मन शुद्ध तुझं... (४)

स्वतःच्या गरजा वाढवीत बसू नका; अन्यथा स्वतःला भिकाऱ्यासारखे बनवून घ्याल. गरजा कमीत कमी ठेवा आणि राजासारखे राहा. मानसिक शांतता आणि 'ऐहिक सुखाची हांव' या दोन गोष्टी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या असतात. एक देते मुक्ती तर दुसरी चिंता. निवड तुमची; अर्थात जीवनमुक्ती. गरजा आणि पूर्ती, इच्छा आणि इच्छिताची मालकी या तुमची मनः शांती बिघडवून टाकतील. ऐहिक प्राप्ती आपल्याबरोबर दुःखाचे गांठोडेही आणत असते, हे लक्षात असू द्या. दुसरे म्हणजे इच्छेपोटी उत्सुकता आणि उत्सुकतेपोटी निराशा जन्म घेते. जी सुखदुःखे भोगणे क्रमप्राप्त आहे, ते भोग भोगायचे असतातच. भूतकाळ विसरा;  सदैव वर्तमानात राहा.

'मला माझी काळजी नाही, दुसऱ्याची काळजी वाटते', 'मी आहे म्हणून इतपत तरी ठीक चालले आहे', असे कुणी म्हणताना आपण ऐकतो. हाही एक त्यांचा भ्रमच! असे जे म्हणतात, ते स्वतःलाच फसवीत असतात. प्रत्येकजण आपल्या पूर्वकर्माच्या फळाने बांधलेला आहे. त्याची फळे तो चाखत असतो. दुसऱ्याचे नशीब बदलण्याची ताकद कुणातच नसते. इथे प्रत्येक जण निमित्तमात्र आहे; कर्ता करविता अदृश्य आहे.

दुसऱ्याच्या उद्योगात तुम्ही ढवळाढवळ करता का? ती माणसे चुकत असतीलही, पण तुम्ही त्यामुळे अस्वस्थ होण्याचे काय कारण ? दुसऱ्या व्यक्तींवर अथवा घटनांवर तुम्ही टीका करता का? तसे करू नका. परमेश्वराने तुम्हाला न्यायाधिशाचे अधिकार दिलेले नाहीत, हे जाणा.

आपले काम आपण करीत राहावे. ज्यात तुम्ही लक्ष घालावे, असे या जगात काहीही नाही. स्वतःवरच लक्ष केंद्रित करा. 'आपण कुठे चुकत नाही ना', हे पाहा. सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यास परमेश्वर समर्थ आहे. खरे म्हण्जे तो तुमचीही काळजी घेतच असतो.

जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर टीका करता, तेव्हा तुम्ही परमेश्वरी इच्छेबद्दल, त्याच्या ज्ञानाबद्दल, त्याच्या न्यायाबद्दल शंका व्यक्त करीत असता. तसे करू नका.