द्रोहपर्व - एक फसवणूकपर्व

अजेय झणकर यांची 'द्रोहपर्व' ही "ऐतिहासिक" कादंबरी नुकतीच कशीबशी वाचली. तिचे नाव
फसवणूकपर्व असते तर योग्य ठरले असते. लेखकाने आणि राजहंस प्रकाशनाने मिळून वाचकांची
केलेली फसवणूक असे त्याचे थोडक्यात वर्णन करता येईल.
त्या फसवणुकीतही राजहंस
प्रकाशनाचा वाटा मोठा, कारण दर्जेदार वा अभिजात लिखाणाचा आरोप अजेय झणकरांवर कुणी
करणार नाही. 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' लिहून अरुण साधूंनी मराठी वाचकांच्या
उंचावून ठेवलेल्या अपेक्षा एका झटक्यात भुईसपाट करण्याचे काम झणकरांनी 'सरकारनामा'
लिहून केले होते हे माहीत होते. पण असे वाटले की जसा एखाद्याचा कर्तृत्वाचा बहर
असतो तसाच एखाद्याच्या फालतूपणाचाही बहर असतो. तो ओसरल्यावर तरी किमान सामान्य
दर्जाचे लिखाण पदरात पडेल. पण निराशाच झाली.
इथे झणकरांनी हात घातला आहे तो
पानिपतोत्तर पेशवाईतील घटनांना.
'पेशवाई' ही एक देदीप्यमान, आदरणीय, सत्शील आणि
नैतिक राजवट होती अशी अंधश्रद्धा महाराष्ट्रातील मध्यमवर्गात बोकाळलेली आहे. तिला
कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. पण त्याबद्दल सविस्तर नंतर
केव्हातरी.

सत्यदर्शी पात्रयोजना, त्या
पात्रांच्या विश्वास बसावा अशा हालचाली, इतिहासास माहीत असलेल्या व्यक्तींचे
मानसशास्त्रीय विश्लेषण, सर्वच ठिकाणी  लेखकाने माती खाल्ली आहे.
लेखकाने
स्वतःचे असे निर्मिलेले पात्र म्हणजे तुळजा. खोपोलीजवळच्या बिरपाड्यातली
तुळजा.
तिची माय काय करायची, तर तान्ह्या तुळजेला पाठुंगळी मारून जंगलात
हिंडायची. कशासाठी? तर जांभळं, करवंदं, चिंचा, बोरं आणि 'उरली सुरली' फळं घेऊन
येण्यासाठी. आता १७४०-५० च्या दरम्यान ती माउली हा उद्योग कशासाठी करीत असेल बरे?
या सर्व वस्तू विकण्यासाठी ना तेव्हा खोपोलीचा यष्टी ष्टँड होता ना कर्जतचे ठेसन.
आणि तेव्हाचे बिरपाड्यातले रहिवासी अशा "जगावेगळ्या" वस्तूंसाठी तुळजाच्या मायेवर
अवलंबून असतील अशी लेखकाची कल्पना असेल तर पुढे बोलायलाच नको.
तर ही अशी तिची
माय तुळजा लहान असतानाच प्रसूत होताना निवर्तली. त्या प्रसंगाचे वर्णन सूचक नसून
बटबटीत आहे.
त्या पाड्यावरच्या नाईकाचा, तिच्या तात्याचा, थेट नाना फडणिसांकडे
राबता असणार, तिची माय गेल्यावर तात्या तिला सरळ शनिवारवाड्यावर नानांकडे नेऊन रुजू
करणार, मोजून चार प्रश्न विचारल्याबरोबर नाना "तुझी पोरगी हुशार तर आहेच, पण ती
तल्लख बुद्धिमत्तेचीसुद्धा आहे. तिला इथे नको, माझ्या वाड्यावर ठेवून घेतो.
दौलतीच्या कार्यात उपयोगी पडेल" असे जाहीर करणार.
नानांचे स्त्रियांच्याबाबतीतले
वर्तन तेव्हा पुरेसे कुप्रसिद्ध होते. पुढे कादंबरीत त्याचा उल्लेखही आलेला आहे.
असे असताना एक बाप स्वतःच्या मुलीला स्वतःच्या पाड्यावरून आणून नानांना पेश करतो.
नाना"दौलतीच्या कार्यासाठी" तिला आपल्या वाड्यावर नेतात. 'दौलतीचे कार्य' जर
नानांच्या वाड्यावरून चालत होते तर शनिवारवाड्यातून काय चालत होते? लाईट अँड साउंड
शो?
आणि एवढे स्पष्ट बोलून झाल्यावर नाना तिला ठेवतात कुठे, तर
शनिवारवाड्यावरच.
ही तुळजा गंगाबाईच्या (नारायणरावाच्या बायकोच्या) दिमतीला दिली
जाते. 'भले बुद्धीचे सागर नाना' शनिवारवाड्यात चाललेल्या हालचालींवर नजर
ठेवण्यासाठी तुळजावर अवलंबून राहतात, रोज सकाळी बेलबागेत तिच्याकडून अहवाल घेतात,
आणि एवढे असूनही शनिवारवाड्यातील खलनायकमंडळींना मात्र त्याच्या अजिबात सुगावा लागत
नाही. 'खल' या शब्दाचा अर्थ केवळ 'दुष्ट' असा नसून 'मूर्ख' असाही असतो हे माहीत
नव्हते.
आणि गंगाबाईच्या खाजगी सेवेत असताना तुळजाला बाहेरच्याही सगळ्या गोष्टी
कळणार. तुळाजी नावाचा खलनायक खुद्द नारायणरावाच्या रपेटीच्या घोड्याचा खूर तोडतो,
ते लगेच तुळजाला कळणार आणि ती ते घोडे बदलायची व्यवस्था करणार.
नारायणरावाच्या
खुनाचा बेत ठरल्याबरोबर तुळजाला खबर मिळते. कशी? केवळ निरीक्षण करून. खलनायक मोरोबा
खलनायक तुळाजीला एक कागद देतो. त्यात "टॉप सीक्रेट" असे काहीही नसते, कारण तो खलिता
नसून केवळ एक घडी केलेला कागद असतो. उघडावा नि वाचावा. तसा खलनायकद्वय तो उघडून
वाचतात. त्यावरून नजर फिरवताना दोघांच्या चेहऱ्यावर विचित्र खुनशी हसू फुटतं. मग
घडी घालून तो कागद शेल्यात ठेवून खलनायक तुळाजी खलनायक राघोबादादांच्या महालात
जातो. खलनायक राघोबादादा कैदेत आहेत. पण पहारेकरी कोण? तर खलनायक सुमेरसिंग आणि
खरकसिंग. ते कागद आत पोहोचवतात. कागदावर राघोबादादांची सही हवी आहे. पण ती
करण्याआधी ते कागद वाचायला आणि आपल्या 'चेहऱ्यावरचे सरसर बदललेले भाव' दर्शवायला
सज्जात येतात. मग ते 'तीक्ष्ण नजरेने तुळाजीकडे रोखून पाहतात' आणि आत
जातात.
राघोबादादांच्या महालापासून दूर तुळजाच्या हातातले कपड्यांचे बोचके पडले
आहे, त्यातल्या कपड्यांच्या परत घड्या घालून ते आवरताना
तिचे निरीक्षण चालू आहे. तिच्या नजरेतच झूम लेन्स बसवलेली असल्याने तिला सर्व तपशील अगदी स्वच्छ दिसतात.
राघोबा
सही करून कागद सज्जात उभ्या असलेल्या तुळाजीला आणून देतात. ते गेल्यावर आनंदीबाई
सज्जात अवतरतात. त्या कागद घेऊन
वाचतात, चेहऱ्यावर हलकेच हसू आणतात, परत चेहऱ्यावर खळबळ दाखवतात, मग क्षणात निःसंग भाव आणतात, कागद घेऊन
आत जातात, काही क्षणांतच बाहेर येतात, परत कागद तुळाजीच्या हवाली करतात, आणि गर्रकन
वळून आत जातात. तो कागद वाचून खलनायक तुळाजीसुद्धा 'भुईकंप झाल्यासारखा
थरथरला'.
आता मात्र तुळजाचे गाठोडे आवरून झाल्यामुळे तिला निघावे लागते. पण
सुमेरसिंग, खरकसिंग, बहादूरखान इ खलनायक मंडळी आपापल्या हालचाली सुरू करत आहेत एवढे
मात्र ती बिनचूक टिपते.
ती बाहेर पडून गाठते ते थेट नानांच्या वाडा. पण
नाना नेमके कुठे बाहेरगावी गेलेले असतात. आता काय? (कैदेत नसलेली) सगळी पेशवेमंडळी
पर्वतीवर गणेशोत्सव आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी गेलेली. तुळजा पर्वती गाठते.  थेट
नारायणरावापर्यंत
पोहोचते. नारायणराव रघुजी आंग्र्यांसोबत काही महत्त्वाची बोलणी करीत आहेत. पण तुळजाला कोण अडवणार? नारायणरावांनी
शनिवारवाड्यावर जाऊ नये असे ती सांगते. पण शेवटी यमाचे बोलावणे जास्त पावरबाज.
"खाशा लोकांच्या मसलतीमध्ये तोंड उचकटून बोलण्याचा अधिकार तुला नाही. आपली मर्यादा
सांभाळ आणि उलट पावली शनिवारवाड्यावर चालती हो" असे नारायणराव तिला चमकावतात आणि
शनिवारवाड्यावर परततात.
त्यांना मारायला आलेले सुमेरसिंग आणि खरकसिंग यांनी आपले
संवाद थेट कादरखानकडून लिहून आणलेले असतात. "देखा! हमें इधर महिनोंसे तनख्वाह नही
मिली और ये दिन दहाडे बेगम के साथ एय्याशी कर राहा है। पेशवा है ना। चलो, जरा उसकी
एय्याशी भी देख लेते है। खोल बे रंडी की अवलाद... दरवाजा खोल।" समोर
आहेत महालातल्या दोन कुणबिणी.
मग "क" दर्जाच्या चित्रपटांत दाखवतात तसा रक्तपात.
नारायणराव, एक ब्राह्मण, दोन कुणबिणी, काही 'निष्ठावंत' सैनिक, दोन गायी इतके जीव
वर जातात आणि शनिवारवाडा गारदी ताब्यात घेतात.
४९२ पानांच्या कादंबरीत तीस पाने
उलटेपर्यंतच एवढा उतमात लेखकाने केलेला आहे.
पुढील भागातील काही मासले -
*
पुरंदरचा किल्ला पुण्याहून साधारण पस्तीस किमी. नाना फडणीसांना घोडेस्वारीचे अंग नव्हते हे लेखकानेही सुरुवातीला
मान्य केले आहे. तर हे नाना 'रोज भरल्या सकाळी उठून पुरंदरास येणं आणि संध्याकाळी
पुण्यास परतणं' हा कार्यक्रम 'बरेच दिवस' राबवत असतात. दिवेघाट वा बापदेवच्या
घाटातून आणि पुरंदरची चढण धरून पालखीच्या भोयांच्या चालीचा वेग तरी किती
होता?
* पण नानांना घोडेस्वारीचे अंग नव्हते हे लेखक नंतर नजरेआड करतो. इंग्रज
चालून येण्याआधी पाहणीला नाना खुद्द महादजींच्या सोबतीने घोडा फेकत राजमाचीपर्यंत
जाऊन येतात.
* पेशवाईतले साडेतीन शहाणे प्रसिद्ध आहेत. त्यातील अर्धे शहाणे
म्हणजे नाना, कारण त्यांना युद्धाचे अंग नव्हते. पण लेखकाचे नाना सर्वगुणसंपन्न
आहेत. ते खुद्द महादजी शिंद्यांनाच लष्करी हालचालींबद्दल मार्गदर्शन करतात.
पुरंदरच्या बचावासाठी वज्रगड किती महत्त्वाचा आहे इथपासून ते कार्ल्याला इंग्रजांना
कसे थोपवावे इथपर्यंत.
*  तुळजाकडे एक कट्यार आहे. नेम धरून ती कट्यार कितीही
अंतरावर बिनचूक फेकणे हा तिच्या हातचा मळ आहे. तिचा जिवलग एका झाडाच्या फांदीवर
बसला आहे. त्याच्या हातात मक्याचे भाजलेले कणीस आहे. तुळजा कट्यार अशी फेकते की
कणसाचे दोन तुकडे होतात. परत कट्यार आणि कणसाचा एक तुकडा या दोन वस्तू जमिनीवर
पडायच्या आधीच झेलायला तुळजा आहेच. रजनीकांत झक मारतो.

स्वपीडनाची प्रवृत्ती
प्रबळ असणाऱ्या इच्छुकांनी पुस्तक मिळवून पूर्ण वाचावे. अशा लोकांसाठी अजून एक
खूषखबर.
"'द्रोहपर्व'च्या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय इंग्रजी चित्रपट,
निर्मितीच्या मार्गावर" असे पुस्तकात जाहीर केलेले आहे.