भारतमाते वंदन तुजला

आयुष्य जेव्हा चूल-मूल एवढयापुरतेच मर्यादीत होते तेव्हाची गोष्ट. २५ ऑक्टोबर १९३६, विजयादशमीचा दिवस, समितीच्या उदघाटनाचा दिवस. भारतीय इतिहासात या दिवसाचे नाव कायमस्वरूपी इतिहासात कोरल्या गेले. शेकडो महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला. देशभक्तिच्या गाण्यांनी आसमंत दुमदुमला. हा निनाद होता राष्ट्रसेविकांच्या ग्वाहीचा की एक नविन पर्व सुरू होतेय!

     होय, ही एक क्रांतीची सुरूवात होती. एक प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची साध्वी - लक्ष्मीबाई - या आंदोलनाची प्रणेती होती. प्रखर राष्ट्रवादाची ज्योत प्रत्येक अंतःकरणात जागवण्याचा वसा घेतलेल्या त्यागमूर्ती लक्ष्मीबाईंना सर्व देश यापूढे मावशी म्हणून ओळखू लागला. निःस्वार्थ सेवा आणि त्यागाने अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झालेल्या मावशींना थोड्याच काळात 'वंदनीय मावशी' हे नामाभिमान प्राप्त झाले.


     दोन महिन्यांचे शिक्षाशिबिर घेण्याचे ठरले. शिस्तबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा ठरली. शिक्षावर्गाचे आयोजन झाले. खुद्द आद्यस्वयंसेवक प.पू. डॉक्टरजी या नविन क्रांतिपर्वाचे मार्गदर्शक होते! बौद्धीकवर्गांबरोबरच व्यायामवर्गांचेही प्रशिक्षण यात देण्यात आले.


     तत्कालिन समाजव्यवस्थेसाठी हा प्रयोग अगदी नविन होता. महिला-सशक्तिकरणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. हम करे राष्ट्र-आराधन चा जयघोष होत होता. महिलांच्या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. विदर्भ-महाराष्ट्रात कार्याला उधान आले. समितीच्या शाखांची वाढ होत होती. ताई आपटे, ताई दिवेकर, नानी कोलते, कमलाबाई सोहोनी या प्रणालीच्या अध्वर्यू बनल्या.


     जेव्हा समाजात बायकांना घराबाहेर पडायची परवानगी नव्हती अश्या काळी त्यांना एकत्र आणून त्यांचे सतत कार्यरत अश्या संघटनेत रूपांतर वंदनीय मावशी करू शकल्या. बायकांनी खुल्या मैदानातील सरावात भाग घेतला. त्या आता दुबळ्या, अन्याय निमूटपणे सहन करणार्‍या बायका राहिल्या नव्हत्या. त्या तर सक्षम सेविका झाल्या होत्या.


कोण म्हणे आम्हा अबला?
आम्ही तर सबला झाशीच्या!!!


     सुरुवाति-सुरुवातीला मावशींना व्याख्यानासाठी व्यासपीठावर जाणे नकोसे वाटत असे. एवढ्या मोठा जमावासमोर बोलणे त्यांना कष्टप्रद वाटे. मग त्या कोणाला तरी आपले भाषण वाचून दाखवायला सांगत. पण लवकरच त्यांना जाणवले की वक्तृत्त्वकला आत्मसात केलीच पाहीजे, त्याशिवाय आपले विचार लोकांना व्यवस्थीत सांगता येणार नाहीत. अशक्य हा शब्द त्यांनी कधी शिकलाच नव्हता. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ही कला तर आत्मसात केलीच, एवढेच नव्हे तर त्या त्या काळातील एक प्रसिद्ध वक्त्या बनल्या. प्रसिद्ध कवी अनिल (आ० रा० देशपांडे) म्हणातात- "त्या मराठीतल्या एक सर्वोत्तम वक्त्या आहेत. उत्तम भाषण कसे असावे हे लोकांना शिकता यावे म्हणून त्यांच्या भाषणांच्या ध्वनिफिती काढल्या पाहिजेत." 


     कार्य वाढले. जनसंपर्क वाढला. त्या काळी वाहनाच्या सुविधा नव्हत्या. जवळपासच्या खेडो-पाडी भेटी देण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागे. जास्तीत जास्त लोकांना भेटता यावे, वेळ वाचावा म्हणून मावशी सायकल चालविण्याचे शिकल्या. राष्टकार्याचा ध्यास लागलेला, स्त्रि-सशक्तिकरणाच्या विचारांनी मन भारावलेले, जी अडचण येईल तितून वाट काढायची, पुढे जायचे. वयाच्या ३५ व्या वर्षी मावशी इंग्रजी बोलायचे शिकल्या.


     नवीन भाषा शिकणे असो दुचाकी मोटारगाडी शिकणे असो वा पोहायला शिकणे असो, त्या काळी स्त्रीचा प्रवेश नसणार्‍या या गोष्टी करण्याचा विचार करणे सुद्धा अवघड होते परंतु मावशींनी ते लिलया साध्य केले.


     बघता बघता समिती स्थापून वर्ष झाले. मावशींनी समितीचे शिक्षाशिबिर घेण्याचे योजिले. अगदी स्वयंसेवक संघाच्या धरतीवर! मुली घरातून बाहेर पडत नसत तेव्हा अनोळखी ठिकाणी राहणे तर विचारूच नका. या प्रश्नावर उपाय म्हणून मावशींनी मुलींची वेगवेगळ्या लोकांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या क्रांतिकारी कल्पनांना समाजमान्यता मिळवून दिली.  अनेक राष्ट्रसेविका शिबिरात सामिल झाल्या. हे शिबिर अतिशय यशस्वी ठरले, नव्हे ते यशस्वी होणे ही जणू जगनियंत्याचीच ईच्छा होती! भारतमातेच्या प्रार्थनेतील 'समुत्कर्षाच्या' कार्याला सुरुवात झाली होती.


अजयांच विश्वस्य देहीं सशक्तीं । 


         सुशीलं जगद्येन नम्रं भवेत ।


          शृतंचैव यत्कंठकाकीर्ण मार्गम ।


स्वयंस्वीकृतं न सुगं कार्येत॥