ट्यूबविरहित टायर

बाळ पालथे होणे, बसणे  रांगणे, उभे राहणे आणि मग चालणे या काही अश्या हालचाली आहेत ज्या आपल्या वाढत्या वयाचे मैलाचे दगड म्हणून ओळखले जातात. मग शाळा आणि मग शाळेला जाणे. या शाळेला जाण्यात आपल्या आयुष्यात स्वतःचे मालकीचे वाहन येते ते सायकल. अन त्या सायकलची देखभाल हा आपला एक छंदच बनून जातो. हा छंद जपताना आपल्या आवाक्या बाहेरची देखभाल म्हणजे पंक्चर. मग "येथे पम्चर/पंचर/पंक्चर काढून मिळेल" असा फलक शोधायची गरज लागते ती लहानपणा पासून ते जो वर स्वतः वाहन (दुचाकी/चारचाकी) चालवतो तोवर. बरं सायकलच ठीक आहे हो. पंक्चर झालेले चाक उचलून नेणे शक्य असते. पण इतर वाहनांचे काय? मग ती दुचाकी असो वा चार चाकी. वाहनचालक जर स्त्री असेल तर मग हतबलता आणखीनच तीव्र अन मदतीची गरज जास्तच. पंक्चर झाल्या झाल्या गाडीचे टायर खाली बसलेच म्हणा, जर मोटर सायकल असेल तर खोळंबा, अतिरिक्त चाक वाली दुचाकी असेल तर चाक बदला. अन चारचाकी असेल तर अतिरिक्त चाक बदलण्याचा खटाटोप वेगळा. अतिरिक्त चाक असले तरी ही ते योग्य स्थितीमध्ये असलेले हवे हे सांगायला नको.  एकूणच गाडी पंक्चर होणे हा प्रत्येक प्रवासातला अप्रिय, अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकार.

या अप्रिय, अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकारा पासून थोडासा दिलासा मिळतो आहे. बाजारात आता आलेल्या ट्यूब विरहित टायर हे जनसामान्यांची हि अडचण ओळखून तंत्रज्ञान विकसीत झालं आहे.

सामान्य टायर ट्यूबची माहिती:
सर्वसाधारणपणे गाडीचे चाक म्हणजे कणा, कण्यावर फिरणारी धातूची रीम, रिमवर बसवलेले रबर-धातू तारा यापासून बनवलेले टायर, टायर आणि रीम यांच्या पोकळीमध्ये असलेली ब्युटीलची ट्यूब, अन त्या ब्युटीलच्या ट्यूबला असलेल्या अन रिममधून बाहेर आलेल्या व्हॉल्व मधून भरलेली काँप्रेस्ड हवा. हे सर्व मिळून तयार होते एक चाक.  खालील चित्रावरून या ठेवणीची कल्पना येईलच.

चाकाची ढोबळ रचना

चाकाच्या या सर्व भागांमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे हवा. पण जेव्हा याच हवेची गळती होऊ लागते तेव्हा मात्र तोंडचे पाणी पळते. अन चालकाचा त्याचा जर अंदाजच आला नाही तर गाडीवरचे नियंत्रण जाऊन प्रसंगी जीव गमावण्याची सुद्धा शक्यता असते.

सामान्य टायरची रचना खालील चित्रावरून लक्षात येऊ शकेल.

सामान्य टायरची रचना

धातूच्या तारा, ज्यामुळे रिमची पकड घेतली जाते, तारांचाच आधार घेऊन असलेली वेष्टणे आणि त्याला आच्छादणारे वेगवेगळ्या जाडीचे रबर (रस्त्याशी संपर्क न येणार्‍या दोन बाजू आणि रस्त्याशी संपर्क येणारा भाग) या पासून टायर बनते. टायरची रस्त्याशी संपर्क येणारी बाजू अनेक देशात वेग वेगळ्या हवामानाचा आणि त्यामुळे रस्त्यावरील पकडीचा विचार करून बनवलेली असते.
ट्यूब ब्युटीलची असते. वाहनाची रचना/वजन यावरून या ट्यूबमध्ये किती दाबाची हवा असली पाहिजे ते ठरवले जाते. कमी दाबाची हवा वाहनासाठी आणि प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच वाहनाच्या इंधनक्षमतेवर सुद्धा परिणाम करू शकते. वाहनाची इंधनक्षमता कमी होते अन इंधनाचा खर्च आपोआपच वाढतो.

या प्रकारच्या टायर ट्यूब पंक्चर झाल्या तर पंक्चर करणारी वस्तू (अनेकदा खिळा) टायरमध्ये रुतून बसतो, ट्यूबला भोक पडते आणि हवेची गळती सुरू होते. हवा ट्यूबमधून, व्हॉल्व खराब झाल्यास व्हॉल्वमधून आणि टायर ट्यूबच्या पोकळीमधून वाहून जाते. खिळा टायरमध्ये राहिल्याने ट्यूबची अक्षरशः चाळणी होण्याची शक्यता असते. पंक्चर झाल्या झाल्या तत्काळ हवा जायला सुरू होते आणि प्रवास तिथल्या तिथे थांबतो. गाडीचे चाक बदलणे अथवा जवळच पंक्चर काढणारा अण्णा शोधणे या शिवाय पर्यायच नसतो. सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे गाडी भरधाव वेगात असेल आणि चालकाला वेग नियंत्रित नाही झाला तर जीवघेणा अपघात होण्याची शक्यता जास्त असते.

ट्यूब विरहित टायरची थोडक्यात माहिती :

नावाप्रमाणेच या प्रकारच्या टायरला वेगळ्या ब्युटील ट्यूबची गरज नाही. टायर,  रीम आणि टायरमधले इनर लायनिंग असे मिळून चाक तयार होते. या प्रकारात हवा भरायचा व्हॉल्व रिमवरच लावला जातो. टायर, रीम आणि हवा असे मिळून एक हवाबंद पोकळी तयार होते. हवा भरायची ट्यूब नसल्याने, चाक आणि इनर लायनिंगच्या घट्ट पकडीमुळे, हवा जाण्याचा एकच मार्ग उरतो. तो म्हणजे ज्या ठिकाणी पंक्चर झाले आहे असा तो भाग. हा भाग शक्यतो छोटा असल्याने नेहमीच्या टायर प्रमाणे हवा पंक्चर होता क्षणीच न जाता हळूहळू जाते व परिणामी पंक्चर झाल्यावर सुद्धा गाडी न थांबता काही अंतर योग्य नियंत्रणात चालवणे शक्य होते.

ट्युबलेस टायर ="" />

ट्यूब विरहित टायरचे चित्र

ट्यूब विरहित टायरचे फायदे:

  1. पंक्चर झाल्यावर गाडी न थांबता चालवली जाऊ शकते.
  2. चाकाचे एकूण भाग कमी झाल्याने सुटसुटीतपणा.
  3. भाग कमी झाल्याने वजन कमी अन त्यामुळे इंधन क्षमता जास्त.
  4. तत्काळ हवा जात नसल्याने गाडीवरचे नियंत्रण जात नाही. त्यामुळे वाहन आणि प्रवाशांची सुरक्षा जास्त.
  5. दुरुस्तीला सोपे.
     

टायरवरची माहिती कशी वाचावी याचे आंग्लभाषेत माहिती देणारे हे एक चित्र:

आशा करतो की माहिती सदस्यांना उपयोगी पडेल. जाता जाता २ गृहपाठ देतो आहे. उत्साही सदस्यांनी आणखी काही माहिती मिळवावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

गृहपाठ

ट्यूब विरहित टायरचे पंक्चर काढण्याचे ३ मुख्य प्रकार आहेत. ते कोणते?
पाश्चिमात्य देशांमध्ये हिवाळ्या आधी आणि नंतर गाड्यांचे टायर बदलले जातात. असे का?

अवांतर
भारतात पंक्चर काढणारे लोक हे प्रामुख्याने केरळचे कमी शिक्षित अण्णा लोकं असतात. त्यांच्याकडे जी साधन सामुग्री असते ती पारंपरिक पद्धतीची असते, तसेच त्यांना या टायर बद्दल तांत्रिक माहिती नसल्याने ते लोक या टायर बद्दल अनेकदा गैरसमज पसरवतात.