नमस्कार,
हल्ली वर्तमानपत्रातून सतत येत असणाऱ्या बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण यासारख्या बातम्या वाचून मनात खूप कालवाकालव होते. अगदी चारपाच वर्षांचं वय असणाऱ्या कोवळ्या मुलींवर होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाणही हल्ली खूपच वाढलंय. खरंतर अशा निरागस वयातल्या या मुलींना पाहून त्यांच्याशी खूप खूप खेळावं, त्यांना कडेवर उचलून घेऊन त्यांचा पापा घ्यावा असं वाटायला हवं. पण त्याउलट स्वत:च्या शरीराची निर्लज्ज भूक भागवण्यासाठी या कोवळ्या मुलींच्या शरीराचे लचके तोडण्याचे पाशवी विचार एखाद्याच्या डोक्यात कसे येऊ शकतात हेच कळत नाही. कुठल्या मातीची बनलेली असतात ही माणसं? यांना माणसं तरी का म्हणावं? अशांना फाशीची शिक्षा दिली तरी ती कमीच आहे.
ज्या मुलींना या प्रसंगाला सामोरं जावं लागत असेल त्यांच्या मनावर किती खोलवर आघात होत असेल याची नुसती वर्तमानपत्रातली बातमी वाचून कल्पना येणं खूपच अवघड आहे. आणि मग त्या प्रसंगामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना भोगाव्या लागणाऱ्या दुष्परिणामांबद्दल विचार करणं तर खूपच दूरची गोष्ट आहे. कित्येकांची आयुष्य अशा प्रसंगांनंतर उद्ध्वस्त झालेली आहेत आणि होताहेत.
कोणत्याही वयात होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाण खरोखरच काळजी करण्याइतपत वाढलंय. कालच्या सकाळमध्ये तर ६५ वर्षाच्या एका महिलेवर बलात्कार झाल्याची बातमी वाचली..... बलात्कार, खून, अपहरण.... हल्ली वर्तमानपत्र हातात घ्यायचीच भीती वाटते.
पुण्यात काही दिवसांपुर्वीच नयना पुजारीच्या बाबतीत जे घडलं त्याने हेही लक्षात यायला हवं की या प्रकारांत बळी पडणाऱ्या मुली, स्त्रिया अगदी तुमच्या आमच्या आजुबाजूला राहणाऱ्या असू शकतात, नात्यातल्या असू शकतात.... किंवा कदाचित घरातल्याही असू शकतात...
खालील मुद्दे विचारात घेऊन इथे चर्चा व्हावी असं मला वाटतं:
- असे प्रकार पूर्णपणे थांबवणं तर आपल्या हातात नाही. पण तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे?
- तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं?
- गेल्या काही आठवड्यांत वाचनात आलेल्या बातम्यांमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अगदी १२-१४ वर्षे वयाच्या मुलांचाही सहभाग असल्याचं दिसून आलं. एवढ्या लहान वयात या मुलांच्या मनात अशा भावना कशामुळे निर्माण झाल्या असतील? याबाबतीत आपण काही करू शकतो का?
- अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना नेमक्या कशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद असायला हवी म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल?
- प्रसारमाध्यमांची याबाबतीत काय भुमिका असावी?
याव्यतिरीक्त अजूनही काही मुद्दे चर्चेयोग्य वाटत असतील तर तेही इथे मांडावेत ही नम्र विनंती.
-योगेश