कविता सुचता सुचता...

आज पहाटे जाग आली तीच एक कविता डोक्यात रुंजी घालीत असल्यानं. नाही तर मी इतक्या लवकर उठलोच नसतो. हे शब्दही इतके लबाड आहेत की, लगेच लिहून ठेवलं नाही, तर नंतर लाख मिन्नतवाऱ्या करूनसुद्धा लेकाचे सुचत नाहीत.डोळे चोळत उठलो, टेबलावरून वही-पेन घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. आणि सहज विचार आला, कविता सुचते कशी???

खरं तर 'कविता सुचते कशी? ' या प्रश्नाला ठरवूनसुद्धा उत्तर देता यायचं नाही. म्हणजे, अगदी बेसिक मुद्दा 'कवितेची जन्मवेळ' हा ठरू शकतो. एक वेळ शिवाजीमहाराजांची जन्मवेळ आणि दिनांक हा शासन आणि इतिहासकार यांच्यात मेळ घालून नक्की करता येईल. पण कवितेची जन्मवेळ खुद्द तिच्या बापालाही (कवयित्री असेल तर तिच्या आईलाही) सांगता यायची नाही. मग बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही. माझा एक 'कविताकार' (हल्ली म्हणे 'कवी'ला हा समानार्थी शब्द आहे)मित्र तर म्हणतो, ''कविता करणं ईज ऍज गुड ऍज बाळंत होणं.'' आणि ते खरंच आहे असं म्हणायला काही हरकत नसावी. तोच मित्र पुढे चेष्टेनं म्हणाला, '' पण काय आहे, कधी कधी नुसत्याच कळा येतात, प्रत्यक्ष प्रसूती होतच नाही. आणि कवितेच्या बाबतीत तर 'सीजर' करणं पण शक्य नाही. खिःखिःखिःखिः '' - तर सांगायचा मुद्दा असा की, कवितेचा जन्म कसा होतो हे सांगणं अवघडच !

             कधी कधी अचानक दाटून यावं, तसा एखादाच शब्द मनात घोळायला लागतो. मग मन त्या शब्दाला कुठल्यातरी वृत्तात बसवायचा घाट घालतं. मग त्या शब्दाचे सवंगडी मनात फेर धरून त्याच वृत्तात नाचू लागतात. आणि ही वेळ अशी असते की जणू 'मन' आणि 'शब्द' यांच्यात कसलं तरी 'निगोसिएशन' चालू आहे. मन म्हणतं, '' जरा, अगदी जऽऽरासं वृत्त बिघडतंय, नाही तर अमुक एक शब्द खास आहे. पण नकोच तो.दुसरा वापरून बघू या. '' तर तोच शब्द म्हणतो, '' तेवढं चालतंय की राव. सांगायचा मुद्दा सांगितला जातोय की.मग काय हरकत आहे? '' मुद्दा वृत्ताचाच असेल असं नाही, कधी कधी भावाचा मुद्दा पण असतो. अशा वेळी शब्द बरोब्बर भाव खातात. तर हे 'निगोसिएशन' यशस्वी झालं की मग कुठे त्या कवितेची एखादी ओळ लिहिली जाते. जणू काही मन आणि शब्दांनी करारावर सह्याच केल्या आहेत.

             प्रत्येक वेळी इतकं 'क्लिष्ट प्रकरण' असेलच असंही नाही. कधी कधी अख्खी ओळच्या ओळ सुचते. मग तिच्यासारख्याच तिच्या मैत्रिणीही येतात.मग, चार-पाच मुली/ बायका एकत्र आल्यावर काय होणार? - 'डोक्याची मंडई'! मनात एकच गोंधळ, कलकल. पण तशा सगळ्याच मुली (काही अपवाद सोडले तर) चांगल्याच असतात. (ओळींना मुलींची उपमा दिल्याने असं लिहावं लागतंय खरं.) असो, तर त्या मुलींच्या तथाकथित चांगुलपणामुळे कवितारूपी कन्यारत्न जन्माला येतं. (अर्थात मन,नक्की कोणती मुलगी चांगली?ह्या विचारानं गुंग होतं ते वेगळंच)

            सुरेश भटांच्या केव्हा तरी पहाटे मधला शेवटचा शेर आहे ना, ''स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली''  तसं काहीसं होतं कधी कधी. आधी शेवटचीच ओळ सुचते. मग मन त्या 'शेवटावर' 'आरंभाचा' डोलारा रचू पाहतं.तो कधी जमतो, कधी नाही हा भाग निराळा. पण ती प्रक्रिया मात्र असते भन्नाट. आणि कधी कधी तोच शेवट सुचता सुचत नाही. मन म्हणतं 'सुरुवातीपासून सगळं छान जमून आलंय, आता शेवट पण साजेसा झाला पाहिजे.' मग ते साजेसे शब्द सुचायची वाट बघायची. मला वाटतं 'वाट बघणं' या बाबतीत एका कवीइतका निग्रह कुणाचाच नसेल. आणि नुसती वाट बघणं नसतंच, सुचलेल्या शब्दांचं ओझं असतंच अंगाखांद्यावर. मग दुसरा शब्द सुचला की डोईवरचं खांद्यावर होतं. कधी कधी सुरुवातीची ओळ इतकी भन्नाट सुचलेली असते की, मग पुढच्या प्रत्येक शब्दावर एक प्रकारचं दडपण येतं. त्या भन्नाट सुचलेल्या शब्दांची शान राखता आली नाही तर? या प्रश्नामुळं आलेलं दडपण ! मग सुचलेला शब्दही जर तितकाच भन्नाट असला, तर वाचकांना एक नितांतसुंदर काव्य वाचायला मिळतं. नाही तर कवितेतला एखादाच भाग आवडतो, जसं मुलगी बघायला गेल्यावर तिचे फक्त केसच आवडावेत तसंच.

असो, कविता सुचता सुचता आलेला अनुभव शब्दांकित करायचा प्रयत्न मी केलाय. प्रत्येक कवीचा अनुभव असाच असेल असं अजिबात नाही. किंबहुना एकाच क्षेत्रातल्या व्यक्तींच्या अनुभवाच्या बाबतीत मतभेद असलाच पाहिजे हा तर अलिखित नियम आहे. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती, तसं व्यक्ती तशा अनुभूती असं म्हणून मी थांबतो. पहिलाच लेख आहे, त्यामुळं कसा जमलाय ते आवर्जून सांगा.कळावे,लोभ असावा ही विनंती .