मन शुद्ध तुझं... (५)

मन शुद्ध तुझं... ५

          दुसऱ्याचा तिरस्कार करीत असाल, दुसऱ्यास़ क्षती पोहोचवत असाल, नोकर-चाकरांना हिणवत असाल, त्यांना तीव्र शब्दांत बोलत असाल, मुलांना टोमणे मारीत असाल, पत्नीला आणि इतरांना घरांत-घराबाहेर अनादराने वागवीत असाल, पतीला आणि त्याच्या संवंधितांना अपमानास्पद कठोरतेने बोलत असाल, तुमचा जो दाता-मालक त्याचा विश्वासघात करत असाल; उद्योग-धंद्यात, नोकरी-चाकरीत वा इतरत्र लांडी-लबाडी करीत असाल, हे आणि अशाच प्रकारातले ’नको ते वागणे’ आचरत असाल, तर मनाच्या शांतीची तुमची इच्छा निरर्थक आहे; फोल आहे. ते अशक्य तर आहेच, पण त्यासाठी तुम्ही लायकही राहात नाही. करावे तसे भरावे. दुसऱ्याच्या मनाला क्लेष देऊन स्वत:साठी मात्र सुख इच्छिण्याचा तुम्हाला अधिकारच शिल्ल्क राहात नाही. तेव्हा नेहमी जागरुक राहा.

          ’क्रिया तेथे प्रतिक्रिया’ होतच असते. आत्ता हंसायचे म्हणजे नंतर कधीतरी रडणे वाट्याला येणारच. सुख-दु:ख ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सपाट जमिनीवर मातीचा ढीग रचायचे म्हटले तर कुठेतरी जमीन खोदावी लागणारच. पेरल्याशिवाय उगवत नसते. याचाच अर्थ त्याग केल्याशिवाय लाभ होत नसतो. म्हणूनच सुख-दु:ख, लाभ-नुकसान हे सारे समानतेने स्वीकारावयास हवे.

          प्रत्येकाची धारणा अशी होऊ लागली आहे की, या अफाट विश्वांतील प्रत्येक वस्तू ही केवळ त्याच्याच उपभोगासाठी असून त्याच्या इच्छेप्रमाणे सारे जग त्याच्याच सेवेस हजर असावे. विचाराची ही धारणा चुकीचीच नव्हे, तर प्रत्येक चराचर वस्तूंचा अपमान करणारी आहे. तुम्ही आनंद मिळ्वता तेव्हां दुसऱ्यासाठी जर दु:ख उभे करत असाल, दुसऱ्याच्या मनाला क्लेष निर्माण करीत असाल, तर तुमच्या वाट्याला येईल ते नैराश्य, अपेक्षाभंग, पराभूतता आणि विपन्नता-दारिद्र्य. म्हणून या विश्वाचे यथार्थ ज्ञान हवे. या विश्वनिर्मितीसाठी परमेश्वराने स्वत:चे तुकडे-तुकडे करून घेऊन, स्वत:च्या शरीराच्या अणू-रेणुतून स्वत:चे दृश्य स्वरूप त्यागलेले आहे. तरीही तो सर्वत्र भरून आहेच-

                                                                      हे ही पूर्ण ते ही पूर्ण ।

                                                                       पूर्णातुनी निघे पूर्ण ॥

                                                                        पूर्णासी मिळे पूर्ण ।

                                                                        उरे ते ही निखळ पूर्ण ॥

          म्हणूनच कणाकणातून परमेशाचे अस्तित्व जाणा. ज्ञानी व्हा आणि आत्मशक्तीचा विकास साधा. अनुभव हेच खरे शिक्षण; तोच सर्वश्रेष्ठ गुरू आहे. त्यातूनच मन संस्कारित होते. जगाला आपल्या सुखाचे साधन समजण्याचा मूर्खपणा करू नये, ते एव्हढ्याचसाठी.

          ऐहिक पातळीवर स्वत:ची तुलना करावयाची ती अशा व्यक्तीबरोबर करा, जे तुमच्यापेक्षा कमी भाग्यवान आहेत. पारमार्थिक पातळीवर तुमची तुलना करा ती तुमच्यापेक्षा अधिक भाग्यवंत आहेत त्यांच्याशी. या तत्वाच्या विरुद्ध केलेली तुलना म्हणजे आपणच आपल्याला विनाशाकडे ढकलीत नेणे! असमाधान आणि अहंकार पाठीस लागतील. नरकाचा निश्चित मार्ग वाट्यास येईल.

          कुणालाही तुमच्यात स्वारस्य नाही, हे नीट लक्षात असू़ द्या. तुम्ही आहांत, तोपर्यंत तुमचा उदो-उदो होईल. तुमच्या पश्चात फार तर चार अश्रू ढाळले जातील. पण, ’खडा पडून दुभंगलेले जल पुन्हा जुळून यावे’ तशी परत ही जगरहाटी चालतच राहील. तुम्ही नाही म्हणून काही अडणार नाही. मग व्यर्थ मायेचा बंध कशासाठी? असून नसल्यासारखे राहाणे शिकले पाहिजे.