लोकोत्तर

या देवी सर्व भुतेषु 'राष्ट्र'रूपेण संस्थिता,


नमस्तत्स्यै, नमस्तत्स्यै, नमस्तत्स्यै नमो नमः


निर्मळता हा मावशींचा सदगुण होता. घराप्रमाणेच मनालाही इतके स्वच्छ आणि मंगल ठेवण्याचे त्यांनी परोपरीने जपले होते. कुठलेही काम कितीही लहान अथवा कितीही महान असो ते तेवढ्याच तत्परतेने आणि शिस्तीने करण्यामागे त्यांचा कटाक्ष असे. तपस्वीता, कार्यप्रवणता आणि संवेदना यामूळे त्या जनसामान्याच्या मातृस्थानी पोहोचल्या, मावशी झाल्या.


एवढ्या कामाच्या धबाडग्यातही त्यांच्या काही-काही गोष्टी खरेच विलक्षण होत्या. त्या कुठेही असोत, तुळशीची नेमाने पुजा करायच्या. तुळशीसमोर लहानशी पण सुंदर रांगोळी काढतील, छानशी फुलांची सजावट करतील.. कार्याच्या यशस्वीतेसाठी कुठल्याही कामात पावित्र्य आलेच पाहीजे असा संस्कार जणू त्या इतरांवर करीत.


एकदा एका समितीच्या शाखेला मावशींनी भेट दिली. स्वतः मावशी येणार म्हटल्यावर सेविकांचा उत्साह आणि आनंद द्विग़ुणित झाला होता. सेविकांनी त्यांच्यासाठी स्वागतगीतही रचले. मावशींच्या गौरवपर मावशींची नाव ही यात गुंफलेले होते. मात्र मावशींना हे गीत फारसे आवडले नाही. त्यांनी म्हटले की गीत तर छान आहे, पण हे व्यक्तिकेन्द्रित होते आहे. मी पण तुमच्या प्रमाणेच एक सेविका आहे! राष्टकार्यापेक्षा कुठलाही व्यक्ती मोठा नसतो. त्यामूळे समर्पणाची भावना ही संघटनेबद्दल हवी, त्या उदात्त कार्याबद्दल हवी!


मावशींची स्मरणशक्ती कुशाग्र होती. एकदा भेटलेल्या व्यक्तिची ओळख कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणपटलावर कोरली जाई. अगदी त्यांच्या आजारपणात लोक भेटायला येत असत तर मावशी त्यांच्या कुटुंबियांबद्दल आस्थेने चौकशी करत.


मावशींना कुठेतरी एकदा रामायणावर प्रवचन द्यायला कुणीसे बोलावले. यजमानांची आई आजारी आहे आणि ती प्रवचन इथे बसुन एइकू शकत नाही हे कळल्यावर त्या दररोज आपले प्रवचन झाले की त्या माऊलीला परत सगळे प्रवचन परत ऐकवायच्या. अश्या सौहार्द्रामूळेच त्या जनमानसात कायमचे घर करून राहिल्या.


१९७१ मधल्या ग्वाल्हेरच्या शिबिराची गोष्ट. पुर्ण गणवेशात समितीच्या सेविकांचे संचलन चालले होते. एक गरीब सेविका मात्र दुरवर खिन्न अवस्थेत बसली होती. मावशींनी ते पाहीले. आर्थिक परिस्थितीमुळे गणवेश घेणे या सेविकेला शक्य नव्हते. मावशींनी तिच्यासाठी स्वखर्चाने गणवेश घेतला आणि त्या सेविकेला दिला. मावशी म्हणाल्या, तू मला मोठ्या बहिणीसारखी आहेस. तू जर हे कपडे स्विकारलेस तर मला आनंद होईल!  


१९७६ च्या आणिबाणीच्या दिवसांमध्ये असंख्य सेविकांना कारागृहात टाकण्यात आले. तन-मन-धनाने मावशींनी सेविकांना आणि त्यांच्या कुटुम्बियांना मदत पुरवली.


अश्या लोकोत्तर स्त्रीचे चरित्र शब्दांकित करणे खरेच अवघड आहे!