टोचणी.....

भरभर आवरून  नेहमीप्रमाणे ८.५३ ची जलद लोकल मिळावी म्हणून ८.२० ला घर सोडले. नशिबाने रिक्षाही अगदी सोसायटीच्या दारातच मिळाली. " चल रे बाबा लवकर, नाहीतर आज लेटमार्क लागेल. " असे पुटपुटतच मी रिक्षात बसत होते तोच तो म्हणाला, " मॅडम, तुम्हाला कळले नाही का? काहीतरी लोचा झालाय डोंबिवलीला. ठाणा स्टेशनवर ही गर्दी झालीये. "  रोजचा मेला वैताग आहे. कधी गाड्या लेट तर कधी रिक्षाच नाही. तर कधी दोन्हीही नाहीत. एक दिवस वाहनसुख लाभेल तर शपथ.

पण पेपरमध्ये तर काहीच आलेले नाही. ह्म्म्म...., सकाळी सकाळी झाले असेल काहीतरी. ऑफिसच्या वेळातच नेमके हे का घडते?  थोडक्यात आजच्या मस्टरची आशाच सोडा. एका मिनिटात हजार विचार मनात वर्णी लावून गेले. आता स्टेशनवर जावे का बस पकडावी तिनहात नाक्याला जाऊन या दोलायमान अवस्थेत मी होते तोच सोसायटीमधलीच एक मैत्रीण धावतपळत येताना दिसली. तिचीही अवस्था माझ्यासारखीच. काय करूया....  यावर उहापोह होऊन शेवटी तिनहात नाक्यालाच जाऊ असे ठरले. रिक्षावाला ऐकतच होताच, निघालो.

नीतिन कंपनीपासून मधल्या तीन-चार सिग्नलवरील धूर मन मानेल तसा व तितका आमच्या फुफ्फुसात शिरून आम्हाला पावन करून गेला. रुमाल नाका-तोंडावर धरत-खोकत एकदाची आमची वरात  तिनहात नाक्याला पोचली. तिला व मला वेगवेगळी बस हवी होती. त्यात लोकलच्या घोळामुळे भल्या मोठ्या रांगा आधीच लागलेल्या. ऊन डोक्यावर तापलेले अन घामाच्या धारांनी मनाच्या वैतागात अजूनच भर टाकली. पण इलाज नव्हता, चडफडत रांगेत उभी राहिले.

मैत्रिणीची बस आली आणि चक्क तिला चढायलाही मिळाले. तिला पटकन बस मिळाली याचे दु:ख नाही पण आपल्याला मात्र असे चटकन काही मिळत नाही याची कटकट झाली. जाऊ दे,  आता ह्यात नवीन काय आहे. मनाला पण अजूनही सवय कशी होत नाही, याचा अजूनच राग आला. तेवढ्यात  एक बस आली आणि रांगेतली तीन चथुर्तांश माणसे तित गेली. चला निदान शेड मध्ये तरी उभे राहायला मिळाले या आनंदात ( अश्या छोट्याछोट्या गोष्टींचाही अशावेळी जीवाला आनंद होतोच....., आणि त्यांची नोंदही  घेतली जाते,  ) मी आजची पुरवणी काढून वाचायला सुरवात केली.

दोन मिनिटेही गेली नसतील तोच एका लहान मुलाचा अजिजीचा सुर कानावर आला, " मॉंजी, सुबू से कुछ नही गया पेट मे..... बहोत भूख लगी है। पचास पैसा - रुपया दे दो ना.....। ए  मॉं, आपके घरवाले जीये-सुखी रहे, बच्चे फले-फुलेंगे. दे दो ना मॉं......" आवाजातल्या अजिजीने मी कोण पोर आहे ते पाहावे म्हणून पुरवणीमधून नजर हटवली. पाहते तर, चांगला तरतरीत दहा-बारा वर्षांचा एक मुलगा होता. सकाळपासूनची झालेली तकतक त्यात ह्याचे भीक मागणे पाहून डोके सटकले. 

रागाने त्याला सुनावत  म्हटले, " काय रे, शरम वाटत नाही का तुला अशी भीक मागताना? चांगला तर दिसतो आहेस. जरा काम कर की. पण नाही, तुम्हाला कष्ट नकोत. आयते गिळायला हवे. निर्लज्जपणे भीक मागायची की  भागतेय ना. " असे म्हणत मी त्याच्याकडे पाठ फिरवली  आणि पुन्हा पुरवणीत लक्ष घातले. सहसा मी कोणालाही  भीक देत नाही. एकतर यांचे दादालोक ती हडपतात किंवा हेच गांजा-दारू, कशात तरी उडवतात. यांच्या या फालतू गोष्टींसाठी माझा कष्टाचा पैसा गमवायची माझी बिलकूल तयारी नाही. पण अगदीच असहाय जीवाला खायला मात्र मी बरेचदा देते. वाटले हा मुलगाही खरोखरच उपाशी असेल. पैसे देण्यापेक्षा काहीतरी खायलाच द्यावे का? असे मी मनाशी म्हणतेय तोच,

" मॅडमजी  शरम तो बहोत आती है । पन मेरे जैसे सडक पे रहनेवाले को कोई काम देताच नई । " मी त्याच्याकडे पाठ फिरवली असली तरी तो अजूनही चिवट आशेवर तिथेच उभा होता. " का, का नाही देणार कोणी काम तुला? उगाच खोटे बोलू नकोस. तू मेहनत व प्रामाणीकपणे  पडेल ते काम करीन असे म्हणालास तर कोणीही तुला काम देईल. आजकाल किती जणांना घरातले काम करण्यासाठी नोकर मिळत नाहीत. पण तुला सवय लागली आहे ती फुकटचे गिळायची. मग कष्ट कशाला करशील तू?  चल पळ इथून. आधीच सकाळपासून कावलेय मी,  त्यात तुझी भर नको. जा म्हणते ना...... "

तो मुलगा तरीही हलला नाही. आजूबाजूला उभे असलेल्या एक-दोघांनीही त्याला हाकलायचा प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. माझ्या उपेक्षेने असेल किंवा हेटाळणी केली म्हणून असेल, तो थोडासा दुखावला गेला होता. अचानक त्याने मला विचारले, " मॅडमजी, आपके पास काम हैं? जो बोलोगे मैं करूंगा । सचमुच । "  " मला गरज तर आहेच एका नोक........." मला मध्येच तोडत, " तो चलो, अपुन है ना ।  अपुन को रख लो,  चोरीमारी की बुरी आदत बिलकुल नही है । मॉं, तुम जो कहोगी मे सब कर देगा । रातको एक कोने मे पडा रहेगा..... बोलो, रखोगी मुझे? "

त्याचे हे उत्तर मला अपेक्षित नव्हतेच. मी विचारात पडले. खरे तर मला घर-ऑफिस, लेक, त्याचा अभ्यास, येणीजाणी या सगळ्याचा खूप ताण येत होता. कोणीतरी असे हाताशी मिळाले तर हवेच होते. चुणचुणीत दिसतोय. पुन्हा लहान आहे. डोक्यावर बसणार नाही. खाऊनपिऊन असा फार पगारही द्यावा लागणार नाही. लेकाला खेळवेल, शाळेत पोचवेल-आणेल, बराच उपयोगी पडेल.

" काय रे, तुझे आई-वडील कुठे आहेत? तुम्ही राहता कुठे? "
" मॉंजी,  अपुन का मॉं तर कभीच मर गया । मेरेकू तो याद भी नई उसका चेहरा..... और बाप... हां है ना ।  पर मॉं के मरने के बाद उसने दुसरा शादी बनाया, वो और उसकी बिवी धारावी का झोपडपट्टी मे रैता । "
" बरं. मग उद्या तुझ्या आई-बापाला घेऊन ये मी बोलते त्याच्याशी आणि तुला घेऊन जाईन. "
" अरे मॉंजी, क्या आप भी । वो कैसी मॉं और उससे क्या पुछना..... उसनेही तो बापके कान भरभरके मुझे घरसे हकाल दिया नं...... "
" म्हणजे............? "
" एक नंबर की टुच्ची औरत हैं वो । दिनभर मुझे भुक्का मारती  थी, और ढेर सारा काम करवा लेती थी । एक दिन पेट की आगसे झुंझलाकर मै कभी वडा उठा तो कभी पाव, कभी जो हाथ लगे वो  चुराने लगा । करते करते एक दिन पकडा गया । वो हरामी शेठ ने बहोत मारा और पुलिसमे दे दिया । उपरसे घरमेंभी बोल दिया । पुलिसको मॉंने बोल दिया, इसको हम नही जानता । फिर क्या जेल मे रहा, छुटने के बाद कुर्ला ठेसन पे बुटपॉलीश करने को चालू किया । पर वो पहले से बुटपॉलिस करते लोग ने मारके वहासें भगाया । फिर एक दादा ने पकडा और भीख मांगने के धंदे मे डाल दिया । अगर पैसा मिलेगा तो वो हडप लेता हैं । पर दोन वक्त पेट को तो डालता हैं.... मॉंजी, ये सुनके घबरा नको । मैं बुरा नही.... पेट के वास्ते चोरी किया था । तुमको कभी धोका नही देगा..... एक बार रखके तो देखो नं मुझे । "

हे ऐकले आणि मन कचरले. मी तर याला ओळखतही नाही. कोण कुठचा, चोरीमारी करून सजा काटून आलेला आणि याला घरात घेऊन जाऊ? म्हणजे स्वतःहून चोराला  निमंत्रण देण्यासारखेच की . नको बाई या भलत्याच भानगडीत पडायला. दया-उपकार करावेत, काम द्यावे-सुधारण्याची संधी द्यावी हे सगळे बोलण्यापुरतेच असते. कुठून याला फुकटचा उपदेश पाजायला गेले असे मला झाले.

" अरे, मी तुला ठेवूनही घेतले असते रे. पण सध्यातरी माझ्याकडे एक बाई आहे. ती सगळे काम नीट करते. मग तू काय करणार आणखी. त्यापेक्षा, हे घे वीस रुपये आणि पुन्हा बुटपॉलीशचा धंदा सुरू कर. नाहीतर काहीतरी वीक ना लोकलमध्ये. तुझ्यासारखी बरीच छोटी छोटी मुले विकत असतातच की . घे. त्या तुझ्या दादाच्या हाती लागू देऊ नकोस. घे न. " असे म्हणत मी विसाची नोट पुढे केली.

मी त्याला घरी घेऊन जाईन या त्याच्या आशेलाच असा सुरुंग लागलेला पाहून तो चिडला. इतका वेळ आपल्याला झापणारी, वर डोस पाजणारी ही बाई स्वत: मात्र मला कामाला ठेवून घ्यायला तयार नाही हे त्याच्या जीवाला लागले. विसाची नोट माझ्या अंगावर फेकून तडकून म्हणाला, " वो मॅडम, खालीफोकट साला मेरा टाइम बरबाद कर डाला ।  उपरसे इत्ती  सारी  फालतू की सीख झाडदी । खुद पे आयी तो तुम कलटी मार दी । इत्ता  तो सच बोल दिया मैं पर तुमको तो अपुनपे भरौसाच नही । ये तेरा बीस रुपया और पाठ नई मांगता ।  पचास पैसा-रुपया भीख दे दो मुझको, मै जाताय । अपुन के पास ये बकवास सुनने का  टाइम नई हैं । साला, जो उठता हैं अपुनको जुते मारता हैं । मदत कोई नई करता । " असे म्हणून मला आरसा दाखवून तो आला तसा गर्दीत हरवून गेला.

सगळा दिवस मी स्वत:चा छळ करून घेतला. कोणालाही फुकटचा सल्ला देण्याआधी मी त्या समस्येवर उपाय देऊ शकते का? सोडवणूक करू शकते का, याचा  विचार करायला हवा. आणि तसे करू शकत नसेन तर किमान हिणवणे, झापणे तरी करता नये. मुळात अडचण समजून घ्यायला हवी, त्यासाठी तेवढा वेळ हवा. शिवाय, ती समजली तरी तिचे समाधान- निराकरण करणे आपल्याला शक्य असेलच असे नाही . तेव्हा ही उपदेशाची पोकळ ढोंगबाजी बंद. असे ठरवून मी त्या संवादावर पडदा टाकला खरा पण मनात कुठेतरी स्वत:च्या  दुट्टपीपणाची - दांभिकपणाची  टोचणी लागली . आज बारा-तेरा वर्षे झाली तरीही ती सलतेच आहे.