'तारे जमींन पर'!

सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्‍यांपैकी मी एक!:)) पण 'तारे..' च्या आधीपासून झळकणार्‍या झलका हा चित्रपट लगेच पाहायचा निर्णय घ्यायला पुरेश्या ठरल्या! कारण मुख्यत्वे प्रेमाचे त्रिकोण, चौकोन, पंच किंवा षट्कोन, लंडन-न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर उबळणारे देशप्रेम, भांगडा आणि सरसों का साग, उबग आणणारे आलिशान प्रासादातले बेगडी कौटुंबिक जिव्हाळे या सर्वांचा सुखद अभाव त्यात प्रकर्षाने जाणवला!

एक आमिरखान सोडल्यास एकही सुस्थापित 'स्टार' चेहरा यात नाही. पण म्हणून या बाकीच्या अपरिचित तार्‍यांची प्रभा काही कमी नाही. सगळ्यात प्रभावी तारा तर 'ईशान' (दर्शिल सफारी) आहे. या मुलाची या भूमिकेसाठी निवड करून आमिरखानने 'पर्फेक्ट निवड' म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरणच समोर ठेवलंय. हाही चेहरा पूर्वी कुठे पाहिल्याचं स्मरणात नाही...त्याच्या ट्प्पोर्‍या डोळ्यांत अनेक भाव उमटतात...डोळ्यांनी हा मुलगा बोलतो! त्याच्या ओठातून पुढे झुकलेले आणि ठळकपणे दिसणारे सशासारखे दोन दात त्याचा तिसरीतल्या मुलाचा अबोध आणि निरागस चेहरा पूर्ण करतात. अभिनय तर त्याने लाजवाब केलाय. कित्येकदा त्याच्या टपोर्‍या डोळ्यांतलं पाणी आपल्याही डोळ्यांतनं कधी पाझरू लागतं आपल्यालाच कळत नाही!

त्याचे आईवडील किंवा त्याच्या मोठ्या भावापासून ते त्याचे शिक्षक, मित्र या सर्वांच्या निवडी त्या त्या भूमिकेसाठी इतक्या यथार्थ आहेत कुठेही आपण चित्रपटातले नट-नट्या पाहतोय असं जराही जाणवत नाही. सगळी पात्रं अगदी आपल्या अवतीभवतीची, सुपरिचित वाटतात. पात्रांच्या निवडीप्रमाणेच चित्रपटातलं एकंदर वातावरणही आपलंसंच वाटतं. चित्रपटाचा नायक हा आलिशान बंगल्यात न राहता तुमच्याआमच्यासारखा सोसायटीत राहतो. सगळी मुलं मिळून बिल्डिंगच्या आवारात किंवा गच्चीवर खेळतात. स्कूलबसने शाळेत जातात. बाबांचा 'कारोबार' नाहीये तर ते ऑफिसला जातात आणि आई जॉब, करियर सोडून गृहिणीपद चोख बजावतेय...सकाळी नवरा-मुलांचा डबा-नाश्ता तयार करण्यापासून ते मुलाला स्कूलबसपाशी सोडायला जाताना घाईघाईत गाऊनवरच ओढणी घेऊन जाणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा दिग्दर्शकाने अचूक दाखवल्यात :)

हा पोरगा इतर पोरांहून जरा 'वेगळा' आहे. जरा म्हणजे त्याला लिहावाचायला जमतच नाही...अक्षरं, आकडे फेर धरून नाचतात त्याच्या डोळ्यांपुढे. वैज्ञानिक भाषेत डिसलेक्सिया म्हणतात त्याला. पण त्याला ही 'अडचण' असू शकेल हे त्याच्या आईवडीलांना कळतच नाही...खरं तर मोठ्या भावाच्या रूपातला एक हुशार आणि गुणी मुलगा घरात असल्याने धाकट्याला असा काही प्रॉब्लेम असेल असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. आणि मग यातून सुरू होतो तो बालमन आणि पालकांच्या अपेक्षा यातला एक न संपणारा संघर्ष. अभ्यास न जमणे आणि शेवटी त्याचे परिणाम परीक्षेत दिसू लागल्यावर आईवडीलांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांचा ओरडा खाणार्‍या ईशानचे मन दिवसेंदिवस कमकुवत होत जाऊन तो एक सतत मान खाली घालणारा अबोल आणि घुम्या स्वभावाचा मुलगा बनतो. त्याच्या मनातली वादळं त्याच्या मनातच राहतात...

ईशानच्या शैक्षणिक प्रगतिविषयी काळजी वाटून आणि तो 'वठणीवर' येईल या विचाराने मन घट्ट करून त्याचे आईवडील त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल करतात. तिथे जायची अजिबात इच्छा नसलेला ईशान मनातून खूप दुखावला जातो.  पण त्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याची मानसिक अवस्था आणि घालमेल तिथला चित्रकला शिक्षक (आमिरखान) बरोबर ओळखतो. लहानपणी हाच प्रॉब्लेम असलेला तो शिक्षक ईशानला योग्य पण वेगळ्या तर्‍हेने शिकवून त्याची लिहावाचायची अडचण तर सोडवतोच पण त्याच्या मनात एक अनामिक आनंद आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास जागृत करतो.

तसं म्हटलं तर लिहिण्या-वाचण्याचा प्रॉब्लेम असलेल्या एका मुलाला त्याच्या शिक्षकाने मदत केली आणि त्यातून त्याला सहीसलामत बाहेर काढले अश्या एका वाक्यात या चित्रपटाची गोष्ट सांगता येईल पण प्रत्यक्षात या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत आणि ते न दाखवून चालणारच नाही. त्याची ही अडचण अधोरेखित करणारे अनेक प्रसंग किंवा छोट्या छोट्या गोष्टी सबंध चित्रपटात इतक्या सहजतेने दाखवल्यात की त्या अजिबात ओढूनताणून दाखवलेल्या किंवा जराही असंबद्ध वाटत नाहीत. साथीला त्याचं मानसिक द्वंद्व प्रतिबिंबित करणारे प्रसून जोशींचे शब्द आणि त्यांना लावलेली शंकर-एहसान-लॉय यांची चाल तर अप्रतिम!

[float=font:brinda;place:top;]आमिरखानचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही यावर्षीचे पुरस्कार घेऊन जातील यात शंका नाही.[/float] चित्रकार समीर मॉंडल यांच्या सुरेख पोर्ट्रेट्स-चित्रांचा चित्रपटात केलेला सहज वापर मुद्दाम लक्षात राहण्यासारखा. अक्षरं आणि  आकड्यांशी वाकडं असणार्‍या ईशानला अक्षरं-आकडेरूपी किडे सर्वत्र सरपटताना दिसण्याचा प्रसंग तर लाजवाब. या आणि अशा कैक पैलूंनी हा चित्रपट एक नितांतसुंदर अनुभव बनलाय. असे विषय बॉलीवूडमध्ये हाताळले जातायत याचाच आनंद आहे आणि याचं श्रेय आमिरखान आणि अमोल गुप्ते आणि त्यांची टीम यांना द्यायलाच हवं!

'तारे जमीनपर' चे संकेतस्थळ:

तारे जमीनपर

सर्वांनी जरुर पाहावा असाच हा चित्रपट आहे.

-वर्षा