बालपण

६ जुलै १९०५, नागपुरातल्या महाल मधील राम मंदिर गल्लीत दाते परिवारात एका कन्येचा जम्न झाला. वैद्य बुवांच्या सल्यानुसार त्या मुलीचे नाव ठेवण्यात आले, कमल.


कमल मोठी होऊ लागली तसे तिच्यातले सर्वसाधारण बालकांपेक्षा वेगळेपण घरातल्या व शेजारपाजारच्या मोठ्या मंडळींचे लक्ष वेधून घेऊ लागले.


बालगोपाळांत ताईगिरी करणारी कमल एकदा भातुकलीच्या खेळात मग्न होती. लग्नघटिका जवळ आली होती. काय ती धांदल! तितक्यात घरातून बोलावने आले आणि तिला लग्न-मंडपातून बाहेर पडावे लागले. परत येऊन पाहते तर काय, सगळ्या वर्‍हाडाचे रुपांतर युद्धभूमीत झालेले होते. पण इवलीशी ही पोर परत आली आणि जणु काही सेनापती सैनिकांना अज्ञा देतो अशी कडाडली. सगळे जणं चिडिचूप आणि थोड्याच वेळात भातुकलीचा खेळ पुन्हा सुरु. नेतृत्वाचे गूण, बाळाचे पाय पाळण्यात!


कमल तिच्या आई आणि मावशी सोबत देवदर्शनाला जाई. त्या दोघी तिला राम-कृष्णाच्या शौर्यकथा सांगत तेव्हा कमल मनातल्या मनात खूप विचार करत बसे. तिच्यावर हळुहळु रामायण, महाभारत तसेच प्राचीन हिंदु संस्कृती बद्दल प्रचंड आदर व उत्सुकता निर्माण झाली.


कमलला शाळेची ओढ पण जबरदस्त. म्हणून मग कमलचे वडील, भास्कररावांनी मुलींना शाळेत घेणार्‍या एकमेव मिशनरी शाळेत कमलचे नाव घातले. कमल मन लावून शाळेत जाऊ लागली. मिशनरी शाळेत शिकवली जाणारी तत्वे तिच्या बाल मनात हळूहळू गोंधळ माजवू लागली. सगळे कसे भिन्न. आई-मावशी सांगतात एक, मंदिरात, प्रवचनांत, भजनांत पहायला मिळते एक आणि हे मात्र दुसरेच. काही तरी गडबड आहे. तिच्या बालमनाला वाटू लागले.


अशीच शाळेत एकदा प्रार्थना चालू होती. नन ने सर्व मुला-मुलींना डोळे बंद करून प्रार्थना म्हणायला सांगितले होते. नियमच होता प्रार्थनेचा तो. प्रार्थना संपली आणि नन रगारागाने चिमुकल्या कमलला म्हणाल्या, "काय गं, तू डोळे बंद का केले नव्हतेस?"


कमल क्षणार्धात उत्तरली, "प्रार्थनेच्या वेळी सर्वांनी डोळे बंद करायचे असतात. मग माझे डोळे उघडे होते हे तुम्ही कसे पाहिले?"


चांगलाच प्रसाद मिळाला या बेधडकपणाचा त्या चिमुरडीला.


हळूहळू तिला वाचता येऊ लागले. घरात लोकमान्यांचे केसरी येत असे. त्यातले लेख आई-मावशींसोबत कमल पण वाचत असे. "मी पण देशासाठी काहीतरी केले पाहिजे" कमलच्या मनात विचार येत.


एकदा एक इंग्रज नोकर दात्यांच्या घरी आला.


"तुम्ही केसरी विकत घेता?"


"हो." यशोदाबाई.


"तुमचे पती सरकारी नोकर असताना तुम्ही केसरी विकत घेणे हा कायद्या नुसार गुन्हा आहे. हे माहीत नाही का तुम्हाला?" इंग्रज नोकर.


"माझे पती इंग्रजांच्या नोकरीत आहेत. मी नव्हे." यशोदाबाईंचे दमदार उत्तर.


"पण पेपर तर नोकरीच्याच पैशांनी येतो ना?"


"माझे पती मला घरखर्चासाठी जे पैसे देतात त्यातले पैसे वाचवून मी केसरी आणते. आणि ते फक्त माझे पैसे आहेत." यशोदाबाईंच्या या उत्तराने त्या इंग्रज सेवकाला निरुत्तर केले होते.


भास्कररावांनी आपल्या पत्नीच्या या पवित्र्याला पाठिंबा दिलेला पाहून कमलला सुद्धा आपल्या आई-वडिलांचा फार अभिमान वाटला होता.


शेवटी मिशनरी शाळेच्या पूर्वदूषित ग्रहाला कंटाळून कमलने घरीच शिक्षण घ्यायचे ठरवले.


केसरीच्या लेखांवर चर्चा करत, नागपुरात येणार्‍या लहान मोठ्या नेत्यांची, स्वातंत्र्यसेनानींची भाषणे ऐकत कमल मोठी होऊ लागली.