हा प्रत्यय’च’ हे करू शकतो!

वाक्यातल्या एखाद्या मुद्यावर भर द्यायचा असेल की आपण ’च’ किंवा ’सुद्धा’ असे प्रत्यय वापरतो. मराठी भाषेतल्या या ’च’च्या प्रत्ययाकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. पण हा प्रत्यय ’लई पॉवरबाज’ आहे असं माझं मत आहे. ’कुठल्याही दोन काड्या हलवून चौकोनाचा अष्टकोन करा’ वगैरे असली जी कोडी असतात त्यांत त्या दोन काड्यांमध्ये जी समोरचं दृश्य क्षणार्धात बदलायची ताकद असते तशीच ताकद या ’च’च्या प्रत्ययात असते. वाक्यातल्या वेगवेगळ्या शब्दांना हा ’च’चा प्रत्यय लावला की त्या वाक्याचा अर्थ लगेच बदलतो.

उदाहरणादाखल एखादं अगदी साधं वाक्य घेऊ - ’मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. ’ हे ते वाक्य.
आता यातल्या एकेका शब्दाला पुढे ’च’ लावला की अर्थ कसा बदलतो ते पाहा.

     *  मुलंच प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात.
        (म्हणजे, बाकी कुणी प्रश्न विचारले तरी चालतात. पण मुलं मात्र भंडावून सोडतात. )

     *  मुलं प्रश्नच विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात.
        (म्हणजे, मुलांनी बाकी काही केलं तरी चालतं. पण प्रश्न विचारले की मोठे वैतागतात. )

     *  मुलं प्रश्न विचारूनच मोठ्यांना भंडावून सोडतात.
        (म्हणजे, मोठ्यांना भंडावून सोडण्यासाठी मुलांना प्रश्न विचारण्याचंच काम करावं लागतं. )

     *  मुलं प्रश्न विचारून मोठ्यांनाच भंडावून सोडतात.
        (म्हणजे, प्रश्न विचारल्यावर भंडावून जाणे ही फक्त मोठ्यांचीच समस्या आहे. )

     *  मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावूनच सोडतात.
        (म्हणजे, वैताग आणतात, त्रास देतात वगैरे इतर काही तापदायक गोष्टी करत नाहीत, फक्त भंडावून मात्र सोडतात. )

     *  मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतातच.
        (म्हणजे, याबद्दल काही दुमत असण्याची सुतराम शक्यता नाही. )

केवढी विलक्षण ताकद आहे ना या प्रत्ययात!

अजून एक उदाहरण बघा. ’आज स्वयंपाक छान झाला आहे’ हे वाक्य घेऊ. आता हा संवाद ज्या घरात घडेल तिथे आपला ’च’चा प्रत्यय काय-काय scenes घडवेल ते बघा.  

     *  आजच स्वयंपाक छान झाला आहे.
        (हे वाक्य म्हणजे पुढच्या ४-५ दिवसांच्या अबोल्याची निश्चिंती! )

     *  आज स्वयंपाकच छान झाला आहे.
        (म्हणजे, घर पसरलेलं आहे, तुझाही अवतार’च’ आहे, मूडही तितकासा खास दिसत नाहीये पण स्वयंपाक मात्र छान झाला  आहे! )

     *  आज स्वयंपाक छानच झाला आहे.
        (म्हणजे, विशेष प्राविण्याचं प्रशस्तिपत्रक! )

     *  आज स्वयंपाक छान झालाच आहे.
        (म्हणजे, अजूनही काय-काय छान आहे, त्याची यादी पुढे येतेच आहे! )

     *  आज स्वयंपाक छान झाला आहेच.
        (म्हणजे, खबरदार! या स्वयंपाकाला कुणी नावं ठेवलीत तर. )

अजून एक उदाहरण बोलकं ठरू शकेल. वाक्य आहे - ’हे जग मी सुंदर करून जाईन. ’

     *  हेच जग मी सुंदर करून जाईन.
        (म्हणजे, दुसऱ्या जगात गेल्यावर मी या भानगडीत पडणार नाही, प्रॉमिस! )

     *  हे जगच मी सुंदर करून जाईन.
        (म्हणजे, दुसऱ्या जगात जाईपर्यंत थांबणार नाही! )

     *  हे जग मीच सुंदर करून जाईन.
        (म्हणजे, इतर कुणी करण्याआधी ते काम मीच करून टाकेन! )

     *  हे जग मी सुंदरच करून जाईन.
        (म्हणजे, सुखकारक, आल्हाददायक वगैरे नकोच! सुंदरच करेन. ते सोपं आहे! )

     *  हे जग मी सुंदर करूनच जाईन.
        (म्हणजे, ते काम झाल्याशिवाय मी हे जग सोडून जाणार नाही! )

     *  हे जग मी सुंदर करून जाईनच.
        (म्हणजे, घाबरू नका, ते काम मी करणार याची खात्री बाळगा! )

आणि आता हे वाक्य - ’या वाक्याचा मतितार्थ लक्षात घ्या. ’

     *  याच वाक्याचा मतितार्थ लक्षात घ्या.
        (म्हणजे, इतर कुठल्याही वाक्याचा घेऊ नका, याचा मात्र घ्या. )

     *  या वाक्याचाच मतितार्थ लक्षात घ्या.
        (म्हणजे, इतर कुठल्याही वाक्यापेक्षा याचा मतितार्थ लक्षात घेणं फार गरजेचं आहे. )

     *  या वाक्याचा मतितार्थच लक्षात घ्या.
        (म्हणजे, अन्वयार्थ, गर्भितार्थ वगैरे नको, मतितार्थच लक्षात घ्या. )

     *  या वाक्याचा मतितार्थ लक्षातच घ्या.
        (म्हणजे, तुमच्यासमोर ते करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. )

     *  या वाक्याचा मतितार्थ लक्षात घ्याच.
        (म्हणजे, आग्रहाची विनंती! )

असं प्रत्येक वाक्याच्या बाबतीत शक्य आहे. काही काही वाक्यांमध्ये खूप धमाल घडते तर काही वाक्यं या ’च’च्या प्रत्ययाला फारशी उलथापालथ न घडू देता आपल्यात सामावून घेतात. प्रत्ययाच्या जागेनुसार वाक्यांचे बदलणारे अर्थ लक्षात घेणे हा माझा एक आवडता विरंगुळा आहे आणि आता मी हे नक्की सांगू शकते की हे वाचल्यावर तुम्हीही मनातल्या मनात निरनिराळ्या वाक्यांवर प्रयोग सुरू केले असतील...
प्रयोगच सुरू केले असतील... प्रयोग सुरूच केले असतील... प्रयोग सुरू केलेच असतील... प्रयोग सुरू केले असतीलच...!!!