मन शुद्ध तुझं

मे १९९० मध्ये आमच्या एका ए. डी. ने, भाटिया त्यांचे नांव, सकाळी आंग्ल भाषेतील एक पत्रक माझ्या हाती सोपविले आणि ते स्वतः एम. बी. ए. च्या टिपण्या काढण्यात न बोलता घुसले. त्या पत्रकावरून धावती नजर फिरविली. तो विषय बहुधा त्या वेळेस त्यांना नको असावा. मी माझ्या जागेवर येऊन बसलो. पत्रकाचा विषय सर्वांसाठीच महत्त्वाचा वाटला. त्याचे यथाशक्ति मराठीत भाषांतर केले. मनाला शांती लाभवून देणारी ही गुरुकिल्ली सर्वांना मार्गदर्शक होईल असे वाटते. आपण क्रमशः पाहू...

माणूस गरीब असो वा श्रीमंत; शिकलेला असो वा अडाणी, आपले बाह्यांग सुंदर दिसावे, यासाठी नेहमी जागरुक असतो. पण, मनाच्या सौंदर्यवाढीसाठी तो किंवा ती  तेव्हढी जागरुक असल्याचे क्वचितच आढळते. जे चकाकते ते सोने असतेच असे नाही,  आम्ही जाणतो. तरीही आम्ही भडकपणाच्याच मागे लागतो. ऐहिक सुखाची चटक आम्हाला लागते आणि मनाची मशागत न झाल्याने सुखी जीवनाची गुरुकिल्ली आम्हाला सापडत नाही.

खऱ्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे, ती 'मनशक्ती'. शारीरिक स्वास्थ्य आणि आर्थिक सुरक्षितता दोन्ही असूनही बरेच जण अशांततेने त्रस्त आहेत. त्यातूनच व्यसनाधिनता, गुन्हेगारी व्रुत्ती, वेडेपणा, अनाचार वाढीस लागत आहे. निधर्मीपणाचा अंगिकार करताना मनावर मूलभूत संस्कार करणारी एखादी प्रभावी प्रणाली आपल्या मदतीस सतत हाताशी असावयास हवी.

मन शांत होत जाते, ते आत्मिक उन्नती जशी होत जाईल तसे. त्यासाठीची पहिली गरज आहे ती सात्त्विकतेची. सोनेरी सूर्यप्रकाश जो आल्हाद देतो ती सात्त्विकता! मातेच्या दुधातून जी त्रुप्ती लाभते ती सात्त्विकता! रखरखत्या उन्हातून प्रवास करताना रस्त्यात दिसलेल्या घनदाट व्रुक्षाची छाया व थंडगार पाण्याच्या विहीरीकाठचा विसावा, ती सात्त्विकता. अशी सात्त्विकता जोपासणारा वेष, आहार, मित्रमंडळी, आजूबाजूचे वातावरण आम्ही निवडावयास हवे. आपल्या आवडी-निवडी आणि संवयी सात्त्विकच हव्यात. त्यातूनच मनाला चिरंतन अनामिक सुख लाभते.

आपल्या जीवनाचा दर्जा सुधारला पाहिजे. मनाची श्रीमंती, ती खरी श्रीमंती! ती श्रीमंती वाढीला लागू द्यात. मुलांनाही हा वारसा लाभू द्यात. माणसाला ओळखतात ते केवळ त्याच्या कृतीवरून नव्हे, तर त्याच्या वैचारिक धारणेवरून. ऐहिक आशा-आकांक्षांच्या ऐवजी आत्मशक्तीच्या वाढीसाठी प्रयत्न करावयास हवा. आंतरिक पावित्र्याचा खजिना वाढू देत.                                                                           (क्रमशः )