जग सोडून गेला होता.b crizJPG

त्यांना फार काळ तिथे राहायची परवानगी नव्हती. लगेच ते ह्विएन्नाला परतले. पुढील वास्तव्यात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या, डब्लिन्मध्ये वॅलेरा याचीही भेट त्यांनी घेतली. पुन्हा एकदा मुसोलिनीची भेट घेतली व यावेळी तो जर भारतात हिंदी जनता सश्सत्र उठाव करेल तर मदतीस तयार असल्याचे त्याने नेताजीना सूचित केले. ८ एप्रिल १९३६ रोजी ते मुंबईंस परत पोहोचले, मात्र ते येणार ही बातमी लागताच गृहखात्याने त्यांना कोणत्या ना कोणत्या कलमान्वये इथे उतरताच अटक करण्याचे ठरविले होते. त्यांप्रमाणे त्यांना अटक झाली व त्यांची रवानगी येरवडा येथे केली गेली. मात्र पुढे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही शर्तींवर दार्जिलिंग जवळ कर्सिऑंग येथे हालवून स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. १७ मार्च १९३७ ला त्यांना अखेर मुक्त करण्यात आले. आता वेळ कमी होता. लढा सुरू करणे अत्यावश्यक होते. मधल्या ३-४ वर्षांत प्रकृतीच्या निमित्ताने त्यांना युरोपचे जवळून निरीक्षण करण्याची संधी लाभली व त्यामुळे राजकीय संबंध, एकंदर राजकीय परिस्थिती, लष्करी घडामोडी याचा बराच अभ्यास त्यांनी केला. हिटलरची राक्षसी महत्त्वाकांक्षा आज ना उद्या युद्धाचा भडका उडवणार याविषयी त्यांना खात्री पटली होती. आणि नेमक्या याच संधीची वाट ते पाहत होते. १९३९ चा सप्टेंबर उजाडला आणि महायुद्धाला तोंड फुटले. नेताजींनी नेहेरुंना गळ घातली की हाच क्षण आहे, आताच घाव घातला पाहिजे, हवे तर तुम्ही नेतृत्व करा, मी शिपाई होतो पण आताच आंदोलनाची हाक द्या. नेहेरूंना ते पटत असले तरी आपण बापूंचे नेतृत्व मान्य केले असून आता सर्वाधिकार त्यांचाच आहे असे उत्तर नेताजींना ऐकावे लागले. मग अखेर नेताजींनी प्रत्यक्ष गांधींचीच भेट घेतली, मात्र आपण या गोष्टीस अनुकूल नसल्याचे गांधींनी सांगितले. आता नेताजींना लढाई एकट्याने लढायची होती. इंग्लंड युद्धाच्या कात्रीत सापडले आहे तेव्हाच आपले स्वातंत्र्य मिळवले पाहिजे, एकदा ही संधी हुकली तर पुन्हा कधी येईल याचा भरवसा नव्हता.

पूर्वेत राशबिहारींनी संधान साधले होते. आत वेध घ्यायचा होता पश्चिमेचा.