मन शुद्ध तुझं...(९-अंतिम)

आपत्तींमुळे खचून जाऊन कांही जण दारूच्या किंवा अंमली पदार्थाच्या नशेत स्वत:ला डुंबवून घेतात. म्हणतात, 'दु:ख विसरण्यासाठी आम्ही हे करतो! ’ वास्तवत: हा एक भ्रम आहे. अशा उपायातून तात्पुरता फरक होतही असेल, पण यातून मनाला निश्चित अशी शांती मिळणे केवळ अशक्य आहे. रोगापेक्षा हे औषध अधिक धोकादायक आहे. झोपेच्या गोळ्या? त्याही प्रश्नाचा गुंता सोडवू शकत नाहीत. मनाला शक्ती मिळण्याऐवजी ते अधिकच नाजूक, अशक्त, संवेदनक्षम बनत जाते. आत्महत्या? तो तर शुद्ध मूर्खपणा आहे. त्यातूनच पिशाचयोनी लाभते.

दु:खावर, मनाच्या अस्वास्थ्यावर मात करणे म्हणजे आमच्या इच्छा, वासना यांचे शमन करणे. निरिच्छ झालेलाच स्वत:ला परमेश्वराजवळ जाण्यास पात्र करून घेत असतो. आंतर्बाह्य पवित्र, सात्विक व्हा. परमेश्वराला मग त्याच्या इच्छेप्रमाणे मुक्तहस्ते तुमच्याशी खेळू द्या. अंतरिक्षातून वाहाणाऱ्या अनामिक शक्तीशाली वायूवर तुमचे जीवन एखाद्या काडीप्रमाणे स्वच्छंद लहरू देत. परमेश्वराच्या त्या परमोच्च शक्तीला ओळखा. त्याच्या इच्छेला मान द्या. विनम्रता म्हणजे दुबळेपणा नाही, तर ती एक दुर्दम्य शक्ती आहे. विनम्रतेच्या या शक्तीतून आणि परमेश्वरी ज्ञानातून तुमच्या अहंकाराचा फुगा आपसुकच फुटेल. निर्माण झालेल्या पोकळीत, तुमच्या मनामध्ये एक विलक्षण शक्ती झंझावाताप्रमाणे केंद्रित होईल. हे सारे निसर्गनियमांच्या आधारेच घडणारे आहे. परमेश्वराच्या हातांनीच तुमचे व्यक्तित्व साकार होऊ द्या.

रोज सकाळी दिवस सुरू करताना फक्त दोन मिनिटांची प्रार्थना करा- ’परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे जसे योग्य वाटेल, त्या प्रकारे तुझ्या योजना पार पाडण्यासाठी माझ्या तन-मन-धनाचा उपयोग करून घे. भगवंता, माझे हे जीवन तुझ्या चरणी समर्पित असू दे. ’ तुम्ही केलेल्या कळकळीच्या प्रार्थनेमुळे दिवसभरात कोणत्याही चुकीच्या कामासाठी तुम्ही हात घालताना अथ्वा चुकीचे पाऊल उचलताना, दोनदा विचार कराल आणि चुका टाळू शकाल. मन:शांतीचा लाभ घ्याल.

आचार-विचारविषयक तत्वे म्हणूनच अत्यादराने वाचा. त्यांचे सतत स्मरण करा. ती शिकवण निरंतर लक्षात असू द्या. ती शिकवण आचरणात आणा, नित्य आचरणात ठेवा. तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी खात्रीचा दुसरा सोपा मार्ग नाही.