श्रावण सोमवार

काही गोष्टी या श्रद्धा, देवधर्म, आस्तिकता वगैरेच्या पलीकडच्या असतात आणि म्हणूनच या गोष्टी आपल्या मनात आयुष्यभर ताज्या राहतात व सातत्याने पुनर्प्रत्ययाचा आनंद देत राहतात. माझ्या आयुष्यात श्रावण सोमवाराला असेच एक खास स्थान आहे. माझ्या अनेक आठवणी श्रावण सोमवाराशी निगडित आहेत.

मी शाळकरी असताना माझे आईकडचे आजी आजोबा आमच्याकडे राहत असत. आजोबा हे कडक शिवभक्त. दर सोमवारी सकाळचे फिरणे लवकर आटोपते घेऊन आजोबा स्नान - संध्या करून पूजेचे साहित्य हाती घेऊन आमच्या घरापासून धोतर, खांद्यावर एक पंचा व हातात ताम्हण, पळी-पंचपात्र घेऊन ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरात अनवाणी जात व शंकराची पूजा करून व रुद्रपठण करून भर बाराच्या उन्हात अनवाणीच येत असत. मग सकाळी उपास असल्यामुळे साबुदाणा खिचडी व केळे असा फराळ असायचा. नेमकी माझी शाळेतून यायची वेळ असायची. साजुक तुपातल्या खिचडीचा वास दरवळल्यावर  मीही जेवण सोडून खिचडीच घ्यायचो. मग भूक उरली तर इतर जेवण. मला खिचडी आवडते हे समजल्यावर आजी चार घास जास्तच करायची. आधी त्यांच्या बरोबर फराळ, मग आईबरोबर जेवण.

श्रावण सोमवार म्हटला की आजोबांचा मोठा महत्त्वाचा दिवस आणि घाईचाही दिवस. सकाळी लवकरच स्नान संध्या उरकून जे काही देवळात जायचे ते मनसोक्त पूजा-अर्चा, अभिषेक, रुद्रपठण वगैरे संपवून दुपारी एक वाजून गेल्यावर घरी यायचे. इकडे आजी बिचारी वाट पाहत असायची. तिने सकाळी चहाव्यतिरिक्त काहीच घेतलेले नसायचे, मात्र आजोबा कितीही म्हणाले तरी ती वाटेल तितका उशीर झाला तरी फराळासाठी थांबून राहायची. आजोबांना त्यांच्या घरातली धाकटी भावंडे लहानपणी भाऊ असे म्हणत असल्याने  ते कुणाचे भाऊकाका, कुणाचे भाउमामा, कचेरीत भाऊसाहेब तर माझे भाऊआजोबा झाले होते. तरुणपणी घरचे अन्न, नियमितपणा, भरपूर व्यायाम व कसलेही व्यसन नसल्याने आजोबांची तब्येत साठी उलटून गेल्यानंतरही मजबूत होती. त्यांच्या बरोबर जर सकाळी फिरायला गेलो, तर त्यांच्या बरोबरीने चालताना माझी फा-फू होत असे. मग आजी काय त्यांच्याबरोबर जाणार? मग ते तिला तळ्यावरच्या कट्ट्यावर बसायला सांगायचे आणि ती ओळखीच्या बायकांशी चार शब्द बोलेपर्यंत तळ्याची एक मैलाची प्रदक्षिणा पूर्णं करायचे. मात्र पुढे त्यांना विस्मृतीचा आजार जडला. श्रावण सोमवार म्हणजे संध्याकाळी भाऊ आजोबा बाळराजेश्वराच्या दर्शनाला मुलुंडला जाणार म्हणजे जाणारच; तेही चालत! हे मंदिर लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ठाणे-मुलुंड सीमेवरील जकातनाक्यापलिकडे साधारण अर्धा किलोमीटर म्हणजे आमच्या त्या वेळच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर च्या थोडे अधिक होते. विस्मृतीमुळे अनेकदा असे घडू लागले की ते घरी परतताना ठाण्याऐवजी उलट दिशेने चालू लागले. त्यांचा शंकर त्यांना घरी आणून सोडायचा असे आजी नेहमी नेहमी म्हणायची. त्याला कारणही होते. आठवण कमी झालेले आजोबा अंगात ताकद भरपूर असल्याने चुकले तरी चालत राहायचे. आपण चुकलो आहोत हे माहीत नसल्यामुळे; किंबहुना मी कसा चुकेने नेहमीच्या जागी? अशी मनोधारणा असल्यामुळे कुणाला लगेच पत्ता विचारायचा प्रश्नच नव्हता! साताला घरी परत येणारे आजोबा आठ वाजायला आले तरी परतले नाहीत म्हणताना सगळे चिंतित व्हायचे व मग मी मित्रमंडळींना घेऊन सायकलवरून देवळापर्यंत, तिथून मुलुंड स्थानक, मग कोपरीचा पूल असे शोधून निराश होत नऊ-साडेनऊला घरी यायचो तर काय? आजोबा हजर! ते रस्ता चुकल्यावर मुलुंडला जायचे की सरळ भांडूप गाठायचे ते त्यांचा शंकरच जाणे. कधी कधी सांगायचे की मला एका भल्या माणसाने स्थानक दाखवले व मी गाडीने आलो. गाडीने आलात? मग तिकिट काढलेत का? त्यांचा प्रतिप्रश्न - तिकिट? ते कसले? आता रोजच्या फिरण्यात 'तिकिट' नसल्याने असे काही असते हे त्यांच्या गावीच नसायचे. वास्तविक ते सुशिक्षित, रोज सकाळी टाईम्स सविस्तर वाचणारे, ठाण्याच्या एका बॅंकेचे पहिले (व केवळ निर्वाहनिधी घेऊन निवृत्त झालेले अखेरचे) व्यवस्थापक होते. नोकरी गावातच असल्याने रोज गाडीने जायचा प्रश्नच नव्हता, मग डोक्यातून 'तिकिट' हद्दपार झालेले. मात्र त्यांना कधी कुण्या तपासनिसाने विनातिकीट पकडले नाही हे मात्र खरे. पुढे पंचाहत्तरी नंतरही प्रकृती उत्तम असली तरी विस्मृतीमुळे आम्ही त्यांना इतके दूर जाऊ देत नसू. मात्र आजही श्रावण सोमवारी त्यांची आठवण झाल्याखेरीज राहत नाही.

श्रावण सोमवार लहानपणी प्रिय असायचे आणखीही एक कारण होते. शाळा एक तास लवकर सुटायची. तेवढाच आनंद. श्रावणातल्या एका सोमवारी आमचा कार्यक्रम ठरलेला असायचा. सकाळची शाळा असायची, ती श्रावण सोमवारी लवकर म्हणजे बाराला सुटायची. आई शाळेबाहेर वाट पाहत उभीच असायची. मग नेहमीप्रमाणे मित्रात न रेंगाळता मी शाळा सुटताच धावत सुटायचो आणि आई दिसताच प्रथम दप्तर तिच्या खांद्याला लटकवून द्यायचो. शाळेपासून कौपिनेश्वर मंदिर अगदी जवळ. या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले शिवलिंग. दक्षिणेत अजस्र नंदी अनेक आहेत, पण कौपिनेश्वरासारखे प्रचंड शिवलिंग मी तरी अजून पाहिलेले नाही. दोन पुरूष पिंडीच्या समोर विरुद्ध बाजूने समोरासमोर उभे राहिले तर दोघांना पिंडीभोवती पसरलेले हात एकमेकाला पकडता येणार नाहीत असे हे चार फूट उंचीचे भव्य शिवलिंग. श्रावण महिन्यात मंदिराच्या परिसरात म्हणजे जुन्या गांव भागात खास बाजार भरायचा, अजूनही भरतो. आजूबाजूच्या गावातल्या व कातकरी, वारली बायका नाना प्रकारच्या भाज्या, फुले, फळे, कंदमुळे, पत्री वगैरे विकायला टोपल्या रस्त्यात पसरून बसलेल्या असायच्या. देवळाच्या प्रवेशेद्वाराअलिकडे असलेले कुटिरोद्योग मंदिर हे मिठाईचे दुकान त्याकाळी सुप्रसिद्ध. देवळात जाण्यापूर्वी कुटिरोद्योगचे पांढरेशुभ्र, ताजे पेढे विकत घ्यायचे हे ठरलेले. मग पायऱ्यांवर बेल, पांढऱ्या चाफ्याची फुले याची खरेदी व्हायची. मग देवळात रांगेत उभे राहून दर्शन व प्रदक्षिणा झाली की एकदा नंदीनिरिक्षण व्हायचे. दोनशे वर्षे जुने असलेल्या या देवळातल्या सभामंडपापुढील नंदीची अशी आख्यायिका होती की हा नंदी म्हणे दर वर्षाला एक सूत पुढे सरकतो. ज्या दिवशी तो शंकराच्या पिंडीला स्पर्श करेल त्यादिवशी जगबुडी होईल. लहानपणी अशा गोष्टी ऐकायला आणि सांगायला मजा यायची; बाकी खरे खोटे कुणाला माहीत. देवळाच्या बाहेर भरलेल्या भर रस्त्यातल्या बाजारात रेंगाळायला मजा यायची. भूक लागली असे म्हणत दैवापुढे ठेवल्यानंतर परत मिळालेल्यांपैकी दोन पेढे गट्ट्म व्हायचे. मग बाजारात कर्टोलीचा वाटा, गावरान लाल भोपळा, श्रावण काकड्या अशी खरेदी व्हायची. सगळ्यात शेवटी केळीच्या पानांची जुडी. तो सोमवार आम्ही सगळे सकाळी उपवासाचा फराळ करायचो. आल्यावर लगेच आई गरमागरम उपासाच्या भाजणीचे व बटाटा खिसून घातलेले थालीपीठ लावायची. खमंग काकडी, थालीपीठ, दही, केळे असा मस्त फराळ व्हायचा.

paan new मग संध्याकाळचे वेध लागायचे. बहीण शाळेतून लवकर यायची, तिची शाळा दुपारची असायची, माझी सकाळची. त्या श्रावण सोमवारी बाबाही खास तो एक दिवस संध्याकाळी लवकर घरी यायचे. मग संध्याकाळी साडेसहालाच जेवण व्हायचे. हे जेवण आवर्जून केळीच्या पानावर. डाव्या उजव्या बाजूने पान सजणार. डावीकडे लिंबाची फोड, हिरवी चटणी, ताजे आंब्याचे लोणचे, कोशिंबीर, भोपळ्याचे भरीत, पापड, घोसाळ्याची भजी, श्रीखंड-पुरी तर उजवीकडे हिरवी मिरची, नारळ व कोथिंबीर घातलेली आमटी, कर्टोलीची भाजी, मटारची उसळ, वाफेवरच्या भाताची मुद, वर पिवळेरंजन गोडवरण, तुपाची धार, बाजूला मसालेभात. ते घमघमणारे सुग्रास जेवण आणि समोर बटाट्याच्या कापात लावलेल्या उदबत्तीचा मंद दरवळ एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती करायचे. मग गप्पा मारत जेवण व्हायचे आणि लवकर आवरून झालेले असल्याने समस्त कुटुंबाची बाहेर एक फेरी व्हायची. आमच्या सुदैवाने लहानपणी दूरदर्शन नव्हते. घरी आल्यावर मग अभ्यास वगैरेचा आढावा घेतला जायचा. गृहपाठ गुंडाळून दप्तर लावताना श्रावण सोमवार संपायचा.

आज हा सगळा कार्यक्रम जसाच्या तसा नाही, तरी एका श्रावण सोमवारी उपास आणि संध्याकाळी साडेसहा नाही तरी साडेसाताला सगळे एकदम जेवायला बसतो, आई-बाबा सकाळी कौपिनेश्वराचे दर्शन घेऊन येताना कुटिरोद्योगचे पेढे आणि केळीची पाने घेऊन आलेले असतात. माग केळीच्या पानावर  आमचे श्रावण सोमवारचे भोजन होते आणि लहानपणाच्या आठवणींच्या गप्पा मारत श्रावण सोमवार साजरा होतो.