जीनिअस

.....तुझी पहिली ओळख झाली ती ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर. रविवारी संध्याकाळी सहा वाजता सिनेमे लागायचे, तो काळ. साप्ताहिकीतून घोषणा व्हायची- या रविवारी सादर करीत आहोत हिंदी चित्रपट ... 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?
  पोरं टीव्हीपुढून हलायची. सगळ्यांना फायटिंगचे सिनेमे हवे असत. 'अल्बर्ट पिंटो' म्हटल्यावर रविवारी संध्याकाळी खेळण्याशिवाय पर्यायच नसायचा. एकदाच केव्हातरी चुकून रविवारी बसलो टीव्हीसमोर. सई परांजपेचा 'कथा' लागला होता, तो पाहिला आणि तू काय चीज आहेस ते कळलं.
 तू मंथन, चक्र याच नावांशी खेळणार आणि श्याम, गोविंद, पंकज, ओम, शबाना यांच्याच छावणीत वावरणार असा माझा समज होता आणि काही प्रमाणात खराही होता. कालच्या अर्जुन रामपालपर्यंत अनेकांनी डोळ्यांवर काळे चष्मे लावले आणि हातात काठ्या घेतल्या पण तुझा 'स्पर्श' मी तरी नक्कीच नाही विसरणार. चहा ओतण्यासाठी शबाना मदत करू जाताच उसळलेला अंध शिक्षक. किटली आणि कपाकडे न पाहताच तू चहा ओततोस. नजर खाली पण शून्यात. बुबुळांची विशिष्ट फिरवाफिरव. थक्क होणं म्हणजे काय, याचा प्रत्यय हे दृष्य कितीतरी वेळा पाहिलं तरी प्रत्येकवेळी कसा तू देतोस? हा अनिरुध्द परमार सर्व अंधांचं प्रतिनिधित्व करतो. परमार रंगवण्यासाठी तू महिनाभर डोळ्यांवर पट्टी बांधून सराव करत होतास. तुझेच शब्द - "अंध बाहेरून कसा दिसतो आणि आतून त्याला कसं वाटत असतं, हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता."
    आपला पहिला मुलगा आपल्याला भेटतोय आणि त्याचवेळी ते आताच्या बायकोपासून लपवूनही ठेवायचं आहे, ही कात्री तुझ्या चेहऱ्यावर विशेष प्रयत्न न करता, सुस्कारे न सोडता, हातवारे न करता व्यवस्थित दिसते. शेखर कपूरला जेवढं श्रेय तेवढंच तुलाही. तुझा तो मफलर तर मध्यमवर्गीय सुरक्षित आणि अवघडलेल्या जाणिवांचं प्रतीक.
    तुझी विनोदाची जाण दिसली ती 'जाने भी दो यारो' मध्ये. टिपिकल वृत्तपत्रीय कार्यालयीन प्रणय. खुशालचेंडू पण संवेदनाजागृत असलेला छायाचित्रकार आपल्या स्त्री अधिकाऱ्याशी लगट करतो. या संवादात बदलत जाणारा तुझा सूर ऐकण्यासारखा आणि फटकारले गेल्यावर मनातल्या मनात ताठ उभे राहण्याची धडपड पाहण्यासारखी.
    छावणी बदलून तू तंबूत आलास आणि इथेही राजासाऱखा पहुडलास. 'कर्मा'च्या पोस्टरवर दिसलास तेव्हा अनेकांनी डोळे चोळले होते. सुभाष घई,  श्रीदेवी, अनिल यांच्या तांड्यात तू ?पण जाता जाता डँगचा अड्डा उध्वस्त करताना तू हिरो शोभलास खरा. तशीही तुला नायिका नव्हती आणि तथाकथित व्यावसायिक प्रवेश करायला हे कर्म चांगलंच उपयोगी पडलं. 'गुलामी' मध्ये मिथुनच्या 'कोई शक' ला तुझी 'शक नही..यकीन' ही टक्कर मस्त होती. 'मोहरा' मधला अंध संपादक अंध शिक्षकापेक्षा नक्कीच वेगळा. सर्वार्थाने. आता तुला केवळ डोळ्यांचा खेळ करायचा नव्हता कारण डोळ्यांवर गागल होता. फक्त चेहरा मदतीला होता. एकच शस्त्र म्हणजे आणखी आव्हान. हेही आव्हान तू सहज पेललंस. तिकडे अक्षयकुमार रवीनाला अंगठी घालतोय आणि इकडे तुझा जळफळाट होतोय, हे फक्त एकदाच दिसतं. कॅमेरा फक्त एकदाच तुझ्यावर येतो. राजीव रायला तू कोण आहेस, हे कळलं आहे, हा आमचं मुकद्दर चमकल्याचा पुरावा आहे. राजीवला ते कळलं म्हणून 'गुप्त'साठी तो तुझीच मागणी करतो. केवळ तारखा उपलब्ध नाहीत, म्हणून तू मिळत नाहीस.
    मिर्झा गालिब कोणी पाहिलेला नाही तरी त्यांचं दुःख नाही, ते तुझ्यामुळे. गालिब बहुतेक असाच असणार, असं वाटायला लावलंस तू. पांढरी शुभ्र दाढी, पोक्त मिश्किलपणा आणि मागे जगजीतचा आवाज...गालिब तूच!
    'मंथन' पासून 'वेडनेसडे' पर्यंत इतका जबरदस्त पल्ला केवळ तूच गाठू शकतोस. एकेकाच्या उल्लेखात तासन् तास जातात. अलीकडे तू अल्बर्ट आईनस्टाईनप्रमाणे दिसू लागला आहेस. आश्चर्य नाही, तूही जिनिअसच आहेस.
    बुध्दी शिणलेली असते, काहीतरी सुंदर समाधान हवं असतं...मॅक्स, झी सिनेमा, स्टार गोल्ड काहीही उघडून बसावं आणि तू दिसावास. वारे न्यारे होऊन जातात. मग, दुसऱ्या कोणाचीही गरज नसते. जंपिंग जॅक, ही मॅन किंवा अगदी कोणी 'सुपरस्टार'ही ! 
   एकच स्वप्न आहे. करशील पूर्ण...?
   अभिनयगुलाबा, उत्तरेतले ओम- अनुपम- दिलीप असे अनेक मोगरे तुझ्याबरोबर दिसले पण दक्षिणेतलं एक 'कमल' तेवढं फुलायचं राहिलंय...फुलाल एकत्र ? आता कुठे तू साठीत आला आहेस अजून कमीत कमी तुझ्याकडे पंधरा वर्षं नक्कीच आहेत !