मन शुद्ध तुझं....८

अप्पलपोटेपणा अंगी शिरू देऊ नका.मन विशाल हवे. नि:स्वार्थीपणे, कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्यास मदत करा. सेवा करा. निरपेक्ष मदत, नि:स्वार्थी सेवा खराखुरा आनंद देते; दुसऱ्यास आनंदी करते. त्यांच्या आनंदात आपण उजळून निघतो. जशी संधी प्राप्त होईल, छोट्या अगर मोठ्या प्रकारे दुसऱ्याची सेवा करीत राहा. कोणी कौतुकाचे चार शब्द बोलतील, कांही बक्षिस मिळेल, मान-सन्मान-मान्यता मिळेल, अशा प्रकारची कसलीही अपेक्षा मनात अजिबात बाळगू नका. वेगळी संधी मिळाली नाही तर जो कुणी दुसर सेवारत असेल, त्याच्या मदतीस पुढे व्हा. तन, मन, धन तिहींसह अथवा एकेकाद्वारे तुमचा सेवाभाव, सहभाग तत्परतेने व्यक्त करा.

सेवेसाठी सेवा, पावलोपावली सेवा आणि संधीनेच तुम्हाला दिलेली सेवेची संधी; तिचा जागरुकपणे लाभ घ्या आणि आनंद लुटा; मनाला पवित्र करून घ्या.

आयुष्य अमोल आहे. आपणास किती आयुष्य लाभले आहे, हे कुणी जाणत नाही. म्हणूनच वाट्यास आलेला प्रत्येक क्षण लाभदायी कसा होईल, याची काळजी करीत निरंतर कांही तरी चांगले कर्म आचरणात आणावयास हवे.

नियमितपणे एकाग्रचित्त करून बसण्यासाठी निश्चित असे प्रयत्न करा. त्याने मनाचा कोंडमारा कमी होतो. आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यामुळे कांही अडचण उद्भवण्याचे कारण नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की चित्त एकाग्र जेव्हा होते, तेव्हा कोणतेही काम कमी वेळात उरकण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते आणि गुणांची सर्वांगिण वाढ होते.

आयुष्यामध्ये अपथ्यकारी आचार-विचार अंगिकारल्याने अस्वस्थ झालेल्या मनास सन्मार्गावर प्रवृत्त करणे आमच्यासारख्या सर्वसामान्यास फार कठिण वाटते. म्हणूनच नित्यनियमाने प्रार्थना आणि वरचेवर तीर्थयात्रा करायची. स्वाध्याय आणि सत्संग करायचा. उपास आणि उत्सव त्यासाठीच सांगितले आहेत. दगडात देव नाही, हे खरे. पण, दृश्य प्रतिकावर चित्त केंद्रित झाल्याशिवाय अदृश्य अंतरात्म्याजवळ पोहोच्ता येत नाही. मनाला योग्य वळण लावणे शक्य होत नाही. ही उपासनेची बाह्यांगे म्हणूनच महत्वपूर्ण आहेत. त्यांच अंगिकार नि:शंक होऊन श्रद्धेने करावा. ’श्रद्धावान् लभते ज्ञानम्’ असे वचन आहे आणि ज्ञान हे प्रकाशमय आहे.

जेव्हा घोर निराशेने घेरलेले असाल, तेव्हा पवित्र वचनांचे स्मरण करीत राहा किंवा महानुभावींचे वाङ्मय वाचा. तीर्थयात्रेला जा. नाहीतर एखाद्या पवित्र क्षेत्री जाऊन महिना-पंधरवडा तेथे राहा. प्रार्थना, कथा-कीर्तन, जप, ध्यानधारणा, एकांतभ्रमण असे आचरण तेथे ठेवा. मरगळलेल्या मनाला पुन्हा चेतना देण्याचे हे उपाय आहेत. तुमचा हरवलेला आनंद आणि विश्वास परत मिळवून देण्याचा हा राजमार्ग आहे.