आपल्यातील बरेचसे लोक दिवसांतून दोनदा तरी तरतरीत वाटावे याकरिता कॉफीचा आश्रय घेत असतात आणि मी ही त्याला अपवाद नाही.लहानपणापासूनच कॉफी म्हटले की हे काहीतरी वेगळेच पेय आहे असं मला वाटायचं (दुधापेक्षा...कारण तेव्हा फक्त दुधाचीच चव माहीत होती )...कॉफी हे नाव मात्र मला जाम आवडायचं...रंगही थोडा थोडा बोर्मीटा
सारखा असल्याने मला त्याबद्दल विशेष आकर्षण वाटायचं.
बाबांच्या किंवा आईच्या ऑफिसचे साहेब वगैरे घरी आले की आई त्यांच्यासाठी चहा न करता कॉफी करायची.
यावरून हे पेय खूप महत्त्वाच्या लोकांनाच देतात असाही माझा (गैर)समज झाला होता.
पुढे कॉलेजला असताना ब्रेक असो वा नसो.. कॅन्टिन मध्ये जाऊन गरम गरम नेसकॉफी पिण्यात एक थ्रिल वाटायचं.
जवळ जवळ चार वर्षांपूर्वी(चू.भू.द्या.घ्या) कॅफे कॉफी डे आणि बरिस्ता या मंडळींनी कॉफीला ग्लॅमर प्राप्त करून दिलं. अ लॉट कॅन हॅपन ओव्हर द कॉफी... असे आश्वासन देत समस्त प्रेमी मंडळींना प्रेम व्यक्त करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी एक ठिकाण प्राप्त करून दिलं.
आजवर इन्स्टंट कॉफी पिणाऱ्या मला... कॉफीचे बीन्स अस्तात आणि त्यांना भाजलं आणि त्यांचा कूट केला की कॉफी तयार होते हे सगळं बरिस्तात गेल्यावर कळलं... आणि कॉफी बीन्स बद्दल उत्सुकता निर्माण झाली..
नुकतीच कुर्ग या ठिकाणाला भेट दिली आणि कॉफीबद्दल मनसोक्त माहिती गोळा केली.
गेल्या गेल्या आजूबाजूच्या हिरव्या झाडांकडे बघताना जाणवलेही नाही की ही कॉफीची झाडे आहेत....
जवळ जवळ ३.५ ते ४ फूट उंचीची ही झाडे शंभर वर्षांची आहेत हे ऐकून तर मला धक्काच बसला.
कॉफीच्या झाडांच्या जवळच काळ्या मिरीच्या वेलाने एका झाडाला गच्च मिठी मारली होती. मधून मधून कॉफीच्या झाडाची एखादी फांदी...लहान मुलीप्रमाणे आपल्या झोळीत असलेली कॉफीची फळे दाखवीत होती.माझ्या या आवडत्या पेयाचा कप हाती येण्याआधी या फळांना कितीतरी प्रक्रियांमधून जावे लागत असावे असा विचार मनाला शिवून गेला...
कुर्ग समुद्रसपाटीपासून जवळपास १००० मी उंचीवर आहे..एवढ्या उंचावर ही झाडे लावली कुणी हे कोडे मला काही केल्या सुटत नव्हते.
योगायोगाने या भागात कॉफीचे मळे असलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांशी ओळख झाली आणि आता बरीचशी माहिती मिळणार असे वाटून मी मनातल्या मनात खूप खूश झाले.
कॉफीचा शोध इथिओपिआत लागला. पण तिचा पेय म्हणून उपयोग अरब लोकांनी केला. त्या काळी मुस्लिम लोकांनी या पेयाला पहिली पसंती दिली कारण हे पेय त्यांच्या आराधनेआड येणारी झोप पळवण्यात पटाईत होते..
मग जिथे जिथे मुस्लिम लोकं गेली तिथे तिथे कॉफीही जाऊ लागली. बाबा बुदान या माणसाने कॉफीचे बीन्स भारतात आणले आणि कॉफीचा भारतातला प्रवास सुरू झाला.(ही माहिती : नॅशनल जियोग्राफीवर उपलब्ध आहे..)
१००० मी उंचीवरच जगणारे हे झाड अतिशय शिष्ट असते कारण त्याला नुसते उंचावर असून चालत नाही तर उत्तरेकडील, पूर्वेकडील, किंवा उत्तर-पूर्वेकडीलच उतार हवा असतो...(माझ्या मते ही झाडे स्वच्छताप्रिय असावीत कारण उतारांमुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत मिळते आणि मुळापाशी पाणी जमून राहत नाही ).आणि ग्रेशिया या झाडाची सावलीही हवी असते. सावलीत वाढल्याने कॉफीची ऍसिडिटी कमी होते असे म्हणतात.
अरेबियात प्रथम कॉफीचा उपयोग झाल्याने एका प्रकाराचे नाव अरेबिका असे आहे...जी सगळ्यात उच्चतम प्रत आहे ( आणि जी भारतीयांना बघायलाही मिळत नाही.) अरेबिकाचे बीन्स हिरवट आणि थोडेसे चपटे अस्तात. दुसऱ्या प्रकाराचे नाव रोबस्टा..हिचे बीन्स वाटोळे आणि लालसर असतात.(याव्यतिरिक्त अरेबिका आणि रोबस्टा यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते मला आठवत नाहीत ) चवीचे म्हणाल तर आपण जी कॉफी अगदी स्टाइल मध्ये पितो ती पाचव्या श्रेणीची भंगार कॉफी आहे असे त्या अधिकाऱ्यांनी सांगताच मला अतिशय वाईट वाटले..
त्यांच्या मदतीने कॉफीची फॅक्टरी बघायला मिळाली..आत जाताच खूप सार्या कॉफीच्या तयार पोत्यांकडे लक्ष गेले..त्यांवर मेड इन इंडिया असे लिहिलेले पाहून आपल्या देशाचा अभिमान वाटला. एका भल्या मोठ्ठ्या हॉल मध्ये ५०० च्या वर मुली कॉफी बीन्स वेगळ्या करताना दिसत होत्या. ह्या मुली एक एक बीन (प्रत्येक व्हरायटीचे) वेगळे करतात. हे बीन्स मग मोठाल्या मशीन मधून पहिले साफ करून घेतात, सुकवून घेतात, नंतर पुन्हा त्यातील चांगले, वाईट बीन्स वेगळे केले जातात आणि शेवटी मशीन द्वारेच पोत्यात भरल्या जातात. ही पोती मुख्यत्वेकरून फ्रान्स, जर्मनी या युरोपातील देशात पाठवली जातात. ही झाली पहिल्या प्रतीच्या कॉफीची कहाणी...आपण जी कॉफी पितो ती म्हणजे असॉर्टेड कॉफी...म्हणजे त्याला अशा कोण्या एका तरी व्हरायटीची चव नसते. आणि मुळात तमिळ नाडू मध्ये लोकप्रिय असलेल्या फिल्टर कॉफीला चिकोरीची (एका झाडाच्या मुळापासून तयार होणारा पदार्थ) चव असते. मला प्रथम चिकोरी हा पदार्थ कॉफीच्या चवीच्या आणि माझ्या आड येणारा असा वाटत होता. कारण हा पदार्थ फारच उग्र असतो. पण एका कॉफी भाजण्याच्या दुकानात कळले की कॉफीतले कॅफिन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो...
इथे चेन्नैत कुम्भकोणम डिग्री कॉफी, कॅफे कॉफी डे ची कॉफी प्रसिद्ध आहे..घराघरात मात्र फिल्टर कॉफीचा जास्त प्रमाणात वापर होतो..
एवढे सगळे जाणून घेऊन मी कॉफी नावाच्या माझ्या मैत्रिणी च्या अजूनच जवळ गेले असे वाटले.
आपल्या आवडत्या व्यक्तीशी संवाद साधताना, डायरी लिहिताना, कुण्या एखाद्या एकट्या क्षणी नेहमीच मला कॉफीची सोबत जिवा भावाची वाटते.