मराठी चित्रपट दशा आणि दिशा

मराठीमायाच्या बुरुजावरून

एका व्यक्तिच्या दांडग्या इच्छाशक्तीने, जिद्दीने, धडाडीने देशाला चित्रपट निर्मितिची दिशा दिली, करोडोंचा व्यवसाय दिला त्या श्री दादासाहेब फाळकेंच्या मायभूमीत मराठी चित्रपट लावा म्हणून टाहो फोडावा लागतो. सरकारला कायदे करावे लागतात. राजकारणी पक्षांना आंदोलनं उभारावी लागतात हे महाराष्ट्राचं दुर्देव समजायचं का?

एकवेळ मल्टीप्लेक्सवाले जबरदस्तीने म्हणा, कायद्याने म्हणा मराठी चित्रपट आज ना उद्या लावतील, पण ते बघण्यासाठी आजचा चोखंदळ रसिक, तरूण प्रेक्षकवर्ग येईल का? हा खरा प्रश्न आहे ते जे पैसे मल्टीप्लेक्समध्ये, मराठी चित्रपटांसाठी मोजतात त्या मोबदल्यात त्यांना त्या दर्जाचे चित्रपट पाहावयास मिळतात का?

आजचा मराठी चित्रपट म्हणजे काय तर तेच तेच दिसणारे दोन - तीन चेहरे जे सतत टि. व्ही वर नाटकात, चित्रपटात पाट्या टाकत असतात, पैसे मिळतात म्हणून वाटेल त्या दर्जाची कामं करतात व व प्रेक्षकांच्या नजरेतून उतरतात. अशावेळी एखाद्या प्रामाणिक निर्माता, दिग्दर्शकाने चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला तरी लोकं तिकडे लवकर वळत नाहीत कारण त्या कलाकारांची ती पूर्वपुण्याई लोकं विसरलेले नसतात.

हिंदी किंवा दक्षिणेकडील हिरोंना जे वलय आहे ते मराठी चित्रपटातील हिरोंना का नाही ?सामान्य लोकांना चित्रपटातील हिरोंबद्द्ल जे प्रचंड आकर्षण असतं ते मराठी चित्रपटातील हिरोंना का नाही? शारीरिक तंदुरुस्तीबदद्ल किती मराठी हिरो जागरूक असतात? याचा त्यांनी जरुर विचार करावा.

अलिकडेच आलेल्या एका मराठी चित्रपटात एका तरुणाने झाडाला लटकून आत्महत्या केल्याचे दृश्य होते.ते कॅमेरामन,दिग्दर्शकाने इतक्या विविध कोनातून चित्रीत केले होते की आत्महत्येचा आशय लक्षात न घेताच ती फ्रेम सुंदर  कशी दिसेल याचाच विचार त्या दोघांनी केल्याचं स्पष्ट दिसत होतं.अशा अर्थहीन पद्धतीचे एकच नाही तर अनेक चित्रपट आज निर्माण होत आहेत आणि त्यांच्या त्या तसल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी करावी ही अपेक्षा.

चित्रपट हे जरी प्रामुख्याने मनोरंजनाचं माध्यम असलं तरी त्याचंही एक शास्त्र आहे, हे किती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक  आणि पटकथाकारांना ठाऊक आहे? आजकाल कुणीही उठतं, अनुदान मिळतं म्हणून चित्रपट निर्माण करण्याची अपेक्षा बाळगणं मूर्खपणाचंच ठरणार.मुंबई, पुणे, गोव्यात सातत्याने  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतात किती मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार हे चित्रपट बघतात, तर उत्तर आहे अत्यंत कमी, नगण्य, जगात काय चाललंय हे तर सोडाच पण आजच्या समाजाची, तरुणाईची काय आवड निवड आहे याचा कानोसा घेऊन चित्रपट बनवायला हवा हा साधा विचार ही दिसत नाही. हिंदी वाल्यांनी इंग्रजी चित्रपटांची नक्कल करायची. हिंदीवाल्यांची भ्रष्ट नक्कल मराठी चित्रपरटात हे असं किती दिवसं चालणार?

चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम समजलं जातं, त्याचा तो कॅप्टन असतो. मराठीत आज असे कितीतरी दिग्दर्शक आहेत की त्यांना संगीत, पटकथा, एडिटींग, या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचे प्राथमिक ज्ञानसुद्धा आहे की नाही इतपत शंका यावी असे त्यांचे चित्रपट असतात.

आपला तो विषय नाही असे मानून तो विषय समजावून न घेण्याचीच वृत्ती दिसून येते. कित्येक वेळा तर दिग्दर्शकाच्या गैरहजेरीतच चित्रपट एडिटींग टेबलवर तयार होत असतो. याचा व्हायचा तोच परिणाम चित्रपटाच्या गुणवत्तेवर होतो.

आठ - दहा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्टात मराठी चित्रपट १० टक्के लोकांनी जरी बघितला तरी किती कोटींचा निर्मात्यांनी जरुर करुन पाहायला हवी.

मराठी चित्रपटांचा व्यवसाय कोटी - कोटींमधे होत नाही. याचाच अर्थ स्पष्ट आहे की मराठी चित्रपट १० टक्के लोकांपर्यंत एकतर पोहचत नाही किंवा त्यांचा प्रतिसाद नाही. विचारांनी प्रगत असलेल्या महाराष्ट्राला नक्कीच हे भूषणावह नाही.

शेजारच्या दक्षिणेकडील राज्यात त्यांचे चित्रपट प्रादेशिक भाषेत असूनही प्रचंड प्रमाणात व्यवसाय करताना दिसतात. शनिवार, रविवार त्यांचे चित्रपट मुंबईच्या परिसरात गर्दी खेचताना दिसतात. याचा अर्थ त्यांचे चित्रपट ग्रेट असतात असे नाही पण ते प्रेक्षकांची नाडी ओळखून त्यांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. काहीवेळेस तर त्यांच्या हिरोंचे मानधन हिंदीतील सुपरस्टार्सपेक्षाही जास्त असते. त्याच्या उलट परिस्थीती आपल्याकडे आहे. मराठी चित्रपट अजूनही ६० - ७० लाखांच्या पुढे जात नाही. एकदा का एवढं बजेट ठरलं की त्यानुसार्च चित्रपटांची मांडणी केली जाते. यामुळे चित्रपटासाठी आवश्यक असलेले भव्य काल्पनिक विचार रूजण्यापूर्वीच खुरडले जातात. अल्पशा बजेटमध्ये चित्रपट निर्माण करण्याचे बंधन पटकथाकार व दिग्दर्शक आल्याने ते ही वाट्टेल ती तडजोड करून कसातरी चित्रपट संपवतात व आपण एक चित्रपट केला यात धन्यता मानतात. यामुळे धड चित्रपट निर्माण होतो, ना धड  तो लोकांपर्यंत पोहचतो, ना धड तो व्यावसायिक स्पर्धेत उभा राहतो. या दृष्ट चक्रामुळे केवळ चित्रपट व्यवसायानेच नुकसान होत नाही तर अगोदरच दोन हात दूर असलेला मराठी प्रेक्षक अजून चार हात दुरावतो व अल्पशा बजेटमधला. अल्पविचारांनी बनलेला चित्रपट बॉक्स ऑफीसवर अल्पायुषी व्हायला वेळ लागत नाही.

चित्रपट निर्मिती करणं ही एक अत्यंत अवघड, जोखमींनी भरलेली कामगिरी  असते पण त्याकडे अजूनही तितक्या गंभीरपणे न बघितल्याने आज फक्त मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे. दर्जा अपवादानेच.

मराठी चित्रपट इतर भाषिक खास करून दक्षिणात्यांच्या तुलनेत खूपच मागे पडल्याचे दिसून येते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विषयांत नसलेले वैविध्य. कनी बजेट,ढिसाळ पटकथा, कलाकारांचा तोच तोच ठोकळेबाज अभिनय.चित्रपट ज्या कथा - पटकथेवर उभा राहतो; या कथा- पटकथाकारांचे महत्त्व आता तरी मराठी चित्रपट निर्मात्यांनी ओळखून  त्यांना उत्त्तम मानधन,पुरेसा वेळ देऊन विविध विषयांवर लिहिण्यास प्रोत्साहन दिलं तर महाराष्ट्राच्या या सुपीक जमिनीतून नक्कीच उत्त्तम पटकथांची फुलं फुलतील. त्याचा लाभ शेवटी निर्मात्यांनाच होऊ शकतो.

एक चित्र वारंवार पाहण्यास मिळते ते म्हणजे मराठी निर्मात्यांकडे चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आवश्यक बजेट नसते.हे म्हणजे देऊळ बांधायचं व कळस चढवायला पैसे नाही म्हणण्यासारखे झाले. चित्रपटाची प्रसिध्दी हे अत्यंत महत्वाचं अंग दुर्लक्षित झाल्याने चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. चित्रपट पोहोचलाच नाही तर प्रेक्षक कसे येतील? याचा गंभीरपणे विचार करुन निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आवश्यक त्या बजेटची सोय करायला हवी.

अनुदान मिळतं म्हणून जे चित्रपट बनवले जातात त्यात काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांशी चित्रपट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतात. त्यांची नावेही तेवढीच हलक्या दर्जाची असतात.

इंग्रजीत म्हटलं जातं (Titled sold)  नाव विकलं जातं पण आपल्या लोकांना चित्रपटांना नाव देण्यास वेळ असतो कुठे ?

एखाद्या चित्रपटात एखादी लावणी चालली की येणार्‍या जवळपास प्रत्येक चित्रपटात गरज असो वा नसो लावणी हवीच हे कशाचं लक्षण म्हणायचं?याचाच अर्थ असा होतो की वाहत्या गंगेत हात धुवून घ्या.या हात धूवून घेण्याच्या वृत्त्तीमुळेच प्रेक्षकांचा चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टीकोन दूषित होतो हे किती जणांच्या लक्षात येतं. एखाद्याने जर नवीन कलाकृती निर्माण केली व तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर त्या गोष्टीची भ्रष्ट नक्कल न करता आपण ही नवीन दर्जेदार कलाकृती निर्माण करायला हवी हा विचार केला जात नाही.

शेवटी चित्रपट ही एक अनेक कलागुणांनी मिळून बनलेली एक कलाकृती असते.या प्रक्रियेत सामाविष्ट असलेल्या प्रत्येकाने प्रामाणिकपणे,नाविन्यपूर्ण पध्दतीने योगदान दिले तर चांगली कलाकृती निर्माण होणे अवघड नसते फक्त त्यासाठी अंतरी इच्छाशक्ती हवी असते.

काहीतरी भव्य करण्याची जिद्द, झपाटून टाकणारी इच्छाशक्ती. विशाल दृष्टीकोन, नाविन्यपूर्ण कल्पनांना अमलात आणण्याची हिंमत. हे जर नजिकच्या काळात घडून आलं तर जगाच्या पाठीवर मराठी चित्रपटांची दमदार पावलं उमटल्याशिवाय राहणार नाही.