मन शुद्ध तुझं... (३)

'मी असे करायला नको होते', 'तसे केले असते तर मी असा झालो असतो-कुठल्या कुठे पोहोचलो असतो' असली पश्चात्तापाची बोलणी विसरा. ते सारे निष्फळ विचार असतात. त्यामध्ये उगाच वेळ आणि आत्मिक शक्ती वाया घालविण्यात काय अर्थ आहे? ज्या गोष्टी जशा घडावयाच्या असतात, तशाच त्या घडतात. प्रत्येक घटनेमागे ईश्वराची काही योजना असते, हे समजून तसे वागण्यातच खरे शहाणपण आहे. चांगल्या वा वाईट प्रसंगी जे वाट्यास आले, ते सुखदुःख शांतपणे उपभोगणे व इतरांनाही शांतता लाभू देणे, हेच शहाणपणाचे असते.

जे जसे वाट्यास आले, त्याचा तसाच स्वीकार केला पाहिजे. ज्यावर काही उपायच नाही, ते सहन करणे भागच आहे. धीराने आणि आनंदाने दुःख पचविण्यास शिकले पाहिजे. मन प्रक्षुब्ध करणाऱ्या, गैरसोय करणाऱ्या, चीड-वीट आणणाऱ्या शेकडो घटना सकाळपासून रात्रीपर्यंत घडत असतात. अशावेळी धीराने, शांतपणे त्या अडचणींचा सामना केल्यास इच्छाशक्ती, मनाचे सामर्थ्य फार झपाट्याने वाढीस लागताना दिसेल आणि जे हानीकारक वाटते तेच तुमच्या फायद्याचे ठरलेले अनुभवाल.

'लोक काय म्हणतील' याची चिंता व्यर्थ आहे. अशा प्रसंगी फाजील संकोच बाळगण्याचे काही कारण नाही. अनेकदा लोकांची मते अंतिमतः चुकीची ठरतात. म्हणूनच नीतिमूल्ये, आचारधर्म, आध्यात्मिक शिकवणूक आणि संत-आचार्यांच्या मतांना अधिकाधिक आदराने अंमलात आणा. त्यांची शिकवणूक आचरणात आणा.

लौकिक कीर्ती, लौकिक वैभव अपेक्षू नका. ते हवेहवेसे वाटणे, हा मानसिक आणि शारीरिक अस्वास्थ्य मिळविण्याचा अगदी हमखास मार्ग आहे. दुसऱ्यांकडून मान-मान्यता मिळविण्याचा खटाटोप हवाच कशाला? त्यापेक्षा पुण्यवान, ज्ञानी, सज्जनांचे आशीर्वाद मिळविण्याचा अविरत प्रयत्न करा. परमेश्वराची क्रुपा व्हावी, यासाठीच सतत प्रयत्नशील राहावे. अशाश्वत, तात्कालिक सुख मिळविण्यासाठी आटापिटा करीत राहाण्यापेक्षा शाश्वत सुखासाठी चिरंतन, खऱ्या सुखासाठी तळमळ लागली पाहिजे; ते मिळावे म्हणून प्रयत्नशील असावे.                                                (क्रमशः)