वैश्विक शेकोटी

मागच्या दोन चार आठवड्यात मुंबईतल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आपण त्याहीपेक्षा एका मोठ्या आणि संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या एका महाभयंकर हल्ल्याला थोडसं विस्मृतीत टाकलं होतं. पण ही विस्मृती लवकरच क्षणभंगूर ठरणार आहे आणि या हल्ल्याच्या दाहकतेत पुन्हा एकदा आपण होरपळून निघणार आहोत. तुमच्या एव्हाना लक्षात आलंच असेल की हा हल्ला म्हणजेच मागचे काही महिने थैमान घालत असलेलं जागतिक आर्थिक महासंकट. या संदर्भात परवा रेक्स वायलर या सृष्टी विज्ञान लेखकाचा एक लेख वाचण्यात आला. या लेखात रेक्सनं जागतिक आर्थिक संकटाकडे बघण्याचा एक संपूर्ण नवा दृष्टिकोन दिलाय. खालील लेख म्हणजे रेक्सच्या याच लेखाचं स्वैर रुपांतर.

जागतिक आर्थिक महासंकट तुमच्या मते काय फक्त डेरिव्हेटिवज आणि सबप्राईम च्या गडबड घोटाळ्यामुळेच उदभवलंय? मोठमोठ्या आर्थिक कंपन्यांनी केलेल्या अफरातफरी, चुकीचे व्यवहार, लालची आणि अधाशीपणा या सगळ्या गोष्टींनाच आपण आजच्या या संकटा मागची खरी कारणं म्हणून गृहीत धरतो. जगभरातले अर्थतज्ञ, पंडित, रथी महारथी सारेच असाच डंका पिटतात. पण याच्या पलिकडे जाऊन या राक्षसाला उभा करणाऱ्या खऱ्या कारणांकडे आपण कधी बघितलंय? अर्थकारणासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी आवश्यक असतात त्या म्हणजे जमीन, उर्जा, हरित आच्छादनं, क्षार आणि समुद्र. आर्थिक महासंकट आणि हे मूलभूत घटक यांचा अर्थाअर्थी काही संबंध असेल असा विचारही याबाबतीत डंका पिटणाऱ्यांनी कधी केला नाहीये. चराचर सृष्टीच्या संदर्भात कागदोपत्री होणाऱ्या या आर्थिक देवाण घेवाणी खरं तर केवळ दांभिक, पोकळ आणि फारच वरवरच्याच असतात. इतकंच काय या देवाण-घेवाणी, हे सौदे, हे वायदे आणि या फसवा-फसवी सुद्धा या साऱ्या निसर्ग, निसर्ग संस्था आणि निसर्गाचे घटक यांच्या जीवावरच केलेल्या असतात.

सतत फोफावण्याच्या महत्त्वाकांक्षा असणाऱ्या जागतिक आर्थिक कंपन्या, त्यांचे व्यवहार आणि त्यांच्यातल्या तथाकथित अर्थतज्ञांच्या ज्ञानातला फोलपणा या आर्थिक महासंकटानं चव्हाट्यावर आणलाय. संपत्ती आणि समृद्धी फक्त या तज्ञांच्या बुद्धीचातुर्यानं आणि व्यवस्थापन कौशल्यानंच निर्माण होते असा एक फार मोठा भ्रम यांच्या डोक्यात असतो आणि ते आणि त्यांचे सहकारी एखाद्या नशेप्रमाणे त्या भ्रमातच सदैव वावरत असतात. एक जमीन खारावली तर दुसरी जमीन, एक नदी आटली तर दुसरी नदी, एक जंगल तोडून झालं की दुसरं जंगल... एवढंच नाही तर एक खंड संपला की दुसरा... असं यांचं हे संपलं की ते पादाक्रांत करणं अव्याहत चालू असतं. हेच असतं यांच्या दृष्टीनं 'क्रिएशन ऑफ वेल्थ'...

आता बाजार खाली पडलेत. ते पुन्हा कदाचित चढतील आणि पुन्हा आपटतीलही. कागदी घोडे नाचवणारे या सगळ्याचा फायदा उठवतील आणि आणखी अधिक संपत्ती स्वतः साठी आणि स्वतःच्या कंपनीसाठी निर्माण करतील. पण "अधिक संपत्तीची निर्मिती" म्हणजे नक्की काय आणि नक्की कुठून? जमीन आणि पाणी सगळं मिळून शेवटी तेवढंच राहतं. त्याच्यात अधिक निर्मिती होते? निसर्गाची अधिक निर्मिती करता येते?

१९६०च्या सुमारास प्रसिद्ध अमेरिकन निसर्गतज्ञ ऍल्डो लिओपोल्डनं लिहून ठेवलं होतं की "जमिनीला आपण विक्री योग्य वस्तू (कमोडिटी) समजतो ही आपली सर्वात मोठी चूक आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळेच आपण तिचा दुरुपयोग करतो. जमिनीला आपण, आपण राहत असलेल्या समाजाचीच एक घटक आहे असं ज्यादिवशी पासून समजायला लागू त्यादिवशी पासून जमिनीचा वापर आपण प्रेमानं आणि आदरानं करायला सुरुवात करू शकू. "

पण अर्थकारण्यांना निसर्गतज्ञांच्या या सूचनांचा अर्थच कधी कळला नाही. अशा धोक्याच्या घंटांकडे त्यांनी कायमच दुर्लक्ष केलं. आता जमिनींची धूप झाली, जमिनी खारावल्या, त्यांची वाळवंटं बनली, जमिनी शेतीयोग्य राहिल्या नाहीत, लोकसंख्येचा भस्मासूर वाढतच राहिला आणि थोडक्यात जगभर उत्पादनक्षम जमिनींची प्रचंड टंचाई निर्माण झाली. जमिनीकडे आम्ही कायम कमोडिटी म्हणूनच बघितलं, आपल्या समाजाचा एक घटक म्हणून कधीच नाही.

यावर्षी इराणला अमेरिकेच्या दारात म्हणजे त्यांच्या जन्मजात वैऱ्याच्या दारात पदर पसरून उभं रहायला लागलं. जवळ जवळ तीस वर्षांनंतर पहिल्यांदा इराणनं अमेरिकेकडून दहा लाख टन गहू घेतला. यू. ए. इ. नं सुदान आणि कझाकिस्तानमध्ये जमीन विकत घेतलीये. शेतीसाठी. त्यांची अन्नधान्याची निकड भागवण्यासाठी. तशीच जमीन घेतलीये दक्षिण कोरियानं मंगोलियामध्ये, चीननं तर दक्षिण पूर्व आशियात बऱ्याच ठिकाणी अन लिबियानं युक्रेन मध्ये.

अन्नधान्याचे जगातले तीन प्रमुख निर्यातदार देश अमेरिका, न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलिया. तिघांचीही शेती मुख्यत्वेकरून रासायनिक खतं आणि जीवाश्म इंधनांवर अवलंबून. रासायनिक खतांच्या उत्पादनातला एक महत्त्वाचा घटक फॉस्फोरस. या फॉस्फोरसच्या वाढत्या तुटवड्यामुळे रासायनिक खतांचा तुटवडा पण दिवसेंदिवस वाढत जाणार. आणि इंधनांच्या तुटवड्याबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे थोडक्यात या शेतींचं भवितव्यही काही फारसं उज्ज्वल नाही.

भूगर्भ शास्त्रज्ञांनी २००५मध्येच हे सांगून टाकलं की जमिनीखालच्या तेलांचे स्त्रोत आता आटायला लागलेत. पुढच्या दशकात या स्त्रोतांमधून मिळणाऱ्या तेल उत्पादनांमध्ये प्रचंड घट होणार आहे. फेब्रुवारी २००५ मध्ये रॉबर्ट हिर्श या शास्त्रज्ञानं अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीसाठी एक अहवाल तयार केला होता. (दुवा क्र. १ या दुव्यावर याबद्दलची अधिक माहिती मिळू शकते. ) या अहवालात तेल स्त्रोतांच्या आटण्यामुळे निर्माण होणाऱ्या महायुद्ध सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी २० वर्षं जी मेहनत करावी लागेल याचा संपूर्ण प्रस्ताव दिला होता. हा २० वर्षांचा कार्यक्रम चालू करायलाही आता आपल्याला बराच उशीर झालाय! आणि याला कारण आपल्या तथाकथित तज्ञ लोकांचा "संपत्ती निर्मितीचा" आणि "वैश्विक उन्नतीचा" बडेजाव आणि निसर्ग अभ्यासकांच्या आक्रोशाकडे केलेलं दुर्लक्ष.

पारंपारिक अर्थशास्त्रीय समजूतीप्रमाणे संपत्तीच्या निर्मितीसाठी भांडवल आणि मनुष्यबळ या दोनच गोष्टींची गरज असते. जागतिक तेल उत्पादनात प्रत्येक वर्षी होणारी घट या सजूतीचं समूळ उच्चाटन करते. जगातल्या बारा सगळ्यात मोठ्या तेल उत्पादन राष्ट्रांपैकी आठ राष्ट्रांच्या तेलाच्या उत्पादनात मागच्या वर्षी घट झाली. जगातल्या प्रत्येक मोठ्या तेल विहिरीतल्या स्त्रोतांना आता ओहोटी लागलीये. पण आमचे "वैश्विक उन्नतीचा" बडेजाव मारणारे मात्र पुढच्या दशकात वाहनांची संख्या शंभर कोटीवरून दोनशे कोटी म्हणजे दुपटीनं वाढ होणार असं छाती ठोकपणे सांगतायत.

पवन उर्जा, सोलर एनर्जी, बायोफ्युएल हे सारे नवीन उर्जा स्त्रोत जगाच्या एकूण उर्जा निकडीच्या तुलनेत इतके तोकडे आणि महाग आहेत की या वैश्विक समस्येवर तोडगा म्हणून त्यांचा इथे विचारही करत न बसणं योग्य ठरेल. नवीन तेल विहिरींचा शोध आणि तेल शुद्धीकरणाच्या नवीन तंत्रांचा शोध या साऱ्याचा वेग तेलाच्या घटणाऱ्या वेगापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे. या उद्योगानं नुकतंच त्यांना आर्क्टिक प्रदेशात नवीन नऊ हजार कोटी बॅरल तेलाचा शोध लागल्याचं जाहीर केलं. पण त्याबरोबरच हे जाहीर नाही केलं की नऊ हजार कोटी बॅरल म्हणजे संपूर्ण जगाची फक्त तीन वर्षाची तेलाची सोय, अर्थात हेही यांनी जाहीर केलेला आणि तेवढा मोठा तेलाचा साठा सापडला तरच...

आपण प्रत्येक तासाला अक्षरशः लक्षावधी टन तेल जाळतो. दररोज आठ कोटी टन कार्बन डाय ऑक्साईडचा धूर आपण वातावरणात सोडतो. ही एक महाप्रचंड वैश्विक शेकोटीच आपण पेटवलीये. आणि या शेकोटीत आपल्या पेक्षा जास्त आपली मुलं बाळं होरपळून जाणार आहेत. हे कटू आहे पण सत्य आहे.

आता आणखी अधिक तेल ज्वलनासाठी पाहिजे असेल तर सगळ्यात सोपा आणि स्वस्त तेलाचा स्त्रोत एकच आहे आणि तो म्हणजे असलेल्या तेल साठ्याचं जतन. वातावरणाशी मिळता जुळता असा हा एकच उपाय आता आपल्या हातात आहे. ही चराचर सृष्टीच हीच आपल्या व्यवसायाची, संपूर्ण अर्थकारणाची जननी आहे हे जिथपर्यंत आपल्या डोक्यात शिरत नाही तिथपर्यंत, "बेल-आऊट" आणि "प्रॉमिसेस" आणि आर्थिक मदती कितीही दिल्या गेल्या तरीही आर्थिक आरिष्टं परत परत डोकी वर काढणारच. खऱ्या अर्थानं सृष्टीचं संतुलन साधण्या शिवाय आपल्या समोर दुसरा कुठचाही पर्यायच नाहीये. ही तारेवरची कसरत आहे आणि ती आपल्याला करावीच लागणार.

अर्थात या सगळ्या बरोबरच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साऱ्यानं गांगरून, घाबरून किंवा उदास होऊन जाऊ नका. याबाबतची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ही वैश्विक शेकोटी आवाक्यात आणायला स्वतः हून पुढं होऊन हातभार लावा. ही सृष्टी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुंदर करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.