कौटुंबिक आव्हान

श्री. चौंडे महाराजांनी गोहत्या विरोधात चळवळ सुरू केली होती. हा साधू स्वतः गवोगावी फिरून लोकांना गायी खाटकांना विकण्यापासून परावृत्त करत होता. करता-करता लोकांचा या सन्याशाला पाठिंबा चांगलाच वाढत होता.


हळूहळू समजूतदार होऊ लागलेली कमल सुद्धा आपल्या मावशी सोबत या अभियानात सहभागी झाली होती. मावशी घरोघर जाऊन गायींचे महत्व समजावून सांगत असे. या सामाजिक कार्यात येणार्‍या अडचणी, लोकांकडून होणारी मानहानी कमल जवळून पहात होती आणि पुढे-पुढे चालत होती.


अशातच प्लेगची भयानक साथ देशभरात थैमान घालू लागली. रुग्णांच्या सेवेसाठी, मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी, सरकारी संस्थाच नव्हे तर स्वयंसेवी संघटना सुद्धा कमी पडत होत्या. सगळी कडे हाहाःकार माजला होता. अशा वेळी दाते दांपत्याने रुग्ण व गरोदर महिलांच्या सेवेचा विडा उचलला. त्यांची बडदी पोर कमल सुद्धा हट्ट करून त्यांच्या सोबत सहभागी झाली. जाती-पातीच्या भिंती तोडून सेवाव्रत अंगिकारणारी, दुसर्‍यांचे आश्रु पुसणारी कोमल अन सुंदर कमल वयात येऊ लागली.


भास्कररावांनी वरसंशोधन सुरु तर केले पण गरिबीमुळे इच्छित स्थळे नकार देऊ लागले तस-तसे ते हताश होऊ लागले. कमल आपल्या आई-वडिलांची परिस्थिती जाणून होती. समजाच्या निर्घृण व्यसस्थेची घृणा तिला येऊ लागली आणि तिने त्याविरुद्ध बंड पुकारायचे ठरवले.


"जो मुलगा हुंडा घेणार नाही त्याच्याशीच मी लग्न करणार" हा संकल्प तिने आई-वडिलांना बोलून दाखवला आणि त्यांना मुलीवर रागवावे की तिच्या धाडसाचे कौतुक करावे हे कळेना.


अखेर तिच्या अटीनुसार तिला पती मिळाला. हुंडा न देता तिचे लग्न वर्ध्याच्या श्रीमंत व प्रसिद्ध केळकर कुटुंबातील लौकीकवान वकील श्री. पुरुषोत्तमराव यांच्या सोबत १९१९ साली तिच्या वयाच्या १४व्या वर्षी झाले. कमलची लक्ष्मी केळकर झाली अन सोबत दोन सावत्र मुलींची जबाबदारी पण आली. या मुलींना त्यांच्या आईची कमतरता न भासू देण्याचे ठरवून कमला-लक्ष्मी त्यांच्या संगोपणात रमू लागली. शांता व वत्सला यांना लवकरच त्यांची ही आई प्राणप्रिय वाटू लागली.


या मोठ्या घरात आल्यावर कमल-लक्ष्मीला हळूहळू या मोठ्या भिंतींनी तिच्यात व समाजात निर्माण केलेल्या अंतराची जाणीव होऊ लागली. या घरात स्त्री ही चूल व मूल यांच्या पुढे जाण्याचा प्रघात नव्हता आणि तो सुरु करण्याची मुभा पण नव्हती. स्त्री म्हणून कमल चार भिंतीत बंद झाली, बाहेर पडण्याचा योग्य मार्ग शोधत.


वर्षभराचा काळ लोटला आणि लक्ष्मीबाईच्या पोटी पुत्ररत्न जम्नाला आले, नाव ठेवले मनोहर.


ब्रिटिशांच्या जुलुमाला तसेच स्वातंत्र्याच्या आंदोलनाला ऊत येत होता. अनेक मोठ-मोठी मंडळींची केळकरांच्या वाड्यावर उठबैस होत-होती. लक्ष्मी आतल्या घरात बसून भिंतीमागून ओसरीवर चाललेल्या चर्चांतून देशातल्या असंतोषाबद्दल ऐकत असे, तिचे मन पेटून उठत असे. पण पुरुषोत्तमराव कमालीचे इंग्रजाभिमानी होते. क्लबला जाणे, बिलियर्डस खेळणे, यात त्यांचा फावला वेळ जाई.


रुक्ष पुरुषोत्तमरावांच्या धाकाने गजरे माळण्यासही मुकलेल्या लक्ष्मीच्या लक्षात आले की तिच्या चिमुकल्या मुलींना फुले आवडतात, गजरे आवडतात. आणि तिने पुरुषोत्तमरावांच्या विरोधात मुलींसाठी छोटे बंड केले आणि त्यांना फुलांचे गजरे वेण्यात घलून देऊ लागली.


"मला गजरे लावणे आवडत नाही हे सांगितले ना तुला. हे भिकारपणाचे लक्षण आहे मुळी. या पोरींना गजरे लावत आहेस."


"तुमच्या म्हणण्याखातर मी गजरे लावणे बंद केले आहे. माझ्या मुलींना फुले आवडतात. गजरे लावल्यावर त्यांना किती आनंद होतो. आणि त्यांना आनंदी ठेवणे हे एक आई म्हणून माझे कर्तव्य आहे."


पहिले बंड यशस्वी झाले होते.


अता पुरुषोत्तमराव लक्ष्मीला क्लबला घेऊन जात. तिथे बजाज, बेहरे व वर्ध्यातील इतर उच्चभ्रूंच्या स्त्रीया पण येत असत. तासंतास पत्ते खेळण्यात त्यांचा वेळ निघून जात असे. बाहेर सगळा देश जळत असताना हे असे निष्काम वेळ घालवणे लक्ष्मीला मान्य नव्हते. तिने हळूहळू त्या महिलांना वृत्तपत्रे वाचणे, देशभक्तीपर गीते गाणे, सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करणे या माध्यमातून ते वातावरण बदलायला सुरु केले. लवकरच ती त्या महिलांची आवडती प्रतिनिधी बनली. लक्ष्मी च्या लक्ष्मीबाई झाल्या.


दरम्यान गांधींजींनी साबरमतीवरून आपला आश्रम वर्ध्याला हलवला होता. लोकमान्यांनतर गांधींकडे काँग्रेसची सूत्रे आल्याने देशभरासाठी वर्धा हे प्रमुख केंद्र बनले होते. अशातच तेथे महिलांचा खूप मोठा मेळावा होणार होता. लक्ष्मीबाईंना ही बातमी कळताच आपणही या मेळाव्याला जायचे असे त्यांनी ठरवले. त्यांच्या गोड स्वभावावर मोहित असलेली त्यांची नणंद सतत त्यांच्या पाठीशी असे. दुर्दैवाने विधवा असल्याने ती नेहमीच माहेरी असे. तिला घेऊन लक्ष्मीबाईंनी त्यांच्या सासुबाईंची समजूत घातली. सगळ्या महिला येणार आहेत, देशातले मोठमोठे पुढारी मार्गदर्शन करणार आहेत, तेव्हा आम्हाला जाऊ द्या, आम्ही लवकर परत येऊ, अशा लाघवी विनवणीला सासूबाईंनी होकार टाळायचा तरी कसा.


या मेळाव्यात गांधीजींच्या भाषणाने सगळे एवढे प्रभावीत झाले होते की जणू काय स्वातंत्र्यदेवीचा संचार सगळ्यांमध्ये झाला होता. भाषणांनंतर मदतीसाठी एक पिशवी महिलांमधून फिरवली गेली. लक्ष्मीबाईंनी बेधडक आपले आलंकार त्या पिशवीत टाकून दिले, घरचा विरोध माहित असूनही.


लक्ष्मीबाईंच्या सामाजिक कार्यातील सहभागावर पुरुषोत्तमराव नाराज असत. पण लक्ष्मीबाईंनी दीर-ननंदासह एवढ्या मोठ्या कुटुंबाला मनमिळावूपणाने आपलेसे केलेले असल्याने व त्यांना रागावण्याची संधी न दिल्याने घरात मोठे प्रश्न असे उपस्थित झाले नाहीत.


मनोहरच्या पाठीवर पद्माकर, त्यानंतर दिनकर, रत्नाकर, कमलाकर आणि आनंद या आपत्यांसह लक्ष्मीवर आठ लेकरांची जबाबदारी आली होती. त्याला यशस्वीपणे हाताळत लक्ष्मीबांचे समाजकार्य हळुहळू वाढत होते. त्यांना तरी काय माहित की नियतीने त्यांच्या समोर काय वाढून ठेवले आहे.


पुरुषोत्तमरावांचा ट्युबक्युलॅसिस बळावत चालला होता. डॉक्टरांच्या उपचारांसोबतच लक्ष्मीबांईची सुश्रुषा पण अविरत चालू होती, अखंड व्रतवैकल्ये तर एकही चुकत नव्हते. पण शेवटी दैवाने घात केलाच आणि वयाच्या आवघ्या २७व्या वर्षी १९३२ साली लक्ष्मीबाईंना वैधव्य आले, काय होते आहे हे कळायच्या आत पहाड डोक्यावर कोसळला होता.