नवीन विचारप्रक्रियेची जडणघडण!

नवीन विचारप्रक्रियेची जडणघडण!


स्त्रिया आणि पुरुष हे परस्परपूरक आहेत, अर्थातच समाजातल्या त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. मावशींना हे पक्के ठाऊक होते. समितीची ध्येये आणि उद्दिष्टे ही मूलतः संघाच्या ध्येयोद्दिष्टां‌समानच होती. परंतु स्त्रीची खास प्रकृती, तिचा स्वभाव, तिचा स्थायीभाव आणि सामाजिक उत्कर्षातील भूमिका ह्या सार्‍याचा विचार करता, समितीची कार्यपद्धती संघापेक्षा थोडीशी वेगळी ठेवायची असे मावशींनी ठरविले. मावशींची दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, सखोल अभ्यास आणि विश्लेषण करण्याची क्षमता ह्या अलौकिक गुणांमुळेच त्या समितीला आजचे स्वरूप देऊ शकल्या.


समितीच्या शाखा महाराष्ट्राबाहेर पसरू लागल्या होत्या. प्रार्थना सगळ्यांना म्हणता आली पाहिजे, समजली पाहिजे मग ती प्रादेशिक भाषेत असून कसे चालेल? उभ्या भारतवर्षात सर्व लोकांना आपलीशी वाटावी अशी भाषा कोणती? अर्थातच संस्कृत. म्हणून मावशींनी रोजची प्रार्थना संस्कृतातूनच म्हणावी असे आदेश दिले. खरी सेविका कशी ओळखावी? मावशींपाशी ह्या प्रश्नाचे साधे आणि स्पष्ट असे उत्तर होते - जिला हिंदू असल्याचा अभिमान आहे ती खरी सेविका! शुद्ध चारित्र्य जिला लाभले आहे ती खरी सेविका!! प्रखर राष्ट्रभक्ती जिच्या अंगी आहे ती खरी सेविका!!! आपल्यातील ह्या गुणांनी तिने इतरांना प्रेरणा द्यायला हवी. त्या दृष्टीने काम सुरू झाले. भारतवर्षातील निरनिराळ्या प्रांतांतील महान स्त्रियांची जीवनचरित्रे एकत्रित करण्यात आली. रोज सकाळच्या प्रार्थनेत ही चरित्रे गाऊ जाऊ लागली. ह्यामागचा उद्देश दुहेरी होता - एक म्हणजे सेविकांना प्रेरणा मिळावी आणि दुसरा म्हणजे राष्ट्रीय ऐक्य. आपले आयुष्य समृद्ध करणारी पंचमहाभूते आणि दहा नमस्कार यांचे काव्यात्मक संकलन करण्यात आले. प्रत्येक शाखेत ते नियमितपणे म्हटले जाते.


समितीच्या सुरुवातीच्या काळात, सेविकांना पुरुषांसारखेच शारीरिक शिक्षण दिले जात असे. परंतु लवकरच मावशींनी वैद्यकीय, शारीरिक शिक्षण आणि योगशास्त्र इत्यादी क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केली. स्त्रियांच्या प्रकृतीसाठी योग्य असा बलसंवर्धनाचा आराखडा तयार केला.  केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठी योगशास्त्राचा अंतर्भाव करण्यात आला. शांत, संयमी, चतुर अशी स्त्रीच कुटुंबाचा उत्कर्ष साधू शकते असा मावशींचा दृढविश्वास होता.


१९५३ साली 'स्त्रीजीवन विकास परिषद' हे महिलांच्या सर्वांगीण विकासाला वाहिलेले संघटन स्थापन झाले. मावशींनी कमलाबाई देशपांडे, यमुनाबाई हेर्लेकर, डॉक्टर हरदास आणि महर्षी दर्वे अश्या दिग्गजांना आमंत्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सेविकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाच्या कार्यक्रमाची पुनर्मांडणी करण्यात आली.


सेविकांचे विचार, त्यांच्या कल्पना हे सगळे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी मावशींनी सेविकांचे वार्षिक सुरू केले. सुरुवातीला ते मराठीतून होते. आता ते हिंदी आणि गुजराथीमधूनही प्रसिद्ध होते. आता त्याचे नाव 'राष्ट्र सेविका' असे आहे. १९५३ पासून सेविका प्रकाशनाने भारतीय भाषांतून वार्षिके आणि अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.


१९५३ मध्येच स्त्रियांच्या उपजत कौशल्यांच्या विकासासाठी 'गृहिणी विद्यालये' सुरू झाली. पहिले दोन महिने उन्हाळ्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.  गृहिणी विद्यालायातर्फे सध्या मुंबईमध्ये अनेक छोटे छोटे शिक्षणवर्ग आयोजित केले जातात. आपल्या दैदीप्यमान संस्कृतीला अनुसरून स्त्रीशिक्षणाची पुनर्बांधणी करण्यासाठी 'भारतीय श्रीविद्या निकेतना'ची स्थापना करण्यात आली.


अष्टभुजा आदिशक्तीच्या पूजेची परंपरा मावशींनी सुरू केली. ही काही आंधळी मूर्तिपूजा नाही अथवा अंधश्रद्धाही नाही. सद्गुणांची वाढ व्हावी म्हणून सद्गुणांचीच उपासना करणे अशी त्यामागील व्यापक भूमिका आहे. सेविकांनी हाती घेतलेले कार्य हे भगवंताचे कार्य आहे असा मावशींचा ठाम विश्वास होता. डोळ्यासमोर दिसणारे असे काही रूप असले की त्यापासून प्रेरणा घेणे सोयीचे होते. स्त्रीस शक्ती व्हावयाचे असेल तर तिच्यासमोर शक्तीचा आदर्श हवा. शक्तिमातेची मूर्ती अत्यंत काळजीपूर्वक सखोल विचारान्ती साकारली होती. देवीच्या हातात भगवा ध्वज, कमळ, गीता, घंटा, अग्निकुण्ड आहे. सातव्या हातात तलवार आणि मणी आहेत. आठवा हात आशीर्वाद देतो आहे. आई शक्ती ही सार्‍या विश्वाची आई आहे. सामाजिक जागरुकता, ज्ञान आणि वैश्विक मातृत्वाची जाणीव हे सारे तिच्या मूर्तीतून प्रतीत होते. १९७२ मध्ये वर्ध्यास समितीच्या केन्द्रात पहिल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मागाहून मुंबई, भाग्यनगर, नागपुर अश्या अनेक ठिकाणी मूर्ती स्थापण्यात आल्या. हिंदी भाषेत अष्टभुजा स्तोत्र रचण्यात आले. साप्ताहिक शाखेत ते म्हटले जाते. स्त्रीचा भक्ती आणि संगीताकडे ओढा असतो. म्हणून मावशींनी सेविकांना भजनी मंडळे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर काही सेविकांच्या अंगचे खास काव्यगुण निरखून मावशींनी त्यांना जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांची जीवनचरित्रे काव्यबद्ध करण्याची प्रेरणा दिली.


दृश्यमाध्यामाचा प्रभाव काही वेगळाच. लोकमानसाला प्रेरित करणार्‍या प्रदर्शनांची मालिका आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा, शिवाजी, भगिनी निवेदिता, विवेकानन्द, रामायण असे विविध विषय होते. काकू रानडे ह्यांनी काढलेली कापडी चित्रे हे अश्या प्रदर्शनांचे विशेष आकर्षण होते. १९६९ मध्यी काकूंचे निधन झाले.


नागपुरमधील मातबर चित्रकर्मींनी प्रदर्शनासाठी एक एक चित्र काढावे असे आवाहन मावशींनी केले. चित्राचे मूल्य करणे अशक्य आहे परंतु चित्रनिर्मितीसाठी लागणार्‍या साधनसामुग्रीच्या खर्चाचे पैसे त्यांना दिले जातील असे मावशींनी सांगितले. सर्व कलाकारांनी मनापासून ह्या सद्कार्यात भाग घेतला. त्यांनी समितीकडून पैसे घेणे नाकारले! अश्या प्रकारे कलाकारांनी सामजिक पुनरुत्थानासाठी आपल्या कौशल्याचा वापर करण्याची प्रेरणा मावशींपासून घेतली. सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आपले योगदान महत्त्वाचे आहे हे कलाकारांना समजले.


१९५८ हे राणी लक्ष्मीबाईंच्या स्मरणाचे शताब्दीवर्ष होते. त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आता समितीची स्वतःची जागा असावी असे मावशींना वाटू लागले. नाशिकच्या सेविका धावून आल्या आणि अल्पावधीतच राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा प्रवेशदारात असलेले 'राणी भवन' नाशिकात उभे राहिले.


जिजाऊंच्या जन्मगावी त्रिशताब्दी साजरी करण्यात आली. ह्याप्रसंगी महिलांना सैनिकी शिक्षण देण्यात यावे अशी कल्पना मावशींनी मांडली. स्त्री हे समाजाचा महत्त्वाचा अर्धा भाग आहे त्यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी तसेच वेळ पडली तर देशरक्षणासाठी बद्धपरिकर असले पाहिजे असे त्यांचे मत होते.


आपल्या संस्कृतीचा आदर करण्यासाठी प्रत्येक हिंदूने भगव्या ध्वजास मान दिला पाहिजे. वर्षप्रतिपदेच्या दिवशी प्रत्येक हिंदू घरात भगवा ध्वज उभारला पाहिजे असा मावशींचा आग्रह होता. आणि देवघरात एक छोटा भगवा ध्वज नेहमी असावा असेही त्यांचे म्हणणे होते.


कोटिकोटिकण्ठकलकलनिनादकराले!
कोटिकोटिभुजैर्धृतखरकरवाले!!
के बोले मा तुमि अबले?
बहुबलधारिणीम् ..
नमामि तारिणीम् ..
रिपुदलवारिणीम् ..
मातरम्!
वन्दे मातरम्!!


मावशींनी वन्दे मातरम् गीताबद्दल प्रचंड आदर मनामनात निर्माण केला. प्रत्येक सेविकेस ह्या गीताची पार्श्वभूमी माहित हवी. प्रथम मातृभूमी आणि मग इतर गोष्टी. मातृभूमीचा आदर आणि पूजा केलीच पाहिजे. ह्यातूनच समितीच्या प्रत्येक सभेते वन्दे मातरम् चे सामूहिक गायन करण्याची प्रथा सुरू झाली.


मावशी - भाग आठ समाप्त