लंडन आणि बॉलीवूड

माझा लंडनमध्ये अगदी पहिलाच आठवडा! वसंत ऋतू इथे एक एप्रिलला सुरू होतो. पण अजूनही काळवंडलेले आकाश आणि बोचरी थंडी यामुळे लंडन काही फार आकर्षक वाटत नव्हते. लंडनला येण्याआधी जी उत्सुकता आणि उत्साह होता तो फार काही जाणवत नव्हता. सहा वर्षाच्या मनुला सोडून आले होते. शिवाय माझी जिथे राहायची व्यवस्था होती ते  बेड अँड ब्रेकफास्ट ठिकाण फारच अनाकर्षक होते -- त्यामुळे कदाचित घरची आठवण फार येत होती -- सलग चौथ्या दिवशी थंड सँडविच खावे लागल्यामुळेही त्या दिवशी संध्याकाळी फारच मलूल वाटत होते. बँक स्टेशनात जाऊन ग्रीनिचची ट्रेन घेऊन परत चालले होते. लंडनच्या अंडरग्राउंड ट्यूबवर जाण्याचाही तसा पहिलाच अनुभव. खोलवर जमिनीत असणाऱ्या फलाटावर उभे राहून बोळकांड्यातून येणारी लांबलचक ट्रेन बघत होते -- ती ट्रेन वेगाने कर्कश आवाज करत निघून गेली आणि समोरच्या भिंतीवर चक्क शाहरुख आणि प्रीती झिंटा दिसले. दोघांचीही मी मुळीच फॅन नाही आणि शाहरुखचा सिनेमा म्हणजे शिक्षा असे माझे मत -- पण तरीही त्या पोस्टर कडे बघून मला फार बरे वाटले होते... त्या नवीन शहरात अगदी कोणी सोबत आहे असे वाटून दिलासावजा आनंद झाला होता.

   हिंदी सिनेमा इथे फार पॉप्युलर आहे ते ऐकले होते -- पण ते फार फार तर इथल्या पंजाबी किंवा गुजराती समाजात असतील अशी धारणा होती -- ( थँक्स टू करण जोहर अँड हिज एनाराय बेस्ड मूव्हीज). पण इथली बॉलीवूडची खरी क्रेझ अजून मला कळायची होती!ट्रेनिंग संपून मी कामाला सुरुवात केली त्या दिवशी ऑफिस टीम बरोबर ओळखीचा कार्यक्रम -- मध्यमवयीन गोरी ब्रिटिश डोना, आमची ऍडमिन ऑफिसर म्हणे
"आय नो यू आर फ्रॉम बॉलीवूड सिटी, आय हॅव्ह बीन वेटिंग फॉर यू. माय डॉटर इज अ बिग फॅन ऑफ बॉलीवूड मूव्हीज अँड वुई वुड लाइक टु नो द मीनिंग ऑफ ऑल द साँग्ज ऑन विच शी लव्हज टु डान्स." 
एक -दोन क्षण मला काही संदर्भ लागला नाही. नशीब तेवढ्यात मॅनेजरने दुसऱ्या कोणाशी ओळख करून दिली. लेकीन ये बॉलीवूड ऐसा पीछा छोड्नेवाला नही था! दोनच दिवसांनी सकाळी मी माझे टेबल लावत होते तर एक उंच, काळा, डोक्यावरचे निम्मे केस गेलेले आणि सोनेरी कडांचा चष्मा लावलेला तिशीतला माणूस समोर उभा. 
"मी दहीर, याच टीम मध्ये आहे. तुझे स्वागत ... 
"माझ्या लहानपणी खूप हिंदी सिनेमा पाहिले, मिथुन माझा आवडता हिरो. त्याची फायटिंग खूप आवडते अजून मला. तो जोश हॉलिवुड ऍक्शन मूवीमध्ये नाही वाटत... "
आता मात्र माझे उसने हसू जाऊन डोळे विस्फारायला लागले होते. नंतर कळले की त्याला आणि त्याच्या पिढीतल्या कोणाही सोमालीया, युगांडा, केनियातल्या इस्ट आफ्रिकन लोकांना  हिंदी कळत नाही, पण त्यांच्या लहानपणी तिथे आपल्यासारखे तंबू लावून हिंदी सिनेमा पाहिले जायचे. अर्थात ही इष्टोरी मला खूप नंतर दुसऱ्या सोमाली सहकारी मोहम्मदकडून कळली. हा थोडा आधीच्या पिढीतला. याला शम्मी कपूर आणि देव आनंद च्या सगळ्या गाण्यांच्या ट्यून आणि पहिल्या ओळीतले तुटक शब्द येतात. काम  करता करता अजूनही मध्येच साक्षात्कार झाल्यासारखा तो येतो आणि 'हे... व्हॉट आफ्टर दिल देके देखो' असं काहीतरी विचारतो!  किंवा बिझी ड्यूटी डेस्कवर असताना मध्येच अगदी ठेका धरून 'ऐ गुलबदन' ची चाल किती छान आहे ना असे विचारतो. कपाळाला हात!
   आता सवय झाली आहे म्हणून एक तर संदर्भ माहीत आहे आणि त्याला काय म्हणायचे हे कळते तरी. त्याला नेमके ते गाणे शोधून यूट्यूबची लिंक पाठवणे हा नेहमीचा होमवर्क झाला आहे! पण तरीही 'गुलबदन' ची पुढची ओळ, संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचे असेल तर मी त्याला ऍडव्हान्स क्लासला, म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये काम करणाऱ्या हिंदीभाषिक वृन्दाकडे पाठवते!गेल्या पाच वर्षात आमच्या क्लासमध्ये मिथुन पासून अमिताभ, शाहरुख, शिल्पा आणि गेल्या वर्षी " जय हो " असे असंख्य लेसन्स आले. दुसऱ्या देशामध्ये असताना आपण आपल्या देशाचे जाणता -अजाणता प्रतिनिधित्व करत असतो,, पण कधी बॉलीवूडचे स्पेशालिस्ट रिप्रेझेंटेशन प्रोफेशनल लाईफमध्ये करू असा विचारही नव्हता केला.
  लेकीन यह पिक्चर यही खतम नही होती है! ऑफिसमध्ये ही चर्चा अनौपचारिकपणे करता तरी येते. पण ज्या लोकांबरोबर मी काम करते, त्यांच्या घरी केस असेसमेंटसाठी गेलेले असताना, बऱ्याच बांगलादेशी कुटुंबात अगदी 'बकरा ' सापडल्यासारखे हिंदी सिनेमाच्या डायलोगांच्या  धर्तीवर हिंदीत संभाषणाचा अट्टहास होतो, तेव्हा मात्र "हिंदी सिनेमे कसे घातक असतात आणि ते ताबडतोब बंद केले पाहिजेत आणि विशेषता सगळ्या खान कंपनीमुळे सांस्कृतिक ऱ्हास होतो आहे" अशी ओरड करणारा ग्रुप मला जॉईन करावासा वाटतो!एकतर सोशल सर्विसवाले आले की इथे लोकांची धाबी दणाणलेली असतात. बंगाली कुटुंब असले की त्यांना मला बघून थोडे हायसे वाटते. 'तुमी बांगाली?' असे दारातच विचारतात. ( त्यांची सीलेटी बंगाली आणि मराठीत खूप साम्य आहे ). नाही. इंडिअन? इंडिअन?  असे करून आपल्या संस्कृतीत किती साधर्म्य आहे असा पाढा सुरू होतो. विशेषता जेव्हा आई -वडील मुलांना शारीरिक शिक्षा करतात किंवा नवरा बायको मध्ये विसंवाद असतो तेव्हा टिपीकल आर्ग्युमेंट अशी की आम्ही सुसंस्कृत आहोत. इथल्या स्वैर गोऱ्या किंवा रानटी काळ्यांसारखे  नाही! (डोमेस्टिक व्हायोलन्स अँड फिजिकल चॅस्टाइसमेंट बोथ आर थरली इन्व्हेस्टिगेटेड इफ देअर आर चिल्ड्रन ऍट होम). हो बाबांनो -- मुलांना आणि बायकोला घरी बडवण्यात आपली महान संस्कृती खरंच एक आहे. यात तीळमात्रही शंका नाही. पण त्यांची केस जरा समजून घ्यावी ( म्हणजे ढील द्यावी )  म्हणून जेव्हा ते स्टार प्लसच्या सिरिअल्सचा वास्ता देतात तेव्हा मात्र खरंच एकता कपूरला उलटं टांगल्याशिवाय पर्याय नाही हे मनोमन पटते!
व्हायोलन्स अँड क्राइम वरून मला नेहमी डेरिल आठवतो. आम्ही केस तपास कामात इथल्या स्पेशालिस्ट पोलीस टीम बरोबर बऱ्याच वेळा जातो. डेरिल हा सगळ्यांचा आवडता पोलीस ऑफिसर --कामात निपुण पण वर्दीचा बडेजाव नाही. उंच, धिप्पाड आणि हसतमुख. अगदी सिरिअस केस असेल आणि इक्विपमेंट लागणार असतील तरच ऑफिसची गाडी वापरणार. एरवी सायकल, पायी किंवा पब्लिक ट्रान्स्पोर्ट. अशाच एका व्हिजिटवरून परतताना गप्पा चालू होत्या. मी त्याला म्हणाले,
"तुला भारताबद्दल बरेच माहीत आहे." 
"काय करणार ... माझी बायको पंजाबी आहे आणि मी बऱ्याच वेळा भारतात गेलो आहे ... "
 मग काय मुंबई, ताजमहाल, इंडिअन करी ... असे विषय निघता निघता हिंदी सिनेमा आलाच! डेरिल अगदी लाल होऊन हसत सांगत होता. 
"पहिली भारतभेट ... रीनाच्या घरी जेवून सगळे बसले होते, तिला जुने सिनेमा आवडतात म्हणून मदर इंडिया पाहत होतो. मला सिनेमापण कळत नव्हता आणि सगळे एवढे का रडतात -- सिनेमातले आणि घरातले -- तेही कळत नव्हते. नुकतेच ट्रेनिंग संपल्यामुळे त्या बाईने ती बंदूक नीट धरली आहे का, तिला पेलवेल का असा विचार करत, अग्ग बाई एवढी ओरडू नकोस; फोकस जाईल. असे ओरडून सांगावेसे वाटत होते. पण तिथे बसलेल्या कोणालाच माझ्या डोक्यातल्या या कश्मकशबद्दल सांगता येत नव्हते! आज वीस वर्षांनी मला तिची भाषा कळते, सिनेमेही कळतात. पण लोक, सिनेमातले आणि (आता) माझ्या घरातले का असे डायलॉग मारून, ओब्सेसिवली का रडतात -- ते अजूनही उमगत नाही!"
डेरिल, अरे तो मॅजिक फॉर्म्युला  तुला कळला तर नोकरी सोडून तू नक्की हिंदी सिनेमात काम करशील ( नाही तरी  टॉम आल्टरचा ब्रिटिश अधिकारी बघून आम्ही थकलो आहोत.
सिनेमाची तिकिटे परवडत नाहीत म्हणून इथेही पायरेटेड सीडींचा व्यवसाय मोठा आहे. कुठल्याही आशियाई विभागात गेलात तर पाच पौंडाला पाच सीडी मिळतात. मी इथे आल्यावर नोकरी करत पुढे पीएचडी करायचीच या विचाराने पैसे साठवून आधी लॅपटॉप घेतला . पण त्याचा उपयोग मात्र नवीन-जुने, राहून गेलेले सिनेमा पाहण्यातच केला हे सांगणे नलगे! नवीन शहरात, नवीन लोकांमध्ये जाणवणारा एकाकीपणा या सिनेमांनी खूप अंशी दूर केला आणि अगदी डिप्रेसिंग थंडीत एका आपलेपणाची मानसिक ऊबही दिली!  अशी भावना असणारी मी एकटी नाही. अजूनही इथल्या एक्स=पॅट किंवा इतर देशातल्या मित्र मैत्रिणीशी (थँक्स टु फेसबुक) गप्पा होतात तेव्हा हा हिंदी सिनेमाशी असणारा बाँडिंग फॅक्टर खूप जाणवतो. सिनेमाचे रिव्ह्यू बघायला आता टाईम्स लागत नाही.. फेसबुकच्या अपडेटसने सर्व पैलूंची  समीक्षा कळतेच. आणि जोडीला महिन्यातून एकदा लंच टाइम मध्ये आमच्या इंडिअन ग्रुप मध्ये बसले की सैफ चे नवे प्रकरण, फराह खान ला ट्रिप्लेटनंतर येणारे प्रॉब्लेम्स, शाहरुख आणि करण जोहरचा  चा सिनेमा विकण्यासाठीचा नवीन स्टंट, जोधा अकबरचा इंडिअन ज्वेलरी बाजारावरचा परिणाम अशा सगळ्या जिव्हाळ्याच्या बातम्या कळतात. आणि फराह खानला किती डिंक लाडू लागतील रिकव्हर व्हायला, यावर एकमत होताना दिसत नाही. अशावेळी परत आपल्या टेबलवर जाण्यात मला शहाणपणा वाटतो!
बॉलीवूड चा हा प्रभाव इथल्या स्थायी झालेल्या ( फक्त भारतीय नाही ) तर आशियाई समाजावर ठळकपणे जाणवतो. कुठल्याही आशियाई भागात ओळीने इंडिअन वेअर च्या दुकानात सगळे जरीकाम केलेले हेवी डिझाइन्सचे कपडे दिसतात--आणि ही दुकाने इथे वाढतच आहेत. साधे सुती कपडे वापरण्यावर आणि त्यातल्या त्यात भारी म्हणजे फॅब इंडियाची साडी किंवा कुर्ता असे मानणारी मी फारच मिसफिट आहे असे वाटते. एकदा एका ट्रेनिंग मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून आलेल्या गिल शी चांगली गट्टी जमली. तिला नंतर घरी बोलवताना पत्ता सांगितला. 
"अरे तू इल्फर्डला राहते, मला तिथे नवीन एक दुकान सुरू झाले आहे, तिथे यायचे होते." म्हणाली.
आता तोपर्यंत गिल मैत्रीण या कॅटेगरीत आलेली; म्हणून फटकन बोलून गेले, 
"इई! कोण ते कपडे घालत असेल! कळत नाही मला?"
गिल ने मला दिलेला लुक म्हणजे मैत्रीच्या शिखरावरून केलेला कडेलोट असा होता!!!
असाच एक शनिवार- सगळी कामे आटोपून काहीतरी छान बघावे असा विचार करून इस्ट हम मधल्या एका व्हिडियोच्या दुकानात गेले . सरकार नुकताच  रिलीज झाला होता. 
कौंटरवरच्या पंजाब्याने हसून विचारले, "कुठला सिनेमा बघायचा आहे?" 
मी त्याला विचारले, "सरकार आहे का? "
"फोटो प्रिंट आहे, चालेल का?" 
"नको."
"... "
"अच्छा वो आपके पास 'समय' का सीडी मिलेगा?" मी.
तो म्हणे, "मैने तो सुना नही."
"अरे वो, उसमे सुश्मिता सेन पोलीस अफसर है."
"नही वो नही है." 
"अच्छा वोह 'कंपनी' का दुसरा पार्ट रिलीज हुआ है, वोह है क्या ?" 
मुंबईत राहिल्यामुळे आणि माझी एक मैत्रीण क्रिमिनॉलॉजी शिकवत असल्यामुळे गँगवॉर आणि अंडरवर्ल्ड हे तसे इंटरेस्टचे विषय. त्यामुळे तो नाही म्हणाल्यावर चेहऱ्यावरची नाराजीची प्रतिक्रिया काही लपली नाही. तो उत्साहाने मला त्याच्याकडच्या नवीन सीडी दाखवू लागला. मी त्याला वैतागून म्हणाले, "मला शाहरुख आणि सलमान नको आहे!" 
उसके चेहरेका हाल बयान नही कर सकते! मी परत जायला निघणार तेवढ्यात त्याने विचारले, "आप पोलीस हो या फिर अंडरवर्ल्डसे जुडे हो?" 
"आपको क्या लगता है?"
"... नही चेहरेसे तो शरीफ लगते हो!"
"... ठीक है अगले बार एक हाथ मे  सिगरेट और दुसरे मे  बोतल ले आवूंगी. आप 'डॉन'का म्युझिक चालू रखना! दोघेही छान हसलो. तेव्हापासून या हरीभाईने जो सीडी मांगा - वोह लाकर दिया !

काही महिन्यानंतरचा असाच एक शनिवार. आपण आयुष्यात काही करत नाही आहोत म्हणून नेहमीप्रमाणे स्वतःवर वैतागले होते! खूप दिवसापासून अरोरा नावाच्या एका मित्राच्या मित्राचे इमेल्स येत होते. लंडनमधल्या भारतीय प्रोफेशनल्सचा एक ग्रुप आहे --त्याची सभासद व्हावे म्हणून आमंत्रण होते. आज जायचे ठरवले. तिथे जाऊन अर्धा तास झाला तरी अरोरा महाशय सोडले तर कोणी यायचे चिन्ह दिसेना. आम्ही लेस्टर स्क्वेअरच्या जवळ असल्यामुळे सिनेमाला जायचे ठरवले आणि अरोरांनी मला इंडिअन प्रोफेशनल नाही पण सिनेवर्ल्ड पासची ओळख करून दिली. फक्त ११ पौंड मध्ये महिनाभर हवे तेवढे सिनेमा बघा!  

घरी आल्यावर माझ्या हाऊसमेट( घरमित्र म्हणूयात ) अन्वरने विचारले.
"मग काय आयुष्याची दिशा  सापडली का नाही?"
त्याला मी सिनेवर्ल्डच्या त्या कार्डाबद्दल सांगितले! नंतरचे सगळे शनिवार आम्ही इमाने इतबारे इल्फर्डच्या सिनेवर्ल्डमध्ये असायचो!
अन्वर त्रिचीचा. पण दोन वर्षे दिल्लीला राहिल्यामुळे हिंदी बऱ्यापैकी बोलायचा ! पण स्त्रीलिंग - पुल्लिंगाचा सतत घोळ. त्यामुळे चतुर रामलिंगमच्या आधीपासून ( श्लोक वगळता ) भाषेचे सगळे जोक्स त्याच्यावर करून झालेले! आला त्याच आठवड्यात मी कोणाशीतरी फोन वर बोलताना 'अरे वैसा मत करना! वाट लगेगी' असे म्हटलेले ऐकले आणि अगदी विस्मयचकित होऊन तुला'मुन्नाभाई भाषा' येते? असे विचारायला आला. तेव्हापासून आमची सिनेमदोस्ती सुरू!
सिनेमाला जायच्याआधी तो वॉर्निंग द्यायचा. 'जोरात हसू नकोस. तू फार जोरात हसतेस.' पण सिनेमा चालू असताना दोन मिनिटांनी त्याला तोच जोक समजावून सांगितला की याचा आवाज सगळ्या थिएटरमध्ये ऐकू यायचा. कारण तोपर्यंत बाकीचे पब्लिक शांत होऊन पुढचा भाग बघत असायचे !
हिंदी सिनेमाचे त्याचे ज्ञान तर फारच अगाध. माधुरी दीक्षित कोण ते माहीत नाही. बऱ्याच वेळा अमक्या हिरोचा तमका सिनेमा असा विषय चालू असायचा आणि नंतर कळायचे अरे हा तर तिसऱ्याच कोणाबद्दल बोलतो आहे. आता 'धमाल' सिनेमामधले शाब्दिक जोक समजावणे सोपे आहे पण 'ओम शांती ओम' बघायला गेलेलो असताना राजेश खन्ना ष्टाईल हा प्रकार कसा समजावून सांगायचा? किंवा 'मनोज कुमार च्या त्या एंट्रीवर का लोक हसले... हे ज्याला मनोजकुमार कोण हेच माहीत नाही त्याला कसे सांगणार. पण असा प्रयत्न सोडला तर तो अन्वर कसला. घरी आल्यावर त्याने स्टोरी लाइन पासून त्यातले सगळे कॅरेक्टर्स समजून घेतले आणि दुसऱ्या दिवशी परत तो सिनेमा बघून आला, एवढेच नाही तर एक महिन्यानंतर त्रीचीला गेलेला असताना त्याच्या बायकोला -- दोन वाक्ये हिंदी येत नाहीत ---घेऊन पुन्हा त्याच सिनेमाला गेला!
मनूही हा सिनेमा बघताना सोबत होती. दोन आठवड्यानंतर मी  एका इंटरव्यूला निघाले होते. थोडी नर्वस होते --तिचा अगदी जेन्युइन प्रयत्न मला चीअर अप करायचा. 
"अरे मम्मा, सच्चे दिल से मांगो तो 'कयामत' भी मिल जाती है!"
मी तोंड विस्फारून व्हॉऽट म्हणाले. मग लक्षात आले की तिला 'कायनात' म्हणायचे होते. 
समजावून सांगायला लागले तर "व्हॉटेव्हर ममा" म्हणून गेली पण. 
असे आणखी बरेच अनुभव ---हिंदी सिनेमा के जैसे इष्टमन कलर मध्ये  - पण पुन्हा कधी 
- क्योंकी पिक्चर अभी बाकी है दोस्तो ....