नाही कुणी कुणाशी बोलावयास राजी
प्रत्येक मावळ्याचा झाला म्हणे शिवाजी
दिसतात खूप सारे श्रीराम आणि बाजी
दुर्मीळ मात्र झाले सौमित्र अन् चिमाजी
झटपट तलाक घ्यावा, मग सोयरीक ताजी
थैल्या करा रिकाम्या, मिळतील कैक काजी
अपुल्याच माणसांवर त्वेषात वार करती
परकीय बेगमांना मुजरा, सलाम, हा जी
दुर्दैव, माणसांची पारख तुम्हास नव्हती
केलात, शंभुराजे, कैसा जवळ जिवाजी?
जाता समीप उंची उमजेल जीवघेणी
लांबून खूप सुंदर वाटेल शैलराजी
त्याचीच आकृती ही मोहक, खुणावणारी
वाटे, हरून नेण्या, आला सखा यमाजी