ध्येयोत्तमा

धावपळीचे ते वर्ष होते १९४०चे. वर्धाही मागे नव्हता. सुभाषबाबूंची सभा चालू होती. आसमंतात उत्साह होता, भारताची तरुणाई नवचैतन्याने प्रेरित होऊन आपल्या लाडक्या सेनापतीची अमोघ वाणी कानात प्राण गोळा करून ऐकत होती. तितक्यात कोणीतरी नेताजींच्या हातात एक छोटीशी चिठ्ठी पोचवली. नेताजींचा चेहरा उतरला. अत्यंत दुःखद स्वरात एक कटुवार्ता त्यांना आपल्या देशबांधवांना द्यावी लागली.

     "भारतमातेच्या मुकुटातील शिरोमणी आज गळून पडला आहे. आपले प्रिय डॉ. हेडगेवार स्वर्गवासी झाले आहेत..."


     माणसांचा तो समस्त सागर गहिवरला, हळहळला, शोकाकुल झाला. नेताजींची ती सभा डॉक्टरांना श्रद्धांजली वाहून आटोपती घेण्यात आली. उत्साहावर मरगळीचे थर जमा झाले, चैतन्यावर दुःखाची झालर चढली व तो समुदाय आपल्या प्रिय नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी नागपूरकडे वळला.


     या दुःखद घटनेने मावशींच्या भावूक मनावर पुन्हा एकदा जीवघेणा आघात केला. पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले,  पण क्षणभरच!


     ज्या ध्येयासाठी डॉकटरांनी आपले जीवन वेचले त्याच ध्येयासाठी  आपले जीवन समर्पण करणे हीच आपल्या या मार्गदर्शक बंधुसाठी सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली ठरणार आहे हे त्यांनी आपल्या मनाला समजावले.


     मागच्या काही महिन्यांत डॉक्टरांची प्रकृती खालावल्यापासून त्यांच्या मनाला सतत हुरहुर लागून असे. त्यांच्या आजारपणात मावशी त्यांना भेटायला नागपूरला जाऊन आल्या होत्या. हिमालयासारखा उंच असणारा हा आधारस्तंभ शरीराने खंगलेला पाहून त्यांच्या मनाला असह्य वेदना झाल्या होत्या. आता तर हे स्फूर्तीस्थान कायमचे काळाच्या पडद्याआड गेले होते. पण यातूनही सावरायचे होते... त्यांनीच दिलेल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी!


     आता समितीचे वारे महाराष्ट्राच्या बाहेर गुजराथ, सिंध, पंजाब व मध्यप्रदेशातही घुमू लागले होते. प्रशिक्षण शिबिरे वर्ध्या बाहेर नागपूर-पुण्यात होणे ही तर सामान्य बाब बनली होती. १९४३-४४ ला कराचीत झालेल्या प्रशिक्षण शिबिराने समितीच्या कामाला पश्चिमेत चांगलीच गती आली.


     ज्या ज्या कोणी महिला समितीच्या शाखा, शिबिरे वा अन्य कार्यक्रम पहात त्या त्या समितीच्या होऊन जात. अशीच समितीची बनली ती अमरावतीची लीला. समितीत आली, समितीची झाली व मावशींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अमरावतीत समितीच्या कार्याला तिने वेग दिला. अशा प्रत्येक गावातल्या लीलाला मार्गदर्शनासाठी मावशीच हव्या असत. मावशीही मोठ्या उत्साहाने जात. पण एका मावशीला एका वेळेला किती ठिकाणी जाणे शक्य होणार होते? त्यांच्यासारख्या अनेक मावशी समितीला हव्या होत्या हे त्यांनी ओळखले होते. लवकरच रानडे काकू, परांजपे काकू, दिवेकर ताई, आंबर्डेकर ताई, काणे जिजींसह अनेक सेविका समितीच्या संपर्कासाठी /प्रचारासाठी बाहेर पडल्या.


     कधी कधी मावशींमधली आई व समितीची मार्गदर्शक यांत प्रचंड तणाव निर्माण होई. पण अशा प्रसंगांमधून मावशी शिताफीने मार्ग काढत व दोहोंचा समतोल राखत, सर्वांना सांभाळत. या प्रचंड दगदगीमुळे शरीराने सुद्धा तक्रारी सुरू केल्या होत्या.


     अशक्यप्राय वाटणार्‍या अडचणींना मावशी लीलया पार पाडत व त्यातून समितीची प्रगती साध्य करत. समितीच्या कार्य उभारणीमध्ये त्यांच्या या गुणाची प्रचिती नेहमीच येत असे. १९४५ला झालेल्या मिरजच्या राष्ट्रीय शिबिराच्या आयोजनासाठी समिती समोर अनेक आव्हाने होती. त्यातील एक म्हणजे अन्नपाण्याची रसद. मावशींनी प्रत्येक घरातून कपभर तांदळाचा पुरवठा व्हावा असे अवाहन केले आणि बघता बघता समितीच्या फौजफाट्याला पुरेशी शिदोरी जमा झाली. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी सुद्धा अशीच एक नामी युक्ती मावशींनी शोधून काढली. शिबीरापासून ते दूरवर असणार्‍या विहिरीपर्यंत सेविकांनी मानवी साखळी केली व घागरींना हातोहात देत चुटकी सरशी पुरेसे पाणी शिबीरस्थळावर उपलब्ध झाले.


     आणि इतिहासाला कलाटणी देणारे ते १९४७ साल उजाडले. परमप्रिय भारतमाता बंधमुक्त तर झाली होती पण खंड खंड झाल्याने या मुक्तीवर विरजण पडले होते. स्वातंत्र्याच्या आनंदासोबतच मातृभूमीच्या विभाजनाने देशवासीयांची हृदये होरपळली होती. त्यातच दंगलींच्या ज्वाळा देशाच्या सर्व भागात धगधगू लागल्या. देशाच्या पश्चिम भागात व बंगालमध्ये क्रौर्याने सीमा गाठल्या. पाकिस्तानातून हिंदूचा सफाया करण्याचा घृणास्पद डाव दुर्दैवाने सत्यात उतरू लागला. हजारो, लाखो हिंदू आया-बहिणींना त्यांचे भाऊ-वडिल-पती यांच्या समोर आपल्या अब्रू गमवाव्या लागल्या, असंख्यांच्या कत्तली सुरू झाल्या. पंजाब, बंगालसोबतच सिंध सुद्धा एक अजस्त्र कत्तलखानाच झाला होता व त्यात मावशींनी उतरण्याचा निर्णय घेतला.


"वंदनीय मावशी,


     आमची पवित्र व प्राणप्रिय सिंधुभूमी सध्या मुस्लीमांच्या दहशतीखाली निष्पाप हिंदूंच्या रक्तांच्या सड्याने कृरतेने रंगवली जात आहे. जाळपोळ, लुटालूट, बलात्कार अशा पाशवी वातावरणात आता आमचे येथे राहणे अशक्य झाले आहे व आम्हाला आमची घरेदारे सोडावी लागणार हे उघड उघड सत्य आहे. परंतू घरेदारे सोडण्याअगोदर आठवण म्हणून आम्ही पवित्र सिंधुतीरावर आम्हाला मातृतुल्य असणार्‍या अशा तुमच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कार्यक्रम करावयाचा ठरवला आहे. हा कार्यक्रम आम्हाला भविष्यात सतत प्रेरणा देत राहील व आम्हाला आपल्या ध्येयाप्रती सतत जागरूक ठेवील. या सर्वदूर पसरलेल्या निराशेच्या वेळेत आपण आम्हाला निराश करणार नाहीत ही अपेक्षा.


तुमची कन्या,


जेठी"


     कराचीहून सेविकांच्या आलेल्या या पत्राचा आदर ठेवण्याचे मावशींनी ठरवले तेव्हा त्यांना खूप जणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मावशी त्यांच्या निर्धारावर ठाम होत्या.


     ४ ऑगस्ट १९४७, अवघी कराची ज्वालांच्या भडक्यात जळत असताना मावशींनी वेणूताईंसमवेत कोणत्याही सुरक्षेशिवाय मुंबईहून कराचीला प्रयाण केले. विमानात असणारे बाकी पुरुष सहप्रवासी फक्त आ वासून बघतच राहिले. कराचीत पोचल्यावर मावशींना जे दिसले त्याने त्यांचे कोमल हृदय हेलावले. हिंदूंचे नामोनिशाण मिटवण्याचा पण केलेल्यांनी रस्त्यांची नावे सुद्धा बदलली होती. रक्ताच्या सड्याबरोबरच हिंदू व भारतीयांप्रती असणारी घृणा सुद्धा तिथल्या लोकांच्या वागणुकीतून प्रत्ययास येत होती.


     कडेकोट बंदोबस्तात मावशी इच्छित स्थळी पोचल्या. तिथल्या कार्यक्रमात उपस्थित असणार्‍या बाराशे हिंदू महिलांना त्यांच्या विचारांनी पुन्हा आशेची किरणे दिसू लागली व मनोबळ वाढले.


     "ही तुमच्या शीलरक्षणाची सत्वपरीक्षा आहे. संयम ठेवा, एकजुटीने रहा, मातृभूमीच्या रक्षणाची प्रतिज्ञा करा. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे."


     त्यांच्या या धीराने काही महिला बोलत्या झाल्या, "इथे सर्वच हिंदूंचे सर्वस्व पणाला लागलेले आहे. अशा वेळी आम्ही महिला काय करणार?"


     त्यांच्या या सुरावर मावशींनी त्यांना आश्वासन दिले, "आपल्या संस्कृतीत दुर्गा रणचंडिका सुद्धा होऊन गेल्या आहेत हे विसरू नका. स्वंरक्षणासाठी लढण्यास तयार रहा आणि मग तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही. परिस्थिती तरी हाताबाहेर जाऊ लागली तर तुम्हाला सुरक्षिततेने भारतात आणण्यास कसलीही कसर केली जाणार नाही."


     दुर्दैवाने त्या सिंधुवासियांना आपली घरे सोडावी लागली. संघाच्या स्वयंसेवकांसोबत सेविकांनी पण कंबर कसून आपल्या बंधु-भगिनींना वाचवण्याच्या कामी शर्थ केली. आश्रयाच्या सुविधा पुरवल्या गेल्या.


     १९४७च्या दंगलींच्या जखमा अजून ताज्याच होत्या तितक्यात गांधी हत्या झाली. पुन्हा देशभरात अराजक माजले. शांतीच्या तथाकथित पुजार्‍यांनी निष्पापांच्या रक्ताने शांतीदूतास श्रद्धांजली वाहिली. भारत सरकारने आकसाने व सूडापोटी संघावर बंदी आणली. मावशींनी सुद्धा समिती स्थगित केल्याचे सरकारला कळवले. तरी सुद्धा संघ स्वयंसेवकांबरोबरच सेविकांना सुद्धा सरकारी जाचाला सामोरे जावे लागले. ब्रिटिशराज्य संपले तरी संघ, समिती व परिवारातील इतर संस्थांच्या नशिबी मात्र छळ होताच. या छळाला न जुमानता समितीचे कार्य सुद्धा भूमिगत चालूच राहिले.


     अखेर १९४९ मध्ये संघावरील बंदी उठली. संघ पुन्हा नवतेजाने उभारू लागला व समितीनेही कात टाकायला सुरुवात केली.