नवी दिशा

"आई मला थोडे पैसे हवे आहेत. दंड विकत घेण्यासाठी", मनोहर आईला विनंती करत होता.

   पद्माकर व दिनकर यांनी पण मनोहरच्या स्वरात स्वर मिसळत आम्हाला पण दंड हवा अशी मागणी केली होती.


   "अरे पण कशाला हवा तुम्हाला दंड?", लक्ष्मीबाईंनी औत्सुक्याने विचारले, "तुम्ही कोणासोबत मारामारी करायच्या विचारात आहात की काय?"


   "अगं आई, आम्ही किनई संघाच्या शाखेत जातो. तिथे आम्हाला खो-खो, कब्बडी सारख्या खेळांसोबतच शिस्तीचे धडे दिले जातात आणि दंड घेऊन संचलन करायचे पण शिकवले जाते. शिवाय दंड प्रहार, दंड युद्ध याचे धडे दिले जातात आणि स्वतःचा तसेच इतर दुर्बलांचा अत्यचारी आक्रमकांपासून बचाव कसा करायचा हे पण शिकवले जाते. जर कोणी आपल्या अंगावर आला तर हे असे त्याला परतवायचे असते," मनोहरने मोठ्या अभिमानाने एका दमात साभिनय सगळे सांगून टाकले.


   मुलांच्या या बाणेदारपणाचे लक्ष्मीबाईंना कौतुक वाटले आणि त्यांनी मुलांचा हट्ट पूर्ण केला. शिवाय ही मुले शाखेत खरेच करतात काय हे बघण्यासाठी त्या दुरून शाखा पहायला विसरल्या नाहीत. शाखेतल्या शिस्तीने, संस्कारांच्या आगळ्यावेगळ्या पाठांनी लक्ष्मीबाईंच्या मनावर प्रभाव टाकला.


   शाखेत जाऊ लागल्या पासून मुले अधिकाधिक शिस्तप्रिय बनू लागली. घर देशाभिमानाच्या, गौरवाच्या स्फूर्तीगितांनी निनादून जाऊ लागले. हिंदू, हिंदुत्व, हिंदुस्थान, भारतमाता हे शब्द सतत मुलांच्या जिभेवर खेळू लागले. मुलांची मने अत्माभिमान, स्वदेशाभिमान, धर्माभिमान, उत्साह व विश्वासाने भरून गेली.


   हेच तर हवे होते लक्ष्मीबाईंना!!


   मुलांच्या बाबतीत होऊ शकते तर मुलींच्या व एकंदरीत स्त्रियांच्या बद्दलच हे का होऊ शकनार नाही? मी समाजोत्थानासाठी जे सुलभ आणि प्रभावी माध्यम शोधत होते ते तर मला सापडले आहे अता, संघ-शाखा! 


   मार्ग दिसला तर होता पण त्यावर जायचे कसे, चालायचे कसे?


याच वेळेला बलालात्काराची एक भयाण घटना घडून गेली. पतीच्या समोर गुंडांनी एका स्त्रिला ओरबाडून तिची आबृ लुटण्याच्या या प्रकाराने लक्ष्मीबाईंचा निर्धार पक्का केला. स्त्री शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पातळीवर सबल झाली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी!


   आणि यावर उपाय एकच महिला-शाखा!!!


   प्रत्येक सामाजिक शुभकार्याची सुरुवात घरापासून करावयाची असते. म्हणून लक्ष्मीबाईंनी आपली मुलगी वत्सलाला विचारले, "तुला तुझ्या भावांप्रमाणे दंड चालवायला आवडेल का गं?"


   "आवडेल का म्हणून काय विचारतेस गं आई, नक्की आवडेल. तु शिकवून तर बघ," वत्सलाचा उत्साह तिच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.


   एके दिवशी मनोहर आईला म्हणाला, "आई, आम्ही उद्या सायंशाखेवरून परतायला जरा उशीर होईल बरं. आमच्या शिक्षकांनी आम्हाला संपर्कासाठी जायला सांगितलं आहे. आम्ही आमच्या गटातील सगळ्या स्वयंसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना भेटणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार स्वतः सगळ्या पालकांना भेटू इच्छितात. ते येणार तेव्हा सर्वा पालकांनी त्यांना भेटायला यावे असा निरोप आम्ही पोचवणार आहोत."


   "ही भेट केव्हा आणि कुठे होणार?", आईच्या या अनपेक्षित प्रश्नाने मनोहर चकित झाला होता.


   "तु येण्याच्या विचारात आहेस की काय?" मनोहर प्रश्नांकित नजरेने बोलू लागला,"तिथे सर्वांचे पालक म्हणजे वडील, काका किंवा भाऊ असे पुरुष येणार आहेत. कोणाची सुद्धा आई येणार नाही."


   "अरे बाळा, पण मीच नाही का तुझी पालक? मग मला न येता कसे बरे चालेल?", आईच्या या प्रश्नाने त्या बालस्वयंसेवकाला विचार करायला लावला.


   "ठीक आहे आई. मी आमच्या शिक्षकांना विचारून पाहतो," मनोहर उत्तरला.


   डॉ. हेडगेवार ठरल्याप्रमाणे वर्ध्याला आले. मनोहरचे शाखा शिक्षक अप्पाजी यांच्या घरी लक्ष्मीबाईंची भेट डॉक्टरांसोबत झाली. एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत बोलायचे म्हणूण लक्ष्मीबाईंची छाती धडधडत होती. पण डॉक्टरांच्या शांत, मोकळ्या व समजूतदार स्वभावामुळे त्या लगेचच मोकळे बोलत्या झाल्या. त्यांनी संघकार्यात महिलांचा समावेश असावा अशी गळ डॉक्टरांना घातली.


   "स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्याप्रमाणे गरूड दोन्ही पंखांमध्ये सारखे बळ असल्याशिवाय उडू शकत नाही त्याप्रमाणे समाजाचे दोन्ही घटक, स्त्री व पुरूष हे सबळ असल्याशिवाय, स्त्रीने तिची समाजाप्रतिची आपली जबाबदारी पेलल्याशिवाय, समाज पुढे जाऊ शकणार नाही," लक्ष्मी बाईंच्या या युक्तीवादाने डॉक्टरांना प्रभावित केले.


   या प्रकारच्या चर्चा पुढे नागपुरात तर कधि-कधि वर्ध्यात होत गेल्या. विचारांचे आदान-प्रदान होत राहिले. लक्ष्मीबाईंना डॉक्टरांच्या रुपाने फक्त मार्गदर्शकच नव्हे तर वडील बंधू मिळाला. अता त्यांना डॉक्टरांच्या कार्याची व्यापकता, दूरदृष्टी, संघटनकौशल्य व ध्येय यांची चांगली कल्पना येऊ लागली होती. तसेच डॉक्टरांना पण लक्ष्मीबाईंच्या मनातली तळमळ, त्यांची वैचारिक प्रगल्भता, ध्येयनिष्ठा, उत्साह, धडाडी समजली होती.


   एके दिवशी डॉक्टरांनीच हा प्रस्ताव मांडला,"लक्ष्मीबाई, मला तुमचे म्हणणे पूर्णपणे मान्य आहे. स्त्रियांना सुद्धा योग्य प्रशिक्षण देऊन राष्ट्रकार्यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. परंतु मला वाटते स्त्रियांची स्वतंत्र संघटना असावी. मला स्त्री या विषयात काहीही ज्ञान नाही. त्यामुळे स्त्रिसंघटना उभारून मी तिला योग्य तो न्याय देऊ शकणार नाही. तेव्हा ही जबाबदारी तुम्ही घेतलीत तर?"


   क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मीबाई ताडकन उत्तरल्या, "डॉक्टरजी, मी माझ्याच्याने शक्य तेवढे सगळे करायला तयार आहे. मला वाटते आपले मार्गदर्शन आणि ईश्वराच्या आशिर्वादाने हे स्त्रिसंघटनाचे कार्य आपण उभारू शकू."


   विचारमंथन, चर्चांची गुर्‍हाळे सुरु झाली. संघटनेचे स्वरूप, घ्येय, कार्यपद्धती कशी असावी याबद्दल खल झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समांतर पण स्वतंत्र अशा, राष्ट्र या मूळ गाभ्यात बसणार्‍या, राष्ट्रीय सेविका समिती या देशव्यापी संघटनेवर शिक्कामोर्तब झाले.


   समितीने संघाची कार्यपद्धती जशाला तशी न वापरता महिलांना सोईची होईल अशा प्रकारची स्वतःची कर्यप्रणाली विकसित करावी त्याचबरोबर संघासोबतची नाळ कायम ठेवत संघाला संमातर असे हे संघटन वाढवावे असे ठरले.


   बर्‍याच तपानंतर विचारांना मूर्त रुप येत असल्याचे पाहून लक्ष्मीबाईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कार्याला वादळाची गती मिळत होती पण घ्येयाचे अन कठीण मार्गाचे भान लक्ष्मीबाईंना होते.


   प्राचीन भारतीय म्हणजेच हिंदू संस्कृतीला पाश्चात्यांच्या संस्कृतीसमोर दुबळे, हीन व वेडगळ ठरवलेल्या या वातारणात पुन्हा एकवार हिंदू अस्मितेचा व प्रखर राष्ट्रवादाचा हुंकार स्त्रिच्या मनातून उपजवण्याचा संकल्प झाला.


   वेनूताई, कालिंदीताई व लक्ष्मीबाई घरोघर संपर्क करू लागल्या. महिलांना राष्ट्रकार्यातील आपले महत्व समजाऊन देऊ लागल्या. अनेक महिला हे नवीनच परंतू महत्वाचे कार्य करण्यामध्ये स्वतःहोऊन हिरिरीने पुढे येऊ लागल्या. दिवसागणिक सेविकांची संख्या वाढू लागली. आणि अता संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्याची वेळ आली.


   दुर्गेच्या पराक्रामाचा दिवस, विजयादशमी, हा मुहूर्त पक्का झाला. आणि भारताच्या कानाकोपर्‍यातून चारभिंतीमध्ये दबून राहिलेली राष्ट्रशक्ती समितीच्या रुपाने अवतीर्ण झाली.


   लक्ष्मीबाईंचे समितीला उद्देशून मार्गदर्शन असे होते, "सेवा हे स्त्रीचे प्रथमकर्तव्य आहे हे आपण सर्व नेहमी ऐकत आलो आहोत. अतापर्यंत आपण आपल्या कुटुंबाची, घरादाराची सेवा केली. अता आपणाला आपल्या कक्षा रुंद कराव्या लागणार आहेत. यापुढे आपण सेवा करणार आहोत आपल्या देशाची. देश म्हणजे आपला भारतीय समाज, आपल्या परंपरा व आपली संस्कृती. याचे संरक्षण आणि संवर्धन आपणाला निस्वार्थ भावनेने करावयाचे आहे. हे करणे कोणा एकट्या-दुकट्याचे काम नसल्याने आपण सर्वजण समितीच्या नावाखाली एक होऊन एकच ध्येयासाठी एकाच कार्यपद्धतीने कार्य करणार आहोत. राष्ट्रसेवेचा हा मार्ग महाकठीण असून आपल्या त्याग व निष्ठेची परिक्षा बघणारा आहे."


   सर्व महिलांना त्यांचे म्हणणे फक्त पटले होते. भारतमातेच्या प्रार्थनेतील 'समुत्कर्षाच्या' कार्याला सुरुवात झाली होती. स्वयंसेवकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी साक्षात दुर्गेने अवतार घेतला होता, आणि आसमंत निनादत होता...


प्रभो शक्तिमान हिन्दु राष्ट्रांग भुता।


इमे सादरम त्वाम नमामो वयम॥


त्वदियाय कार्याय बद्ध कटियम।


शुभम आशिषम देही तत्पुर्तये॥