स्वप्न साकारले

  स्वप्न साकारले
           


                           कै. वंदनीय मावशींचा दूरदर्शीपणा वाखाणण्याजोगा होता. रामायण आणि महाभारताच्या चर्चेतून विचारांना दिशा देणे आणि मनाला संजीवन देणे, आसने आणि योगाभ्यास करून स्त्रियांची शारीरिक क्षमता वाढवणे आणि स्त्रियांचे समाजातील स्थान पुन्हा प्रस्थापित करणे याकरता मावशींचे जीवनकार्य वाहिलेले होते. तरुण स्त्रियांना शिस्तबद्ध करून, त्यांच्यात आपापसात एकजूटीने राहण्यासाठी आचारसंहिता आखणे ,त्यांचा आत्मविश्वास जागवणे, त्यांच्या मनात आपल्या उज्ज्वल संस्कृतीचे महत्त्व निर्माण करणे व एवढेच नाही तर त्यांचे राष्ट्रप्रेम वाढवणे आणि हिंदुत्वाचा अभिमान रुजविणे ह्याकरता वंदनीय मावशी सदैव प्रयत्नशील होत्या.


                         त्यांच्या कारकीर्दीत समितीचे कार्य जम्मुकाश्मीरपासून ते दक्षिणेपर्यंत आणि ईशान्येपासून गुजरातपर्यंत विस्तारले. समितीच्या कार्याबरोबरच मावशींनी लहान मुलांच्या शिक्षणाकरता शिशुविहाराची स्थापना केली. तसेच त्यांनी भजनी मंडळ, पूजांचे वर्ग,उद्योगमंदीर आणि श्रीविद्यानिकेतनची स्थापना व आयोजन केले.


                    स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीस तोंड देण्यास तरुण स्त्रियांना समर्थ करणे हा मावशींचा उद्देश होता.एकत्र कुटुंबपद्धती झपाट्याने विलयाला जात होती आणि राष्ट्राची पुर्नबांधणी हा सर्वस्वी सरकारची जबाबदारी असल्याने राष्ट्रीय मोहिमेची आता गरज नव्हती. मावशींना जाणवले की आता स्त्रियांनी केवळ देशासाठी वाहून घेण्यापेक्षा, स्त्रीने दक्ष, कुशल, सुजाण आणि कार्यक्षम गृहिणी असणे अधिक आवश्यक आहे कारण त्यांच्यावरच समाजाचे आणि राष्ट्राचे भवितव्य आधारित आहे. म्हणूनच मावशींनी सेविकांना भारतीय मूल्यांची जपणूक करून ती पुढील पिढीला देण्याबरोबरच नव्या युगाची नवी आव्हाने पेलण्यास आवश्यक असलेले शिक्षण देण्याचे निश्चित केले.


                    वंदनीय मावशींनी समितीचे आखलेले काम करताना नेहमी अश्या विचारांना प्राधान्य दिले की ज्यामुळे समितीच्या सेविकांना बदलत्या काळाची आव्हाने तर पेलता आलीच पण त्यांच्यात आर्थिक स्वावलंबनाची भावना ही जागृत झाली.   वंदनीय मावशींच्या निर्वाणानंतर वंदनीय ताई आपट्यांनी राष्ट्रसेवा समितीचे अध्यक्षपद स्वीकारले.  


                       त्यांच्या कारकीर्दीत समितीचे कार्य केनिया,इंग्लंड,मॉरिशस,दुर्बान,अमेरिका, कॅनडा,ब्रह्मदेश आणि मलेशिया या देशांतही सुरू झाले. भारतात सर्वत्र दूरवर समितीच्या शाखा कार्यरत होत्याच. समितीच्या कार्याला वाहून घेतलेल्या २६ प्रचारिका असणारी कार्यालये विविध राज्यात स्थापन करण्यात आली. त्या सर्व ठिकाणी विनामूल्य प्रथमोपचारकेंद्रे, विनामूल्य वाचनालये उभारण्यात आली आहेत. कुटुंबकल्याणकेंद्र, भजन आणि पुजापाठाचे वर्ग, आणि इतरही कार्यक्रमांचे आयोजन त्या कार्यालयाद्वारे केले जाते. जम्मुकाश्मीर आणि आसामच्या आपदग्रस्त लोकांची सेवा आणि मदत करण्याचे निकडही समितीला जाणवली आहे.


                उषाताई चाटी यांनी ताई आपट्यांनंतर समितीचे कार्य सांभाळले आहे. त्यांनी ही जबाबदारी मोठ्या गौरवाने आणि कौशल्याने सांभाळली आहे. त्यांची समितीच्या कार्याशी असलेली निष्ठा आणि त्यांचे समितीच्या माजी कार्यकर्त्यांना दीर्घकाळ दिलेल्या सहकार्यामुळे त्यांनी समितीचे कार्य तसेच पुढे सुरू ठेवले आहे आणि अधिक वाढवले आहे.  उषाताई समितीला एका नवीन उच्च स्तरावर नेतील आणि  मावशींच्या स्वप्नाची पूर्तता करतील यात शंका नाही.