चांगले नाही....

नित्य सान्निध्यामुळे आता हृदय संतुष्टते
या मनाची मालकी देतो तुला अस्वस्थते

एकटे येणे तुझे सोसायचे नाही मला
ये सुखांचे हात हाती घेउनी उद्विग्नते

फारसे सांभाळले नाही तुला हेही खरे
एवढेही दूर जाणे शोभते का सभ्यते?

ठोकला आहेस तंबू तू तिच्यापाशी तुझा
व्हायचे होतेस माझेही जरासे रम्यते

सारखे जोखायचो नाही तुला याच्यापुढे
नष्ट होणे चांगले नाही कधीही शक्यते

काय झाले जीवनाचे पाहते आहेस ना?
भासशी जासूस मृत्यूची अताशा दक्षते

राबते आहेस केव्हाची, जरा आराम घे
दे मलाही मोकळे सोडून किंकर्तव्यते