मन शुद्ध तुझं... (६)

प्रत्येक कठिण प्रसंगी जगाने धांवून यावे नि तुम्हाला सोडवावे, अशी अपेक्षाच करू नका. तसे होणारही नाही. परमेश्वरावर अढळ श्रद्धा असूं द्या. परमेश्वर पाठीशी असेल आणि सारी दुनिया जरी तुमच्या विरोधात उभी ठाकली, तरीही तुम्ही यशस्वी व्हाल. पण परमेश्वरी साहाय्य नसताना साऱ्या दुनियेच्या साहाय्यानेदेखील तुम्ही हराल. म्हणूनच परमेश्वराची मैत्री संपादन करा. ती परमोच्च संपत्ती आहे. कोणत्याही आपत्तीतून तो सहीसलामत तुम्हाला तारेल. क्षुद्रवृत्ती, कावेबाजपणा, नीच प्रवृत्ती, स्वार्थीपणा हे जे दुर्जनांचे गुण आहेत, त्यांचा त्याग करा. सर्वसमानता अंगी बाणवा.

तुम्ही म्हणाल, तुमचा काही दोष नसताना तुमचा अपमान केला जातो अथवा तुम्हाला त्रास दिला जातो. ते खरे असेलही. परंतु त्यामुळे प्रक्षुब्ध होऊ नका. शांतपणे परिस्थितीचा सामना करावयास हवा. सत्याचे आणि सात्विकतेचे बळ तुमच्यापाशी असेल तर तुम्हाला जो अपमानित करेल, त्रास देईल त्याच्या कितीतरी अधिक पटीने त्रास-अपमान ती दोषी व्यक्ती भोगणार आहे, हा विश्वास बाळगा. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही धारण केलेला शांतपणा म्हणजे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. त्या शस्त्राच्या सामर्थ्याने तुम्ही अगदी कठीण परिस्थितीचाही परिणामकारकरित्या सामना करू शकता. हे साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे 'मी मोठा’ किंवा 'मी लहान’ या भावनेचा त्याग करणे. साऱ्या सजीवात आणि निर्जीवात परमेश्वराचे समान अस्तित्व असल्याची ठाम भावना मनात रुजू द्यात. तुमच्या ठायी आपोआपच नम्रता आणि सात्विकता वाढीस लागेल आणि हृदयात  शुद्धता वास करू लागेल.

तुमचा अपमान करणाऱ्याबद्दल मनात अढी बाळगू नका. तुम्हाला हानी पोहोचविणाऱ्याचा तिरस्कार करू नका. उघडपणे आपला राग व्यक्त करणे त्यापेक्षा परवडले. घृणा, तिरस्कार किंवा हेवा मनात बाळवून राहाणे म्हणजे मनाचा कर्करोग झाल्यासारखे! दु:खांना खतपाणी घालीत बसू नका. त्याने तुमचेच स्वास्थ्य तुम्ही हरवून बसाल, झोप उडेल, तुमचे रक्त तुम्ही दूषित करून घ्याल, रक्तदाब वाढेल. तुमचा अपमान किंवा तुमची हानी एकदाच झाली असेल. आता तो भूतकाळ झाला आहे. तो प्रसंग संपला आहे. विसरा व क्षमा करा. आपली शांतता बिघडवू न देण्याचा हा सोपा मार्ग आहे. आपलं आयुष्य इतके छोटे आहे की, असल्या क्षुल्लक गोष्टींसाठी या अमोल आयुष्याचे क्षण वाया घालवणे परवडेल का? वाईट संवयींपासून सुटका करून घ्या. ज्यात आपले मन गुंतून राहील असा सदाचार अविरत करणे, हे सर्वात उत्तम.

कसोटीस उतरलेले ठराविकच मित्र असावेत. ओळखी-पाळखी वाढवित बसू नका. कुणाबरोबरही घसट वाढवू नका. अति तेथे माती. कुणाच्या अधिक जवळ जाणे म्हणजे अवमानित होणे, भावना दुखावल्या जाणे, मनाला क्लेष निर्माण होणे हे सारे स्वाभाविकच होत असते.

जे कामाचे तेव्हढेच बोला. निरर्थक, अनावश्यक बोलणे टाळा. तोलून-मापून बोलणे नेहमीच श्रेयस्कर असते. अगदी चांगल्या भावनेने बोललेले देखील चांगले शब्द गैरसमजुती निर्माण करताना आपण अनुभवतो. त्यातूनच अस्वस्थता प्राप्त होते. वादविवाद टाळा. तुमचेच म्हणणे खरे करायचा अट्टाहास कशासाठी? त्यातून शाश्वत फायदा होणे तर दूरच, पण तुमचा अहंकार मात्र वाढेल. दुसऱ्याला दु:खही होईल आणि मैत्रीत वितुष्टता येईल, ती वेगळीच.