४७. दहशत!

मुंबईतले बाँबस्फोट ही या लेखाची प्रेरणा आहे.

मी स्वत: किती सुरक्षित आहे, तुम्हाला मुंबईत काय दिवस काढायला लागतायेत, सुरक्षा ही वैयक्तिक जवाबदारी की राजकीय, दहशतवादाचं समूळ उच्चाटन कसं आणि कुणी करावं; अशा व्यर्थ दिशेनं प्रतिसाद न देता जर मन:पूर्वक लेख वाचला तर तुम्ही कुठेही आणि कितीही असुरक्षित असलात तरी अत्यंत समर्थपणे परिस्थिती हाताळू शकाल यासाठी हे लेखन.
___________________________________________

विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक निर्विवाद गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तुम्ही कितीही सुरक्षा निर्माण करा जोपर्यंत आपल्याला काहीही होत नाही, मग तो बाँबस्फोट असो की प्रलय, हा उलगडा होईपर्यंत भय कायम राहील; तुम्ही झेड सिक्युरिटीत असा की अमेरिकेचे अध्यक्ष त्यानं जरा सुद्धा फरक पडत नाही.

साखर एक चमचा की दीड, जेवणानंतर गोळी घेतली की नाही किंवा रात्री निजायला उशीर झाला आता सकाळी जाग येईल का? यापैकी कोणतीही गोष्ट भय निर्माण करेल. भय आणि दहशत यात फरक फक्त डिग्रीचा आहे, जे आपण हाताळू शकू असं वाटतं ते टेन्शन आणि जे टेन्शन समूळ हादरवून टाकतं ती दहशत इतकाच फरक आहे पण एकदा आपण हरेक स्थितीत अबाधित आहोत म्हटल्यावर सगळेच प्रश्न संपले.

सरकार सुरक्षा करेल, काश्मीर प्रश्न सुटेल न सुटेल, अल कायदाला म्होरक्या मिळेल न मिळेल, गडचिरोलीत वातावरण निवळेल न निवळेल ते आपल्या हातात नाही; आपण सत्य आहोत, नित्य आहोत आणि प्रसंगानं अस्पर्शित आहोत हे जाणणं हा एकमेव सूज्ञमार्ग आपल्याला उपलब्ध आहे मग इतर कुणी त्याला स्वार्थ म्हणो की आत्मकेंद्रितता, ते अज्ञानी माणसाचं परिस्थितीचं आकलन आहे.
___________________________________
प्रणय आणि भय या दोन आत्यंतिक भावनांमध्ये माणसाचं आयुष्य दोलायमान आहे. कळायला लागण्यापूर्वीचा बालपणीचा काळ सोडला आणि त्या वेळी जर अवतीभवती सगळेच प्रेमळ असतील तर या दोन भावना नसतात पण एकदा कळायला लागलं की मिळणारं सुख हिरावून घेतलं जाईल ही भीती आणि मग वयात आल्यावर प्रणयाची आस यात आपण शेवटापर्यंत हिंदकळत राहतो. पुढेपुढे वय वाढल्यावर शारीरिक दौर्बल्य आणि जगण्याच्या असंख्य विवंचनांमुळे प्रणयाची आस कमी होते, तो कैफ राहत नाही आणि मग उरते फक्त भीती, जगण्याचा सारा रंगच उडून जातो.
________________________________

प्रणय ही जशी अस्तित्वागत भावना आहे तसंच भय देखील नैसर्गिक आहे, प्रणय ही निसर्गाच्या पुननिर्मीती प्रक्रिया आहे तर भय ही शरीराला असलेल्या धोक्याची सूचना आहे. सुनामी येण्यापूर्वी तिथल्या वन्यजीवनानी त्या भागातून आधीच स्थलांतर केलं होतं आणि हवामानाच्या इतक्या प्रभावी यंत्रणा आपल्याला योग्य सूचना देऊ शकल्या नाहीत त्यामुळे अपरिमित मनुष्यहानी झाली असं मी वाचलंय.

भय ही मानसशास्त्रीय संकल्पना किंवा शरीराला संभवणाऱ्या धोक्याची सूचना आहे हा बोध आपल्याला त्या संवेदनेचा योग्य उपयोग करून देऊ शकतो, म्हणजे भयानं भयभीत न होता आपण ती संवेदना, तो सिग्नल योग्यप्रकारे डिकोड करून आवश्यक ती उपाय योजना करू शकतो.

भय ही प्रणयासारखीच नैसर्गिक संवेदना आहे पण ती शारीरिक धोक्याची सूचना आहे. आपल्याला धोका वाटण्याचं कारण  गोंधळून गेल्यानं  आपण ती संवेदना योग्य रीतीनं डिकोड करू शकत नाही हे आहे. स्वत:ला शरीरच समजत असल्यानं आपण आपल्यालाच धोका आहे असं समजतो आणि मग उपाय योजनेची दिशा चुकते. खरं तर शरीर जगवणं (किंवा त्याचा मृत्यू) ही निसर्गाची जवाबदारी आहे आपण निसर्गाकडून मिळालेली संवेदना योग्य रीतीनं डिकोड केली तर शरीराचं जगणं आणि मृत्यू दोन्हीही सुखाचे होतील.

शरीराला जर मृत्यू यायचा असेल तर भयाची संवेदना तीव्रतेनं येईल आणि त्यावेळी प्रसंग हाताबाहेरचा असेल, अशा स्थितीत मृत्यूचा स्वीकार करणं सुखाचं होईल, मृत्यू शरीर घेऊन जाईल, आपण जसेच्यातसे राहू.

___________________________________

काय असेल या निश्चिंत करणाऱ्या स्थितीच्या बोधाची साधना? ती साधना अशी आहे:

कोणत्याही सुट्टीच्या दिवशी पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास उठा, सुट्टीचा दिवस अशासाठी की तुम्हाला कोणतंही भविष्यकालीन व्यवधान नको. बसल्या जागी मांडी घालून उजव्या हातानं उजव्या पावलाचा वरचा भाग (घोट्याच्या वर) आणि डाव्या हातानं डाव्या पावलाचा वरचा भाग व्यवस्थित धरा. तुमचं शरीर एका स्क्वेअर पोझिशनला येईल म्हणजे पाठ सरळ आणि दोन्ही खांदे गुढघ्यांच्या समान रेषेत येतील. आता पिंगा घालतात त्याप्रमाणे शरीराचा वरचा भाग उजवीकडून डावीकडे नेत गोल फिरवायला सुरुवात करा.

तुमचं डोकं सहा पॉंईंट्स मधून जायला हवं. १) उजवा गुडघा २) शरीराच्या बरोबर मध्ये समोरच्या जमिनीलगत ३) डावा गुडघा ४) डावा खांदा ५) मानेच्या मागचा भाग आणि ६) उजवा खांदा.

या रोटेशननी तुमच्या शरीराचा वरचा भाग आणि मान मोकळी व्ह्यायला लागेल, तुम्ही बसलेले असल्यानं चक्कर येणार नाही आणि तुम्ही निर्धोकपणे रिपीटीशन्स करू शकाल. दहा, बारा, पंधरा तुम्हाला हव्या तितक्या आणि सुखावह वाटतात तेवढ्या रोटेशन्स करा. त्यानंतर त्याच पोझिशनमध्ये फक्त तीन किंवा चार रोटेशन्स डावीकडून उजवीकडे (पहिल्या पिंग्याच्या विरुद्ध क्रमानं) करा.

या प्रक्रियेचा हेतू शरीराचा वरचा भाग (मुख्यत: पाठ) आणि विशेषत: मान रिलॅक्स करणं आहे त्यामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तप्रवाह मिळू लागतो, मेंदूचा रक्तप्रवाह मानेच्या मागचा भाग रिलॅक्स होण्यावर अवलंबून असतो.

यानंतर आपण ‘होकार’ देतो त्याप्रमाणे प्रथम उजवा कान उजव्या खांद्याकडे आणि मग डावा कान डाव्या खांद्याकडे प्रत्येकी तीन-चार वेळा नेऊन आणि त्यानंतर ‘नाही’ म्हणतो त्याप्रमाणे हनुवटी प्रथम उजव्या आणि नंतर डाव्या खांद्याकडे तीन-चार वेळा नेऊन मान संपूर्ण शिथिल करा.

आता उठून एक कप पाणी (दोनशे मिली) पिऊन नंतर चहा करायला ठेवा. मग एक फुल कप कडक चहा (कॉफी असेल तर अर्धा कप) आणि दोन कोणतिही चांगली बिस्कीटं यांचा शांतपणे आस्वाद घ्या.

आता शांतपणे मांडी घालून आणि सुखद अशा कुशन्सला पाठ टेकून घरातल्या सर्वात शांत जागी बसा (बेडरूम, हॉल, बाल्कनी काहीही चालेल). सभोवताली संपूर्ण अंधार हवा आणि डोळे मिटलेले हवेत. वेळ साधारण पहाटे साडेचारची हवी.
_____________________________________
आता हे मेडिटेशन :

या संपूर्ण अस्तित्वात एक अदृश्य पण अत्यंत सघन असा उभा तोल आहे, द व्हर्टिकल इक्विलिब्रीयम. प्रत्येक व्यक्त गोष्टीच्या बरोबर मधून एक सरळ उभी रेघ गेलेली आहे. या रेषेला अध्यात्मात साक्षी म्हटलंय.

ही रेष आपल्या मेंदूच्या बरोबर मधून वरून सरळ नाभी आणि पाठीचा कणा यांच्या मधल्या भागातून ऍनसपर्यंत आली आहे, या सरळ रेषेशी संलग्न व्हा. एका क्षणात तुम्हाला लक्षात येईल की शरीर बसलंय आणि आपण शरीरापासून वेगळे आहोत.

 आपण पदार्थ नाही, अपदार्थ आहोत. आपण व्यक्ती नाही तर तो अदृश्य पण सतत उभा असलेला तोल आहोत. या तोलाशी संलग्नता तुम्हाला भय मुक्त करेल कारण कोणत्याही हादऱ्यानं काहीही हालेल पण हा तोल तसाच राहील.

या तोलाचं विस्मरण भयाच्या सूचनेचं भीतीत आणि प्रसंगी दहशतीत रूपांतर करतं पण एकदा हा तोल सापडला की आपण विदेह होतो. एका अर्थानं नाहीसे होतो आणि एका अर्थानं एकसंध होतो, अभंग होतो.

इकहार्टनी म्हटलंय साक्षात्कार झाल्यापासनं मला अनेकाअनेक अनुभव आले आणि गेले पण एक अभिन्न शांतता मला सदैव साथ करत असते. ही शांतता म्हणजे अस्तित्वात असलेलं हे अंगभूत, निर्वैयक्तिक स्थिरत्व, याच्याशी एकरूप व्हा, तुम्ही ते स्थिरत्व व्हाल.

 घटना आणि प्रसंग या पदार्थाच्या पदार्थाशी घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सर्व घटना आणि प्रसंगात एक अदृश्य तोल कायम असतो आणि तो तोल नेहमी आपण असतो!

संजय 

 पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १