धार्मिक दहशतवादावर उपाय - सामूहिक धर्मत्याग

धर्माच्या नावाखाली दहशतवादी कृत्यं ही गोष्ट आता नित्याचीच झाली आहे. ही कृत्यं अतिरेकी व कट्टरपंथीय करतात, त्यांना बहुसंख्य सर्वसामान्य अनुयायांचा पाठिंबा नसतो असं म्हंटलं जातं. त्यावरून अतिरेक्यांना धर्मबहिष्कृत घोषित केल्यास त्यांच्या कारवायांना आळा बसेल असंही काहींना वाटतं. अर्थात शस्त्रसंपन्न असलेल्या अतिरेक्यांना त्यामुळे काही फरक पडेल असं वाटत नाही. कारण आपल्याला बहिष्कृत करणारे बहुसंख्य अनुयायी निः शस्त्र असल्यामुळे आपण धर्माच्या नावाखाली आवाहन केलं तर  आपली अवज्ञा करण्याचे धाडस ते करणार नाहीत, धर्माच्या झेंड्याखाली गोळा होतील, याची अतिरेक्यांना खात्री असते. अतिरेक्यांच्या या विश्वासाला तडा गेला तरच त्यांचं मनोबल खच्ची होऊ शकतं.      

त्यासाठी ज्यांना आपल्या धर्मातील अतिरेक्यांच्या हिंसक कारवाया पटत नाहीत त्यांनी त्या कारवाया बंद न झाल्यास आपण आपल्या धर्माचा त्याग करून निधर्मी म्हणून राहू व स्वतःच्या धर्माची तत्त्वं स्वतःच्या बुद्धीनी ठरवू असं सामूहिकपणे जाहीर केल्यास व त्याप्रमाणे कृती सुरू केल्यास अनुयायांच्या संख्येला गळती लागेल या भीतीनी अतिरेक्यांना त्यांच्या धोरणाचा व कारवायांचा फेरविचार करणं भाग पडेल. शेवटी चांगल्या आचरणाची तत्त्वं ही कुठल्या धर्माची मक्तेदारी नाही त्यामुळे ती आचरणात आणण्यासाठी धर्माचं लेबल लावून घ्यायची गरज नाही. आणि रोजच्या सार्वजनिक व्यवहारासाठी संविधान आणि संसदेनी पास केलेले कायदे आहेतच ज्यामुळे हक्क व व्यक्तिस्वातंत्र्य यांचंही रक्षण होईल. मग अमुक एक धर्म, किंबहुना धर्मच असण्याची गरजच काय?