साडे माडे तीन - बघा!!

परवा मी आमच्या संपूर्ण कुटुंबासमवेत 'साडे माडे तीन' हा मराठी चित्रपट सिटी प्राइड, कोथरूड येथे पाहिला. अडीच तास मस्त मनोरंजन देण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. जरी 'चलती का नाम गाडी' या जुन्या हिंदी चित्रपटाची बऱ्यापैकी नक्कल असला तरी एक सुखावह मराठीकरण केलेला अंकुश चौधरी आणि सचित पाटील या दिग्दर्शक जोडगोळीचा हा पहिला चित्रपट चित्रपटगृहात हास्यकारंजी उडविण्यात यशस्वी ठरतो. नेटकी आणि आटोपशीर पटकथा, चांगला अभिनय, चुरचुरीत संवाद, ताजे संगीत, नवीन नृत्य-संयोजन आणि योग्य प्रमाणात वापरलेला मनोरंजनाचा मसाला या खुमासदार रेसिपीमुळे साडे माडे तीन प्रेक्षकांची वाहवा मिळवून जातो.

मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप सुधारला आहे हे 'साडे माडे तीन' बघून पटते. अर्थात झी टॉकीज निर्माता असल्याने तांत्रिक सफाई असणे अपेक्षित होते परंतु मराठीत पहिलाच चित्रपट निर्माण करताना पैसे खर्च करण्यात थोडी सावधगिरी बाळगल्याचे नक्कीच जाणवते. पण तरीही कॅमेऱ्याचे अगदी नेत्रसुखद अँगल्स, समजून केलेले कला दिग्दर्शन, दिलखेचक नृत्ये यावरून चित्रपटाची निर्मिती मूल्ये नक्कीच वरच्या दर्जाची वाटतात. (१२-१५ वर्षापूर्वीचा मराठी चित्रपट बघणे म्हणजे शिक्षा असायची. गचाळ चित्रीकरण, सुमार पटकथा, उथळ विनोद, पांचट संगीत, अळणी नृत्ये, विटका अभिनय या सगळ्यांची शिळी मिसळ म्हणजे मराठी चित्रपट असे समीकरण रूढ झाले होते. अर्थात, सन्माननीय अपवाद तेव्हाही होतेच. पण सुबल सरकारांचे रटाळ नृत्यदिग्दर्शन बघून हसू मात्र नक्कीच यायचे.) आता मात्र चित्रपट निर्मितीमधली कल्पकता खचितच वाढली आहे.

मनोरंजक चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या घटकांचा सजीव समावेश हे साडे माडे तीन चे वैशिष्ट्य! विनोद, भावनावेग, रहस्य, संगीत, मारामारी हे सगळं आहे या चित्रपटात. शेवट आणि कथेला मिळणारी कलाटणी जरी अपेक्षित असली तरी खटकत नाही.

मकरंद अनासपुरे, भरत जाधव, अशोक सराफ, अरुण नलावडे, उदय टिकेकर, सिद्धार्थ जाधव या सगळ्यांची कामे झकासच झाली आहेत. मकरंदला खूपच चांगले संवाद मिळाले आहेत आणि त्याने कॉमेडीचे टायमिंग अचूक सांभाळले आहे. अशोक सराफांचा कडक दादा चांगलाच कडक झाला आहे. सुकन्या कुळकर्णीला फारसे काम नसले तरी गॅरेजमध्ये आलेल्या गाडीत डांबून ठेवले असताना तिला अशोक सराफ बाहेर दिसतो आणि त्याचं लक्ष जावं म्हणून तिने केलेले आटोकाट प्रयत्न सुकन्याने केवळ डोळ्यांमधून समर्थपणे दाखवलेले आहेत. काच काळी असल्याने अशोकचं लक्ष जात नाही म्हणून तिच्या चेहऱ्यावर निराशा दाटते आणि अशोक पुन्हा केस सावरण्यासाठी म्हणून काचेत बघतो तेव्हा त्याचे आपल्याचकडे लक्ष गेले आहे असे वाटून डोळ्यात आलेली चमक आणि तो केस सावरतो आहे हे लक्षात आल्यावर पुन्हा दाटलेली निराशा सुकन्याने अप्रतिमरीत्या दाखवलेली आहे. हा प्रसंग खूपच चांगल्या पद्धतीने चित्रित केला आहे.

शेवट अगदी अपेक्षितपणे अपेक्षित अशा वळणावर येतो आणि आता पुन्हा फक्त लुटुपुटुची मारामारी होऊन अगदी सरधोपटपणे चित्रपट संपेल असे वाटत असतानाच सिद्धार्थ जाधव येऊन आणखी धमाल उडवून जातो. त्याचा दिवे बंद-चालू करण्याच्या प्रसंगात तर पटकथाकाराने कमाल केली आहे. भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांनी मोठ्या भावाच्या कायम धाकात राहणारे सरळमार्गी आणि प्रामाणिक भाऊ खूप छान रंगवले आहेत. नवनवीन गोष्टी करण्याचा मोह, तो मोह टाळून दादाच्या शिस्तीत चालताना होणारा त्रास, प्रेमात पडावे की दादाच्या धाकातच राहावे ही घुसमट, दादाकडून मिळणाऱ्या शिक्षेची भीती हे सगळे भाव दोघांनी खूप चांगले रंगवले आहेत. त्यात थोडासा (अगदी किंचित) आगाऊ पण सहृदय भाऊ मकरंदने चांगला उभा केला आहे. दादाचे एवढ्या मोठ्या भावांना छडीने फोडून काढणे मात्र तितकेसे पटले नाही पण त्याचाच उपयोग शेवटी चांगल्या पद्धतीने करण्यात आला आहे. उदय टिकेकरचा खलनायक चांगला झाला आहे पण खलनायकाचे कारस्थान, त्याच्या कारस्थानांचा नायक मंडळींनी उडविलेला धुव्वा वगैरे भाग खूपच सरधोपट आणि अगदी नेहमीच्या पठडीतला झाला आहे. चित्रपटाच्या कथेच्या मूळ मजबूत गाभाऱ्याभोवती फुटलेल्या विटांनी आणि मातीने घाई-घाईत मंडप बांधल्यासारखा हा भाग झाला आहे. हा भाग अजून चांगला आणि रोमांचक करता आला असता.

[float=font:mohini;place:top;]दोन्ही नायिका चांगल्या आहेत. त्यांची कामे देखील चांगली झाली आहेत. मराठीतल्या नायिकांमध्ये आता-आता कुठे ग्लॅमर दिसू लागले आहे. दोन्ही नायिकांनी नायकांना चांगली साथ दिली आहे.[/float]

सुमीत राघवन एका गाण्यात अफलातून नृत्य करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून जातो. हा गुणी आणि देखणा अभिनेता का कायम अडगळीत राहिला हे एक कोडेच आहे. गीत-संगीत आजच्या काळाच्या अनुरूप आहे. ७७७ गाण्यात शब्द मात्र तितकेसे प्रभावी वाटत नाहीत. शीर्षक गीत गुणगुणण्यासारखे आहे. अजय-अतुल हे चांगले संगीतकार आहेत हे त्यांनी आधीच सिद्ध केले आहे.

झी टॉकीजने मराठी चित्रपटनिर्मितीमध्ये केलेले पदार्पण स्तुत्यच आहे परंतु त्यांच्या हिंदी चित्रपटनिर्मितीचा वेग जसा मंदावला तसे मराठी चित्रपटांच्या बाबतीत होऊ नये ही सदिच्छा! फरेब (अरबाज खान, मिलिंद गुणाजी, सुमन रंगनाथन), गदर (सनी देवल, अमीशा पटेल) याव्यतिरिक्त झी चे हिंदी चित्रपट दिसले नाहीत. वास्तविक हे दोन्ही चित्रपट तिकिटबारीवर जबरदस्त चालले होते. दोन्ही चित्रपटातली गाणी खूपच गाजली होती पण पुढे कुठे माशी शिंकली देव जाणे. अर्थात, साडे माडे तीन हा झी टॉकीज या पूर्णपणे मराठी चित्रपटांना वाहून घेतलेल्या २४-तास वाहिनीचा चित्रपट असल्याने केवळ मराठी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणे त्यांना सोपे जाणार आहे. फरेब आणि गदर हे झी नेटवर्क चे चित्रपट होते आणि त्याकाळी झी नेटवर्कवर झीच्या सगळ्या वाहिन्यांना कंटेट पुरवण्याची जबाबदारी होती. त्यामुळे कदाचित हिंदी चित्रपट निर्मितीचा त्यांचा वेग मंदावला असावा.

एकंदरीत, साडे माडे तीन म्हणजे मनोरंजनाची हमी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सुटीच्या दिवशी कुटुंबातल्या सगळ्यांना घेऊन जा; निराशा पदरात पडणार नाही याची गॅरंटी!

साडे माडे तीन
निर्माता - झी टॉकीज
दिग्दर्शक - अंकुश चौधरी, सचित पाटील
संगीत - अजय-अतुल
कलाकार - अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सुकन्या कुळकर्णी, सिद्धार्थ जाधव, उदय टिकेकर, अरुण नलावडे (नायिकांची नावे माहीत नाहीत त्याबद्दल क्षमस्व पण त्यातली एक झी मराठीवरच्या असंभव मालिकेमध्ये क्षिप्राचे काम करते.)

-- समीर