आम्हीच श्रेष्ठ !!!

अमेरिकन वा इतर पाश्चिमात्य देशातील कोण्याही शास्त्रज्ञाने एखादा शोध लावला की आम्ही भारतीय लगेच पुढे सरसावतो. जुन्या पुराण्या (कधीच न वाचलेल्या) पोथ्या काढतो... त्यावर काथ्याकूट करतो आणि मग सांगतो, "बघा हा शोध आमच्या पूर्वजांनी आधीच लावला होता ".

शोध आधीच लावला होता, हे जरी मान्य केलं, (त्याशिवाय हि मंडळी ऐकतच नाही), तर मग तुम्ही इतके वर्ष काय झोपा काढत होते का ?

भारतीय वंशाच्या ..... ची भरारी. कसला वंश ? तो त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारून कधीचाच अनिवासी (आणि ९९ % परत कधीही न येणारा) भारतीय (? ) झालेला असतो. त्याला स्वतःची भाषा सुद्धा धड बोलता येत नाही, त्याचे कौतुक ? अन अश्या लोकांच्या पुन्हा पुन्हा बातम्या ?

आपण खरंच इतके लाचार झालो आहोत ? २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणाऱ्या परशुरामाचे वंशज ना आपण ? (आता पोथ्या बाजूला ठेवून, असं काही नाही म्हणू नका)... मग कशाला परदेशी लोकांच्या संशोधनाला नाकारता ?

संगणक क्षेत्रात ३० (? ) % भारतीय आहेत, मग एखादी ऑपरेटिंग सिस्टम बनवायला काय हरकत आहे ? का काहीतरी बनवायचं अन विकून मोकळं व्हायचं अन टेंभा मिरवायचा की संगणक क्षेत्रात भारतीय पुढे आहेत. स्वतःच्या देशात तंत्रज्ञानाची वानवा अन दुसऱ्या देशात जाऊन चमकले की आम्ही आहोतच "मूळ भारतीय" किंवा "भारतीय वंशाचे" म्हणवून घ्यायला.

आता बस्स झालं. जि मंडळी ज्या देशात काम करत आहेत, तिथल्या लोकांना त्यांचा अभिमान वाटू द्या. कारण त्या देशांनी त्यांना सुविधा पुरवल्या आहेत, आपण नव्हे.

आपले पूर्वज श्रेष्ठ होते ह्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्या हेच वाक्य म्हणतील असं काही करू.