मन शुद्ध तुझं... (७)

दुसऱ्याचे मत लक्षात घ्या. कांही व्यक्ती अशा असतात की त्यांचे मतांतर करणे कधॉही शक्य नसते. अशांसाठी आपले श्रम आणि वेळ वाया घालवा कशाला आणि परत शत्रुत्वही विकत घ्या कशाला? त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देत. योग्यवेळी त्यांना उपरती होईल. आपल्या वाणीवर आणि वागण्यावर नियंत्र्ण असेल, तर मनाला हानी पोहोचणार नाही आणि आपला जीवनप्रवाह स्फटिकाप्रमाणे नितळ राहील.

हेवादाव्याची भावना म्हणजे मनाला लागलेला कर्करोग, हे एकदा जाणले म्हणजे आपल्या उद्धाराचा मार्ग सापडतो. तुम्ही स्वत:चा उद्धार करावयाचे ठरविलेच तर जगातील कोणतीही दुष्प्रवृत्ती तुम्हास रोखू शकणार नाही. साऱ्या सदप्रवृत्ती तुमच्या सहाय्यासाठी धावून येतील. प्रत्येक व्यक्ती ही स्वत:च्या भवितव्याशी बांधलेली असते. जे तुम्हाला आवश्यक आहे, ते तुम्हाला मिळणारच मिळणार. त्ती परमेश्वरी व्यवस्था आहे. म्हणूनच कुणाचा हेवा करू नका आणि आपल्या दुर्दैवाला दूष्ण देत बसू नका.

मन:शांती मिळत नाही, म्हणून तुमच्या अंवती-भंवती जे कांही असेल, जसे राहाते घर, व्यक्ती, वस्तू वगैरेंना दोष देऊ नका. नसत्या शंका घेऊ नका. तुमच्या दृष्टीने या दोषास्पद परिस्थितीला अनुकूल करून घेण्यासाठीचे तुमचे प्रयत्न बहुतांशी वायाच जातात. त्यापेक्षा आपणच आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करावा. त्यातून कांहीतरी चांगले निश्चित उत्पन्न होईल. स्वत:ला शुद्ध करून घ्या. तुमची आंतरिक शुद्धता, सात्विकता वाढीस लागली की वर्षानुवर्षे जी परिस्थिती तुम्हाला अडचणीची भासत होती, ती आपोआपच अनुकूल होत जाईल; अगदी आश्चर्यकारकरित्या बदललेली दिसेल. एकदा प्रयत्न करून पाहा आणि अनुभवा.

आपल्या मनाचा समतोल बिघडण्याचे आणखी एक कारण म्हणजे अगदी बारिक-सारिक गरजेसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहाण्याची आमची प्रवृत्ती. पराधीनतेपोटी दु:ख निपजते; स्वावलंबनातून सुख लाभते. म्हणूनच शक्यतो स्वावलंबी राहावयास हवे.

परमोच्च, विश्वव्यापी शक्तीवरील श्रद्धा दृढमूल झाली पाहिजे. प्रेम आचरणात आणले पाहिजे, नि:स्वार्थीपणा रुजला पाहिजे. दुसऱ्याच्या कल्याणाची इच्छा कृतीत आणली पाहिजे, आत्मसमर्पणवृत्ती जोपासली पाहिजे. हे गुण कांही आठवडा-पंध्रवड्यात अंगी उतरणारे नाहीत, हे तर उघडच आहे. आपल्या वृत्तीत ते सहजपणे व्यक्त व्हावेत, म्हणून ठरवून प्रयत्न करावयास हवेत. आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य भाग असावयास हवा, त्याचा आविष्कार सहजसुंदर झाला पाहिजे.