उठ उभी राहा

अवघ्या तरूणपणीच वैधव्याचा झालेला प्रहार संभाळत लक्ष्मीबाई घरादाराचा, मुलाबालांचा खंबीर आधार बनून उभ्या राहू पहातच होत्या, पुरुषांच्या विश्वातल्या अर्थिक व्यवहार, शेती-उद्योगाला शिकतच होत्या तेवढ्यात पुन्हा एकवार नशिबाने त्यांच्यावर आघात केला आणि त्यांची मोठी मुलगी शांता ट्युबक्युलॅसिसच्या विळख्यात आडकली. या ही वेळी लक्ष्मीबांईंनी तिला मृत्युच्या जबड्यातून ओढण्याचा पुरता प्रयत्न केला. परंतु देवाला जणू लक्ष्मीबांना जीवणाच्या भट्टीतून जरा जास्तच पक्के करून घ्यायचे होते, पुन्हा एक लचका तोडला गेला, शांता देवाघरी गेली.


या अघातांनी लक्ष्मीबाईंना अस्वस्थ केले. पण काही दिवसच. काही काळातच त्यांना कळून चुकले की आणखी खूप पुढे जायचे आहे, कंबर कसायला हवी. झालेल्या अधातांनी उलट त्यांना खंबीरच केले.  आपल्या आप्तांच्या मृत्युसोबतच्या झालेल्या झटापटीत त्यांची सुद्धा मृत्युशी जणू ओळखच झाली आणि त्यांच्या मनातून मृत्युची भितीच कायमची पळून गेली.


त्यांनी ठरवले. जगायचे. स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी तरी!


लक्ष्मीबांईंच्या धैर्याला, चिकाटीला व तल्लख बुद्धीला दूरदृष्टीपणाची अप्रतीम जोड होती याची प्रचिती देणारी घटना लवकरच घडली. त्यांची धाकटी मुलगी, वत्सलाला, शाळेत घालायला वर्ध्यात मुलींची शाळाच नव्हती. ठरले, मुलींची शाळा सुरु करायची आणि आपल्या मुलीसोबत वर्ध्यातल्या सगळ्याच मुलींच्या शिक्षणाची सोय करायची.


नेहमी प्रमाणे लक्ष्मीबाईंच्या पाठीशी उमाबाई तर होत्याच शिवाय वेणुताई कळंबकर आणि कालिंदिताई पाटणकर पण शिक्षिकेच्या रुपात येऊन सामिल झाल्या. शाळा सुरु झाली. केळकरांचे घर शिक्षिकांचे राहण्याचे ठिकाण झाले. लहान मुलींसोबत स्त्रीयांचे शिक्षण पण सुरु झाले. वाटेवर आडसर येतच होते, त्यावर मात करायची आणि पुढे चालायचे असे चालू झाले आणि आज टुमदार दिसणारी "केसरीमल कन्या शाळा" बाळसे धरू लागली.


चार भिंतीतून बाहेर पडून मुलींना फक्त पुस्तकांपर्यंत पोचवणे हेच लक्ष्मीबाईंचे ध्येय नव्हते. बाहेरच्या जगात स्त्रीला तिची सन्मानाची जागा त्यांना मिळवून द्यायची होती. त्यासाठी मुली सगळयाच क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने असाव्यात असा त्यांचा उद्देश होता. आणि म्हणूनच  त्यांनी मुलींना खेळ, दुचाकी चालवणे, पोहायला शिकणे, इ. आवश्यक कसब अंगिकारयाला प्रोत्साहन देणे सुरु केले. त्याचाच भाग म्हणून त्या स्वतः सुद्धा दुचाकी (सायकल) शिकल्या.


सेवाग्रामच्या प्रभात फेर्‍यांमध्ये सुद्धा त्या नियमीत भाग घेऊ लागल्या. तसेच "हरिजन" मधील लेखांवर दैनंदिन सायं-चर्चासत्र भरऊ लागल्या.


एके दिवशी बापूजींच्या प्रवचनात त्यांनी म्हटले, "भारत पुन्हा पूर्ववैभवा प्रती पोहचू शकेल मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीय स्त्रीला सीता बनावे लागेल. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने सीताचे पवित्रता, त्याग, आत्मविश्वास, उत्साह, आध्यात्मिक बल आणि कार्याच्या प्रती स्वतःला वाहून घेण्याची वृती हे गूण अंगीकारावेत".


"बापू, तुम्ही फक्त स्त्रींयांनाच सीता बना असा उपदेश का बरे देत आहात? पुरुषांना राम बनायचा उपदेश का नाही देत?", एका चुणचुणीत मुलीने प्रश्न विचारला होता.


त्यावर हसून गांधीजी म्हणाले, "मुली, रामाला राम बनण्याची प्रेरणा ही सीतेमुळे मिळाली. म्हणूनच जर प्रत्येक स्त्री सीता बनली तर प्रत्येक पुरूष पण राम बनल्याशिवाय राहणार नाही".


बापूंच्या या उत्तराने लक्ष्मीच्या मनात मोठे वादळ उभे केले आणि म्हणून मग तिने रामायणच पुन्हा नव्या अर्थाने वाचायला हाती घेतले. रामायण-महाभारत स्त्रीने वाचने त्या काळी समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ग्रंथ मिळणे अवघड होते पण श्रीधरजींचा "रामविजय" वाचून लक्ष्मीबाईंचा उत्साह एवढा वाढला की रामायणाच्या मिळतील त्या सर्व रचना त्यांनी वाचून काढल्या. त्यापासून त्यांचा उत्साह खूप वाढला आणि त्यांनी नव्या जोमाने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. आणि त्याचा प्रत्याय लवकरच आला.


महिलांवरील अत्याचार भयंकर वाढले होते. दररोज अपहरण, लूट, बलात्काराच्या बातम्या कानावर पडत. या बातम्यांनी लक्ष्मीबाईंच्या अंगाची लाही-लाही होत असे. या सर्वांत भर पडली ती नागपुरातल्या संत्र्याच्या बाजरातील महिलांच्या हालाखीने. तिथे या कष्टकरी महिला व्यापार्‍यां/दलालांकडून संत्रे विकत घेऊन विकत असत. पैसा नसल्याने ही खरेदी उधारीवर चाले. बहुतांशी बुडीत असणार्‍या या धंद्यात दलालांची उधारी वाढतच जात असे. शेवटी या उधारीच्या बदल्यात ते दलाल या संत्राविक्रेत्यांच्या मुलीबाळी व सुनांच्या आब्रू लुटत असत. त्यामुळे विक्रेत्यांची ही जमात मूळ समाजधारेपासून तिरस्काराच्या भावनेने दूर लोटली जात होती. त्यातही दलाल मुसलमान असल्याने त्या बिचार्‍यांचे हाल कुत्रे खात नव्हते.


डॉ. जंत्रें सारखे हिंदू महासभेचे कार्यकर्ते तळमळीने या विक्रेत्यांच्या समाजाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण म्हणावे असे यश येत नव्हते.


या प्रश्नाने लक्ष्मीबाईंना व्यथित करून सोडले होते. "काय करावे म्हणजे या स्त्रीयांना पुन्हा मानाने जगता येईल?", त्यांचा हा प्रश्न अनुत्तरितच रहात असे.


रामासारखा पराक्रमी पती, लक्ष्मणा सारखा योद्धा दीर सोबत असताना सुद्धा सीतेचे अपहरण झालेच ना? महाबली सुग्रीव सेना तरी काय एका रात्रीत तिला सोडवून नेऊ शकली? नाही. मग सीता पवित्र कशी राहिली? तिने इतिहासामध्ये स्वतःचे नाव कसे कोरले? "स्वतःच्या आत्मविश्वासावर, आध्यात्मिक बळावर, श्रद्धेवर...." त्यांना त्यांच्या मनाने उत्तर दिले.


म्हणजेच या स्त्रीयांना स्वतःचा आत्मसन्मान पुन्हा हवा असेल तर त्यांच्यारत आत्मविश्वास जागा केला पाहिजे, त्यांचे अध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे, त्यांना तसेच त्यांच्या हिंदू समाजाला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त केले पाहिजे.... पण कसे???


या शेवटच्या प्रश्नाला काही केल्या उत्तर मिळत नव्हते. त्यांना त्यांचे अतापर्यंतचे सामाजिक कार्य शुन्य वाटू लागले.


"लक्ष्मी, तू एवढा विचार कशाला गं करतेस? काय साध्य होणार आहे त्यातून? आपण बायका काय दिव्य करून दाखवणार आहोत? उलट मुलांकडे लक्ष दे. त्यांना उद्याचे चांगले नागरिक बनव. त्यातच आपले भले आहे", उमाबाईसह अनेकांचे असे सल्ले सुद्धा लक्ष्मीबाईंना विचारातून बाहेर काढू शकले नाहीत.


विचार नवी दिशा शोधू लागले. आणि आमवस्येची रात्र संपूण पहाटेचा पहिला किरण क्षितिजावर दिसला......